संपादकीय

मतदार राजा जागा हो, महाराष्ट्र धर्माचा धागा हो

देशाला गुलामगिरीविरुद्ध लढण्यास महाराष्ट्राने शिकविले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव इ. संतांनी धार्मिक-जातीय गुलामगिरीविरुद्ध लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या गुलामगिरीविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

ॲड. हर्षल प्रधान

देशाला गुलामगिरीविरुद्ध लढण्यास महाराष्ट्राने शिकविले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव इ. संतांनी धार्मिक-जातीय गुलामगिरीविरुद्ध लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या गुलामगिरीविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. लोकमान्य टिळक देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडले. महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक आणि जातीवर्गाच्या गुलामगिरीविरुद्ध लढा दिला. संविधानाच्या मार्गातून सामाजिक समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणली. आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्वाभिमानी राज्य यावे म्हणून प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीने मतदान करावे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये बरीच चुरस आणि विविध राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. राज्यभर झालेल्या निवडणूक सभांमधून एकमेकांवरील आगपाखड पाहायला आणि ऐकायला मिळाली. राजकीय नेत्यांनाही तपासणीला सामोरे जावे लागते हे देखील या वेळेस काटेकोरपणे पाहायला आणि अनुभवायला मिळाले.

‘उठा उठा निवडणूक आली, महाराष्ट्राच्या गद्दारांना पाडण्याची वेळ झाली’, ‘कुठे नेऊन ठेवलीय ही महागाई? सांगा आता कसं जगायचं?’, ‘महागाई जगायला देत नाही’, ‘महाराष्ट्रातील उद्योगधंदे, वित्तीय केंद्र, गुजरातला पळविले जातात, तर महाराष्ट्रातील बंदरे, एअरपोर्ट, वीज प्रकल्प, पुनर्वसन प्रकल्प, मिठागरे, मोक्याच्या जागा उद्योजकाला विकल्या जात आहे’, या आणि अशा असंख्य घोषणांनी आसमंत दुमदूमला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण १५९ पक्षांतर्फे ४,१२० उमेदवार उभे आहेत.

महाराष्ट्रातले प्रमुख विषय कोणते?

बेरोजगारी, महागाई आणि महिला असुरक्षित असणे हे महाराष्ट्रातील प्रमुख विषय आहेत. महाराष्ट्रातील उद्योगधंदे, वित्तीय केंद्र गुजरातला पळविले जातात, तर महाराष्ट्रातील बंदरे, एअरपोर्ट, वीज प्रकल्प, पुनर्वसन प्रकल्प, मिठागरे, मोक्याच्या जागा एका बड्या उद्योगपतीला विकले जात आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या इच्छेनुसार चालणारे सरकार हवे की दिल्लीतील व्यापारी मनोवृत्तीच्या नेत्यांच्या इच्छेनुसार चालणारे सरकार हवे, हे आता जनतेनेच ठरवावे. महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा जलसिंचनाचा, राज्य सहकारी बँकेचा घोटाळे करणारे आज यात्रा काढून लोकांना स्वप्ने दाखवतात. ‘सबका साथ, सबका विकास’ वाढत्या बेरोजगारीतून आणि वाढत्या महागाईतून जनता अनुभवत आहे. आत्मनिर्भर भारताची घोषणा झाली आणि चीनकडून होणारी आयात प्रचंड वाढली. शब्दच्छल करून किती काळ मतदारांची दिशाभूल करणार? राजकारणात नवीन नवीन शब्दांची पेरणी करून मतदारांना फार काळ भुलवता येत नाही. सध्या राज्यात घोषणांचा सुकाळ आणि उपायांचा दुष्काळ सुरू आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ म्हणणारे प्रधानमंत्री दिल्लीत राष्ट्रीय महिला खेळाडूंवर झालेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करतात. मणिपूरपासून उत्तर प्रदेशपर्यंत महिलांचे धिंडवडे काढले जातात. तरी त्यांना तेथे भेट देऊन त्यांचे सांत्वन करावेसे त्यांना वाटत नाही. महाराष्ट्रातील भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शहांना ‘सूर्याची’ उपमा दिली. दुसरे उदाहरण अजितदादा पवारांचे. त्यांच्या सोबत व्यासपीठावर बसलेले पंतप्रधान मोदी त्यांच्या काकांना ‘भटकती आत्मा’ बोलतात, तेव्हा हा स्वाभिमानी मराठी नेता शांत बसून पाहतो. महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा सत्तेपुढे शांत झाला, याची ही उदाहरणे. आपले आजचे मतदान हे राज्याचा स्वाभिमान विरुद्ध महाराष्ट्रद्वेषी राजकारण यांच्यातला निर्णय करणारे असणार आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेला ठरवायचे आहे कोण जिंकणार? महाराष्ट्राची अस्मिता की दिल्लीतील नेत्यांचा अभिमान आणि अहंकार? महाराष्ट्राच्या मुळावर उठलेल्यांना महाराष्ट्र कधीच माफ करीत नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र त्यांना त्यांची जागा दाखवतोच.

मुंबईत आज मराठी माणसाला सोसायटीत घर घेऊ देत नाहीत, दुकाने घेऊ देत नाहीत, मांसाहार खाऊ देत नाहीत. महाराष्ट्रात आधीच तेल, डाळी, कडधान्य, खाद्यान्यांचे दर प्रति किलो २० ते २५ रुपयांनी वाढविले. लसूण आज ४०० रुपये किलो आहे. मुलांच्या शाळेची फी, क्लासेसची फी तसेच शाळेच्या वह्या पुस्तकांवर १२ ते १८ टक्के जीएसटी द्यावा लागतोय. शेतकऱ्यांच्या शेतीच्या अवजारांवर, साहित्यांवर १२ टक्के जीएसटी लावून त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी निम्मे केले आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, हरभरा, तूर इ. कडधान्याची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. एवढे कमी म्हणून की काय म्हणून ठराविक उद्योगपतीची महागडी वीज महाराष्ट्राच्या जनतेच्या माथी मारली जात आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या २० हजार शाळा बंद करून द. मुंबईतील मोक्याच्या जागेवरचे दोन भूखंड राज्याच्या मंत्र्यांच्या जवळच्या खासगी संस्थेला दिले जाणार आहेत. महाराष्ट्रातील २० पेक्षा कमी पट असलेल्या सुमारे २० हजार शाळा बंद करणार आहेत. ग्रामीण भागातील गरीब, आदिवासी, दलित मुलांना शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर ढकलले जात आहे, तर शहरात दक्षिण मुंबईतील शासकीय कार्यालये जागेअभावी वाशी, कोकणभवन येथे स्थलांतरित करण्यात येत आहेत. वित्त विभागाचा आक्षेप डावलून राज्याच्या मंत्र्याच्या जवळच्या खासगी संस्थेच्या प्राथमिक शाळेसाठी २९९५.७५ चौ. मीटरचा ३० कोटी रुपयांचा भूखंड देण्यात आला. विशेष म्हणजे याच संस्थेला भुलेश्वरमधील १०,२५७.८८ चौरस मीटरचा भूखंड जिमखान्यासाठी ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय महायुती सरकारने १६ मार्चच्या २०२४च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. या सगळ्या विषयाची माहिती वेळोवेळी राज्याच्या जनतेसमोर आली आहे. आज त्याची आठवण ठेवून मतदान करायला बाहेर पडायचे आहे.

भारत सरकारने काँग्रेस सरकारच्या काळात मुंबईतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ जीव्हीके कंपनीला काही वर्षांच्या कराराने दिले होते. जीव्हीकेने एअरपोर्टचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नूतनीकरण केले. परंतु २०१४ नंतर मोदींचे सरकार आले आणि दिल्लीशाची नजर या विमानतळावर पडली. पुढील कराराच्या वेळी नियम बदलून उद्योगपती मित्रासाठी सोयीस्कर नियम तयार करण्यात आले. जीव्हीकेवर एअरपोर्ट सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला. ईडी, सीबीआयच्या धाडी टाकण्यात आल्या. त्यांना सतावण्यात आले. शेवटी जीव्हीकेने एअरपोर्टचा ताबा सोडला. मग मित्राला मुंबई एअरपोर्ट ३० वर्षांच्या कराराने देण्यात आले. महाराष्ट्रातील खेड्यात व शहरात वीज मीटर डिजिटल (Digital Electricmeter)बसविण्याचे काम मोदींच्या मित्राच्या उद्योगाला देण्यात आले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वांद्रे रिक्लेमेशन येथील आपल्या मुख्यालयासह कास्टिंग यार्डच्या २९ एकर भूखंडांचा विकास करण्याचा निर्णय घेतला. या पुनर्विकाचे कंत्राट एका उद्योगाच्या समूहाला दिले. ४३ टक्के शिपिंग व्यवसाय उद्योगपती मित्राच्या नावे, २४ टक्के कार्गो आयात निर्यात त्याच उदयोगपतीच्या नावे, देशाचा ३३ टक्के कोळसा उद्योगपतीच्या मालकीचा, देशाची २२ टक्के औष्णिक ऊर्जा उद्योगपतीच्या मालकीची, १४ टक्के पोर्टस बंदर उद्योगपतीच्या मालकीची, ३०० किमी. मार्गाचा खाजगी रेल्वेमार्ग त्याच उद्योगपतीचा. यातून देशाची मालकी हळू हळू त्या उद्योगपतीकडे जात आहे.

फोडा, जोडा आणि जिंका

अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी मार्गदर्शन करताना त्यांना निवडणूक जिंकण्याचा एक मंत्र दिला. तो मंत्र असा ‘फोडा, जोडा आणि जिंका’. म्हणजे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पार्टीपासून फोडायचे, मग पैशाची-पदाची लालूच दाखवून किंवा ईडी-सीबीआयचा धाक दाखवून मराठी लोकांना एकमेकांपासून तोडायचे, त्यांना एकमेकांचे शत्रू करून, एकमेकांची डोकी फोडून त्यांना भाजपमध्ये आणायचे आणि त्यांच्यामार्फत साम-दाम-दंड-भेद पद्धतीने निवडणुका जिंकायच्या.

महाराष्ट्र धर्म पाळा आणि गद्दारांना गाडा

बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीत वाढलेल्या छगन भुजबळ, राज ठाकरे, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्या सावलीत वाढलेले एकनाथ शिंदे, तर शरद पवारांच्या सावलीत वाढलेले अजित पवार, दिलीप वळसे-पाटील अशा अनेक उदाहरणांनी गद्दारी केली. आपल्याच मुळावर ते उठले. ज्यांनी राजकारणात आणले, आमदार केले, मंत्री, उपमुख्यमंत्री केले त्यांना आयुष्यभर आधार द्यायचा सोडून त्यांच्याशी दगाबाजी, बेईमानी, गद्दारी करून त्यांच्याच राजकीय पक्षावर हक्क सांगितला. ईडी-सीबीआयला घाबरून सत्ताधारी पार्टीला शरण जाऊन त्यांना साथ दिली. हे महाराष्ट्राची जनता कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्राचे दैवत श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही दगाबाजी आणि गद्दारी सहन करीत नसत. दगाबाज आणि गद्दारांना ते टकमक गडावरून ढकलून देण्याची शिक्षा करीत असत. आजच्या मतदानातून या गद्दारांना गाडण्याची नामी संधी सामान्य मतदारांना उपलब्ध झाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा मतदार राजा घेईल आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्म पाळेल एवढीच अपेक्षा!

लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ