संपादकीय

हरवत चाललेली मातृभाषा

आज जागतिक मातृभाषा दिन साजरा करत असताना आपापल्या मातृभाषेचे काय होत आहे, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. भाषिक राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय भाषा राष्ट्रीय भाषांना, राष्ट्रीय भाषा प्रादेशिक भाषांना, तर प्रादेशिक भाषा स्थानिक बोलीभाषांना मागे सारत आपले प्रभुत्व प्रस्थापित करत असतात. या भाषिक राजकारणातून अनेक स्थानिक भाषा नामशेष होत आहेत.

नवशक्ती Web Desk

चौफेर

प्राजक्ता पोळ

आज जागतिक मातृभाषा दिन साजरा करत असताना आपापल्या मातृभाषेचे काय होत आहे, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. भाषिक राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय भाषा राष्ट्रीय भाषांना, राष्ट्रीय भाषा प्रादेशिक भाषांना, तर प्रादेशिक भाषा स्थानिक बोलीभाषांना मागे सारत आपले प्रभुत्व प्रस्थापित करत असतात. या भाषिक राजकारणातून अनेक स्थानिक भाषा नामशेष होत आहेत.

आज जागतिक मातृभाषा दिन. भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि जागरूकता वाढवण्यासाठी युनेस्कोने (UNESCO) सन २००० पासून दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्याची कल्पना कॅनडामध्ये राहणारे बांगलादेशी रफीकुल इस्लाम यांनी दिली. बंगाली भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीही हा दिवस स्मरणात ठेवला जातो. १९५२ मध्ये ढाका विद्यापीठातील विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या मातृभाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले. यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या स्मरणार्थ युनेस्कोने मातृभाषा दिनासाठी हा दिवस निवडला. २०२२-२०३२ हे दशक संयुक्त राष्ट्रांकडून ‘देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय दशक’ म्हणून साजरे केले जात आहे.

“माझी मातृभाषा कोरकू आहे, पण माझं शिक्षण मराठी शाळेतून झालं आहे. सुरुवातीला शाळेत इतरांशी बोलायला, व्यक्त व्हायला खूप अडचणी आल्या. पण मी शिकलो. आता या शाळेत शिकवतोय, माझ्यासारखी स्थिती या पोरांची होऊ नये असं मला वाटतं” असं ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शिक्षक शिशिर वसावे सांगत होते. त्यांच्या बोलण्यातून भाषेचं महत्त्व आणि विद्यार्थ्यांचं भविष्य किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव होते. 'भाषा' हा शब्द उच्चारला की आपल्या मनात पहिल्यांदा येते ती मातृभाषा. आपल्याला कितीही भाषा येत असल्या तरी डोक्यात विचार सुरू असताना किंवा काहीतरी लिहिताना सुचणारी कल्पना मातृभाषेतूनच येत असते. लहान मुलंही मातृभाषेतून लवकर शिकतात, हे आता अभ्यासातून सिद्ध झाले आहे. परंतु आताच्या अनेक मराठी घरातून साध्या संवादासाठी इंग्रजी किंवा हिंदीतील वाक्यांचा उपयोग केला जातो. आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे, अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यामुळे मातृभाषेविषयी ओढ असूनही मुलांच्या करियरसाठी उपयोगी ठरेल अशीच भाषा शिकवण्यावर भर असतो. त्यामुळे हळूहळू मातृभाषा विसरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

अमेरिकेत बरीच वर्षे राहिल्यानंतर एका मराठी कुटुंबात वाढलेला माझ्या मित्राला ‘रागी’ (Ragi flour) हा शब्द आपलासा वाटतो. रागीच्या पिठाला मराठीत नाचणीचं पीठ म्हणतात हे त्याच्या लक्षात नाही. ‘रागी’ हा शब्द मराठी आहे का? जर नाही तर रागीला मराठीत काय म्हणतात असे त्याने एकदा मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर विचारले. रागीला मराठीत ‘नाचणी’ म्हणतात हे सांगितल्यावर मी विसरूनच गेलो होतो, असे त्याने सांगितले.

मुंबईत एका पीआर कंपनीत काम करणाऱ्या शाहीदला उर्दू येत नाही. याचं त्याला दुःख आहे. त्याच्या पालकांना येत असलेली उर्दू भाषा आपल्याला येत नाही याची खंत त्याच्या मनात आहे. उर्दू शिकण्याचे अनेकदा त्याच्या मनात येते. पण आता खूप उशीर झाला आहे, असे त्याला वाटते. शाहीदचे वडिलोपार्जित घर ग्वाल्हेरमध्ये आहे. पण नोकरीनिमित्ताने तो आणि त्याचं कुटुंब मुंबईत स्थायिक झाले आहे. घरात सर्वजण हिंदीत बोलायचे, पण शाहीदला आपल्या कॉलेजच्या काळात जाणवू लागले की, त्याच्या अब्बू आणि अम्मीला उर्दू येणारे कुणी भेटले की त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहत नव्हता. पण त्याचे उर्दू शिकणे राहून गेले.

युनायटेड नेशन्सच्या (UN) अहवालानुसार जगभरात बोलल्या जाणाऱ्या ६००० भाषांपैकी जवळपास २६८० भाषा (४३ टक्के) लुप्त होत आहेत. लुप्त होण्याचे प्रमाण खूप जास्त आणि वेगवान आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी दोन भाषा नाहिशा होत आहेत. त्यामुळे प्रादेशिक सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डिजिटल क्रांतीत मागे पडलेल्या छोट्या भाषा त्यांचे अस्तित्व वाचवू शकलेल्या नाहीत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर शंभरहून कमी भाषा वापरल्या जातात. जागतिक स्तरावर, लहान देशांच्या मातृभाषा वेगवेगळ्या प्रदेशात प्रचलित आहेत. जागतिक डेटा माहितीनुसार, भारताची अधिकृत भाषा असण्यासोबतच, सात देशांमध्ये मातृभाषा म्हणून हिंदीला प्रमुख स्थान आहे. यामध्ये फिजी, न्यूझीलंड, जमैका, सिंगापूर, त्रिनिदाद टोबॅगो, मॉरिशस या देशांचा समावेश आहे. पापुआ न्यू गिनी सारखे क्षेत्र उच्च भाषिक विविधतेचे उदाहरण आहे. ३.९ दशलक्ष लोकसंख्येद्वारे येथे बोलल्या जाणाऱ्या भाषांची संख्या सुमारे ८३२ आहे. या भाषा ४० ते ५० भिन्न भाषा कुटुंबातील आहेत. मात्र जगातील सुमारे ६० टक्के लोक फक्त ३० प्रमुख भाषा बोलतात.

भारतासारख्या विशाल बहुभाषिक देशात १९,५६९ भाषा किंवा बोली या मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. १२१ कोटी लोकसंख्येच्या भारतात १२१ भाषा अशा आहेत ज्या १०,००० किंवा त्याहून अधिक लोक बोलतात. संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या २२ भाषा या भारतातील ९३.७१ टक्के लोकांच्या मातृभाषा आहेत. भारतातील ९० टक्के भाषा बोलणाऱ्यांची संख्या एक लाखापेक्षा कमी आहे. १३६५ मातृभाषांपैकी बहुतेक प्रादेशिक भाषा आहेत. भारत हा प्राचीन काळापासून बहुभाषिक देश आहे, पण ही संस्कृतीही आता धोक्यात आली आहे. भारतातील ४३ कोटी हिंदी भाषकांपैकी केवळ १२ टक्के लोक द्विभाषिक आहेत, तर ९७ दशलक्ष लोकांपैकी १८ टक्के लोक बंगाली आहेत. देशात राष्ट्रवादाच्या नावाखाली लढणाऱ्या वर्गाला संस्कृत ही केवळ १४ हजार लोकांची मातृभाषा आहे हे जाणून आश्चर्य वाटेल. डिजिटल युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण अजूनही प्रयत्न केले नाहीत, तर कदाचित २२ अनुसूचित भाषाही त्यांचे अस्तित्व वाचवू शकणार नाहीत. आपल्या मातृभाषेत बोलायला इथले लोक टाळतात हे भारताचे दुर्दैव आहे. जर कोणी मातृभाषेत बोलले तर त्याला अडाणी समजले जाते, त्याच्या कौशल्याचा अवमान केला जातो. इंग्रजी मानसिकतेने भाषेला सामाजिक स्थितीशी जोडले आहे. जर आपण आपल्या मातृभाषेचे संवर्धन केले नाही तर भाषिक विविधता आपसुकच नाहीशी होईल.

prajakta.p.pol@gmail.com

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस; पुढील तीन तास महत्त्वाचे, हवामान खात्याचा रेड अलर्ट

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; बीड, सिल्लोडमध्ये नागरिक अडकले, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य सुरू | Video

Mumbai : भरपावसात मोनोरेल पुन्हा बंद; प्रवाशांची सुखरूप सुटका, महिन्याभरातील दुसरी घटना

Waqf Board Amendment Act 2025 : वक्फ बोर्डातील दोन तरतुदींवर स्थगिती, पण संपूर्ण कायदा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

डाॅक्टरांचा गुरुवारी संप; सरकारच्या नवीन अधिसूचनेविरुद्ध IMAचा इशारा