क्रीडा क्षेत्राला सुगीचे दिवस! 
संपादकीय

क्रीडा क्षेत्राला सुगीचे दिवस!

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांपासून प्रेरित होऊन जगभरात क्रीडा संस्कृतीचा विकास झाला आहे. भारतातही शालेय, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंच्या गुणवत्तेवर भर देत विविध स्पर्धांचे आयोजन होत आहे.

नवशक्ती Web Desk

क्रीडा जगत

मनोहर आ. साळवी

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांपासून प्रेरित होऊन जगभरात क्रीडा संस्कृतीचा विकास झाला आहे. भारतातही शालेय, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंच्या गुणवत्तेवर भर देत विविध स्पर्धांचे आयोजन होत आहे.

जगात क्रीडा संस्कृतीचा मूळ उगम हा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामुळे झालेला आहे. या क्रीडा स्पर्धामुळे जगातील दर चार वर्षांनी देशांच्या गुणी खेळाडू आणि संघांची वेग, दम, क्षमता व शक्ती या कौशलयांची कसोटी कसोटी लागलेली असते. यासाठी साऱ्या जगातील देश आणि त्यांचे क्रीडापटू आणि संघ या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होतात आणि आपल्या देशांना जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत पदके मिळविण्यासाठी कौशल्याने झगडावे लागत असते. यामध्ये भव्यदिव्य स्वरूप, प्रसिद्धी, जाहिरात माध्यम, क्रीडा स्पर्धांचे रेकॉर्डस, सांख्यिकी माहिती, आधुनिक सुविधा, सज्ज क्रीडांगणे आणि विज्ञान आधुनिकतेची झालर लावून या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. याशिवाय स्पर्धेचे अधिकार आणि हक्क यावर देखील आर्थिक मदार असते.

याच स्पर्धेचा आदर्श साऱ्या जगाने घेऊन आता जागतिक स्तरांवर विविध खेळांच्या स्पर्धा तसेच आशियाई आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास अनेक देश आणि उद्योजक संस्था पुढाकार घेऊ लागले आहेत. याचाच परिणाम म्हणजे क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी आणि तिचा विकास वृद्धिंगत करण्यासाठी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरांवर विविध खेळांच्या स्पर्धांना महत्त्व प्राप्त झाले. आज हाच विस्तार जिल्ह्यातील संघ, क्लब, व्यायाम शाळा, मंडळे, शैक्षणिक संस्था आदी माध्यमातून क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी संलग्नता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होताना दिसतात. आज याकडे क्रीडा संस्कृतीची गंगोत्री म्हणून पाहिले जाते. विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या त्या खेळांचा विविध स्तरांवर विकास होण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवर क्रीडा संघटना, असोसिएशन, फेडरेशन यांचे माध्यम पुढे आले. राज्य क्रीडा संघटनांना विविध खेळांच्या सर्व जिल्हा संघटना संलग्न होणे बंधनकारक आहे. यानुसार विविध खेळांच्या क्रीडा संघटना या राज्य संघटनांना आणि राज्य क्रीडा संघटना या महासंघाला (फेडरेशनला) संलग्न होत असतात. प्रत्येक स्तरावरील अधिकृत क्रीडा संघटनांवर त्या त्या संलग्न संस्थांचे प्रतिनिधी वरिष्ठ संघटनांवर निवड करून पाठविला जातो. सर्व खेळांचे फेडरेशन आपले प्रतिनिधी इंडियन ऑलिम्पिक असो.वर पाठवितो. तसेच राज्यातील विविध क्रीडा संघटना अधिकृत प्रतिनिधी महाराष्ट्र ऑलिम्पिक असो.वर पाठवितात. पण यांच्या सर्व संलग्न संघटनांना भारत सरकारने नव्याने मंजूर केलेले 'राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ ' याचे बंधन स्वीकारावेच लागते. याशिवाय राज्य व केंद्र सरकार यांचे शालेय व महाविद्यालय पातळीवर स्वतंत्र राष्ट्रीय असोसिएशन असून त्यांच्यावतीने शालेय व महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा वयोगटानुसार, सरकारी अनुदानानुसार आयोजित केल्या जात असतात. त्या देखील आंतर जिल्हा व राष्ट्रीय स्तरांवर होतात. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना आणि संघाना क्रमवारीनुसार केंद्र सरकार त्यांना खास शिष्यवृत्ती देतात. यामुळे त्यांचा शैक्षणिक भविष्यकाळ उज्वल होऊ शकतो. शैक्षणिक क्षेत्रातील विविध शाखेत प्रवेश देताना फी बाबत सवलत देण्यात येते. आता तर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध आर्थिक मदतीने जागतिक क्रीडा क्षेत्रात भारत उंच भरारी मारताना दिसत आहे ! भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रगती जगात स्पर्धा करू लागलेली आहे. यामध्ये छोट्या छोट्या खेळाडूंचा देखील वाटा दिसतो.

अशाप्रकारे देशात आणि राज्यात प्राप्त होणारी खेळातील गुणवत्ता व क्रीडा विकास पाहता केंद्र, राज्य आदी माध्यमातून क्रीडा क्षेत्रांची आर्थिक तरतूद प्रत्येक वर्षी वाढताना दिसू लागली. ही सकारात्मक वृत्ती विविध प्रकारच्या राज्यातून वाढलेली दिसते. आता तर आथिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवत्ता असलेला खेळाडू देखील जागतिक स्तरांवर यश प्राप्त करताना दिसत आहे. क्रीडा मंत्रालयाची वार्षिक आर्थिक तरतूद खेळांच्या विकासासाठी अंदाजे साडेतीन हजार कोटी रुपयांचे असते. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि अन्य इंटरनॅशनल स्पर्धा आयोजित केल्या तर त्या त्या आर्थिक वर्षात जादा आर्थिक तरतूद करण्यात येते.यानुसार त्या त्या राज्यांच्या खेळांच्या गुणवत्तेनुसार आर्थिक तरतूद देण्यात येते.यामुळे साऱ्या देशात आणि महाराष्ट्रात गुणी खेळाडू आणि सांधिक संघ यश मिळवित असताना दिसते. या यशामुळे केंद्र आणि राज्य शासनानी आपल्या विविध शाखांमधून या गुणी खेळाडूंना वरिष्ठ पासून ते चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या नोकऱ्या सहज उपलब्ध झालेल्या आहेत. इतकेच काय पण खाजगी क्षेत्रात देखील नामांकित कंपन्या मधुन अनेकांना आज नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत. क्रीडा क्षेत्रात बेकार खेळाडू दिसत नाही. गुणी खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये नक्कीच लाभ होताना दिसत आहे.

क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता आणि त्यांचे योगदान पाहता खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटक यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून लाखो, करोडो रुपयांसह विविध पुरस्कार प्राप्त होत असतात. यांना विनामूल्य प्रवासाची सुविधा प्राप्त होत असते. ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक मदत उपलब्ध केलेली आहे. पुरस्कारपटू आणि राष्ट्रीय खेळाडूंना सवलतीत सदनिका प्राप्त झालेल्या आहेत. कुस्तीदारांना खुराक उपलब्ध करण्यात येतो. क्रीडा सहभागासाठी खेळाडू, विविध अधिकारी वर्ग आणि संघटक पदाधिकारी यांना भारतात रेल्वे प्रवासासाठी सवलत देण्यात येते. विद्यार्थ्यांना विशिष्ट परीक्षांसाठी विशेष जादा गुण देण्यात येतात. राष्ट्रीय स्पर्धेतील विजयी संघांना आणि गुणी खेळाडूंना राज्य शासन हजारो, लाखो रुपयांची आर्थिक मदत करत आहे. असे सारे असल्यावर तुम्ही तुमच्या आवडीच्या किंवा तुमच्याकडे असलेल्या गुणवत्तेनुसार खेळावर प्रेम करून त्यामध्ये यश प्राप्त करावे. विशेषता मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्यास या क्रीडा क्षेत्राकडे आवड निर्माण करण्यास प्रोत्साहन व उत्तेजन देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व वाढविण्याकरिता आणि त्याचा विकास करण्यासाठी खेळाकडे लक्ष देण्यास भाग पाडा. मोबाईलसाठी वेळ न दवडता मैदानावर सराव करा. नक्कीच त्या मुलांचे भवितव्य उज्वल होईल पण यावर पालकांनी मुलांच्या भविष्यासाठी आपला दृष्टिकोन बदलून खेळाच्या माध्यमासाठी सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातून हा बदल होताना दिसत आहे. शिक्षणाच्या शर्यतीत स्पर्धा पाहता तेच ध्येय गाठण्यासाठी क्रीडाक्षेत्राला अधिक जवळ करा असेच म्हणावे लागेल!

शिव छत्रपती पुरस्कार विजेता, (क्रीडा संघटक)

माजी क्रीडा परिषद आणि माजी शिव छत्रपती पुरस्कार नियमावली विशेष शासकीय सदस्य.

इंधन दरवाढीचा फटका! इंडिगोकडून आजपासून तिकिटांवर अधिभार; विमानप्रवास महागणार

ई-रिक्षा व ई-बाइकसाठी परवाना बंधनकारक; मोटार वाहन विभागाकडे करावी लागणार नोंदणी

BMC शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली; इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढला; प्रजा फाऊंडेशनचा अहवाल जाहीर

गॅस सिलिंडर पुरवठ्यासाठी जिल्हास्तरीय विशेष समित्या स्थापन; राज्य सरकारचा निर्णय

Mumbai : पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री दोन ब्लॉक; प्रभादेवी पूल पाडण्यासाठी बोरिवली ते भाईंदर दरम्यानही ब्लॉक