संपादकीय

सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकोत्सव झाला पाहिजे!

गणेशोत्सवाच्या दरम्यान होणारे मार्केटिंग भयंकर आहे. सर्व प्रकारची धार्मिकता, शूचिर्भूतता, पावित्र्य वगैरे बाजूला ठेवून हे उत्सव धनदांडगे, गुंड, पुढारी यांच्या ताब्यात जाताना दिसतात. त्यांना मिळणाऱ्या सवंग प्रसिद्धीमुळे त्यांनी या उत्सवांचे वाटोळे करून टाकले आहे. वेळीच आपला हा सांस्कृतिक ठेवा, परंपरा जपली पाहिजे.

नवशक्ती Web Desk

भवताल

ॲड. वर्षा देशपांडे

गणेशोत्सवाच्या दरम्यान होणारे मार्केटिंग भयंकर आहे. सर्व प्रकारची धार्मिकता, शूचिर्भूतता, पावित्र्य वगैरे बाजूला ठेवून हे उत्सव धनदांडगे, गुंड, पुढारी यांच्या ताब्यात जाताना दिसतात. त्यांना मिळणाऱ्या सवंग प्रसिद्धीमुळे त्यांनी या उत्सवांचे वाटोळे करून टाकले आहे. वेळीच आपला हा सांस्कृतिक ठेवा, परंपरा जपली पाहिजे.

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सव सार्वजनिक ठिकाणी कसा सुरू झाला? हा इतिहास आपण सारेजण जाणतोच. 'आता हा सार्वजनिक ठिकाणी होणारा गणेशोत्सव बंद करा' असे म्हणत त्यावरची चर्चाही अलीकडेच खूप रंगली, असे म्हणणाऱ्या व्यक्तीला सगळ्यांनी मिळून ट्रोल पण केले. आमच्याकडे, तर १५ ऑगस्टपासून म्हणजे तब्बल वीस दिवस आधीपासून गणपतीच्या आगमनाला सुरुवात झाली. त्यामुळे संध्याकाळी सातपासून दहा वाजेपर्यंत शहरामध्ये वाहतुकीची कोंडी झाली. घरी जाणारे नोकरदार चिडचिड करत घरी पोहोचले. व्यापारी आणि ग्राहकांचे हाल झाले. शेवटी वैतागून व्यापाऱ्यांनी बंडाचे निशाण रोवले आणि पोलिसांकडे याबाबत निवेदन दिले. झालं, त्यामुळे गणेश उत्सव मंडळ आणि व्यापारी यांच्यामध्ये माध्यमांनी चांगलाच कलगीतुरा रंगवला. त्यामध्ये पुढाऱ्यांनी उडी मारली. आमचे पुढारी कधीतरी आमच्या मतदारसंघात येत असतात आणि लोकांना आपण सभागृहात बसून केलेले कायदे कसे पाळले पाहिजेत हे न सांगता ते मोडण्यासाठी पाठबळ देणे म्हणजे पुढारपण असा त्यांचा समज असावा. त्यामुळे गणेशोत्सव मंडळाची बाजू त्यांनी उचलून धरली. थोडक्यात काय, गणेशोत्सव येणार म्हणून आनंदी, पुलकित झालेले वातावरण भरपावसात गरमागरम झाले.

हा चाललेला सगळा प्रकार शांतपणे पाहताना माझ्या मनात विचार आला. गणपतीला विद्येची देवता म्हणतात. मग गणेश उत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सांस्कृतिक, धार्मिक, वैचारिक विवेकाचा उत्सव का होऊ नये? कोणत्याही नव्याने सुरू झालेल्या किंवा परंपरेने चालत आलेल्या गोष्टी बंद करा, असे म्हणणे मला स्वतःला मान्य नाही. किंबहुना मोठ्या संख्येने ज्यावेळेला माणसे एकत्र येऊन काही करू पाहतात, तर त्या वेळेला त्याला सकारात्मक कसे वळण द्यावे याचा विचार व्हावा. मुळातच उत्सवप्रिय असणाऱ्या भारतीय माणसांना या सगळ्याला सकारात्मक वळण दिलेले अधिक आवडेल. ते बंद करण्याची भूमिका घेतली, तर संवादही बंद होतो आणि सांस्कृतिक पोकळीही निर्माण होते; पण आज या सगळ्याच गोष्टी मग ती दहीहंडी असो, गणेशोत्सव असो, चौकाचौकात बसणारी देवी असो; चिंता वाटावी अशा थराला पोहोचल्या आहेत. म्हणून मला प्रश्न विचारावासा वाटतो की, गणेश उत्सव कलेचा, सांस्कृतिक विद्येचा विचारांचा उत्सव बनवणे अशक्य आहे का?

गणेशोत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरा झाला पाहिजे, या मताची मी आहे. आमच्याकडे अलीकडेच काही मंडळांनी जाहिराती दिल्या की, दिवसाला पाचशे रुपये दिले जातील; मंडळाला कार्यकर्ते हवे आहेत. अशी ही जाहिरात बघून आश्चर्य वाटले. पण खरंच अशी परिस्थिती आहे. मंडळांकडे कार्यकर्ते नाहीत. कार्यकर्ते मोबाईलवर गुंतले आहेत किंवा नोकरी, कामधंद्याच्या चिंतेमध्ये चिंतातूर झाले आहेत. मंडळाचे कार्यकर्ते १५ आणि ढोल पथक ५० जणांचे, असा प्रचंड गोंगाट करत रस्त्याने जाताना दिसतात. या ढोल पथकांच्या सुपाऱ्यांचे आकडे ऐकून आम्ही अवाक‌् होतो. त्याच्या माध्यमातून कोणती कला सादर होते? गणेशोत्सव मंडळात सगळे एकत्र यायचे. एकेकाचा प्रसाद असायचा. चांगले सामाजिक उपक्रम घेतले जायचे. आपल्या कॉलनीत चांगले काम करणाऱ्या मंडळींचे सत्कार घेतले जायचे. कॉलनीतली मुलं, मुली, महिला, सीनियर सिटीझन या सगळ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल अशा स्पर्धा व्हायच्या. संध्याकाळी आवर्जून वेळ काढून सगळेजण एकत्र यायचे; खास करून जिथे जिवंत देखावे सादर केले जायचे, त्या ठिकाणी तर अगदी पहाटेपर्यंत बसून आम्ही नाटकासारखे देखावे पाहिल्याचे मला आठवते. त्यात काम करणारे नट-नटी पुढे वर्षभर रस्त्याने दिसले की, त्यांचं भरभरून कौतुक केले जायचे. रांगोळ्यांची स्पर्धा असायची, गायनाची स्पर्धा असायची, वक्तृत्व स्पर्धा व्हायची. यातूनच आम्हाला कळलं की, आपल्याला नाटक करता येते, आपल्याला नाच करता येतो, आपल्याला व्यासपीठावर जाऊन बोलता येते. हे सगळे या मुक्त अर्थव्यवस्थेने विस्कटून टाकलेले आहे. याच्या विरोधात आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी आंदोलन उभे केले पाहिजे, बंड उभारले पाहिजे. हे सगळे बदलणे अगदीच अशक्य आहे, असे मला वाटत नाही. आपला सांस्कृतिक ठेवा, आपल्या परंपरा, आपल्या कॉलनीत, आपल्या गावात काय व्हावे हे ठरवण्याचा आपला लोकशाही अधिकार आपल्या नातवंडांसाठी आपल्याला जपायला हवा. त्यांना काय येते हे त्यांना कसे कळणार? बदललेल्या अर्थव्यवस्थेत सण-समारंभाचे झालेले बाजारीकरण अत्यंत दुःखद आणि त्रासदायक आहे. काही मंडळी आहेत जी रक्तदान, आरोग्य शिबीर, विविध कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा, असे चांगले उपक्रम घेतात. त्यांना समाज माध्यमांमधून चांगली प्रसिद्धी मिळाली पाहिजे, त्यांचे कौतुक झाले पाहिजे. जिवंत देखाव्याऐवजी मोठ्या शहरात दाखवलेले देखावे छोट्या गावात दाखवण्यासाठी विकत आणले जातात. गणेश उत्सव म्हणजे, ध्वनी प्रदूषण, प्लास्टिकचा प्रचंड गैरवापर आणि विजेचा गैरवापर हे पूर्णपणे वेळीच थांबविणे शक्य नाही का? खूप मोठी युवाशक्ती गणेशोत्सवाच्या निमित्ताने सक्रिय होत असते. त्यांना सकारात्मक वळण लावण्यासाठी मार्केटिंगच्या जंजाळातून आपले धार्मिक उत्सव ठरवून, भूमिका घेऊन आपल्याला बाहेर काढावे लागतील. एका चांगल्या हेतूने सुरू झालेला गणेशोत्सव चुकीच्या हातांमध्ये आणि चुकीच्या दिशेने आपण जाऊ देता कामा नये. गणपती ही कलेची, विद्येची देवता असेल, तर तिचा आब, तिचा सन्मान, त्यातील बाजारीकरण थांबवून, त्यामध्ये निखळ सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडेल, असे पाहिले पाहिजे. त्याची उंची उत्तरोत्तर वाढत जाईल यासाठी महाराष्ट्रातील विचारी लोकांनी भूमिका घेतली पाहिजे. थोडक्यात काय, गणेशोत्सवातला उत्सव, कलेचं सादरीकरण, त्यातला सांस्कृतिक ठेवा, माणसांशी जोडणारी नाती हे सगळं हरवत आहे. ते सगळं जपायला हवं. गणेशोत्सव मंडळांनी जाणीवपूर्वक स्पॉन्सरशिप नाकारली पाहिजे, जाहिरातींचे बोर्ड लावणे बंद केले पाहिजे. अवतीभोवतीच्या लोकांकडून मिळणाऱ्या वर्गणीतूनच गणेशोत्सव साजरा होईल. या सगळ्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या परिसरातील बचत गट, युवक मंडळ, क्रीडा मंडळ, सीनिअर सिटीझनचे मंडळ यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. चुकीच्या गोष्टी नाकारायचे ठरवले, तर गणेशोत्सव सार्वजनिक ठिकाणी करण्याने एका चांगल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडवणे आपल्याला शक्य आहे. त्यातून समाजातील धर्माधर्मामधील सलोखा वाढेल, जातींमधील तेढ कमी होईल, स्त्री-पुरुष समतेचा संस्कार होईल. तरुणांमधील नेतृत्वगुण विकसित होतील. तरुणांना भविष्यातील भारतासमोरील राजकीय, सामाजिक, आर्थिक आव्हानांची कल्पना येईल आणि त्यासाठी गणेशोत्सव मंडळासारख्या मंडळातून होणाऱ्या कार्यक्रमांमधून एकत्रित नात्याची विण विणली जाईल. तरुणाईला नैराश्य येणार नाही, आत्महत्येचा विचार त्यांना शिवणार नाही. कलासंपन्न, नैतिक मूल्यांची जाण असणारा युवक यातून घडेल. भविष्यकाळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना बळ मिळेल, ऊर्जा मिळेल. लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. आपल्या परंपरा, चांगल्या गोष्टी यांचा त्यांच्यावर संस्कार होईल.

त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारा गणेशोत्सव हा सुरू राहिला पाहिजे. बाजारीकरण, विद्रूपीकरण झालेला कर्कश असा गणेशोत्सव बदलूया. तो दिवसेंदिवस धनदांडग्यांच्या, गुंडांच्या, पुढाऱ्यांच्या ताब्यात जातो आहे. तो परत लोकोत्सव होण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. चला गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' म्हणत असताना काही मंगल करण्याचा निर्धार करूया.

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या

असून, लेक लाडकी अभियानाच्या संस्थापक आहेत.)

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग 'मिसिंग लिंक': सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आता नवा सामना; रोड केबल-स्टेड ब्रिजसाठी आव्हानात्मक अभियांत्रिकी काम

'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर; सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार

CSMT परिसरात उभारणार शिवरायांची भव्य प्रतिमा; "नवीन प्रस्तावाची गरज नाही, केंद्र सरकारचं ठरलंय!" भास्कर जाधवांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर

Goa Nightclub Fire Update : अर्पोरा नाईटक्लब आगप्रकरणी मोठी कारवाई; लुथ्रा बंधूंचा बेकायदेशीर बीच शॅक जमीनदोस्त

“एखादा आमदार टोकाचं वक्तव्य तेव्हाच करतो जेव्हा..."; अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर संजय शिरसाटांचा पलटवार