संपादकीय

केजी टू पीजी हस्ताक्षराची काळजी

अक्षर हा माणसाच्या मनाचा आरसा असतो. त्याच्या अक्षरातून त्याची सृजनशिलता, कृतिशिलता, संघटन कौशल्य, सहनशक्ती इ. कौशल्ये समजतात.

अर्चना मुळे

अक्षर हा माणसाच्या मनाचा आरसा असतो. त्याच्या अक्षरातून त्याची सृजनशिलता, कृतिशिलता, संघटन कौशल्य, सहनशक्ती इ. कौशल्ये समजतात. अक्षरावरूनच त्याचा शैक्षणिक, भावनिक विकास लक्षात येऊ शकतो. लिहिणं हा माणसाच्या दैनंदिन जीवनातील एक भाग आहे. हाताने लिहिण्यामुळे कठीण परिस्थिती हाताळण्याचं विचार कौशल्य विकसित होतं. आकलन क्षमता वाढते. अनेक गोष्टी लक्षात ठेवता येतात. ध्येय निश्चितीसाठी मदत होते. हस्ताक्षर ब्रेनला ट्रेन करतं असं म्हंटलं जातं. काही मुलांच्या समस्या या चांगली अक्षरं, खराब अक्षरं, गोंधळात टाकणारी अक्षरं, अभ्यास यांच्या अवतीभोवती फिरत राहतात.

पहिलीतील आर्यनच्या आईची तक्रार होती की, आर्यनचे अक्षर खूप खराब आहे. तो खूप हळू लिहितो. बोर्डवर लिहिलेला अभ्यास हा अर्धवट लिहून आणतो. लिहिण्याच्या कासवगतीमुळे याला मार्क कमी पडतात. तसा तो हुशार आहे, पण लिहिण्याचा खूपच कंटाळा करतो. शाळेतून सारख्या तक्रारी येतात. काय करू कळत नाही. सहावीतील जिज्ञाची देखील अशीच काहीशी समस्या होती. अक्षर खराब होतं. लिहिण्याचा कंटाळा होता. लिहायला लागू नये म्हणून शाळाच नको, असं ती म्हणायची. तिला अभ्यासाचा तिरस्कार वाटायचा. ती चिडचिड करायची, रडायची. तिच्या पालकांना तिच्या या वागण्यामुळे हतबल वाटू लागले होते.

आजकाल अक्षर चांगलं नसण्याची समस्या तर आहेच. परंतु त्याहून जास्त लिहिण्याचा कंटाळा करण्याची समस्या केजी टू पीजीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यात ऑनलाईन अभ्यास पद्धतीने आणखी भर घातली असं दिसून येतंय. सर्वसाधारणपणे ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये ही समस्या आढळून येते. अशा समस्यांमुळं पालकांमध्ये चिंता वाढते आहे. विद्यार्थ्यांमधील नेमक्या समस्या, कारणं, परिणाम याचा थोडा विचार करायला हवा.

समस्या -

मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो. अभ्यासाची ईच्छा होत नाही. गृहपाठ पूर्ण करायला बराच वेळ देऊनही तो अपूर्णच राहतो. लिहिलं तरी त्या अक्षरांचा रेषेला नीट स्पर्शही होत नाही. अक्षरं अधांतरी तरंगत राहतात. अक्षरांना वळण देता येत नाही. दोन अक्षरांमध्ये योग्य अंतर असावं हे समजत नाही. अक्षरांचा योग्य आकार कळत नाही. एका हाताने कागद किंवा वही पकडणे आणि दुसऱ्या हाताने पेन्सिल, पेन पकडणे ही तारेवरची कसरत वाटते. लिहिताना अक्षरावर भर द्यायला समजत नाही. अक्षर लिहिण्याची योग्य पद्धत लक्षात येत नाही. एकसारख्या अक्षरांचा, अंकांचा गोंधळ होतो. अक्षरांमध्ये एकसारखेपणा आणणं जमत नाही. इंग्रजी लिहिताना कॅपिटल, स्मॉल लेटर्स समजून घेताना त्रास होतो.

कारणं -

सवय, शिस्त, वळण लावण्याची घाई - बाळ जन्माआधीपासून आई-वडिलांचा शाळेचा शोध सुरू होतो. बाळाला शाळेची सवय असावी म्हणून बाळ असल्यापासूनच पाळणाघर निवडलं जातं. बाळाला अभ्यासाची सवय व्हावी म्हणून घरात अंकलिपी, बाराखडी, बडबडगीतं यांची पुस्तकं आणली जातात. पुस्तकातून शिकवायला वेळ लागतो हे लक्षात आल्यावर मोबाईलची मदत घेतली जाते. जो मोबाईल.. यूट्यूबच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास सोपा करेल असं वाटतं, तो मोबाईल मुलांचा घात करतो. कारण मोबाईल हातात घेण्याचं ते योग्य वय नसतं. त्याचे दुष्परिणाम आपण बघतोच आहोत.

ऐकणे, बोलणे, लिहिणे ही शिकण्याची प्रक्रिया समजून न घेणे- बाळ असल्यापासून त्याच्याशी भरपूर गप्पा माराव्यात. झोपवताना अंगाई गीत म्हणावं. गाणी म्हणावीत. गोष्टी सांगाव्यात. मुलांच्या कानावर भरपूर शब्द पडावेत. त्याच्याशी लाडात बोबडं बोलू नये. त्याने सगळ्या कृती त्याच्या वयाच्या आधी कराव्यात हा अट्टाहास पालकांनी करू नये. बोलायला लागल्यावर सतत त्याने कसं बोलावं याच्या सूचना देऊ नयेत. तो पालकांचं अनुकरण करेल. फक्त पालकांनी आपण जे बोलतो त्याकडे नीट लक्ष द्यावं. त्यांचाही शब्दसंग्रह चांगला असावा.

मनगट आणि बोटांच्या स्नायूंचा विकास - मनगट आणि बोटातील स्नायूंचा विकास झाला नसेल तर हातात पेन्सिल धरण्याची क्षमताच नसते. अशा वयात लिहिण्याचा हट्ट करणं म्हणजे हस्ताक्षर खराब होण्याची सुरुवात होणं. पालकांचं ओरडणं- अक्षर नीट येत नाही म्हंटल्यावर मुलांवर रागावणं, ओरडणं, मारणं सुरू होतं. त्याआधी अक्षर चांगले येत नाही त्याचं कारण शोधणं महत्त्वाचं आहे ही गोष्ट पालकांनी समजून घ्यावी.

नकारात्मक शिक्का- मुलांवर आळशी, निष्काळजी, मंद अशी विशेषणं लगेचच लावली जातात. ती न लावता मुलांना लिहिण्यासाठीचं वातावरणच तयार केलं जावं.

मुलांच्या वाईट सवयी- लिहिताना खूप लांब हात धरून लिहिणे, कागदाला डोळे चिकटून लिहिणे, पेन्सिलला अंगठ्याने वळसा घालून लिहिणे, वाकून बसणे या सवयींमुळे अक्षरं बिघडतात. कोणीच सहकार्य करत नाही- समस्याग्रस्त मुलांना चांगलं लिहिण्यासाठी पालक, शिक्षक सहकार्य करताना दिसत नाहीत. मुलांना टोमणे मारले जातात. अशा मुलांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांना प्रोत्साहन देऊन लिहिण्यासाठी उद्युक्त करण्याऐवजी त्यांचं खच्चीकरण केलं जातं. मेंदूशी निगडीत आजार - डिसप्रॅक्सिया, डिस्लेक्सिया, हायपर मोबिलिटी सिंड्रोम, डिसग्राफिया, एडीएचडी अशा काही आजारांमध्ये मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही. शिकण्याची प्रक्रिया सावकाश असते. त्यामुळेही शाळा, अभ्यास मुलांना नको वाटतो. तंत्रज्ञानामुळे होणारी नकारात्मक मानसिकता- हाताने लिहिण्याची गरजच काय, असा प्रश्न या पिढीला पडतो. त्यांना हातानं लिहिणं म्हणजे वेळेचा अपव्यय वाटतो. परंतु हस्ताक्षर किती महत्त्वपूर्ण असतं हे मुलांना समजावून सांगावं.

रायडल कॅरोल यांनी बुलेट जर्नलचा आविष्कार केला. ही एक कागद, पेन वापरून टिपणं काढण्याची पद्धत आहे. त्यांना जेव्हा विचारले की, "तुम्ही तुमची सर्व टिपणे स्वतःच्या हस्ताक्षरात कागदावर का ठेवता?" तेव्हा ते म्हणाले, "कागदावर स्वतःचे शब्द उमटवण्यात मला प्रचंड शक्ती जाणवते. तो एक असा क्षण असतो जेव्हा तुमची एक कल्पना किंवा विचार पहिल्यांदा मूर्त स्वरूपात कागदावर उतरते आणि तुम्हाला आश्चर्यचकित करते. डिजिटल माध्यमात मला हे समाधान कधीच मिळाले नाही. मला हे तसंच वाटतं जसं की, एखाद्या मित्राला स्काइपवर भेटणं आणि त्याच्या उलट, त्याला घरी जेवायला बोलावणं किंवा प्रत्यक्ष त्याला भेटणं यात जसा फरक असतो त्याप्रमाणेच हस्तलेखन आणि टायपिंग यामध्ये असतो.

पंचेंद्रियांमधील बिघाड - नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा यामध्ये जन्मत: किंवा नंतर काही बिघाड झाला तरी त्याचे शैक्षणिक दुष्परिणाम दिसून येतात. मुलांकडे मोबाईल देताना त्याचा योग्य वापर करण्याचे धडे दिले जात नाहीत.

परिणाम - शिकायला उशीर लागतो. परीक्षेच्या काळात निराशा येते. मार्क कमी मिळतात. आत्मविश्वास कमी होतो. सृजनशिलता नष्ट होते. तणावमुक्त अभ्यास होत नाही. सतत दडपण असतं. राग, चिडचिड वाढते. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही याचा अपराधी भाव असतो. आपण काहीच करू शकत नाही, अशी नकारात्मकता निर्माण होते. मुलांचं मन उदास व्हायला लागतं. परिणामी मुलांची शाळा, अभ्यास, परीक्षा याविषयी नकारघंटा सुरू होते.

उपाययोजना-

१) लिहिण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीपासून पालकांनी मुलांची भाषा समृद्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.

२) मुलांशी प्रेमाने बोलून लिहिण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

३) वाळू, माती, जमीन यावर मोठी अक्षरं काढू द्यावीत.

४) हवेत, कुणाच्याही पाठीवर अक्षरं लिहून मजा अनुभवायला द्यावी.

५) गृहपाठ करताना लिहायला उशीर लागला तरी त्यालाच तो पूर्ण करू द्यावा.

६) मुलांनी सावकाश चांगल्या अक्षरात लिहावं यासाठी प्रोत्साहन द्यावं.

७) अक्षरं सुधारण्यासाठी ग्राफ पेपरचा उपयोग होऊ शकतो.

८) लक्ष देऊन लिहिण्याने अक्षर चांगलं येतं.

९) लिहिण्यासाठी पुरेसा वेळ देणं.

११) आकार व्यवस्थित शिकवणे.

१२) अभ्यासासाठी आनंददायी वातावरण देणं.

१३) लिहिताना शारीरिक बैठक व्यवस्थेवरही लक्ष द्यायला हवं.

१४) रंगीत कागद, पेन्सिल, रंगीत खडू यांचा उपयोग करावा.

अशाप्रकारे पालकांनी मुलांच्या लिहिण्याचा, अभ्यासाचा कंटाळा नाहीसा करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मुलांचं अक्षर चांगलं नाही याचा अर्थ प्रत्येकवेळी ती आळशी आहेत असा होत नाही. मुलांनाही त्याचे हात आणि मेंदू याचं सहकार्य घडवून आणताना संघर्ष करावा लागतो. मुलांनाही स्वत:ला त्यांची अक्षरं चांगली असावीत, भरपूर अभ्यास करावा असं वाटत असतं. परंतु काही कारणास्तव त्यांना ते जमत नाही. मुलं अभ्यास न करण्यासाठी अनेक कारणं देतात. जसं की, नाहीतरी आता इथून पुढे कुठे हाताने लिहायला लागणार आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलवर टायपिंगच करावं लागेल. मग ही चांगल्या हस्ताक्षरांची धडपड कशाला?

द नॅशनल हॅन्ड रायटिंग असोसिएशन ही संस्था हाताने सुलेखन क्षेत्रात काम करते. ते असं मानतात की, हाताने लिहिणे हा शिक्षणाचा एक महत्त्वपूर्ण अंग आहे. त्यांचं ध्येय हे आहे की, सुवाच्च हस्ताक्षरांचा प्रचार व प्रसार करणे. ग्वेन डोरमन म्हणतात, "पारंपरिकदृष्ट्या सुद्धा आपण बघितले तर मुलांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांच्या लिखाणाचा त्यांना वाचता येण्याशी संबंध दिसून येतो." खूप कमी मुले लिहिण्याऐवजी कीबोर्ड टायपिंग करतात. त्यांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे लिहिण्या-वाचण्याचा संबंध अजून तरी खोडता येत नाही. या देशाच्या प्राथमिक शाळेतून अजून तरी मुले सर्व लिखाण पेन किंवा पेन्सिलच्या माध्यमातून करतात आणि यावरच त्यांची गुणात्मक पात्रतेची परीक्षा होत असते. माध्यमिक आणि त्याच्यापुढेही अनेक स्तरांवर लेखी परीक्षा घेतली जाते. झटपट आणि सुवाच्च लेखन कौशल्याचा अभाव हा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला मारक ठरू शकतो आणि त्यांच्यातील आत्मविश्वासाला बाधा येऊ शकते.

मुलांची अक्षरं चांगली असावीत, त्यांनी चांगला अभ्यास करावा, अशी अपेक्षा पालकांनी ठेवली तर त्यात चूक काहीच नाही. परंतु मुलांच्या अडचणी समजून न घेता अभ्यासाच्या मागे लागून तर ते अयोग्यच असेल. मुलांचं हस्ताक्षर खराब आणि पालकांच्या डोक्याला ताप अशा अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी, मुलांच्या भविष्यासाठी मुलांना योग्य ते सहकार्य करणं पालकांची प्राथमिकता असायला हवी.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल