संपादकीय

बहुआयामी लोकनेता!

नवशक्ती Web Desk

-चंद्रशेखर बावनकुळे

प्रासंगिक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज, २२ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले आहे. तसेच, त्यांनी मागील तीन दशकांपासूनचे मित्र असलेल्या फडणवीस यांच्या बहुआयामी कारकीर्दीला उजाळा दिला आहे. फडणवीस यांच्याकडे विकासाची स्पष्ट दृष्टी असून कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न बाळगता ते काम करतात. तसेच वेळप्रसंगी कठोर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आहे. राज्याच्या विकासासाठी ते अहोरात्र काम करत आहेत.

विकासाची स्पष्ट दृष्टी, निश्‍चित दिशा आणि कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न बाळगता काम करत राहण्याचा स्वभाव ही या लोकनेत्याची कुशलता आहे. दहा वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय दमदारपणे सांभाळली होती. त्यादरम्यानचा त्यांचा अनुभव यावेळी त्यांनी मला सांगितला आणि त्यातूनच आताचे संघटन मार्गक्रमण करत आहे. २००४ मध्ये पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा राजकारणात कार्यकर्ता व आंदोलनाचा मोठा अनुभव असूनही विधिमंडळाच्या कामकाजाचे बारकावे माहिती नव्हते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातील कामकाज कसे हाताळायचे, प्रश्‍न, लक्षवेधी कशा प्रभावीपणे मांडायच्या हे समजावून सांगितले. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारी निधी कसा खेचून आणायचा यासाठी वेगवेगळी संसदीय आयुधे आणि जे कौशल्य लागते त्याबाबत देवेंद्र फडणवीस हे मला वेळोवेळी सांगायचे. या सगळ्या टप्प्यात व प्रवासात त्यांचे मार्गदर्शन व सोबत मला नेहमी लाभत आली आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात मला ऊर्जामंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचदरम्यान माझ्याकडे उत्पादन शुल्क हे महत्त्वाचे खातेही त्यांनी सोपवले. एकवेळ अशी आली की, त्यांनी मला नागपूर जिल्ह्याच्या पालक मंत्रीपदासोबतच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचेही पालक मंत्रीपद दिले. राजकीय व्यक्तीने मल्टिटास्किंग असावे, हे देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य कायम लक्षात राहायचे. त्यातूनच एकाचवेळी विविध कामांचा आढावा घेण्याची सवय मला लागली. त्या पाच वर्षांच्या काळात अनेक प्रशासकीय बारकावे त्यांनी मला शिकवले. ते स्वप्न बघतात आणि पूर्ण करण्यासाठी ते ध्येयाने झटतात. सुमारे २५ वर्षांपूर्वी बघितलेले समृद्धी महामार्ग हे या स्वप्नांचे महत्तम उदाहरण आहे. तिसऱ्या मुंबईचे अस्तित्व खुणावणारा अटल सेतू हा प्रकल्प याच विश्वसनीय ध्येयाचा अविष्कार आहे. राष्ट्रीय प्रकल्प असलेला गोसेखुर्द प्रकल्प तरुणांना रोजगार देणारा, पर्यटन विकासाला चालना देणारा प्रकल्प व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न दूरगामी आहेत. राज्याच्या इतिहासातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. २०१९ मध्ये संपलेल्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विकास, पारदर्शकता आणि प्रशासनातील बदलांना प्राधान्य दिले.

देवेंद्र फडणवीस यांची अनेक वैशिष्ट्ये, बारकावे आहेत. कोणताही मुलाहिजा न ठेवता ते कठोर निर्णय घेऊ शकतात. लोकहितापुढे ते सर्व मोह त्यागू शकतात. समर्पण, त्याग, न्यायीवृत्ती ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये मला जाणवली. मैत्री कशी जपावी याचा ते वस्तुपाठ आहेत. शब्द देतानाच तो पाळण्याचे बंधनही ते स्वतःला घालून घेतात. त्याचबरोबर राजकारणात असावी लागणारी गुप्तता हा विशेष गुण त्यांच्यात आहे. माझा तरी अनुभव हाच आहे, ते एका शब्दानेही प्रेम व्यक्त करत नाहीत. पण त्यांचा आधार हीच त्यांच्या सोबतीची खरी जाणीव असते. त्यांच्या स्वभावातील एक वेगळेपण म्हणजे कोणत्याही भूलथापांना हा माणूस भुलत नाही. खोट्या प्रशंसेला हा माणूस कधी शरण जात नाही आणि त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक तटस्थपणा असतो. ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो’ किंवा ‘मी तुझ्यासोबत आहे’, ‘मी तुझ्या पाठीशी आहे’, असली पोकळ वाक्ये ते बोलून दाखवत नाहीत. ते त्यांच्या कृतीतून दिसते. सिंचनाच्या क्षेत्रातील देवेंद्र यांचा अभ्यास चकित करणारा आहे. पायाभूत सुविधा, अर्थकारण आणि वीज हे विषय त्यांना आवडतात. जनतेला सोयी मिळाव्यात यासाठी हाती घेणाऱ्या प्रकल्पांची अंमलबजावणी करतानाच त्यांचे तारीखनिहाय नियोजनही तयार असते. वर्सोवा-विरार सी-लिंक, मेट्रो ११, मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्प, एमटीएचएलमुळे तयार होणाऱ्या तिसऱ्या मुंबईत बांधकाम क्षेत्रात सुमिटोमोची गुंतवणूक, पुण्यात स्टार्टअप हब विकसित करण्यासाठी सहकार्य, सेमिकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूक, मुंबईचा कोस्टल रोड अशी अनेक उदाहरणे त्यांच्या दूरदृष्टीची प्रचिती देतात.

२०१८ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या ‘एलिफंटा लेणी’चे अखेर विद्युतीकरण झाले. खरेतर अरबी समुद्राखालून एलिफंटा लेणीत केबल नेण्याचा हा प्रकल्प मोठा महत्त्वाकांक्षी होता. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेली इच्छाशक्ती विलक्षण होती. त्यांची विचारशक्ती अचाट असल्याचा प्रत्यय माझ्यासह वीज मंडळाच्या सर्वांनाच आला. आम्ही अवघ्या पंधरा महिन्यांत सत्तर वर्षांचे काम पूर्ण केले. अरबी समुद्राच्या आतून साडेसात किमी लांबीची केबल टाकून एलिफंटा बेटावर वीज पोहोचवण्यात आली. ज्या दिवशी तिथला अंधार दूर झाला, तेथील रहिवाशांचे चेहरे आनंदाने उजळले तो दिवस ऐतिहासिक होता. अरबी समुद्रात विजेचे जाळे पसरवण्यासाठी एवढ्या मोठ्या केबलचा वापर पहिल्यांदाच झाला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत ३२ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मला मिळाली. नंतर प्रदेशाचे महामंत्रीपद मिळाले. हा सगळा प्रवास सुरू असताना अनपेक्षितपणे २०२२ मध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून फार मोठी जबाबदारी नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा यांनी मला दिली. या सगळ्या जबाबदारीमागे एका व्यक्तीचे पाठबळ आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस! ही जबाबदारी मी त्यांच्या सूचनेनुसार व समन्वयाने पार पाडत आहे. त्यांनी मला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना पूर्ण स्वातंत्र्य दिले. एक गोष्ट ते कटाक्षाने पाळतात. शासन आणि पक्ष यात सरमिसळ कधी करत नाहीत. आपल्या पक्षाचे सरकार सत्तेवर असले तरी पक्ष म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व आहे आणि भाजप हा सरकारला नाही तर जनतेला बांधिल आहे, असे त्यांचे नेहमी सांगणे आहे. कृषी सुधारणा, शहरी विकास, पोलीस दल मजबुतीकरण, सार्वजनिक सुरक्षेला प्रोत्साहन, सायबर गुन्हे आणि दहशतवाद यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पावले उचलून कायदा व सुव्यवस्था बळकट करण्याला प्राधान्य, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलविकास, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा अशी थक्क करणारी कामगिरी त्यांची आहे.

राज्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस हे अहोरात्र झटत आहेत. हाती घेतलेले काम झपाट्याने पूर्ण करीत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते जनतेशी जुळले आहेत. राज्यातील रस्ते, वीजपुरवठा, उद्योग, सिंचन या बाबी राज्याचा विकासदर निश्चित करण्यासाठी कामी येत असल्या, तरी गरीब-सर्वसामान्य, तळागाळातील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच प्रगती मोजण्याचा मापदंड असतो. विकासाची स्पष्ट दृष्टी, निश्‍चित दिशा आणि कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न बाळगता काम करत राहण्याचा स्वभाव ही या लोकनेत्याची कुशलता आहे. या लोकनेत्याला वाढदिवसानिमित्त माझ्या मन:पूर्वक शुभकामना...

(शब्दांकन :

रघुनाथ पांडे, मीडिया हेड, महाराष्ट्र)

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन