अस्वस्थ वर्तमान
डॉ. प्रवीण बनसोड
जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गीयाने आत्ममग्न भूमिका घेतली आहे. पूर्वी सामाजिक कामात अग्रेसर असलेला मध्यमवर्गीय आता त्यापासून दूर गेला आहे. सध्या त्याचे संपूर्ण लक्ष उपभोगावर आधारित चैनीने राहण्याकडे लागले आहे.
१९९० नंतरच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात सर्वांत प्रभावी झाल्या त्या मध्यमवर्गीय संवेदना. एक नवी भुलविणारी आचार-विचार पद्धती मध्यमवर्गीय समूहाने अंगीकारली. दूरच्या डोंगरावर उभे राहून समाजात घडणाऱ्या घटनांकडे पाहायचे व ‘हे काही बरे नाही’ असे म्हणायचे; ही मानसिकता म्हणजे नवआधुनिक जीवनशैलीतून आलेल्या उपभोगवादी संस्कृतीची देण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ग्रामीण जीवन आत्महत्याग्रस्त झाले असताना शहरी-निमशहरी मध्यमवर्गीय -उच्चवर्णीय अहंपणा स्वीकारला जातो, तेव्हा जागतिकीकरणाच्या रेट्यातून आलेली आत्ममग्नता किती भयानक आहे, हे दिसून आले. जागतिकीकरणाने आणलेली मॉल्स संस्कृती आणि आता आलेल्या नवतांत्रिक माध्यम संस्कृतीने मानवी जीवनात अनेक अस्वस्थ प्रश्न निर्माण केले आहेत. आधुनिक जीवनशैलीनुसार संगणकासमोर बसून शेअर बाजारातील चढ उताराचा ग्राफ काढणारे मेंदू व भ्रमणध्वनीद्वारे अश्लील संदेश पाठवून एकमेकांची निर्लज्ज भूक भागविणारी मानसिकता नवतांत्रिक जीवनशैलीच्या महाजाळ्यात जाणारीच म्हटली पाहिजे.
‘बहुसांस्कृतिकता’ हा भारतीय समाजव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक; पण जागतिकीकरणाच्या रेट्यातून ‘एक सांस्कृतिकता’ निर्माण करण्याचा प्रयत्न तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पातळीवर विभागणारी प्रक्रिया अशा व्यवस्थेकडे आता आपण आलो आहोत. जागतिकीकरणाच्या माध्यमातून ‘जागतिक सांस्कृतिक व्यवस्था’, ‘जागतिक सैनिक व्यवस्था’, ‘विश्व गाव’, ‘विश्वनगर’ इत्यादी संकल्पनांच्या माध्यमातून एकछत्री जागतिक व्यवस्था मांडण्याचा प्रयत्न होत आहे. ‘प्रभुत्वशाली राष्ट्रांनी विकसनशील राष्ट्रांवर आपली अर्थव्यवस्था आणि संस्कृती लादण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे जागतिकीकरण होय,’ अशी गिलिपीनने केलेली व्याख्या या संदर्भात महत्त्वाची ठरावी. संपूर्ण जगालाच जागतिकीकरणाचे ‘शॉपिंग कॉम्प्लेक्स’ बनवून श्रमाचा, बुद्धीचा, भावनेचा मूलभूत गरजांचा बाजार मांडणे, त्यातून अधिक उत्पन्न मिळविणे हा उद्देश अगदी स्पष्ट असल्याने मानवी अधिकार, बहुसांस्कृतिकता, कृषिपरंपरा, लोकसंस्कृती या बाबींना हरताळ फासला जात असतो. जागतिकीकरणाच्या आर्थिक पैलू एवढेच सामाजिक व सांस्कृतिक पैलू अधिक जटिल व गुंतागुंतीचे आहेत.
संपूर्ण मानवी जीवन त्यात समाविष्ट करण्यात येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातूनच ‘चेहरा नसलेली शहरे’ व ‘भकास झालेली खेडी’, ‘भावना नसलेला माणूस व बांधिलकी नसणारा समाज’ निर्माण झाला आहे. नवतांत्रिक आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली साम्राज्यवादाला बळकटी देण्याचं कार्य सुरू आहे. ‘जागतिकीकरण हा जगाचा सामूहिक सवर्णवाद आहे’ हे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे विधान या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरावं. आधुनिक संपर्क माध्यमे व जलद दळणवळणांमुळे खेडी शहरांच्या संपर्कात आली असली तरी अद्यापही खेड्यात पारंपरिक जीवनपद्धती टिकून आहे.
जीवनपद्धतीला कुठेकुठे तडे गेलेत; पण ती ढासळलेली मात्र नाही. एकमेकांवर अवलंबून असणे, एकमेकांशी लागेबांधे असणे व बांधिलकीमधून जीवन जगणे ही ग्रामीण जीवन पद्धती आहे. शेती व शेतकरी केंद्रस्थानी व इतर व्यावसायिक हे शेती व शेतकऱ्यांवर अवलंबून अशी ग्रामीण जीवनाची रचना आहे. या सर्वांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध असणे स्वाभाविकच आहे. परंपरा, पद्धती भिन्न असूनही एकमेकांशी बांधीलकी मानणारी, जिव्हाळ्याची संस्कृती म्हणजेच ग्रामीण संवेदनशीलता. एकच सामूहिक जीवन असूनही बहुसांस्कृतिकता जोपासण्याचे काम ग्रामीण संवेदनशीलतेनेच आजवर केले. ‘आपण एकच सामूहिक जीवन जगत आहोत,’ अशी सुप्त स्वरूपात का असेना, सगळ्यांनाच जाणीव असते. या जीवनपद्धतीचा एक स्वाभाविक परिणाम म्हणून इतरांकडे माणुसकीच्या दृष्टीने, समंजसपणे, सहानुभूतीने बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो. समाजातील सगळेजण एकमेकांशी बांधलेले आहेत, आपण या समाजाचा एक घटक आहोत, अशी जाणीव निर्माण होते. अशी जाणीव त्या व्यक्तीच्याठायी निर्माण झाली म्हणजे जीवनाचा अनुभव स्वयंकेंद्रितपणे न घेता ती व्यक्ती समाजशील वृत्तीने मानवाच्या व्यापक भूमिकेवरून घ्यायला लागते. याप्रकारे अनुभव घेण्याची क्षमता व धाटणी म्हणजे ग्रामीण संवेदनशीलता होय; पण जागतिकीकरणाच्या रेट्यात ही संवेदनशीलता हरवते की काय ? अशी भीती निर्माण होण्यास वाव आहे. ग्रामीण भागापर्यंत जाऊन पोहचलेला नवतांत्रिक मूलतत्त्ववाद समाजाची संवेदनशीलता नष्ट करीत आहे. उपासना पद्धती, आचार-विचार राहणीमानात, विविधता असूनही ग्रामीण जीवनाचे सूत्र ‘एक’ असल्याचे दिसते.
उत्स्फूर्तता, परस्पर सहकार्य म्हणजे ग्रामीण संवेदनशीलतेचे महत्त्वाचे अंग, पण नवतांत्रिक माध्यमांच्या रेट्यातून आलेल्या उपभोगवादी संस्कृतीने या कृषिसंस्कृतीवरच घाला घातला आहे. त्यातून सामूहिक नैराश्याची भावना व अलिप्ततेची मानसिकता यावर प्रकाशझोत टाकून नवसाम्राज्यवाद रोखण्याचे काम साहित्यातून होण्याची गरज आहे. साहित्याची बांधिलकी समाजाशी असतेच; नव्हे साहित्याची निर्मिती समाजातल्या उपेक्षित घटकाला डोळ्यांसमोर ठेवून झाली पाहिजे, अशी अपेक्षा असते. जीवनव्यवहाराला गेलेले तडे, वेगाने बदलणारी संवेदनशीलता, नात्यांमधील तुटलेपण, वाढत असलेला बाजारवाद आणि अस्वस्थता असे समाजाला ग्रासणारे विषय रेखाटून मानवी संवेदनशीलता टिकवण्याचे कार्य साहित्याला तातडीने करावे लागणार आहे.