प्रतिनिधिक फोटो
संपादकीय

अशांतता माजविण्याचे कुटील कारस्थान

अपघातांच्या, हिंसाचाराच्या घटना देशभर सातत्याने घडत आहेत. या घटनांचे समान स्वरूप संशयास्पद आहे. या घटनांच्या मागे देशात अशांतता पसरवून अराजकता माजविण्याचा प्रयत्न आहे, असे दिसते.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

-केशव उपाध्ये

अपघातांच्या, हिंसाचाराच्या घटना देशभर सातत्याने घडत आहेत. या घटनांचे समान स्वरूप संशयास्पद आहे. या घटनांच्या मागे देशात अशांतता पसरवून अराजकता माजविण्याचा प्रयत्न आहे, असे दिसते. हे सारे नियोजनपूर्वक घडत असून त्यामागे बाह्यशक्तींचा हात असावा, हे स्पष्टपणे जाणवते. बांगलादेशात आंदोलन पेटावे, अराजकता माजावी, यासाठी बाह्यशक्तींनीच मदत केली होती, हे विसरून चालणार नाही.

नमध्ये मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत ज आल्यानंतर गेल्या तीन-सव्वातीन महिन्यांतील काही घटना सामान्य भारतीय नागरिकाला अस्वस्थ करणाऱ्या ठरल्या आहेत. चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी भाविकांच्या बसवर झालेला हल्ला, १२ जून रोजी कठुआ येथे झालेला दहशतवादी हल्ला, १३ जून रोजी दोड्डा येथे काश्मीर रायफल चेकपोस्टवर झालेला दहशतवादी हल्ला, १४ जून रोजी बद्रिनाथ येथील भाविक बस दुर्घटना या सगळ्या घटनांच्या मागे एक समान संशयास्पद धागा होता.

काश्मीर खोऱ्यात ३७० वे कलम रद्द झाल्यानंतर अतिरेक्यांच्या कारवायांना चांगलाच लगाम बसला आहे. मात्र गेल्या चार-पाच महिन्यांत जम्मू विभागात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून होणारे हल्ले अचानक वाढले आहेत. काश्मीरप्रमाणेच सुरक्षा दलांनी जम्मूमधील अतिरेक्यांच्या हालचालींना पायबंद घालण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. जम्मूमधील अतिरेक्यांच्या कारवायांमध्ये अचानक वाढ होत असताना त्याच सुमारास म्हणजे गेल्या वर्षभरात देशभरात रेल्वे मार्गावर अडथळे निर्माण करून रेल्वे अपघात घडवून आणण्याचे अनेक प्रकार देशभरात घडले आहेत. ४ जून २०२३ ते १३ सप्टेंबर २०२३ या काळात रेल्वे मार्गावर विविध प्रकारे अडथळे निर्माण करण्याच्या थोड्याथोडक्या नव्हे, तर २४ घटना घडल्या आहेत. ५ जून २०२३ रोजी ओदिशातील भद्रक येथील रेल्वे क्रॉसिंगवर लाकडाच्या मोळ्या आढळून आल्या. २ ऑक्टोबर २०२३ रोजी राजस्थानातील गंगरार, सोन्याना, चित्तोडगढ या ठिकाणी रुळांवर दगड ठेवल्याचे आढळून आले. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे 'वंदे भारत' एक्स्प्रेस रेल्वे गाडीवर दगडफेकीची घटना घडली. २ जून २०२४ रोजी पश्चिम बंगालमधील मालदा येथे रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. १२ जुलै २०२४ रोजी पश्चिम बंगालमधीलच दुबराजपूर येथे रेल्वे डब्यांची नासधूस केल्याची घटना घडली. १६ जुलै २०२४ रोजी उत्तर प्रदेशातील लालगोपालगंज स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर गॅस सिलिंडर आणि हातोडे ठेवण्यात आल्याचे आढळून आले. १७ ऑगस्ट २०२४ रोजी कानपूरजवळ गोविंदपूर येथे साबरमती एक्स्प्रेसचे २० डबे रुळांवरून घसरले. १८ ऑगस्ट २०२४ रोजी मध्य प्रदेशातील गढाकछपुरा येथे रुळावर १५ २० फूट लांबीचे पाच-सहा लोखंडी रॉड टाकलेले आढळले. २० ऑगस्ट २०२४ रोजी प्रयागराज स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर दुचाकी ठेवली होती. याच दिवशी बिहारमध्ये दानापूर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत रेल्वे सुरक्षा दलाच्या दोन जवानांची हत्या करण्यात आली. २२ ऑगस्ट २०२४ रोजी उत्तर प्रदेशातील मिर्जापूर जिल्ह्यात हमीरपूर येथे स्टेशन मास्टरवर जीवघेणा हल्ला चढवण्यात आला. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राजस्थानातील पाली जिल्ह्यात जवाईबंद आणि विरोलिया स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर दगड ठेवण्यात आले होते. २३ ऑगस्ट २०२४ रोजी उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यात कयामगंज-शमसाबाद स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर लाकडी ओंडके ठेवण्यात आले होते. २८ ऑगस्ट २०२४ रोजी राजस्थानातील बारन जिल्ह्यात रुळावर मोटारसायकलची चॅसी ठेवण्यात आली होती. ३० ऑगस्ट २०२४ रोजी तेलंगणात रंगारेड्डी जिल्ह्यात रुळावर लोखंडी रॉड ठेवलेले आढळले. ९ सप्टेंबर २०२४ रोजी उत्तर प्रदेशात कानपूर जिल्ह्यात रुळावर गॅस सिलिंडर आढळले.

उपरोक्त सगळ्या घटना मुद्दाम तारीखवार व अन्य तपशिलांसह दिल्या आहेत. या सर्व घटनांमागे देशात अशांतता, अस्थैर्य, अराजक पसरविण्याचा स्पष्ट हेतू दिसतो आहे. दिल्लीत तीन वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर खलिस्तानी ध्वज फडकवणे, सुरक्षादलाच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणे यासारखे प्रकार घडले. अग्निवीर योजनेविरोधात उत्तर भारतात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या, चार वर्षांपूर्वी दिल्लीत सीएएविरोधी आंदोलक अनेक महिने रस्ता अडवून बसले होते. याच आंदोलकांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी आपल्यावर गोळीबार करावा, त्यातून हिंसाचार भडकावा असाच हेतू दिल्लीतील शाहीनबाग आंदोलकांचा होता. महाराष्ट्रात बदलापूर येथे दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांनी अनेक तास रेल्वे वाहतूक बंद पाडली होती. देशात सातत्याने अशांतता धगधगत ठेवण्याच्या हेतूनेच हे सारे नियोजनबद्ध पद्धतीने घडविले जात असावे. प्रवासी आणि मालवाहू रेल्वेला मोठे अपघात व्हावे, असाच हेतू या सर्व घटनांमागे होता. राजस्थानात क्रमांक नसलेली ट्रॅक्टर ट्रॉली रेल्वे मार्गावर उभी करून ठेवण्यात आली होती. अशा घटनांद्वारे हिंसाचार पेटावा, सरकार बदनाम व्हावे याखेरीज अन्य हेतू असूच शकत नाही. भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढती ताकद पाहता भारताचे वर्चस्व अनेक बड्या आंतरराष्ट्रीय शक्तींना खुपते आहे. यातला दुर्दैवाचा भाग एवढाच की या शक्तींना आपल्या देशातील मंडळी साथ देत आहेत. बांगलादेशात बाह्यशक्तींनीच आंदोलन पेटावे यासाठी सर्व प्रकारचे साह्य केले होते, हे लपून राहिलेले नाही. भारतात राजकीय किंवा अन्य फायद्यासाठी देशात हिंसाचार, अराजक माजवण्याचे प्रयत्न पंजाब, काश्मीरमध्ये १९८० च्या दशकात कसे झाले होते, हे देशाने पाहिलेले आहे. त्याची धगही सोसली आहे. त्यामुळे आता हे असे प्रयत्न जागरूक जनता उधळून लावेल याची खात्री आहे.

(लेखक भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत.)

Maharashtra Assembly Elections 2024: जागावाटपापूर्वीच अजितदादांनी १७ जणांना दिले ‘एबी फॉर्म’

Maharashtra Assembly Elections 2024: नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिसूचना; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ तारखेपर्यंत मुदत

१ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची नवी धमकी

मुंबईत शिवसेना ठाकरे गट देणार 'हे' नवे चेहरे; मातोश्रीवर होणार अंतिम निर्णय