विशेष
राजेंद्र साठे
नाटक हा सुट्टा सुट्टा अनुभव नसतो. लाल्याच्या किंवा संभाजीराजांच्या भूमिकेत काशीनाथ घाणेकर यांनी नाटक मारून नेले हे विजयाबाईंच्या व्याख्येत बसणारे नाटक नव्हते. नाटकांतील प्रत्येक नट, प्रत्येक प्रसंग यांनी मिळून एक संपूर्ण अनुभव प्रेक्षकाला द्यायला हवा हा त्यांचा आग्रह होता.
१९७० आणि ८० च्या दशकात एक बाई होत्या. त्यांचे खरे नाव इंदिरा गांधी होते. पण राजकीय वर्तुळात आणि पत्रकारितेतले लोक त्यांचा उल्लेख बोलताना बाई असा करीत. तो करताना त्यामागे कौतुक, आश्चर्य, आदर, भीती असे सर्व भाव असत. राजकारणासारख्या पुरुषी क्षेत्रामध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याच्या कर्तृत्वाला दिलेली ती एक प्रकारची दाद होती.
त्याच काळात मराठी रंगभूमीवरही अशाच एक बाई हुकुमत गाजवत होत्या. त्यांच्याबद्दलच्या बाई या उल्लेखातूनही असेच कौतुक, आश्चर्य, आदर, भीती व्यक्त होत असे. या बाईंचे नाव अर्थातच विजया मेहता. दिग्दर्शनासारख्या तोवर पुरुषी मानल्या जाणाऱ्या इलाख्यात बाईंनी वयाच्या विशीतिशीतच मोठा दबदबा निर्माण केला होता.
मराठी समाज स्वतःला पूर्वापार नाटकवेडा समजत आला. बाईंनी सुमारे ५० वर्षांच्या कारकीर्दीत अनेक रंगकर्मींना तर घडवलेच पण पण नाटक म्हणजे काय आणि ते कसे बघायचे असते याची एक नवी दृष्टी प्रेक्षकांना दिली. नवनव्या प्रयोगांची सवय लावली.
मराठी रंगभूमीवरच्या या अद्वितीय बाईंनी मंगळवारी एक्झिट घेतली. नाटकात प्रत्येक पात्राच्या भूमिकेची लांबीरुंदी ठरलेली असते. तद्वतच माणसाच्या आयुष्याला मृत्यूची मर्यादा असते. पण मोठे कलाकार अगदी छोट्या भूमिकेतही मोठा आशय भरू शकतात. बाईंसारखे रंगकर्मी तर आयुष्याची मर्यादा ओलांडून अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकणारे संचित निर्माण करीत असतात.
बाईंच्या जाण्याने मराठी रंगभूमीवरच्या एका समृध्द विद्यापरंपरेची कुलगुरु आणि जणू विद्यापीठाची निर्माती काळाच्या पडद्याआड गेली आहे. एकच चांगली बाब ही आहे की, हे विद्यापीठ त्यांच्या असंख्य कलाकृतींमधून, प्रयोगांमधून आणि मुख्य म्हणजे त्यांनी घडवलेल्या कितीएक कलाकारांमधून अखंड पुढे वाहते आहे व पुढेही राहणार आहे.
विक्रम गोखले, नाना पाटेकर, अशोक सराफ, सुहास जोशी, प्रतिमा कुलकर्णी, रीमा लागू, नीना कुलकर्णी यासारख्या असंख्य कलाकारांनी कृतज्ञतेने सांगावे, श्रीराम लागू, अनुपम खेर, नसिरुद्दिन शाह, शबाना आझमी, अमोल पालेकर अशांसारख्यांनी त्यांच्याविषयी अतीव आदराने बोलावे यामधूनच बाई नावाच्या विद्यापीठाची थोरवी कळते.
आपले वडील आणि नंतर बाई यांच्यामुळे आपले पाय जमिनीवर राहिले असे महेश एलकुंचवार यांनी म्हटले आहे. हे सर्व कलाकार आणि त्यांच्याही पुढच्या दोन पिढ्या बाईंचे ऋण मानतात यातच सर्व काही आले.
विजयाबाईंचा कलेतला प्रवास एखाद्या कादंबरीला शोभेल असा होता व खरे तर त्याच्यावरच एखादे उत्कृष्ट नाटक आणि सिनेमा निघू शकेल. त्यांचे वडील थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य. काका वारकरी. इतके की त्यांच्या नावाने आजही भिवंडीमध्ये मठ उभा आहे व तिथे भजनकीर्तने होतात. लहानपण गिरगाव नावाच्या मराठी मध्यमवर्गाच्या पंढरीमध्ये गेले. त्यांचा जन्म १९३४ चा. त्यामुळे १९४२ ची चळवळ व पुढे मिळालेले स्वातंत्र्य यांचा संस्कार त्यांच्या शाळाकॉलेजच्या वयात त्यांच्यावर झाला. त्याच काळात त्या राष्ट्रसेवा दलात जात होत्या.
स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या पहिल्या पिढीमध्ये भारताचे नाव जगाच्या नकाशावर नेण्याची कशी उर्मी होती याचे वर्णन त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये केले आहे. तीच उर्मी त्यांच्या कामामधून प्रकट होत राहिली. कॉलेजमध्ये केलेल्या अत्र्यांच्या नाटकांमधून त्या रंगभूमीवर आल्या. नंतर गिरगावातल्या साहित्य संघाच्या नाटकांमधून कामे करू लागल्या. झुंझारराव, संशयकल्लोळ अशा नाटकातून त्यांनी भूमिका केल्या. जुन्या रंगभूमीशी असलेला हा विलक्षण धागा पुढच्या त्यांच्या सर्व प्रवासात आपल्याला कायम दिसतो.
याच काळात आरंभी त्या खोटे कुटुंबात लग्न करून गेल्या. तिथे त्यांचे आयुष्य बदलले. दुर्दैवाने त्यांच्या पतीचा मृत्यू झाल्याने काही काळ त्या सैरभैर झाल्या पण नाटक या गोष्टीनेच त्यांना सावरले. पुढे फारोख मेहता यांच्याशी दुसरे लग्न करून काही काळ इंग्लंडमध्ये गेला. पुढे मध्यमवर्गीय चौकटीतून त्यांनी वाळकेश्वरच्या उच्चभ्रू वातावरणात प्रवेश केला. पण तरीही नाटकाचे मूळ प्रेम सुटले नाही.
या काळात राष्ट्रीय पातळीवर अल्काझीसारखे नाट्यगुरु आणि नंतर जर्मनीतील ब्रेख्त थिएटर या आंतरराष्टीय चळवळीशी त्या जोडल्या गेल्या. पण मराठी मध्यमवर्गीय मूल्यांबद्दलची आस आणि त्यातली गुंतवणूक कायम राहिली.. बराच काळ उच्चभ्रू व आंतरराष्ट्रीय स्तरावर राहूनही बाई बोलताना अतिशय उत्तम प्रवाही मराठीतच बोलत. त्यांच्या बोलण्यात खूप क्वचित इंग्रजी शब्द येत. मराठी माती, संस्कृती, भाषा यांच्याशी नुसत्या जोडलेल्या नव्हे तर किती घट्टपणे रुजलेल्या होत्या त्याचे ते निदर्शक होते.
वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी बाईंनी विजय तेंडुलकरांचे श्रीमंत नावाचे नाटक पहिल्यांदा दिग्दर्शित केले. ही कालची पोर आम्हाला काय शिकवणार असे त्यावेळी कोणाला वाटले नाही. किंबहुना, त्या नाटकाच्या तालमींमध्येच तेंडुलकर त्यांना बाई म्हणून हाक मारू लागले व कालांतराने मराठी नाट्यसृष्टीच्याच त्या बाई झाल्या. यातूनच पुढे रंगायन ही नाट्यचळवळ उभी राहिली. श्री. पु. भागवत, श्रीराम लागू, तेंडुलकर, अरविंद देशपांडे अशासारखे विविध क्षेत्रांमधील प्रतिभावान तरुण या चळवळीचे स्थापनकर्ते होते. पण बहुदा सुलभा देशपांडे यांनी एके ठिकाणी वर्णन केले आहे त्याप्रमाणे रंगायन नावाच्या या मधमाशांच्या पोळ्यात विजयाबाईंचा दिमाख हा राणीमाशीसारखा होता. तिथे त्या सर्वांच्या केंद्रस्थानी होत्या. सर्व काही त्यांच्याभोवती फिरत होते.
नाटक म्हणजे काय याबाबत बराच काळ मराठी कलावर्तुळात एक ठराविक मर्यादित समज होती. आधी बराच काळ संगीत रंगभूमीचा दबदबा होता. नंतर मो. ग. रांगणेकरांची कौटुंबिक थाटाची नाटके आली. पण रंगायनने त्या पलिकडे जाणारी, वास्तवाला अधिक थेट भिडणारी नाटके आणली. मराठी नाट्यरसिकांचा अवकाश विस्तारला. ठराविक खलनायक, नायक पठडीतून नाटक बाहेर आले. माणसे व परिस्थितीचे विद्रूप चेहरे दिसू लागले.
मराठी रसिकांची नवी जाणीव घडवण्यासाठी त्याला अत्यंत विचित्र, वेगवेगळे आविष्कार पाहण्यासाठी त्यांची तयारी करून घेण्यासाठी रंगायनवाल्या पिढीने प्रचंड कष्ट केले. या कष्टांमुळेच मराठी नाटकाचे रोप जोमदारपणे उभे राहिले व विस्तारत गेले. नंतरच्या काळातली प्रायोगिक रंगभूमी ते दलित किंवा बंडखोर रंगभूमी हे सगळे मराठी नाट्यसृष्टीने सहज आपल्यात सामावून घेतले याचा पाया रंगायन व त्यासारख्या त्या काळातच्या चळवळींनी घातला. विजया मेहता या त्या चळवळीच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक होत्या.
नाटक हा सुट्टा सुट्टा अनुभव नसतो. लाल्याच्या किंवा संभाजीराजांच्या भूमिकेत काशीनाथ घाणेकर यांनी नाटक मारून नेले हे विजयाबाईंच्या व्याख्येत बसणारे नाटक नव्हते. नाटकांतील प्रत्येक नट, प्रत्येक प्रसंग यांनी मिळून एक संपूर्ण अनुभव प्रेक्षकाला द्यायला हवा हा त्यांचा आग्रह होता.
बाईंच्या नाटकात लेखक महत्वाचा असला तरी दिग्दर्शक त्याच्याही वर होता. दिग्दर्शक हा अनुभवाला त्रिमिती प्रदान करतो अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी अशा बलदंड लेखकांसोबत त्यांचे कमी काम झाले. वसंत कानेटकर, जयवंत दळवी यांच्यासोबत त्यांनी बरीच नाटके केली. दळवींच्या बॅरिस्टर, संध्याछाया, सावित्री आणि पुरुषने तर इतिहास घडवला. दळवी नाटके लिहीत नाहीत तर बाई त्यांच्याकडून लिहून घेतात असेही गमतीने त्यावेळी म्हटले जात असे.
पण बाईंनी सतत नवनवीन लेखकांसोबत मैलाचा दगड ठरेल असे काम केले. अनिल बर्वेंचे हमिदाबाईची कोठी हे त्याचे उदाहरण. यातली बुढी तवायफ साकारण्यासाठी बाई स्वतः ग्रँट रोड भागातील तवायफांच्या कोठीवर गेल्या होत्या असे म्हणतात. महेश एलकुंचवार यांच्या वाडा चिरेबंदी हेही त्यांचे चिरेबंदी काम आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचा खास वैदर्भीय ठाय लयीत होत असलेला ऱ्हास त्यात दर्शवला आहे. चिं.त्र्यं. खानोलकर, भास्कर चंदावरकर यांच्यासारख्या अवलिया कलाकारांच्या सहयोगाने ब्रेख्तच्या शैलीतील अजब न्याय वर्तुळाचा त्यांनी साकारला. शाकुंतल, मृच्छकटिक, यासारख्या जुन्या संस्कृत नाटकांचा नव्याने शोधही त्यांनी घेतला व तेही प्रयोग चित्तवेधक झाले.
बाईंनी सिनेमा थोडा केला. पण तिथेही आपली छाप निर्माण केली. स्मृतिचित्रे हा पहिला सिनेमा निर्माण करण्यापूर्वी एखाद्या शाळकरी विद्यार्थ्याप्रमाणे त्यांनी श्याम बेनेगल यांच्याकडून चित्रपट निर्मितीचे धडे घेतले. नंतर पेस्तनजी हा पारशी समाजावरचा सिनेमा केला. या सर्वांना मोठे पुरस्कार मिळाले. एकूणच, बाईंनी अक्षरशः हात लावील त्याचे सोने केले.
याचे कारण बाईंची आपल्या कामावर जबर निष्ठा होती. त्याबद्दल त्यांना अतूट असे प्रेम होते. हे आपण केलेच पाहिजे अशी ठाम धारणा होती. आणि हे करण्यासाठी कितीही कष्ट करण्याची तयारी होती. ही निष्ठा, धारणा व कष्टांची तयारी म्हणजेच हेच बाईंच्या विद्यापीठाचे बोधवाक्य होते.
आता बाई नाहीत. पण आपल्या शेकडो शिष्यांच्या व लाखो रसिकांच्या मनावर त्या हे बोधवाक्य कोरून गेल्या आहेत.