उरणमध्ये युरियाची टंचाई; कृषी विभागाचा बेजबाबदारपणा; शेतकरी हवालदिल  प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

उरणमध्ये युरियाची टंचाई; कृषी विभागाचा बेजबाबदारपणा; शेतकरी हवालदिल

तालुक्यात सध्या युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून हक्काच्या खतासाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

Swapnil S

उरण : तालुक्यात सध्या युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून हक्काच्या खतासाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने उरण तालुक्यातील भातपिके उत्तम स्थितीत असून सध्याच्या काळात पिकांना खताची अत्यंत गरज आहे. मात्र, तालुक्यातील एकाही कृषी केंद्रावर खत उपलब्ध नसल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.

खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने १५ ऑगस्ट २०२६ पासून 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' (एफएफएस) ही नवीन ऑनलाइन खत विक्री प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीनुसार शेतकरी आयडी किंवा आधार कार्डच्या मदतीने ॲपवर लॉग इन करून पिकाच्या गरजेनुसार खताची मागणी नोंदवून मिळालेल्या क्यूआर कोड किंवा टोकन क्रमांकाद्वारे खत खरेदी करणे अपेक्षित आहे. परंतु ही ऑनलाइन पद्धत अत्यंत किचकट असून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनच उपलब्ध नाहीत. त्यातच प्रत्यक्ष दुकानांमध्ये खत उपलब्ध नसल्याने या नव्या प्रणालीचा शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

शेतकरी दुहेरी संकटात

उरण तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक असून त्यांची शेती गुंठ्यांवर आधारित आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण खताची पिशवी खरेदी करणे लहान शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे पिकांच्या गरजेनुसार कमी प्रमाणात खत न मिळणे आणि त्यातच बाजारात खताचा तुटवडा असणे यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांमधून तीव्र संताप

उरण तालुक्याच्या कृषी अधिकारी अर्चना सूळ ननावर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे कृषी केंद्र चालकांना खत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत; परंतु ते विक्रेते खत आणण्यास नकार देत असल्याचे त्यांनी सांगितले.

भातशेती धोक्यात

उरण तालुक्यातील कृषी विभागाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराबाबत शेतकऱ्यांच्या आधीपासूनच अनेक तक्रारी आहेत. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभही सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप होत आहे. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात खतांचा तुटवडा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे उरणमधील भातशेती धोक्यात आली असून, आता खतासाठी दाहीदिशा भटकणाऱ्या शेतकऱ्यांनी दाद कोणाकडे मागावी, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मेट्रोमुळे रेल्वेचे प्रवासी घटले! पहिल्या तिमाहीत लोकलच्या प्रवाशांमध्ये ४४.६५ लाखांची घट; AC लोकलच्या प्रवाशांमध्ये ४१ लाखांची भरघोस वाढ

Navi Mumbai : ऐन सणासुदीत नारळ महागला; प्रतिनग १५ ते २० रुपयांची वाढ, पुढील २-३ महिने दर चढेच राहण्याची शक्यता

Pune : मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा; पंतप्रधानांचे छायाचित्र भिंतीवरून काढले

परवानगी नाकारल्याने आजचा OBC मोर्चा रद्द - नवनाथ वाघमारे

विविधता हेच भारताचे सौंदर्य - मोहन भागवत