opposition 
संपादकीय

हतबल विरोधक महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते..

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका अंतिम टप्प्यात असताना सत्ताधारी भाजपचा जोशात प्रचार आणि विरोधकांची ठळक अनुपस्थिती यामुळे या निवडणूक सभांचे चित्र अधिकच लक्षवेधी बनले आहे.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

केशव उपाध्ये

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका अंतिम टप्प्यात असताना सत्ताधारी भाजपचा जोशात प्रचार आणि विरोधकांची ठळक अनुपस्थिती यामुळे या निवडणूक सभांचे चित्र अधिकच लक्षवेधी बनले आहे.

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या बुधवारी म्हणजे ३ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकालही लागतील. या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच भाजपचे अन्य मंत्री, पदाधिकारी संपूर्ण राज्यभर हिंडून प्रचार करत आहेत. प्रचाराच्या या धामधुमीत ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे तथा उबाठा, राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार ही मंडळी पूर्णपणे गायब होती. महाविकास आघाडीच्या कळपात दाखल होऊ इच्छिणारे श्रीमान राज ठाकरे हेही प्रचारसभा घेताना दिसले नाहीत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची प्रचारातील ही अनुपस्थिती राज्यातील विरोधकांच्या हतबलतेची विदारक स्थिती दर्शविणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसात किमान चार-पाच जाहीर सभांना संबोधित करत होते. फडणवीस यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला होता.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारसभांनाही जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या प्रचारसभांमधून विरोधकांवर टीका-टिपण्णी करण्याऐवजी राज्यातील विकासकामांबद्दल त्या-त्या शहरांच्या भविष्यातील विकास योजनांवर भर दिला. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मदतीने राज्य सरकारने कोणकोणते विकास प्रकल्प हाती घेतले आहेत, याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या प्रचारसभांमधून दिली. केलेली कामे आणि भविष्यात करावयाची कामे याची यादी जनतेपुढे ठेवत मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्य सरकारमधील भाजपचे मंत्री, पक्षाचे पदाधिकारी यांनी मतदारांकडून विकासाच्या मुद्द्यावर कौल मागितला. विरोधकांवर चमचमीत भाषेत टीका-टिपण्णी करण्याऐवजी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने ही निवडणूक सकारात्मक मुद्द्याच्या आधारे लढवली.

आपल्या शहराचा विकास करावयाचा असेल तर केंद्रात आणि राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाच्या हातात नगरपालिकेची, नगरपंचायतीची सूत्रे दिली पाहिजेत, यावर भारतीय जनता पक्ष नेतृत्व मतदारांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून करत आहे. त्या शहराच्या विकासासाठी राज्य सरकारने काय केले, केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या शहरातील विकास प्रकल्पांना किती निधी दिला, याची आकडेवारी जनतेपुढे या निमित्ताने ठेवली. तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आपल्या सरकारच्या कामाचा हिशोबही मतदारांपुढे ठेवला. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांची माहिती मतदारांना देणे हे सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य आहे. सत्तेवर येण्यापूर्वी मतदारांना दिलेली आश्‍वासने कोणत्या पद्धतीने पूर्ण झाली आहेत, हेही सत्ताधाऱ्यांनी मतदारांना सांगितले पाहिजे. आपल्या कामाचा अहवाल, प्रगती पुस्तक मतदारांपुढे ठेवण्याची ही चांगली संधी आहे, हे ओळखून भारतीय जनता पक्ष नेतृत्वाने सर्व प्रचारसभांमध्ये विरोधकांवर टीका करणे टाळले.

बरोब्बर एक वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत महायुतीला प्रचंड बहुमत प्रदान केले. पराभवाच्या या धक्क्यातून उबाठा, ज्येष्ठ नेते शरद पवार, राज ठाकरे आणि काँग्रेसमधील समस्त नेतेगण अजूनही सावरू शकलेले नाहीत. उबाठा तथा उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीखेरीज अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रस नाही, हे या निमित्ताने पुन्हा जगापुढे आले आहे. असे असहाय्य विरोधक महाराष्ट्राने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळू शकली नव्हती. तरीही पक्षाचे नेतृत्व खचले नव्हते. त्या पुढील प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आणि कार्यकर्ते जिद्दीने मैदानात उतरले. त्यामुळेच १९८४नंतर अवघ्या ११ वर्षांत राज्यात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या साथीने राज्यात सरकार स्थापन केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही १९८० ते डिसेंबर १९८६ या काळात विरोधी पक्षात असताना आपल्या समाजवादी काँग्रेस या पक्षाची बांधणी करण्यासाठी संपूर्ण राज्य अनेकदा पालथे घातले होते. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे बजावण्याची कधीच सवय नव्हती. ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ या म्हणीप्रमाणे दिल्लीतील गांधी घराण्यातील नेता आपल्याला सत्ता मिळवून देईल, ती सत्ता आपण भोगायची अशी सवय राज्यातील काँग्रेस नेत्यांना लागली आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांमध्ये राज्यातील काँग्रेस नेतृत्व हातपाय हलवेल, अशी अपेक्षा कोणालाच नव्हती. मागील विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाला २० जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा उबाठा गटाला मिळाल्या. त्यामुळे राज्यात उबाठा गट हाच प्रमुख विरोधी पक्ष आहे, या नात्याने उद्धव ठाकरे हे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद आपल्या पक्षाला मिळावे, अशी मागणी वारंवार करतात. मात्र मुख्य विरोधी पक्ष या नात्याने आपण मतदाराला बांधिल आहोत, हे दाखवण्यासाठी उबाठा गटाने नगरपालिका निवडणूक प्रचारात सहभागी होण्याचे कर्तव्य बजावलेले नाही.

सध्या उद्धव ठाकरे यांना फक्त मुंबई महापालिकेच्या पोपटाचा डोळा दिसत आहे. मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंपुढे लोटांगण घातले आहे. ज्या भावाला गेली १८ वर्षे उद्धव ठाकरेंनी ओळख दाखवली नाही, तो भाऊ आता त्यांच्यासाठी प्राणप्रिय ठरला आहे. एकीकडे सत्ताधारी मतदारांपुढे जाण्यासाठी प्रचंड सक्रिय, तर दुसरीकडे मनाने गळपटलेले विरोधक असे कमालीचे विषम चित्र या निवडणुकीच्या आखाड्यात दिसले. राज्याला भविष्यकाळात तरी सक्षम विरोधी पक्ष मिळो, एवढीच इच्छा या निमित्ताने व्यक्त करता येईल.

केशव उपाध्ये,

प्रदेश मुख्य प्रवक्ते, भाजप

आज मतदानाचा वार! निवडणूक प्रशासनासह पोलीस सज्ज; नगरपालिका व नगरपंचायतींचे ठरणार भवितव्य

पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान; २६४ नगरपालिका-पंचायतींच्या निव़डणुकीत महायुती-महाविकास आघाडीत चुरस, कुठे तणावाचे, तर कुठे कायदेशीर अडचणींचे सावट

पहिल्याच दिवशी हंगामा; ‘SIR’ वरून लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब, राज्यसभेतही विरोधकांचा सभात्याग

जनआंदोलकांच्या सहाय्यासाठी वकिली ‘नजर’!

डिसेंबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य