देश-विदेश
भावेश ब्राह्मणकर
एका बाजूला आकाशातून होणारा क्षेपणास्त्र आणि बॉम्बवर्षाव तर दुसऱ्या बाजूला पूर्णपणे उध्वस्त झालेली अर्थव्यवस्था... अशा दुहेरी आणि प्राणघातक संकटात इराण सापडला आहे. अशा परिस्थितीत सावरणे व जनक्षोभ टाळणे आव्हानात्मक आहे.
गेल्या काही काळापासून अत्यंत नाजूक स्थितीत असलेल्या इराण-अमेरिका संघर्षाला पुन्हा एकदा नवे उग्र वळण मिळाले आहे. युद्धाच्या ज्वाळा काही काळासाठी शमल्याचा भास निर्माण झाला असतानाच, अमेरिकेने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांमुळे संपूर्ण इराण पुन्हा एकदा कमालीच्या अनिश्चिततेच्या आणि भीतीच्या गडद छायेत लोटला गेला आहे. प्रचंड कचाट्यात सापडलेला सामान्य इराणी नागरिक आज ‘‘उद्याचे काय?’’ या एकाच प्रश्नाच्या भीतीखाली आपले दिवस कंठत आहे. वरवर पाहता इराणी सत्ताधीश अमेरिका आणि इस्रायलसोबत झालेला करार हा आपला धोरणात्मक विजय असल्याचे भासवत असले, तरी देशातील प्रत्यक्ष वास्तव मात्र पूर्णपणे वेगळे आणि भयानक आहे. उघड्या डोळ्यांनी दिसणारे विनाशकारी वास्तव, बेरोजगारीचा उच्चांक आणि होरपळणारी ९ कोटी जनता आज एका मोठ्या ऐतिहासिक संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे.
युद्धाचा सर्वात मोठा आणि थेट फटका इराणच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याला बसला आहे. तेहरानमधील ४० वर्षीय छायाचित्रकार सोमाये हिने आपली व्यथा मांडताना सांगितले की, युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत आज भाजीपाला आणि रोजच्या किराणा सामानाचे भाव दुप्पट झाले आहेत. ती म्हणते ‘‘युद्धाच्या या भीषण काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट अर्थव्यवस्था हीच असते. दररोज आमची परिस्थिती अधिक बिकट आणि कठीण होत चालली आहे. सर्वात जास्त मानसिक ताण हा रोज बदलणाऱ्या परिस्थितीचा येतो-एक दिवस युद्धाची शक्यता असते, तर दुसऱ्या दिवशी शांतता! आम्हाला दोन दिवसांनंतरचे नियोजन करणेही अशक्य झाले आहे.’’
स्थानिक बाजारपेठांमध्ये वस्तूंची अचानक तीव्र कमतरता जाणवत नसली, तरी युद्ध सुरू झाल्यापासून वस्तूंच्या किमतींमध्ये तब्बल ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे लोकांनी अत्यावश्यक अन्नधान्य आणि औषधे वगळता इतर सर्व प्रकारची खरेदी पूर्णपणे थांबवली आहे. राजधानी तेहरानमधील अनेक व्यावसायिक आणि कलादालनांचे मालक आपले व्यवसाय अक्षरशः ठप्प झाल्याचे सांगत आहेत. पश्चिम कुर्दिस्तान प्रांतातील सनंदज शहरातील ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर अमीर याने २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू होण्याच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच लग्न केले होते. मात्र, जानेवारी महिन्यात सरकारने देशांतर्गत आंदोलने मोडून काढण्यासाठी इंटरनेट सेवा खंडित केल्यापासूनच अमीरचा रोजगार हिरावला गेला. अमीर सांगतो, ‘‘माझ्यावर कर्जाचा प्रचंड डोंगर होता. सनंदजसारख्या शहरात राहून इंटरनेटशिवाय काम करणे अशक्य होते. काही दिवसांपूर्वीच मला कसेबसे नवीन काम मिळाले होते, पण आता पुन्हा संघर्ष तीव्र झाल्याने जगणे नकोसे झाले आहे.’’
डिजिटल किंवा ऑनलाइन माध्यमांवर आधारित काम करणाऱ्या ‘रिमोर्ट वर्कर्स’साठी ही इंटरनेट नाकेबंदी आर्थिकदृष्ट्या प्राणघातक ठरली. महिनाभर इंटरनेट पूर्ववत झाल्यानंतर लगेच युद्धाला सुरुवात झाली आणि पुन्हा नेटवर्क बंद करण्यात आले. सलग अनेक आठवडे झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेची धुरा सांभाळणारे मुख्य औद्योगिक आणि पायाभूत घटक पार उद्ध्वस्त झाले आहेत. साउथ पार्स या अब्जावधी डॉलरच्या गॅस क्षेत्रासह पेट्रोकेमिकल प्रकल्पांवर गंभीर हल्ले झाले. खुझेस्तान आणि इसफाहानमधील अवाढव्य पोलाद कारखाने उत्पादन थांबवून बंद पडले. रेल्वे, विमानतळ, पूल आणि विजेचे ग्रीड उध्वस्त झाल्याने औद्योगिक पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे.
सेंट अँड्रूज युनिव्हर्सिटीचे इतिहासकार प्रोफेसर अली अन्सारी यांच्या मते, ‘‘इराणच्या अंतर्गत नुकसानाची नक्की तीव्रता मोजणे कठीण आहे, पण कोणत्याही निकषावर हा इराणसाठी मोठा पराभव आहे. पैसा संपला आहे आणि देशातील पायाभूत सुविधांचे धिंडवडे निघाले आहेत.’’ उद्योग बंद पडल्याने त्याला जोडल्या गेलेल्या लहान-मोठ्या पुरवठादारांवर साखळी-प्रतिक्रिया झाली आहे. तब्रिज शहरातील कापड व्यावसायिक आरश यांनी सांगितले की, त्यांना त्यांचा कारखाना बंद करून सर्व १२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावे लागले आहे.
इराणी रियाल या चलनाचे मूल्य कमालीच्या वेगाने घसरल्यामुळे देशातील तरुण पिढीची भविष्याची सर्व स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. ३४ वर्षीय सायकोथेरपिस्ट नाझनीन ही उच्च शिक्षणासाठी (पीएचडी) परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत होती. मात्र, चलनाचे अवमूल्यन झाल्यामुळे तिला देश सोडणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाले आहे. या आर्थिक अडचणींसोबतच परदेशात न जाण्यामागे एक भावनिक आणि वेदनादायी कारणही दडले आहे. नाझनीन म्हणते, ‘‘हल्ल्यांच्या काळात जेव्हा जेव्हा मी कुटुंबापासून दूर असायचे, तेव्हा माझ्या मनात विचार यायचा की जर बॉम्बस्फोटात माझे कुटुंब मारले गेले तर मी काय करेन? परदेशात एकटेपणाच्या दुःखात जगण्यापेक्षा आपल्या माणसांसोबत संकटाला सामोरे जाणे मी पसंत करेन.’’
इराणमधील परिस्थिती अत्यंत बिकट आणि भयावह असली, तरी बहुतांश नागरिक आपला देश सोडून निर्वासित होण्यास तयार नाहीत. सिरियात २०११ ते २०२४ दरम्यान झालेल्या गृहयुद्धातून पळून गेलेल्या निर्वासितांची जी दुर्दशा झाली, तशी आपली परक्या देशात होऊ नये अशी भीती त्यांना वाटते. अमीर आपल्या आजोबांच्या आठवणी सांगताना म्हणतो, ‘‘माझी आई १९८०-८८ च्या इराण-इराक युद्धाच्या वेळची गोष्ट सांगायची. माझे आजोबा म्हणायचे की, ‘आपण आपल्याच छताखाली मेलो तरी चालेल, पण घर सोडायचे नाही.’ आज इतर देशांच्या सीमा आपल्यासाठी उघड्या असतील की नाही आणि तिथे आपल्याला कोणती वागणूक मिळेल, याची कुणालाच खात्री नाही.’’
जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीचे अभ्यासक उमुद शोकरी यांच्या मते, चालू वर्षात इराणची अर्थव्यवस्था १० टक्क्यांनी घसरण्याची दाट शक्यता आहे. इराणची पुनर्उभारणी ही दोन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असेल. जोपर्यंत इराणवरील जागतिक निर्बंध शिथिल होत नाहीत आणि परदेशातील गोठवलेला निधी मोकळा होत नाही, तोपर्यंत सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार देणे आणि उदध्वस्त पायाभूत सुविधांची दुरुस्ती करणे अशक्य आहे. युद्धादरम्यान इराणने संयुक्त अरब अमिराती आणि इतर शेजारी आखाती देशांच्या क्षेत्रांना लक्ष्य केल्यामुळे महत्त्वाचे व्यापार संबंध दुरावले आहेत. एका युएई अधिकाऱ्याच्या मते, या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील विश्वासाला तडे गेले असून ते पूर्ववत होण्यासाठी अनेक दशकांचा काळ लागू शकतो.
इराणी प्रशासनाला सध्या इस्रायल किंवा अमेरिकेच्या बॉम्बपेक्षाही देशांतर्गत उफाळून येणाऱ्या जनक्षोभाची अधिक भीती वाटत आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या आंदोलनांमध्ये सरकारने केलेल्या हिंसक कारवाईत हजारो नागरिकांचा बळी गेला होता. महाबाद शहरातील रहिवासी सिवा यांच्या मते, युद्धाच्या या तीव्र झळा भविष्यात मोठ्या सामाजिक क्रांतीला जन्म देऊ शकतात. महागाईचा असाच भडका उडत राहिल्यास, रस्त्यावरील तीव्र आंदोलनांशिवाय इराणी जनतेसमोर दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. युद्धाच्या काळात बॉम्बच्या भीतीपोटी शांत बसलेली जनता, आता शांततेच्या काळात सरकारच्या आर्थिक अपयशाविरुद्ध आणि वाढत्या महागाईविरुद्ध अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी रोखून आपले अंतिम राजकीय अस्त्र वापरले खरे, पण त्याची दीर्घकालीन आर्थिक किंमत आता संपूर्ण देश मोजत आहे. कागदावर राजकीय किंवा धोरणात्मक विजय दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणच्या सत्ताधाऱ्यांसमोर आता उदध्वस्त झालेला देश चालवणे, कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरणे आणि उफाळणाऱ्या अंतर्गत जनक्षोभाला रोखणे हे इतिहासातील सर्वात मोठे आव्हान बनले आहे.
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार