- महाराष्ट्रनामा
महाराष्ट्र, मराठी माणूस यांच्या नावाखाली ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होईपर्यंत कोण कोणासोबत राजकीय समीकरणे कधी बदलतील हे राजकारणीही सांगू शकत नाही; मात्र राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दोघा ठाकरे बंधूंनी एकत्र येणे हे 'राज', उद्धव' ठाकरे यांनी ओळखले असून, ठाकरे बंधूंच्या राजकीय अस्तित्वाची ही लढाई आहे.
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप नेते कामाला लागले आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे यांनी ही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेत एक हाती सत्ता काबीज करण्याकडे भाजप नेत्यांनी छुपी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होत असल्याने एकनाथ शिंदे यांनी ही अधिकाधिक नगरसेवक निवडून आणत मुंबई महापालिकेवर आपला दबदबा प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा तितकसा जोर मुंबईत नसल्याने राष्ट्रवादीने ग्रामीण भागात मोर्चा वळवला आहे; मात्र शिवसेनेचा जन्म मुंबईतला मराठी माणूस मराठीसाठी शिवसेनेचा जन्म झाला. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक आजही मुंबईत तळ ठोकून आहेत; मात्र शिवसेनेतून वेगळी वाट धरत राज ठाकरे यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. राज ठाकरे यांना सुरुवातीला मतदारांनी उचलून धरले, २८ नगरसेवक, १३ आमदार असा प्रवास मनसेने केला. मात्र २०१४ पासून मनसेला उतरती कळा लागली असून ना आमदार ना नगरसेवक. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज यांना मुंबईत राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठी राज खेळी खेळावी लागणार यात दुमत नाही. भाजप सोबत मनसे गेली जनतेने नाकारले, महायुतीला पाठिंबा दिला जनतेने नाकारले, त्यामुळे एक चाल उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने खेळली, तर मुंबई व राजकारणात 'राज' कायम राहील, यात शंका नाही.
शिवसेनेचे एकनिष्ठ कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडाचे हत्यार उपसले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना झटका दिला. शिंदे यांनी बंडखोरी नंतर ४० आमदार व १३ खासदार, मुंबई महापालिकेसह अन्य महानगरपालिकेतील नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिंदे यांच्या बंडा नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांचे मुंबईत अस्तित्व म्हणा किंवा जोर नाहीच. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करणे एकनाथ शिंदे यांचा उद्देश नाही, हे स्पष्ट होते; मात्र मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक पदाधिकारी शिंदे सेनेत प्रवेश करत आहे, त्यामुळे शिंदेंनी मुंबई महापालिकेत पाय रोवण्यासाठी रणनीती आखली असणारच. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईत पकड असल्याने शिंदे सेनेला मुंबईत जम बसवण्यात किती यश येते हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. मुंबई महापालिकेत सत्ता काबीज ही लढाई शिवसेना विरुद्ध भाजप आहे, हे स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या सोबतीला भाजपनेही सत्तेचा उपभोग घेतला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका म्हणजे काय हे भाजप नेत्यांना चांगलेच अवगत आहे. तर २५ वर्षें सत्तेचा उपभोग घेतलेल्या शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा झेंडा फडकवणे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना व भाजप यांच्यासाठी हा अस्तित्वाचा लढा आहे. मात्र आगामी निवडणुकीत ठाकरे सेना - मनसे एकत्र आले तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत चमत्कार घडणार, यावर कोणी शंका उपस्थित करू शकत नाही.
हिंदूहृदयसम्राट बाळ ठाकरे यांची भाषण करण्याची ठाकरे शैली, "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो" हा आवाज ऐकताच जोरदार टाळ्यांचा गजर, घोषणाबाजी, त्याच प्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात होताच तोच टाळ्याचा गजर घोषणाबाजी, राज ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी, मात्र सभेला होणाऱ्या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये झाले नाही. त्यामुळे मनसे फक्त नावातच राहिली.
लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणूक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलली आहे. आता ना लोकसभा ना विधानसभा निवडणूक संधी आहे ती आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची. भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला धोका दिला की शिधसेनेने भाजपला धोका दिला हे भाजप व शिवसेना नेतेच सांगू शकतात. मात्र सत्तेसाठी शिवसेना व भाजप एकत्र नांदत होते आणि भविष्यात चमत्कार घडला तर भाजप व शिवसेना एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको, कारण राजकारणात सबकुछ माफ हैं, त्यामुळे ठाकरे नावाचे राजकीय अस्तित्व टीकवण्यासाठी उद्धव- राज एकत्र येणे 'दोघा भावांसाठी' फायदेशीर ठरणार हेही तितकेच खरे.
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तर २०२९ची निवडणूक स्वबळावर लढायची, असे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजप २०२९मध्ये होणाऱ्या सगळ्या निवडणुका स्वबळावर लढणार हे स्पष्ट झाले आहे. केंद्रात आणि राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची २०२९पर्यंत गरज आहे, हेही अमित शहा यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे. २०२९मध्ये केंद्रात व महाराष्ट्रासह अन्य राज्यात भाजप सत्तेत आले, तर मित्र पक्षांना भाजप दुधातून माशी काढल्याप्रमाणे बाजुला काढणार याची चर्चा आतापासून रंगू लागली आहे. त्यामुळे मुंबई व महाराष्ट्रात राजकीय अस्तित्व टीकवण्यासाठी भाजप वगळता सगळ्याच पक्षांनी रणनीती आखली आहे. मात्र मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला राजकीय अस्तित्व टीकवण्यासाठी मुंबई महापालिका काबीज करणे गरजेचे आहे. अन्यथा बिनशर्त पाठिंबा आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत टेस्ट मॅच खेळण्यातच राजकीय आयुष्य यांचे जाणार यात शंका नाही.
gchitre4@gmail.com