मुलुख मैदान
रविकिरण देशमुख
महाराष्ट्रात आवडते विरोधक व नावडते विरोधक याचा भेद समजून घ्यायचा असेल तर कोणत्या काळात कोणत्या विरोधी नेत्याला वेगवेगळ्या संस्था, उपक्रम स्थापन करता आले. त्यांच्या संस्थांना, उपक्रमांना सरकारी मदत सतत मिळत गेली, याचा मागोवा घेतला पाहिजे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम यांना विधानसभा निवडणुकीत सणसणीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांच्या आणि त्यांचे प्रमुख अनुक्रमे ममता बॅनर्जी व एम. के. स्टॅलिन यांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी मताधिक्क्यासह मिळालेल्या विजयामुळे हा प्रादेशिक पक्ष टिकणार हे निश्चित आहे.
राजकारणात आवडता विरोधक आणि नावडता विरोधक अशा दोन संकल्पना वरवर दिसत नसल्या तरी पडद्यामागे अस्तित्वात असतात. सत्ताधारी पक्षाच्या सोयीचा विरोधक आवडता आणि गैरसोयीचा तो नावडता असतो. पंजाबमध्ये मागील निवडणुकीत आम आदमी पार्टीन विधानसभा जिंकली ती अशाच संकल्पनेवर. तिथे काँग्रेसचा पाडाव करायला हा पक्ष कामाला आला. आता त्याची गरज संपत आली आहे. या आधी अकाली दल काँग्रेसला सतत आव्हान देत होता तेव्हा त्याचे सर्व नखरे सहन करत भाजपा त्यांच्या सोबत युतीत होता.
तमिळनाडूमध्ये द्रमुकला पराजित करण्याची धमक एका सिनेनायकातच असू शकते यावर आधारित काम झाले. एकाचवेळी शहरी आणि ग्रामीण भागात सर्व समाजघटकातील बहुतेक मतदारांनी तमिळगा वेत्री कळघम (टीव्हिके) या पक्षाच्या पाठीशी उभे राहणे उगाच घडत नसते. तमिळनाडूत विजय या अभिनेत्याने गेल्या काही वर्षांत जे सिनेमे केले त्यातील बरीच कथानके सरकारी व्यवस्थेच्या विरोधात दिलेल्या लढ्याची होती. त्याचा योग्य तो संदेश लोकांमध्ये पोहचत असताना द्रमुकच्या विरोधकांकडून त्याला हवा देण्याचे प्रयत्न झालेच नसेल, असे म्हणणे कठीण आहे.
महाराष्ट्राच्या मातीत राजकीय कथानके वेगळ्या अर्थाने आकाराला येत असतात. शिवसेनेच्या स्थापनेनंतर काही वर्षांतच या पक्षाला उपहासाने वसंतसेना म्हटले जाऊ लागले होते. त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक पडद्याआडून सेनेला बळ देतात असा आरोप तेव्हाचे विरोधक डावे पक्ष, प्रजा समाजवादी, शेका पक्ष करत असत. मुंबईवर खऱ्या अर्थान राज्य केले ते कामगारांनीच. त्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी काँग्रेसला हैराण करून टाकले होते. तेव्हा शिवसेनेने त्या वर्चस्वाला सुरुंग लावला. अर्थात याला अनेक बाजू असल्या तरी श्लेष असाच आहे.
महाराष्ट्रासारख्या साधनसंपत्तीने श्रीमंत राज्यावर आपली एकमुखी सत्ता असावी असे काँग्रेस व भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना वाटणे अनैसर्गिक नाही. पण एकीकडे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मजबूत बांधला आणि काँग्रेससमोर आघाडी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. तेव्हा राष्ट्रवादीला शह देण्यासाठी विरोधी बाकावरील काही नेत्यांचा खुबीने वापर करून घेण्यात आला. त्यामुळे विरोधकातच दोन गट पडले होते. हे राजकारण काँग्रेसचे मुख्यमंत्री चतुराईने खेळत राहिले. जेव्हा नारायण राणे अस्वस्थ होऊन बाहेर पडले तेव्हा काँग्रेस नेतृत्वाने त्यांना पक्षात खेचले. पुढे राज ठाकरे नाराज होऊन बाहेर पडले व स्वतंत्र पक्ष काढला तेव्हा आंदोलन, अटक या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हवा तयार झाली. २००९ च्या निवडणुकीत त्याचा अचूक लाभ काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता टिकविण्यासाठी घेतला.
महाराष्ट्रात आवडते विरोधक व नावडते विरोधक याचा भेद समजून घ्यायचा असेल तर कोणत्या काळात कोणत्या विरोधी नेत्याला वेगवेगळ्या
संस्था, उपक्रम स्थापन करता आले. त्यांच्या संस्थांना, उपक्रमांना सरकारी मदत सतत मिळत गेली. कधी चौकशीचा ससेमिरा मागे लागला नाही, तसेच त्यांच्या मतदारसंघात त्यांना व्यक्तिगत कधी त्रास झाला नाही, याचा मागोवा घेतला की हे सहज लक्षात येते.
नवा दिवस नवे आडाखे या प्रमाणे राजकारण फिरता फिरता ते २०१० च्या आणि २०२० च्या दशकात येते. राज्यात मराठा मतदान बऱ्यापैकी संघटीतपणे होत असते आणि ते सहकारी संस्थांच्या भोवती फिरते. त्यावर पवारांच्या राष्ट्रवादीची बऱ्यापैकी पकड आहे, याचा अभ्यास झाला तेव्हा हा प्रादेशिक पक्ष सोबत असायला हवा असे भाजपाला वाटले नसेल तर नवलच. त्यात या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या काही चुका पथ्यावर पडत गेल्या. त्यापैकी काही जण मग पक्ष सोबत घेऊन बाहेर पडले. दुसऱ्या बाजूला मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता व त्यासाठी लागणारी आक्रमकता यावर शिवसेना टिकून असते. त्यांचीही काही मते निश्चित आहेत. ती फोडायची असतील तर त्यासाठी हा पक्ष फुटायला हवा यावर काम झाले. पण आता मूळ पक्ष ताब्यात असणारे सोबत असले तरी ते वेळेप्रसंगी आपला बाणा दाखवतात. त्यामुळे दुसरा सहयोगी म्हणून राष्ट्रवादी बरा असे मानून काम सुरू झाले आहे.
त्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व प्रस्थापित व्हायला हवे, यावर काम सुरू झाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर बारामती परिसरातील जनता काहींशी अस्वस्थ आहे. ती अस्वस्थता कोणत्याही मार्गाने व्यक्त केली जाऊ शकते. अजित पवार राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलिनीकरणासाठी काम करत होते. त्याला कोणाचा विरोध होता याचीही चर्चा या परिसरात होती. हे पाहता काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार तिथे असायला नको या व्यूहरचनेवर अचूक काम झाले. अगदी प्रतिष्ठेचा प्रश्न करत उच्च पातळीवरून प्रयत्न झाले आणि काँग्रेसने आश्चर्यकारकरित्या माघार घेतली. काम तिथे फत्ते झाले.
निवडणूक रिंगणात उरलेल्या २२ अपक्षांना तशी काही ओळखच नव्हती. त्यामुळे झालेले मतदान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्य देणारे ठरले. त्यांचे नेतृत्व बारामतीने स्वीकारले हा संदेश या निमित्ताने गेला. सुरुवातीला निवडणुकीपासून दूर असणारी दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस इतकी अलिप्त होती की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने ते आपला उमेदवार उभा करू शकतात अशी विधाने आली. पण माघारीनंतर प्रचार सांगता सभेला स्वतः खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या. त्याही पुढे जात त्यांनी जे विधान केले ते भविष्याच्या दृष्टीने खूप सूचक आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार नाही. वाटल्यास आपण दुसऱ्या मतदारसंघातून लढू हे त्यांचे एका वृत्तवाहिनीच्या कार्याक्रमातील विधान सहजगत्या आलेले नाही. भविष्यातील राजकीय घडामोडींची कल्पना येण्यास ते पुरेसे ठरावे.
काळाची पावले ओळखून काम सुरू आहे, असे यातून दिसून येते. सुप्रिया सुळे यांनी २०२४ ची निवडूक कशी जिंकली हा एक अभ्यासाचा विषय आहे. हक्काच्या मतदारसंघात प्रचंड मेहनत करावी लागली असेल तर त्यांना दुसरा मतदारसंघ कोणता उपलब्ध आहे? तो सहजगत्या जिंकता येईल अशा पध्दतीने तयार करून दिला जाणार आहे? प्रयत्नपूर्वक बांधलेले स्वतःचे घर सोडून उगाच कोणी जात नसते.
आधी आवडती असणारी ठाकरेंची शिवसेना नावडती झाली. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नावडता सहयोगी पक्ष होतो की काय अशा घडामोडी दिसत आहेत. अमरावतीत भाजपाशी दोन हात करणारे बच्चू कडू शिवसेनेत आल्याबरोबर म्हणतात की, एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करू. त्यांचे एक मंत्री म्हणतात की २०२९च्या निवडणुकीत भाजपा व शिवसेना स्वतंत्र लढू शकतात. आवडते, नावडते हा राजकारणात चालणारा निरंतर खेळ आहे हेच खरे !
ravikiran 1001@gmail.com