प्रदेश काँग्रेसची दमछाक! 
संपादकीय

प्रदेश काँग्रेसची दमछाक!

भाजपाला शह देण्याचे राजकारण हे शिंदे खेळत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. सध्या भाजप व शिवसेना या दोन मित्रपक्षात शह-काटशहाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

अरविंद भानुशाली

सह्याद्रीचे वारे

अरविंद भानुशाली

भाजपाला शह देण्याचे राजकारण हे शिंदे खेळत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. सध्या भाजप व शिवसेना या दोन मित्रपक्षात शह-काटशहाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

गेले आठवडाभर महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक व उमेदवारांची रस्सीखेच हा विषय चर्चिला गेला होता. या दहा जागेस सर्वात बाजी मारली ती भाजापने सहा जागा जिंकल्या. मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेसची अवस्था अत्यंत दारुण झाली. बारामती विधानसभा निवडणुकीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ यांनी निवडणूक लढवण्याची जाहीर केले. एवढेच नाही तर उमेदवाराचा अर्जही भरला. त्यानंतर माघार घेतली. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळीही हीच अवस्था काँगेसची झाली. काँग्रेसचे १६ आमदार असताना राष्ट्रवादीचे (श प) १० आमदार असताना त्यांना राज्यसभेची जागा देऊ नये अशी भूमिका सकपाळ यांनी घेतली. शेवटी शरद पवारांच्या उमेदवारीमुळे सकपाळांना माघार घ्यावी लागली. हे दोन प्रकार झाल्यानंतर तिसऱ्यांदा विधान परिषद निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाली. महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले. मात्र त्यानंतर बाजी पालटली. उद्धव ठाकरे ऐवजी अंबादास दानवे हे नाव पुढे आले. त्यावरही काँग्रेसने आदळआपट केली. शेवटच्या तासापर्यंत विधान परिषदेची एक जागा काँगेस लढविणार असे जाहीर करण्यात आले. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी माशी शिंकली आणि काँग्रेसने दानवे यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्याचे जाहीर केले. एवढेच कशाला आधल्या दिवशी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी दानवे यांच्या उमेदवारीस प्रश्न चिन्ह उपस्थित करून काँग्रेस ही जागा लढविणार असे जाहीर केले. दुसऱ्या दिवशी वडेट्टीवार हेच दानवे यांच्या उमेदवारास अर्ज भरण्यासाठी पुढे होते. एकूण या तिन्ही घटनांमुळे काँग्रेसची अवस्था 'ना घर की ना घाट की' अशी झाली आहे.

विधान परिषदेवर उबाठातर्फे उद्धव ठाकरे यांचे नाव महाविकास आघाडीतर्फे निश्चित झाले होते. मात्र त्यानंतर नेमके काय झाले हे कळले नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी आपले नाव मागे घेऊन अंबादास दानवे यांचे नाव पुढे आणले. याबाबत राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसरा उमेदवार देणार असल्याचे जाहीर केल्याने पराभवाचा फटका बसू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली अशी सर्वसाधारण चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारास पाठिंबा दिला होता, दानवेंच्या नाही. दरम्यान राष्ट्रवादीने (शप) दानवे यांच्या उमेदवारीस पाठिंबा जाहीर केल्याने अखेर काँग्रेसने दानवे यांना अटी व शर्ती टाकून पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. पण याच्या मागे मुख्य बाब म्हणजे शिंदे यांचे राजकारण. या सर्व खेळीमध्ये भाजपाने आपले पाच व सहावा उमेदवारही निवडून आणून प्रज्ञा सातव यांचाही मार्ग सुकर केला.

प्रज्ञा सातव या यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून विधान परिषदेवर आल्या होत्या. त्यानी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ती जागा रिक्त झाल्याने भाजपाने प्रज्ञा सातव याना तिकीट देऊन बिनविरोध निवडून आणले. खरं पाहू गेल्यास २०१४, २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट असतांना प्रज्ञा सातव यांचे पती लोकसभेवर एकमेव निवडून गेले होते. काँग्रेसने त्यानंतर प्रज्ञा सातव याना विधान परिषदेवर संधी दिली होती. परंतु काँग्रेसचे घाणेरडे राजकारण पाहिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपाने विधान परिषदेच्या ९ जागांच्या वेळी प्रज्ञा सातवचे दहावे पोटनिवडणूक जाहीर केली आणि त्या बिनविरोध निवडून आल्या व बाजी मारली. याचबरोबर महायुतीचे तीन उमेदवार निवडून आल्याने विधान परिषदेचे संख्याबळ वाढले. यातून काँग्रेसची अवस्था दारुण झाली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँगेसचे बंटी पाटील यांना देण्याचे होत होते. राज्यसभा निवडणुकीनंतर हे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला दिले जाईल असे म्हटले जात होते मात्र आता काँग्रेसची ती आशाही मावळल्याचे दिसून येत आहे. यातूनच प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. राज्यसभा, बारामती पोट निवडणूक त्यानंतर विधान परिषदेची जागा न मिळणे व चौथे अपयशाचे कारण म्हणजे विरोधी पक्षनेतेपद गमावल्याची स्थिती निर्माण होणे हे पाहता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जे म्हटले आहे त्याला पुष्टी मिळत आहे. काँग्रेसचे आमदार पदाधिकारी हे काँग्रेस पक्षात अस्वस्थ असून ते लवकरच भाजप पक्षानं प्रवेश घेऊ शकतील असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. त्याची सुरुवात झाली आहे. इतर घटक पक्षांची अवस्था काय आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरचढ होऊ पाहत आहेत. समृद्धी महामार्ग व मुंबई-पुणे मिसिंग लिंक ची कल्पना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतांना सुरु झाली होती.

प्रहार ही संघटना शिवसेनेमध्ये विलीन झाली. असे म्हटले जात असले तरी कडू यांनी मात्र सामाजिक सेवेसाठी प्रहार ही संघटना काम करील असे जाहीर केले आहे. याचा अर्थ हे दुहेरी शस्त्र का ठेवले जाते, हे कळत नाही. यापूर्वी जनता पक्ष यामधूनच दुभंगला होता. जनसंघाने सामाजिक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोडचिट्ठी द्यावी अशी मागणी लावून धरली होती. यावरूनच जनसंघ जनता पक्षातून बाजूला पडला आणि १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. एका पक्षात काम करत दुसरे शस्त्र ही ताब्यात ठेवणे हे दबावाचे राजकारण असू शकते ते राजकारण बच्चू कडू खेळतात की काय हे लवकरच कळेल.

राष्ट्रवादी अजित पवार गटाने पराभूत झालेल्या उमेदवारास विधान परिषदेवर दिल्याचे दिसून येते. बाबा सिद्दीकी हा एक आक्रमक चेहरा होता. त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव झिशान सिद्धीकी हे राजकारणात आले. पराभूत उमेदवारास उमेदवारी देण्यात येणार नाही असे जाहीर झाले असतानाही अजित पवार गटाने त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्येही नाराजी पुढे आली आहे. एकूण भाजपा वगळता सर्व राजकीय पक्षात नाराजीनाट्य काही संपत नाही. काँग्रेस पक्ष तर नगण्य झाला आहे. सत्ताधारीही एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पॉवरफुल होत आहेत. बच्चू कडू यांना जवळ केल्याने अमरावती विभागात पक्षबळ वाढू शकते. भाजपाने रवी राणा व नवनीत राणा यांना शह देण्यासाठी बच्चू कडूंचा आक्रमक चेहरा शिंदे शिवसेनेला भारी पडू शकतो. पक्षाचे जाळे विदर्भात पोहचवण्यासाठी कडु यांचा उपयोग शिंदे करू इच्छितात. कडू यांचा आक्रमक स्वभाव हा शिंदेंना प्रभाव दाखवू शकतो. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ही कडू यांच्यामुळेच मिळाली. तर कडू यांच्यामुळे दिव्यांग विभाग स्वतंत्र निघू शकला. आणि त्याचा उपयोग शिंदे करू इच्छितात आणि म्हणूनच ऑफर देऊन कडू यांना उमेदवारी देण्यात आली. कडू हे यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांनी शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटी गाठली होती. त्यामुळे त्यांचे स्नेहसंबंध हे जवळचे होते. शिंदे यांची ही चाल प्रभावी वाटत आहे. असे असले तरी भाजपाला शह देण्याचे राजकारण हे शिंदे खेळात असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. सध्या भाजप व शिवसेना या दोन मित्रपक्षात शह-काटशहाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. नव्या मुंबईत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद सुरु आहे तर इकडे मीरा-भाईंदर मध्ये नरेंद्र मेहता विरुद्ध शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे. साताऱ्यामध्ये तर शंभूराज देसाई हे मंत्री रस्त्यावर उतरल्याने राजकारण तापले होते. त्यांना बळ देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सातारा येथे जाऊन जाहीर सभाही घेतली. एक मात्र निश्चित की भाजपाचा वळू हा पश्चिम महाराष्ट्रात उधळला जात आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर हे काँग्रेसचे गड असायचे; परंतु सध्या हे गड संपले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले तर इकडे बाळासाहेब थोरात हे संगमनेर विभागातून पराभूत झाले. ही सर्व पार्श्वभूमी पाहता काँग्रेसची अवस्था सर्वच पातळीवर दारुण झाली आहे.

आजचे राशिभविष्य,२१ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Sunday Special Recipe : काहीतरी हटके खायचंय? मग घरच्या घरी बनवा खुसखुशीत चिकन पॅन-फ्राईड मोमोज

International Yoga Day 2026 : योगामुळे खरंच वजन कमी होतं का? वाचा तज्ज्ञांचे मत

Father's Day 2026 : 'फादर्स डे' सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

सकाळच्या घाईतही तयार होईल झटपट नाश्ता; ट्राय करा पोहे-बटाट्याचे क्रिस्पी बाइट्स