संपादकीय

कोकणात कसे पोहोचायचे? देवाक काळजी!

गणरायाच्या आगमनाला आता अवघा आठवडा उरला आहे. पण रस्त्याने कोकणात जायचे तर प्रत्येक चौकात कंबर मोडणारे खड्डे आहेत आणि रेल्वेने जायचे तर त्या भरगच्च आहेत. कोकण रेल्वे प्रकल्प अवघ्या आठ वर्षांत पूर्ण होतो, मग मुंबई-गोवा महामार्ग १३ वर्षे झाली तरी पूर्ण का होत नाही?

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

ॲड. हर्षल प्रधान

गणरायाच्या आगमनाला आता अवघा आठवडा उरला आहे. पण रस्त्याने कोकणात जायचे तर प्रत्येक चौकात कंबर मोडणारे खड्डे आहेत आणि रेल्वेने जायचे तर त्या भरगच्च आहेत. कोकण रेल्वे प्रकल्प अवघ्या आठ वर्षांत पूर्ण होतो, मग मुंबई-गोवा महामार्ग १३ वर्षे झाली तरी पूर्ण का होत नाही?

गेली तेरा वर्षे मुंबईचे चाकरमानी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्याची वाट बघत आहेत. गणेशोत्सव जवळ आला की दरवर्षी त्यांना मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याचे आश्वासन दिले जाते, प्रवास सुखाचा होईल, असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही.

मुंबई-गोवा महामार्ग नेमका रखडलाय कुठे ?

मुंबई-गोवा महामार्ग (एनएच-६६) हा ४४० किमीचा प्रकल्प पनवेलच्या पळस्पेपासून महाराष्ट्र गोवा सीमेवरील झरापपर्यंत आहे. हा प्रकल्प २०११ पासून सुरू असून, तो अनेक भागांत रखडलेला आहे. जुलै २०२५ पर्यंत काही भाग पूर्ण झाले असले तरी अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे आणि डेडलाइन वारंवार पुढे ढकलली जात आहे. सरकारी आश्वासनानुसार सप्टेंबर २०२५ पर्यंत रस्ता खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे, पण एका अहवालात २०२७ पर्यंत तो पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे. पनवेल ते इंदापूर (८४ किमी) एनएचएआयद्वारे ७७ किमी पूर्ण, पण उर्वरित भाग रखडलेला आहे. डोंगराळ भाग आणि नद्या ओलांडण्यामुळे समस्या येत आहे. पॅकेज १ (पनवेल ते कासु, ४२.३ किमी) ८५% पूर्ण आहे, पण ब्रिज आणि सर्व्हिस रोड अपूर्ण आहेत. वडखळ ते महाड दरम्यान सहा फ्लायओव्हरचे बांधकाम सुरू असून अद्याप एकही कार्यान्वित नाही. हे काम वर्षानुवर्षे रखडलेले आहे. चिपळूणजवळ पेढे गाव येथे मागील वर्षी रस्ता कोसळला. तेव्हा तात्पुरते प्लास्टिक शीट आणि फिलर लावले, पण पुनर्निर्माण रखडले आहे. परशुराम घाटात धोकादायक भाग आहे. पावसाळ्यात १.५ किमीचा रस्ता एका लेनवर पिळवटला जातो. मलबा साफ करणे आणि ट्रॅफिक व्यवस्थापनामुळे अनेक समस्या समोर येतात. संगमेश्वर, रत्नागिरी येथील कांटे गावचे बांधकाम रखडले आहे, रस्ता खराब अवस्थेत असल्यामुळे अपघातात जखमी होण्याची शक्यता आहे. कशेडी घाट द्विन टनेल जवळपास पूर्ण असले तरी पाणी गळती आणि इलेक्ट्रिकल समस्या असल्याने रस्त्यात आणि बोगद्यात काय होईल याचा नेम नाही. अंबा घाट आणि इतर भागात रस्ता खराब, सतत वळणे असून खड्डे तर पाचवीला पूजलेले आहेत. कुडाँडा ते कोळंबे, हमरापूर फाटा, डोलवी, गडब, पेण, पांडापूर येथे रस्ते कोसळलेले आणि खराब अवस्थेत असल्याचे आजही दिसते. हा रस्ता का रखडला याबाबतची मोघम कारणे म्हणजे वनजमीन मिळवण्यातील अडचणी, शेतकऱ्यांना भरपाई देण्यात अडचणी, वन मंजुरी आणि राजकीय विवाद तसेच रस्ते कंत्राटांमधील अंतर्गत संघर्ष हीच आहेत. त्यात पावसामुळे काम थांबते. डोंगराळ भागात भूस्खलन आणि माती सरकणे वाढते. त्यात सतत वाहतूक सुरू असल्याने काम करता येत नाही, सर्व्हिस रोड खराब होतात. खड्डे भरून तात्पुरती वाहतूक सुरू करणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने गेल्या दशकभरात अनेक कंत्राटदार बदलले तरी बांधकामाची गुणवत्ता कमी आणि खर्च कायम वाढत राहिला आहे. आज ३००० ते ७००० कोटी खर्च करूनही हा रस्ता अधुराच आहे.

रस्त्याची स्वप्न दाखवणारे राष्ट्रीय नेते या रस्त्याबाबत आता काहीही बोलत नाहीत. कंत्राटदार कोणामुळे पळून गेले? अर्धवट कामे टाकून गेल्यावर त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यांच्या कंत्राटावर कोणी कोणी मलिदा खाल्ला? कोण कोण राजकारणी या कंत्राटदारांचे सगेसोयरे आणि भागीदार होते? या सगळ्याची इत्थंभूत माहिती सगळ्यांकडे आहे. पण कोणीच त्याबाबत काहीच बोलत नाही. कारण सगळ्यांचेच हात मळलेले आहेत या रस्त्याच्या कंत्राटात. इकडे मुंबईचा चाकरमानी मात्र गणेश उत्सवात आपापल्या गावी जाताना या रस्त्यावरून आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. कधी त्यासाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर-संखेश्वर (कर्नाटक) करत आंबोली घाटातून सावंतवाडीकडे जातो, तर कधी मुंबई-कराड-ओणी करत अणुस्कुरा घाटातून राजापूर गाठतो आणि पुढचा प्रवास करतो. आंबा घाट, फोंडा घाट, करूळ घाट करत देखील रत्नागिरी-सिंधुदुर्ग गाठता येते. त्यामुळे कुठच्या ना कुठच्या मार्गाने चाकरमानी कोकणात पोहोचतोच. मात्र वाटेत तो राजकारण्यांचा 'जयजयकार' करत, तर कधी कंत्राटदारांच्या नावाने 'ठणाणा' करत प्रवास करतो.

कंत्राटदार बदलले तरी काम अर्धवटच

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक टप्प्यांमध्ये विभागलेले आहे आणि त्यासाठी विविध कंत्राटदारांना कंत्राटे देण्यात आली आहेत. गेल्या १३ वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला असल्याने कंत्राटदार बदलण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. मुंबई-गोवा महामार्गासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, दिलीप बिल्डकॉन, एनसीसी, पीएनसी आणि आयआरबीसारख्या संस्थांना कंत्राटे मिळाली, पण कामाबाबतचे असमाधान, आर्थिक अडचणी आणि भूसंपादनामुळे किमान तीन-चार टप्प्यांमध्ये कंत्राटदार बदलले गेले.

गेल्या १३ वर्षांत (२०११-२०२५) अनेक टप्प्यांमध्ये कंत्राटदार बदलले गेले. विशेषतः पनवेल-इंदापूर आणि माणगाव भागात कंत्राटदारांच्या कामातील कमतरता, आर्थिक अडचणी आणि निकृष्ट बांधकामामुळे बदल झाले. माणगाव-इंदापूर भागात २०२३ मध्ये झालेल्या आंदोलनानंतर नवीन ठेकेदार निवडण्याचे ठरले. एकूण ११ टप्प्यांपैकी किमान तीन-चार टप्प्यांमध्ये कंत्राटदार बदलले गेले असावेत. कारण प्रत्येक टप्प्यात विलंब आणि गुणवत्ता समस्यांमुळे नवीन निविदा काढण्यात आल्या. पनवेल ते इंदापूर आणि माणगाव भागात कंत्राटदार बदलण्याचे प्रमाण जास्त आहे, कारण या भागात भूसंपादन आणि भौगोलिक आव्हाने मोठी आहेत. कामात खड्डे पडणे, पेव्हर ब्लॉक खराब होणे आणि सेवा रस्त्यांचे नुकसान यासारख्या तक्रारी वारंवार आल्याने काही कंत्राटदारांना बदलण्यात आले. काही कंत्राटदारांना निधीची कमतरता आणि खर्च वाढल्याने काम सोडावे लागले. काही राजकीय कंत्राटदारांनीही काही कामे केली पण ती देखील अर्धवट. त्यांना जाब कोण विचारणार? या सगळ्यात प्रकल्प खर्च ३,५०० कोटींवरून १५,६०० कोटींवर गेला. काही वेळा वनजमीन मंजुरी, स्थानिक विरोध आणि भरपाई विवाद यामुळे कंत्राटदारांना काम थांबवावे लागले. यातच काहींनी कंत्राट सोडले. अनेक कंत्राटदारांनी डेडलाइन (उदा. डिसेंबर २०२३, मे २०२४) पाळल्या नाहीत, त्यामुळे एनएचएआयने नवीन निविदा काढल्या. नवीन ठेकेदार निवडीचे काम २०२३ पासून सुरू आहे.

मुंबईतून पनवेलला पोचल्यावर हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सुरू होतो आणि बस, एसटी, खासगी वाहन वा सरकारी वाहन घेऊन प्रवासी निघाले की रखडपट्टी आणि हाल सुरू होतात. अत्यंत खडतर वेडावाकडा प्रवास करत खड्ड्यातून रस्ता शोधत किंवा अर्धवट पुलांच्या गळक्या छतांखालून जीव मुठीत धरून जावे लागते. त्यानंतर राजापूरपासून किमान कणकवलीपर्यंतचा रस्ता बऱ्यापैकी पूर्ण झाल्याचे पाहायला मिळते. एनएचएआयने आता मार्च २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी नवीन डेडलाइन दिली आहे आणि कंत्राटदारांना काम पूर्ण करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत.

कंत्राट बदलामुळे खर्च वाढला असून, स्थानिकांचा रोष आणि न्यायालयात सतत प्रकल्पविषयीच्या दाखल होणाऱ्या याचिका यामुळे एनएचएआयवरही हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबतचा दबाव वाढत आहे. प्रकल्पाशी संबंधित सर्व कंत्राटदार आणि राजकारणी आता थंड बसले आहेत. कारण त्यांची देवाण-घेवाण आता झाली आहे आणि सामान्य माणसांच्या हलाखीचे दळणवळण सुरू झाले आहे.

प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

आभाळ फाटलं! राज्यात पावसाचे धुमशान; पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू

निकालाला विलंब; ठाकरे गटावर अन्याय होत असल्याची जनभावना

'इंडिया'चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार अखेर ठरला; SC चे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा

मुंबईसाठी नवीन २६८ एसी रेल्वे गाड्यांची खरेदी; पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती - मुख्यमंत्री

गिल थेट उपकर्णधार, श्रेयस पुन्हा संघाबाहेर! आशिया चषक टी-२० स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर