उरणला जलमार्गाने मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का आणि करंजा ते रेवस या दोन्ही रो-रो सेवांचे काम रखडल्याने या रो-रो सेवांचे भवितव्य अधांतरीतच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दोन्ही रो-रो सेवांसाठी जवळजवळ १०५ कोटी रुपये शासन खर्च करणार आहे. यामध्ये मोरा जेट्टी ७५ कोटींची तर करंजा रेवस २५ कोटींचे काम होते. या मार्गावरील कामाच्या दिरंगाईमुळे खर्चात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्वी करंजा रेवस रो-रो साठी १०.५ कोटींची मंजुरी होती, मात्र त्या कामात दिरंगाई झाल्यामुळे हेच काम २५ कोटींपर्यंत वाढ झाली होती आत्ता पुन्हा एकदा या कामात ५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या मोरा-भाऊचा धक्का या रो-रो सेवेचे काम देखील याच धर्तीवर आहे. मागील सहा महिन्यांपासून हे काम बंद स्थितीत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
२०१८ ला मंजूर झालेल्या मोरा (उरण) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यानच्या रो-रो सेवेचे काम रखडले आहे. मागील वर्ष भरापासून या जेट्टीवर एकही दगड पडलेला नाही. सागरमाला योजनेतूनच हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी ८८ कोटी ७२ रुपयांचा आराखडा बनविण्यात आला होता मात्र ७५ कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले. गेल्या वर्षी या जेट्टीचे काम देखील सुरू करण्यात आले होते, मात्र सध्या हे काम बंद आहे. उरण धील नागरिकांसाठी आपल्या खासगी वाहनांसह
मुंबईत येजा करता यावे, याकरिता मोरा ते मुंबई रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील भाऊचा धक्का येथील जेट्टीचे काम पूर्ण झाले आहे.
उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानच्या रो-रो जलप्रवासात उरणच्या नागरिकांना आपली चार व दुचाकी वाहन घेऊन मुंबईत जाता येणार आहे. या सागरी मार्गावर रो-रो सेवेसाठी २५ कोटी रुपये खर्च करून उरणच्या करंजा बंदरात रो-रो ची स्वतंत्र जेट्टी तसेच तिकीट घर, कार्यालय व वाहनतळ आदींची उभारणी करण्यात आली आहे. मात्र अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम अपूर्ण असल्याने ही सेवा रखडली आहे.
भारत सरकारच्या सागरमाला योजनेतून रस्त्यावरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी जलवाहतुकीला प्रोत्साहन दिले जात आहे. करंजा ते रेवस रो-रो ची नव्याने निविदा काढण्यात आली आहे. तर मोरा जेट्टीचे काम लवकरच सुरू करण्यात येऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
- सुधीर देवरे
(कार्यकारी अभियंता महाराष्ट्र मेरीटाइम मंडळ)