-अभय जोशी
फोकस
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. राज्यसभेच्या ५६ पैकी ३० जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले. राज्यसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका म्हणजे घोडाबाजार ठरलेला, असे वर्णन यापूर्वी केले जायचे. गेल्या काही वर्षांत घोडेबाजार हा शब्द वापरात येत नसल्याने ‘घोडेबाजार’ थांबला असावा, असे म्हणायला हरकत नाही. मात्र राज्यसभा निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगमुळे भाजपच्या यशाने काँग्रेस पक्ष घायाळ झाला आहे, हे नक्की.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. राज्यसभेच्या ५६ पैकी ३० जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले. १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५६ जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी १२ राज्यांत ४१ जागांवर निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध झालेल्या निवडणुकीत भाजपचे २०, काँग्रेसचे ६, तृणमूल काँग्रेसचे ४, वायएसआर काँग्रेसचे २, राजदचे २, बिजू जनता दलाचे २, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बीआरएस, जनता दल युनायटेड या पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर निवडून आला. कर्नाटकात काँग्रेसचे तीन, तर भाजपचा एक उमेदवार विजयी झाला. काँग्रेसचे अजय माकन, नासिर हुसेन, जी. सी. चंद्रशेखर राज्यसभेवर निवडून आले, तर भाजपचे नारायण बंदिगे विजयी झाले.
त्यामुळे आता राज्यसभेत केवळ भाजपचे ९७ सदस्य झाले आहेत, तर भाजपप्रणीत एनडीएचे ११७ सदस्य झाले आहेत. राज्यसभेत बहुमत असण्यासाठी २४० पैकी १२१ जागा मिळणे आवश्यक आहे. आता एनडीए त्या आकड्यापासून केवळ ४ जागा दूर राहिली आहे. त्यामुळे भाजपचे राज्यसभेत भाजपचे संख्याबळ वाढले आहे. आता राज्यभेत बहुमतासाठी फक्त चार जागा कमी आहेत. त्यामुळे भाजपची राजकीय ताकद वाढली असून यापुढे राज्यसभेत विधेयक संमत करण्यासाठी आधीसारखी छोट्या पक्षांच्या सदस्यांचे मन वळवण्यासाठी कसरत करावी लागणार नाही.
हिमाचल प्रदेशात काँग्रेसला धक्का देऊन अतिरिक्त उमेदवार भाजपने निवडून आणला. तसेच उत्तर प्रदेशात भाजपचे आठ जण निवडून आल्यामुळे भाजपची रणनीती ही जमेची बाजू ठरली आहे. विजयाचा गुलाल उधळताना काँग्रेसला आणि समाजवादी पार्टीला ‘डॅमेज’ करण्यात आले आहे. कारण अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी जी कसरत करावी लागते, त्यात भाजपचे नेते तज्ज्ञ झाले आहेत.
हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार असतानाही भाजपच्या रणनीतीने उमेदवार हर्ष महाजन हे निवडून आले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांच्या पराभवाने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पराभवाने सिंघवी यांना धक्का बसलेला तर आहेच, शिवाय काँग्रेस पक्षाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. काँग्रेस पक्षाच्या सहा आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याने अभिषेक सिंघवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचा व्हीप झुगारून बंडखोर आमदारांनी भाजपला मतदान केले. हिमाचल प्रदेशच्या ६८ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेस व भाजप उमेदवाराला समसमान म्हणजे प्रत्येकी ३४ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून निर्णय झाला, तर कौल भाजपच्या बाजूने लागला. सध्या विरोधी पक्षातील आमदार जसे भाजपच्या बाजूने कौल देतात, तसे दैवसुद्धा भाजपच्या बाजूने गेल्याचे वेळोवेळी दिसते. पक्षीय निर्णय घेताना काँग्रेस सावधगिरीची भूमिका घेताना दिसत नाही. हिमाचल प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकीनंतर संघवी हे बाहेरचे उमेदवार असल्याने त्यांचा पराभव झाल्याचे सांगण्यात येते. सिंघवी हे मूळचे राजस्थानचे आहेत. भाजपचे उमेदवार हर्ष महाजन हे स्थानिक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक उमेदवार विरुद्ध परप्रांतीय उमेदवार मुद्दा हा उपस्थित झाल्याने त्याचा फटका सिंघवी यांना बसला, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशात काँग्रेस सरकार धोक्यात आले होते. बंडखोर आमदारांना विधानसभेतून निलंबित करून सध्या तरी हा धोका टाळला आहे. मात्र हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवरील धोक्याची टांगती तलवार कायम असणार आहे. कारण पुढील काही दिवसांत आणखी काही आमदारांना गळाला लावले जाऊ शकते. त्यातील काही आमदारांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजप हिमाचल प्रदेशातील जनाधार आपल्या बाजूने वळवू शकतो.
हिमाचल प्रदेशनंतर भाजपने उत्तर प्रदेशातही फोडाफोडीच्या राजकारणाने अखिलेश यांना धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशात भाजपने आठ जागा जिंकल्या, तर समाजवादी पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला. जया बच्चन यांची राज्यसभेवर पुन्हा निवड झाली असली तरी समाजवादी पार्टीच्या आमदारांना फोडून भाजपने आठवा उमेदवार निवडून आणला आहे.
वास्तविक पाहता राज्यसभेचे उमेदवार देताना ते राज्यातीलच असावेत, अशी पूर्वी प्रथा होती. परंतु त्यानंतर पक्षाची संघटना मजबूत ठेवण्यासाठी केंद्रीय पातळीवरील पक्षाचा राजकीय समतोल ठेवण्यासाठी दुसऱ्या राज्यातील उमेदवार लादण्याची प्रथा काँग्रेसने सुरू केली. असे करताना पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असेल तर अन्य राज्यातील उमेदवारांनाही निवडून आणणे सोपे असते. त्यात केंद्रातील पक्षाचा प्रमुख किंवा पंतप्रधान यांची जरब असेल तर सांगेल त्या उमेदवाराला निवडून आणणे कठीण नसते. नेहरू, इंदिरा गांधी यांच्या काळात हे सहज शक्य होते. आता हे कसब भाजपकडे आले आहे. भाजपनेही आता अन्य राज्यातील उमेदवारांना सोयीनुसार दुसऱ्या राज्यातून उमेदवारी देऊन राज्यसभेवर पाठवले आहे. त्यात २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय खेळ्यांनी काँग्रेस पक्ष आणि बडे नेते घायाळ झाले आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मात्र प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांना पराभूत करण्याची भाजपची राजकीय रणनीती यशस्वी ठरत आहे.
आता राज्यसभा निवडणुकीत जवळपास निम्म्या जागी उमेदवार निवडून आणल्यामुळे आणि काँग्रेसला धक्का दिल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला आहे. असे असले तरी राजकीय शत्रूच्या खेळी ओळखून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी पुढील निर्णय घ्यायला हवेत. त्यात आपला राजकीय शत्रू सत्ताधारी आहे. सलग दोन वेळा सत्ता मिळवून तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचे मनसुबे आखले आहेत. नुसते मनसुबेच नाही तर त्यांना मोठा आत्मविश्वास आहे. पंतप्रधानांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालात बाजी मारल्यानंतर जुलैमधील कार्यक्रमासाठी विदेशातून आमंत्रणं येत आहेत. विदेशातील ही आमंत्रणे पाहता त्यांनाही भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असल्याची खात्री दिसते, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
राज्यसभा निवडणुकीत एकूण १६ आमदारांनी केलेल्या क्रॉस व्होटिंगमुळे भाजपला आपले अतिरिक्त उमेदवार निवडून आणता आले. क्रॉस व्होटिंग म्हणजे मराठीत घोडेबाजार. विधानसभेतील सदस्यांमधून राज्यसभेवर प्रतिनिधी पाठवता येतात. तसेच विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेत प्रतिनिधी पाठवता येतात. या दोन्ही निवडणुकांमध्ये उमेदवार निवडून येण्यासाठी मातब्बर नेते आणि राजकीय पक्ष ‘तन, मन, धना’ने काम करतात. या आधीच्या राज्यसभा निवडणुकांमध्ये अनेकवेळा उद्योगपतींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊन निवडून आणले. या दोन्ही निवडणुका म्हणजे घोडेबाजार ठरलेला असे यापूर्वी वर्णन केले जायचे. गेल्या काही वर्षांत घोडेबाजार हा शब्द वापरात येत नसल्याने कदाचित ‘घोडेबाजार’ थांबला असावा, असे म्हणायला हरकत नाही. मात्र, राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या यशाने काँग्रेस पक्ष घायाळ झाला आहे, हे नक्की.