दृष्टिक्षेप
उत्तम जोगदंड
हिंदुत्वाच्या नशेत धुंद झालेले काही कृतघ्न लोक बाबासाहेबांच्या बदनामीत आघाडीवर असतात. बाबासाहेबांचा इतिहास बदलणाऱ्या, त्यांचे खलनायकीकरण करणाऱ्या सनातनी गोबेल्स तंत्राच्या दुष्प्रचारास आळा घालण्याचे अत्यंत जिकिरीचे काम करावे लागणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून एक कुजबूज व्हायरल होऊ लागली आहे, ती म्हणजे संविधानाचा ड्राफ्ट बी. एन. राव यांनी खूप परिश्रम घेऊन लिहिला, परंतु आंबेडकर केवळ ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष असल्याने त्यांनाच संविधानचे शिल्पकार म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खोटे, अर्धसत्य, दिशाभूल करणारे नरेटीव्ह गोबेल्स तंत्राने जमेल तिथे प्रसारित करून त्यांना अपमानित करण्याच्या सनातनी परिवाराच्या षड्यंत्राचा हा आहे एक अंश.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या सात दशकांच्या काळात, देशासमोर सामाजिक, राजकीय, संविधानिक असे जटिल प्रश्न उभे राहिले तेव्हा बाबासाहेबांच्या लेखनाचा, भाषणांचा आधार घ्यावा लागला. त्यातून त्यांच्या विचारांची शाश्वतता, अपरिहार्यता अधोरेखित होत आली आहे. एकाच जातीत बंदिस्त केलेल्या बाबासाहेबांचे महिला, कामगार, कृषी, अर्थ, शिक्षण, सिंचन, कायदा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमधील योगदान प्रकाशात आल्याने त्यांच्या कार्याची व्यापकता, त्यांची विद्वत्ता यास केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर मान्यता मिळू लागली आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी धर्मांध प्रवृत्ती सत्तेवर आल्यानंतर तर त्यांच्या विचारांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवू लागले आहे आणि हेच येथील सनातनी प्रवृत्तीच्या ‘परिवाराचे’ दुखणे आहे. म्हणूनच, एकीकडे डॉ. आंबेडकरांना प्रातःस्मरणीय मानायचे आणि दुसरीकडे आपल्या वर्तुळात त्यांच्यावर विविध माध्यमांतून, चर्चांमधून खोटे, अर्धसत्य, दिशाभूल करणारे नरेटीव्हज पसरवून, नालस्तीची मोहीम राबवून नंतर आपला परीघ विस्तारायचा, अशी यांची मोडस ऑपरेंडी आहे.
अशा नरेटीव्हजना काहीतरी आधार हवा म्हणून त्यांनी वापरलेले संदर्भ ग्रंथ असतात, १) अरुण शौरी यांचे Worshipping of False God, २) धरमपाल यांचे The Beautiful Tree पुस्तक, ३) शशी थरूर यांच्या An Era of Darkness या पुस्तकातील अंश, ४) दीनानाथ बात्रा यांचे लिखाण. यावर आधारित बाबासाहेबांना अपमानित करणाऱ्या निवडक नरेटीव्हजवर एक दृष्टिक्षेप.
भारतात अस्पृश्यता अस्तित्वातच नव्हती
बाबासाहेबांनी जातीभेदाविरोधात आणि अस्पृश्यांच्या हक्कासाठी दिलेला ऐतिहासिक, अद्वितीय लढा कसा अनावश्यक, निरर्थक किंवा कृत्रिम होता हे ठसवण्यासाठी, देशात जातीची उतरंड, अस्पृश्यता अस्तित्वातच नव्हती, सर्व जाती-वर्णांचे लोक ‘समरसतेने’ राहत होते, ब्रिटिशांनीच देशात जातीव्यवस्था निर्माण केली, जातीव्यवस्थेला धार्मिक अधिष्ठान मिळावे म्हणून हिंदू धर्मग्रंथांमध्ये जातिप्रथा आणि विविध वाईट प्रथा त्यांनी मुद्दाम घुसवल्या, मग त्यांनी अस्पृश्य जातीच्या लोकांसाठी आंबेडकरांचे नेतृत्व निर्माण करून पुढे आणले, अशी मांडणी करून ब्रिटिशांनी छेडछाड केलेले हिंदू ग्रंथ अभ्यासून आंबेडकर अस्पृश्यतेविरुद्ध लढले, जे ब्रिटिशांना हवे होते, असे आरोप केले जातात. यावर, संत चोखामेळा ब्रिटिश यायच्या शेकडो वर्षे आधीच मंदिराबाहेर कसे? महात्मा बसवेश्वर १२ व्या शतकात जातीभेदाविरोधात का लढले? छेडछाड केलेले ग्रंथ तुम्ही टिकू कसे दिले? असे प्रश्न विचारल्यास थेट देशद्रोहाचा शिक्का मारला जातो.
आंबेडकर हे ब्रिटिशांचे एजंट होते...
हे नरेटीव्ह पसरवण्यासाठी अरुण शौरी यांच्या Worshipping of False God या पुस्तकातील पान क्रमांक ४ वरील दुसऱ्या परिच्छेदाचा संदर्भ दिला जातो. हा परिच्छेद म्हणजे बाबासाहेबांच्या लेखन व भाषण संग्रहाच्या खंड १०, पान क्र. ४९२ मधील, बाबासाहेबांनी ए. व्ही. अलेक्झांडर, सदस्य ब्रिटिश कॅबिनेट मिशन, यांना लिहिलेल्या पत्रातील एक ‘निवडक’ उतारा आहे. त्यावरून, बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारला मदत केली, ते ब्रिटिशांचे हस्तक होते, त्यांनी ब्रिटिशांना अस्पृश्य सैनिक पुरवले, असा निष्कर्ष काढला जातो. वास्तविक पाहता या पत्रात, स्वातंत्र्यानंतर जातिवादी सवर्ण लोकांकडे सत्तांतर झाल्यावर, अस्पृश्य समाजाचे भवितव्य काय, याची साधार चिंता वाटल्यानेच, अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करणे ही ब्रिटिशांचीच जबाबदारी असल्याचे त्यांना ठणकावून सांगतानाच, भारतात ब्रिटिश पाय रोवू शकले ते क्लाइव्ह, हेस्टिंग्स यांच्यामुळे नव्हे, तर ब्रिटिश सेनेतील अस्पृश्य सैनिकांनी प्लासी, खडकी येथील लढायांमध्ये केलेल्या पराक्रमामुळे, असे ते सुनावतात. यावरून बाबासाहेब ब्रिटिशांचे एजंट कसे ठरतात? यातील विसंगती अशी आहे की प्लासीची लढाई इ.स. १७५७ साली, खडकीची लढाई इ.स. १८१७ साली झाली आणि बाबासाहेबांचा जन्म १८९१ साली झाला असताना त्यांनी जन्माला यायच्या कित्येक दशके आधीच ब्रिटिशांना मदत कशी केली असेल? खरे तर डॉ. आंबेडकर हे ब्रिटिश सत्तेच्या विरोधातच होते. शिवाय, ते सवर्णांनी लादलेल्या गुलामगिरीतून अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी अजून एक स्वातंत्र्य युद्ध लढत होते. म्हणून अस्पृश्यांच्या भवितव्याचा विचार करून लिहिलेले हे पत्र योग्यच होते.
संविधान आंबेडकरांनी लिहिलेच नाही
संविधानाचे शिल्पकार म्हणून मान्यता पावलेल्या बाबासाहेबांना अवमानित करण्यासाठी, संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही जगन्मान्य मानवी मूल्ये अजिबात मान्य नसलेल्या सनातनी परिवाराने, हे संविधान दुसऱ्या देशांच्या संविधानांतून कॉपी पेस्ट केलेले आहे, असा दुष्प्रचार सुरू केला. परंतु ही संवैधानिक मूल्ये टाळता येत नसल्याने ती मूल्ये ब्रिटिश यायच्या आधीपासून आमच्याकडे होती अशी पुडी सोडून ‘त्यात काय विशेष?’ असा आविर्भाव दाखवतात. आता तर संविधान हे आंबेडकरांनी लिहिलेच नाही, बी. एन. राव हे संविधानाचे शिल्पकार आहेत, असा प्रचार केला जात आहे.
संविधानाने जातिभेद वाढवला
अनुसूचित जाती, जमातींना प्रतिनिधित्व, न्याय देण्यासाठी, समतेच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीमुळे या सनातनी शक्ती प्रक्षुब्ध झालेल्या आहेत. या तरतुदीमुळे संविधानच जातिभेद पाळते, वाढवते, असा दुष्प्रचार सुरू आहे. या तरतुदी जातिभेदाच्या रोगावरील प्राथमिक उपचारासारखा असताना, सनातनी प्रवृत्ती उपचारासच रोग मानत आहेत.
प्रसिद्ध व्यक्तींकडून वादग्रस्त वक्तव्ये
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणतात, हिंदू धर्मास इस्लामचा नव्हे तर आंबेडकरवादाचा धोका आहे. हिंदू संस्कृती वाचवायची असेल तर आंबेडकर, आंबेडकरी विचारधारा आणि आंबेडकरी बुद्धिझम पुसून टाकले पाहिजेत. डॉ. आंबेडकरांनाच पुसून टाकण्याची भाषा हे शंकराचार्य बोलत आहेत.
म. गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करणाऱ्या शरद पोंक्षे नावाच्या एका नटाने अलीकडेच मनुस्मृतीचे गोडवे गाऊन, ती जाळणाऱ्यांनी वाचलीच नव्हती, असे वादग्रस्त विधान केले. अशी डॉ. आंबेडकरांना अवमानित करणारी वादग्रस्त वक्तव्ये काही प्रसिद्ध व्यक्तींकडून अधूनमधून येतच असतात. त्यांच्या वक्तव्यांचा कोणत्याही उजव्या संघटनांनी निषेध केलेला दिसत नाही. म्हणजे त्यांची यास मूक सहमतीच असते, असे म्हणता येईल. गोबेल्स तंत्राच्या दुष्प्रचारास आळा घालण्याचे जिकिरीचे काम आंबेडकरी विचारधारेच्या लोकांना करावे लागणार आहे.
uttamjogdand@gmail.com