Navi Mumbai : धारण तलावात हजारो मासे मृत; प्रदूषण आणि अस्वच्छतेमुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा दावा 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

Navi Mumbai : धारण तलावात हजारो मासे मृत; प्रदूषण आणि अस्वच्छतेमुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा दावा

वाशी येथील मिनी सी शोर (जुहू चौपाटी) परिसरातील धारण तलावात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : वाशी येथील मिनी सी शोर (जुहू चौपाटी) परिसरातील धारण तलावात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावाच्या पाण्यावर हजारो मृत मासे तरंगताना दिसत असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या आठवडाभरात तलावाच्या पाण्याचा रंग बदलला असून किनाऱ्यावर फेस साचलेला दिसत आहे. या बदलामुळे तलावातील पर्यावरणीय समतोल बिघडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाशीतील मिनी सी शोर परिसर हा नवी मुंबईतील नागरिकांसाठी लोकप्रिय फिरण्याचे ठिकाण असून येथे संध्याकाळच्या वेळी मोठी गर्दी असते. काही वर्षांपूर्वी या तलावात बोटिंग सुविधा देखील सुरू करण्यात आली होती; मात्र ती पुढे बंद पडली.

कांदळवन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रदूषण, पाण्याची पातळी कमी होणे आणि वाढते तापमान ही संभाव्य कारणे असू शकतात. या प्रकारामुळे पर्यावरणीय संतुलनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

वातावरणातील बदलामुळे पाण्यावर शेवाळ वाढले असून त्यामुळे माशांना प्राणवायू कमी प्रमाणात मिळाल्याने हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.
अविनाश लाड, स्थानिक नगरसेवक
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच यामागील कारण निश्चित होईल.
सुखदेव येडवे, सहाय्यक आयुक्त, वाशी विभाग

मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू

गुरुवारी तलावाच्या सर्व किनाऱ्यावर मृत माशांचा खच आढळून आला. स्थानिकांच्या मते, वाशी खाडीमध्ये शहरातील प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडले जाते. वातावरणीय बदलांमुळे हे पाणी योग्य प्रकारे निचरा न होता तलावात आले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद