अशोकजी सिंघल : एक राष्ट्रऋषी 
संपादकीय

अशोकजी सिंघल : एक राष्ट्रऋषी

वैयक्तिक कर्तृत्वापेक्षा लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलेले व्यक्तिमत्व म्हणून अशोक सिंघल प्रसिद्ध होते. राम जन्मभूमी आंदोलनात त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. खऱ्या अर्थाने ते राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात वाहून घेतलेले राष्ट्रऋषी होते.

नवशक्ती Web Desk

विशेष

पंतप्रधान नरेंद्र मोदी

वैयक्तिक कर्तृत्वापेक्षा लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलेले व्यक्तिमत्व म्हणून अशोक सिंघल प्रसिद्ध होते. राम जन्मभूमी आंदोलनात त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. खऱ्या अर्थाने ते राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात वाहून घेतलेले राष्ट्रऋषी होते.

एक खूप सुंदर म्हण आहे,

वृक्षकबहुँ नहिं फल भखै, नदी न संचै नीर।

परमारथ के कारने, साधुन धरा शरीर।।

चा अर्थ असा, की वृक्ष स्वतःची फळे स्वतः खात नाही आणि नदी स्वतःचे पाणी स्वतः साठवून ठेवत नाही. दोन्ही इतरांच्या कल्याणासाठीच अस्तित्वात असतात. आपले संत आणि ऋषीमुनीही अनंत काळापासून आपल्याला हीच शिकवण देत आले आहेत की, आपल्या सभोवतालच्या लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलेले जीवन हे वैयक्तिक कर्तृत्वापेक्षा अधिक अर्थपूर्ण ठरते. आपल्या जगण्यात सातत्याने याच भावनेचे प्रतिबिंब असलेली अशी एखादी व्यक्ती जर कोण असेल, तर ते अशोक सिंघल होते.

२७ सप्टेंबरपासून, आपण आध्यात्मिक साधना, सांस्कृतिक प्रबोधन आणि अनेक दशकांचे समर्पित संघटनात्मक कार्याचे एकात्मिकरण घडवून आणणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यासाठी त्यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत.

अशोक सिंघल यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या स्नेहाची अनुभूती घेण्याच्या अगणित संधी मला लाभल्या, हा मी माझा बहुमानच मानतो. त्यांच्या बाबत माझ्या अगदी सुरुवातीच्या आठवणींपैकी एक आठवण १९८१ मधली आहे. त्यावेळी मी माझ्यावर सोपवलेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडणारा एक तरुण कार्यकर्ता होतो. मला त्यांनी स्वतः हाताने पत्र लिहिले होते. साहजिकच, तो माझ्यासाठी एक उल्लेखनीय प्रसंग होता. या पत्रातून त्यांनी महत्त्वाच्या आगामी कार्यक्रमाबद्दल लिहिले होते आणि काही कामे माझ्यावर सोपवली होती.

गेली अनेक दशके, मी त्यांना अहोरात्र काम करताना पाहिले आहे. ते कायम दूरवरच्या आणि अनेकदा दुर्गम भागातल्या आव्हानात्मक प्रवासावर जायचे. गुजरातमधील आदिवासी भागांमध्ये प्रवास करण्याची उत्सुकता त्यांच्यात कायम दिसायची. त्यांचे मन सतत कुठे ना कुठे धावत असायचं, ते सतत समाजातील वंचित घटकांसाठी आणखी काय करता येईल, याचाच विचार करत असायचे.

त्यांची काैटुंबिक पार्श्वभूमीवर संपन्न घराण्यातील होती. तरीही अशोक सिंघल हे मात्र अगदी तरुण वयापासूनच एका वेगळ्याच ध्येयाकडे आकर्षित झाले होते. ते म्हणजे भारतमातेच्या लेकरांना त्यांचे वैभव पुन्हा मिळवून देण्याच्या आणि राष्ट्राचे पुनरुत्थान घडवण्याच्या ध्येयाकडे. सिंघलजींनी सातत्य आणि अथक परिश्रमाने अनेक संस्था आणि चळवळी उभ्या केल्या. त्यांचा आवाज भारदस्त होता आणि त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वाने संपूर्ण सभा भारावून जायची. अशोकजींच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवणारे दोन प्रसंग माझ्या मनात ताजे आहेत. त्यापैकी पहिला प्रसंग १९९३ मधील आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे केलेल्या ऐतिहासिक भाषणाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेत एका अधिवेशनाचे आयोजन केले होते. परदेशात अशा प्रकारचे अधिवेशन आयोजित करण्याची कल्पना, त्यामागचे नियोजन आणि विविध क्षेत्रांतील लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न या सगळ्यांतून त्यांचे संघटन कौशल्य दिसून आले होते.

दुसरा प्रसंग २००० मधील आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील पोर्ट ऑफ स्पेन येथे जागतिक हिंदू अधिवेशन आयोजित केले होते. यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींमध्ये अशोकजींच्या उपस्थितीने किती उत्साह निर्माण झाला होता, हे मला तिथे पाहायला मिळाले. माझे भाषण झाल्यानंतर अशोकजींनी केलेले कौतुक माझ्यासाठी खूप भावणारे होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला नव्या उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळत असे, हे मी पुन्हा एकदा अनुभवले.

अशोकजींचा उल्लेख करताना रामजन्मभूमी आंदोलनातील त्यांच्या भूमिकेची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. १९९१ मध्ये बोट क्लबवर झालेल्या सभेतील त्यांचे भाषण कोण विसरू शकेल? आंदोलन ऐन भरात असताना जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेतील अशोकजी आजही कुणीच विसरू शकत नाही. आज अयोध्येत भव्य राममंदिर उभे आहे. हे शक्य होण्यासाठी अशोकजींसारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अपेक्षा न ठेवता या कामासाठी आपले आयुष्य वाहून घेतले. अयोध्येत राममंदिर साकारताना पाहून अशोकजींना खूप आनंद झाला असता.

सिंघलजी यांना विचारांची असाधारण स्पष्टता लाभली होती. समाजात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण झाले पाहिजे आणि बंधुभावाचा संदेश सातत्याने अधोरेखित केला गेला पाहिजे, हा त्यांचा ठाम विश्वास होता.

अयोध्येतील राम मंदिराची पहिली वीट ठेवण्याचा मान समाजातील वंचित घटकातून आलेल्या व्यक्तीला मिळावा, असा त्यांचा विचार होता. त्यामुळे बिहारमधील वंचित घटकातून आलेले आणि विहिंपचे तळागाळातील कार्यकर्ते कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते राम मंदिराच्या पहिल्या विटेचे पूजन करण्यात यावे, अशी त्यांची भूमिका होती. काशी येथे आयोजित धर्मसंसदेत त्यांनी डोम राजांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विविध सामुदायिक उपक्रमांमध्ये त्यांनी डोम राजांसोबत काम केले. समाजातील प्रत्येक घटकाला समान सन्मान, प्रतिष्ठा आणि स्थान मिळाले पाहिजे, या त्यांच्या दृढ विचारांचे हे कृतीतून दिसून आलेले उदाहरण होते.

राष्ट्रनिर्माणाच्या कार्यापलीकडे सिंघलजी यांच्या जिव्हाळ्याचे आणखी दोन विषय होते, एक म्हणजे शिक्षण, विशेषतः वैदिक शिक्षण आणि दुसरे संगीत. अभ्यासू आणि गुणवंत, अशी त्यांची ओळख होती. दुर्गम आणि ग्रामीण भागांपर्यंत आदिवासी समाजापर्यंत मूलभूत शिक्षण पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘एकल विद्यालय’ उपक्रमाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.

ते विपुल वाचन करणारे तसेच उत्तम श्रोते होते. अधिकाधिक वाचन करण्याचा सल्ला ते आपल्या तरुण कार्यकर्त्यांना नेहमी देत असत. ज्ञानसंपादनासाठी सातत्याने वाचन करण्याची प्रेरणा त्यांनी अनेकांना दिली.

त्यांना जवळून ओळखणाऱ्यांना त्यांच्या उत्तम गायन कौशल्याची निश्चितच जाणीव होती. नागपूरला झालेल्या काही बैठकींच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. यात ते ‘एकल गीत’ सादर करत आणि त्यांच्या गायनाने उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध होत. त्यांच्या गायनामुळे बैठकीचे वातावरणही विशेष उत्साहाने भारून जात असे आणि बैठकीची सुरुवातच एका वेगळ्या उर्जेने होत असे. २०१५ मध्ये त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान, त्यांनी उपस्थितांना आश्चर्यचकित करत ‘हे मातृभूमि मेरी, हे पितृभूमि मेरी’ हे गीत गायले. त्यांच्या या अनपेक्षित आणि उत्स्फूर्त गायनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आणि तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.

त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अधिकाधिक तरुणांना त्यांच्या महान कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्याचा आपण संकल्प करूया. तसेच, आपल्या राष्ट्राच्या आणि देशवासीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने साकार करण्याच्या दिशेने कार्य करण्याचा आपला संकल्प पुन्हा दृढ करूया.

आजचे राशिभविष्य, २८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ!

फायबर अन् व्हिटॅमिन्सचा खजिना; ब्लूबेरी खाण्याचे फायदे एकदा वाचाच

कडू कारल्याची अशी करा चविष्ट भूर्जी; पोळी-भाकरीसोबत लागेल मस्त, मुलंही आवडीने खातील

Sharvari Wagh : शर्वरी वाघचा हा रॉयल लूक पाहिलात? पांढऱ्या-सोनेरी अनारकलीत अभिनेत्रीची मोहक अदा