- विचारभान
- संध्या नरे-पवार
म. जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव अलीकडेच महाराष्ट्र विधानसभेत संमत झाला. समतेच्या तत्त्वाला आध्यात्मिक क्षेत्रातून सार्वजनिक क्षेत्रात आणण्यासाठी जोतिबा आणि सावित्रीबाईंनी आपल्या कृतिकार्यातून सांस्कृतिक बंड केलं आणि त्याचवेळी एकमय राष्ट्राचं स्वप्न पाहिलं.
“सत्य सर्वांचे आदिघर,
सर्व धर्मांचे माहेर
जगामाजी सुख सारे,
खास सत्याची ती पोरे
सत्य सुखाला आधार,
बाकी सर्व अंधकार..”
या शब्दात सत्याची प्रतिष्ठापना करत आपलं संपूर्ण आयुष्य सत्यशोधनात घालवणाऱ्या आणि शूद्र-अतिशूद्रांच्या शोषणामागचे सत्य शोधणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांचा पुतळा पुणे नगरपालिकेत बसवावा, यासाठी १९२५ मध्ये ब्राह्मणेतर नेते केशवराव जेधे यांनी नगरपालिकेत ठराव मांडला होता. ज्यांच्या धार्मिक, आर्थिक श्रेष्ठत्वाविरोधात फुलेंनी आयुष्यभर संघर्ष केला होता त्या उच्च जातीयांनी अर्थातच हा ठराव फेटाळला. हा पारतंत्र्याचा काळ होता. स्वातंत्र्य चळवळ जोरात सुरू होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यताविरोधी चळवळ आकाराला येत होती. या काळात पुणे नगरपालिकेत फुले यांचा पुतळा बसवण्याला विरोध होत होता. ज्या महात्म्याने आपले संपूर्ण आयुष्य शूद्र-अतिशूद्रांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हक्कांसाठी वेचले त्या महात्म्याला पुन्हा एकदा पुणे शहरात नाकारले जात होते. जातवर्ण श्रेष्ठत्वाचा अहंकार किती तीव्र आहे, याचे प्रत्यंतर या नकारातून येत होते. संपूर्ण महाराष्ट्रात या विरोधाने खळबळ माजली होती.
१९२५ ते २०२५...बरोबर एक शतक लोटलं. जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ या पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात यावे, असा ठराव अलीकडेच मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडण्यात आला आणि तो संमत होऊन केंद्राकडे पाठवण्यात आला. ज्या जातवर्णवर्चस्ववादी वृत्तीने फुले दाम्पत्याला नाकारले होते, त्यांनाच आज फुलेंना स्वीकारावे लागत आहे, हा काव्यगत न्याय झाला. अर्थात बहुजनांना चुचकारण्याचं एक सांस्कृतिक राजकारणही यात आहेच. ‘बघा, आम्ही फुलेंना स्वीकारलं’, असं सांगणारा हा मुखवटा आहे. अर्थात फुलेंना स्वीकारणं इतकं सोपं नाही. कारण शाळेत शिकवायला जाते म्हणून जात्यांध वृत्तीच्या उच्चवर्णीय मंडळींनी सावित्रीबाईंच्या अंगावर फेकलेले शेणाचे गोळे आणि केलेला दगडांचा मारा..आजही फुलेंचे कार्य म्हणजे केवळ समाजसुधारणेचं नव्हते, तर समाजक्रांतीचं होते याची साक्ष देत उभा आहे. फुलेंवरच्या ‘सत्यशोधक’ या नुकत्याच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातील हा इतिहास सांगणारी दृश्य आजही खळबळ माजवत आहेत.
महात्मा जोतिराव फुले म्हणजे नेमकं काय? हे महाराष्ट्राला प्रबोधनकार ठाकरेंशिवाय दुसरं कोण सांगणार? प्रबोधनकार सांगतात, ‘जोतिराव फुले उच्च समाजसुधारक कोटीतले महात्मा होते. ते लोकमान्य झाले नाहीत. हीच त्यांच्या श्रेष्ठ कर्तव्याची साक्ष आहे. लोकमान्य होणे सोपे, पण जोतिरावांचे एखादे मत नुसते प्रतिपादन करणे फार कठीण. लोकमताला वळण देण्याचे काम लोकमान्यतेच्या भरी पडणाऱ्यांच्या हातून जगात आजपर्यंत घडलेले नाही’, प्रबोधनकार ठाकरे सप्टेंबर १९२५ च्या प्रबोधन मासिकाच्या अंकात ‘लोकमान्य’ पदवी मिळालेल्या टिळकांपेक्षा जोतिरावांचे असलेले वेगळेपण सांगताना हे मत व्यक्त करतात. जोतिराव फुले त्यांच्या समकालात ‘महात्मा’ झाले, सर्वसामान्यांनी पुढाकार घेऊन त्यांना ‘महात्मा’ ही पदवी दिली, पण ते ‘लोकमान्य’ झाले नाहीत. कारण ते तत्कालीन लोकमताला वेगळं वळण देण्याचं काम करत होते. त्यामुळे लोकमान्यतेऐवजी त्यांना लोकक्षोभच जास्त सहन करावा लागला, हा प्रबोधनकारांच्या वरील विधानाचा आशय आहे. जोतिबांच्या कार्याची अचूक ओळख इथे प्रबोधनकार करून देत आहेत. शूद्र-अतिशूद्रांची बाजू घेत, चातुवर्ण्याला-उच्चवर्णीय वर्चस्वाला प्रश्न विचारत, समतेची मांडणी करत फुले लोकमताला नवे वळण देण्याचे काम करत होते. त्यासाठी अर्थातच आधीचे वळण खोडून काढण्याचे, त्यातले दोष दाखवण्याचे काम त्यांना करावे लागत होते.
समाजातल्या अनिष्ट प्रथा-परंपरांविरोधात आवाज उठवून त्या नष्ट होण्यासाठी प्रयत्न करणं, प्रसंगी प्रत्यक्ष कृतीकार्यक्रम हाती घेणं, हे समाजसुधारकाचं काम असतं. मुलींसाठी, शूद्र-अतिशूद्रांसाठी शाळा काढून, हंटर कमिशनसमोर देशातील शिक्षणाच्या दुरवस्थेविषयी साक्ष देऊन आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा आग्रह धरून, विधवा महिलांच्या केशवपनाविरोधात न्हावी समाजाचा संप घडवून आणून फुले हे काम करतच होते. पण हे काम करत असतानाच या अनिष्ट प्रथा-परंपरांच्या मागे कोणती शोषण व्यवस्था उभी आहे याचा शोध घेत, त्या व्यवस्थेची चिरफाड करत, प्रसंगी प्रचलित लोकमतावर आघात करत, लोकक्षोभाचा डोंब उठवत लोकमानसाची मशागत करावी लागते, तेव्हा कुठे लोकमताची वेगळी वाट तयार होते. हे काम समाजक्रांतिकारकाचे असते. लोकमताला वेगळे वळण लावण्याचे हे क्रांतिकार्य फुले यांनी आयुष्यभर केलं. या क्रांतिकार्यासाठी त्यांनी आपल्या धारदार लेखणीचा उपयोग केला. ही लेखणी कल्पनाविलासात रमणाऱ्या साहित्यिकाची नव्हती किंवा असे झाले पाहिजे-तसे झाले पाहिजे, असे सांगणाऱ्या समाजसुधारकाची नव्हती, तर शोषणव्यवस्थांचा वेध घेणाऱ्या, घटनेमागचे सत्य शोधणाऱ्या आणि न घाबरता ते जगासमोर मांडणाऱ्या समाजक्रांतिकारकाची होती. समाजात क्रांती घडवणारी व्यक्ती अनेक गोष्टी समाजात पहिल्यांदाच करत असते किंवा घडवून आणत असे. या पार्श्वभूमीवर जोतिबा आणि सावित्रीबाईंच्या कार्याकडे पाहिले असता काही ठळक गोष्टी दिसून येतात -
फरार बाईंकडे शिक्षिकेचं रितसर प्रशिक्षण घेऊन शाळेत मुलींना शिकवण्याचं काम करणारी आद्य ऐतद्देशीय शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले आणि आपल्या पत्नीला शिकवून तिच्या शिक्षिका होण्याच्या प्रवासात तिला साथ देणारा, तिच्यावर दगडगोट्यांचा-शेणाचा मारा होताना तिच्यासोबत ठामपणे उभा राहणारा पहिला भारतीय पुरुष म्हणजे जोतिबा.
शिक्षणाचे कार्य करतात म्हणून स्वत:ला धर्मरक्षक म्हणवणाऱ्यांनी जोतिबा-सावित्रींना घराबाहेर काढण्याकरिता जोतिरावांच्या वडिलांवर, गोविंदरावांवर दबाव आणल्यावर शिक्षणकार्यासाठी स्वत:चे राहते घर सोडून बेघर होणारे पहिले दाम्पत्य म्हणजे सावित्री-जोतिबा.
फसवलेल्या, अत्याचार झालेल्या गरोदर स्त्रियांवर आपल्या अपत्याचा जीव घेऊन स्वत: जीव देण्याची वेळ येऊ नये, यासाठी स्वत:च्या घरात ‘बालहत्या प्रतिबंधकगृह’ काढून फसलेल्या विधवांची बाळंतपणं करणारे, जन्माला आलेल्या अर्भकांना सांभाळणारे पहिले दाम्पत्य म्हणजे जोतिबा-सावित्री.
ब्राह्मण बालविधवांच्या केशवपनाच्या रूढीविरुद्ध कृतिशील आवाज उठवत त्याविरोधात न्हावी समाजाचा संप घडवून आणणारी पहिली व्यक्ती म्हणजे जोतिराव.
आपल्या घरातला पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करणारे पहिले पतीपत्नी म्हणजे जोतिबा-सावित्री.
भटजी, ग्रामजोशी यांना नाकारून त्यांच्याशिवायच्या सत्यशोधक विवाहाची समतावादी पद्धत रूढ करणारे पहिले शूद्र.
जमीनदारांविरोधात शेतकरी कुळांचा संप घडवून आणणारा, जमिनी पडिक ठेवून जमीनदारांना कुळांबरोबर चर्चेसाठी बसायला लावणारा पहिला भारतीय माणूस म्हणजे जोतिराव.
आपल्या लेखनामधून स्थलांतरित कामगारांचे दु:ख मांडणारा, ग्रामीण अर्थव्यवस्थेतील जंगलांचे मूल्य स्पष्ट करणारा पहिला भारतीय लेखक म्हणजे जोतिराव.
शेतकरी आणि शूद्र-अतिशूद्र यांच्या शोषणशासनाची व्यवस्था स्पष्ट करत, त्याला ‘शेटजी-भटजी’ असे संबोधत धर्मसत्ता आणि अर्थसत्ता यांना प्रश्नांकित करणारा पहिला भारतीय नेता म्हणजे जोतिराव.
लोकस्मृतीतून बळीराजाला जागं करत, दशावताराच्या अवतारकल्पनेची नव्याने मांडणी करत भारतीय इतिहासाची पर्यायी मांडणी करणारा आणि त्या माध्यमातून सांस्कृतिक बंड उभारणारा नेता म्हणजे जोतिराव.
फुले यांचा काळ हा छापील माध्यमांच्या उदयाचा काळ होता. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकरांचे ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू झाले होते. मागोमाग ‘ज्ञानप्रकाश’, ‘इंदुप्रकाश’, ‘प्रभाकर’, ‘केसरी’ ही वर्तमानपत्रे सुरू झाली. या वर्तमानपत्रांचा उद्देश देशी लोकांपर्यंत आधुनिक ज्ञान जावे, तसेच त्यांचे प्रबोधन व्हावे, हा होता. म. फुलेंनी मात्र आपलं कृतिशील क्रांतिकार्य सुरू असतानाच सडलेल्या समाजव्यवस्थेविरोधात वैचारिक क्रांती घडविण्यासाठी लेखणी हातात घेतली. १८५५ मध्ये ‘तृतीय रत्न’ हे मराठीतील पहिले आधुनिक, सामाजिक नाटक लिहिले. त्यानंतर ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा’, ‘पवाडा - विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी’, ‘चिरंजीव परशुराम उर्फ आदिनारायणाचा अवतार यांस नोटीस’, ‘गुलामगिरी’, ‘हंटर शिक्षण आयोगापुढे निवेदन’, ‘शेतकऱ्याचा असूड’, ‘सार्वजनिक सत्य धर्म’ अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केलं.
जोतिरावांनी हंटर आयोगाला सादर केलेलं निवेदन हे आजही अभ्यासावं असंच आहे. त्यातून डोक्यावर उभ्या असणाऱ्या समाजाला पुन्हा पायावर उभं करण्याचं त्यांचं क्रांतिकारकत्व स्पष्ट होतं. ब्रिटिश सरकार उच्च शिक्षणावर वारेमाप पैसे खर्च करत आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे. याउलट सरकारने प्राथमिक शिक्षण सक्तीचे करून प्राथमिक शिक्षणावर अधिक खर्च करावा, अशी मागणी म. फुले या निवेदनाद्वारे करतात. ते लिहितात, या बाबतीत (सामान्यांच्या प्राथमिक शिक्षणाबाबतीत) जो अनावस्था प्रसंग ओढावला आहे, त्याचा काहीतरी दोष सरकारच्या पदरी बांधता येईल, अशी परिस्थिती आहे. उच्च शिक्षणार्थ पैशांची खैरात आणि सामान्य जनतेच्या शिक्षणाची आबाळ करण्यात सरकारचे जे काही हेतू असतील ते असोत, पण सामान्य जनतेचे न्याय्य हित साध्य करण्याच्या दृष्टीने तसे करणे अनिष्ट आहे, असेच कोणीही म्हणेल. हिंदी साम्राज्याच्या महसुलापैकी फार मोठा हिस्सा, घाम गाळणाऱ्या श्रमिक रयतेच्या कष्टामधून उभा राहत असतो, ही गोष्ट सर्वमान्य आहे. एक माहितगार इंग्रज लेखक म्हणतो, आमचे उत्पन्न शिलकी नफ्यातून येत नाही, ते येते मूळ भांडवलातून. ते चैनीच्या वस्तूवरील करांतून उभे राहत नाही, ते उभे राहते अत्यंत निकृष्ट अशा गरीबांच्या गरजेच्या वस्तूंवरील करांतून. हे उत्पन्न पापाचे आणि अश्रूंचे फळ आहे.’
इथे म. फुले आपल्या शैक्षणिक मागणीच्या समर्थनार्थ महसुलाचा मुद्दा म्हणजेच आर्थिक मुद्दा उपस्थित करतात. सर्वाधिक महसूल जर सर्वसामान्य भरत असतील तर सर्वाधिक खर्चही त्यांच्या शिक्षणावर झाला पाहिजे, असे सांगताना ते माहीतगार इंग्रज लेखकाचे म्हणणेही उद्धृत करत गरीबांचे शोषणही अधोरेखित करतात आणि गरीबांच्या शोषणातून उभा राहणारा सरकारचा महसूल म्हणजे पापाचे आणि अश्रूंचे फळ आहे, असे सांगतात. शिक्षणसम्राट असलेल्या आजच्या राजकीय नेत्यांनी फुले यांचे हे निवेदन एकदा नीट वाचावे आणि महाराष्ट्रातील शैक्षणिक स्थितीचा लेखाजोखा मांडावा.
भारतीय पत्रकारिता ही कायम सत्तेची बटिक राहिलेली आहे. फुलेंच्या काळातही ती तशीच होती. शेतकऱ्यांच्या, शूद्र-अतिशूद्रांच्या बाजूने फुले करत असलेले लेखन छापायला तत्कालीन वर्तमानपत्रे नकार देत असत. फुले त्यांना ‘भेकड छापखानेवाले’. ‘गुलाबी पत्रकारितावाले’ असे तर म्हणतातच, पण तत्कालीन पत्रकारितेला ते ‘तितंबा’ म्हणजे ‘थोतांड’ म्हणतात. आपले लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून फुले गावोगाव जाऊन आपल्या लेखनाचे वाचन करत असत. आज पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असताना ‘लोकांपर्यंत जाण्याचा’ फुलेंचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.
फुलेंमधल्या क्रांतिकारकाला सामाजिक समता अभिप्रेत होती. मध्ययुगातल्या संतानी अध्यात्मिक समता सांगितली. फुले मात्र शूद्र-अतिशूद्र जनतेच्या बाजूने उभे राहत सार्वजनिक समतेची मागणी करतात. त्यांनी केलेला सगळा संघर्ष, त्यांनी केलेले सांस्कृतिक बंड हे सर्व या सार्वजनिक समतेसाठी आहे. जोतिबा एकमय राष्ट्राविषयीही बोलतात. मात्र हे एकमय राष्ट्र समतेच्या पायावरच उभं असलं पाहिजे यासाठी ते आग्रही आहेत.
जोतिबांच्या या सांस्कृतिक बंडात सावित्रीबाईंनी त्यांना जशी साथ दिली, तसेच स्वतंत्रपणेही काम केले. जोतिबांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईंनी जोतिबांचे चरित्र लिहिले. त्यात त्या म्हणतात,
“करी शूद्रसेवा, दिले धैर्य त्यांना, क्रियाशील नेता अशा जोतिबाचा
नसे जात त्याला, नसे पंथ काही,
तया वंदूनि सावित्री काव्य वाही...”
जातधर्माच्या पलीकडच्या या क्रियाशील दाम्पत्याला ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देणं म्हणजे केवळ त्यांचा गौरव नसून समाजात अजूनही कृतज्ञता शिल्लक आहे, हे सांगणारी ही पोचपावती असेल.
sandhyanarepawar@gmail.com