संपादकीय

मुंबई, मराठी माणूस आणि ठाकरे कुटुंब

मुंबई महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव व राज ठाकरे यांचे मनोमिलन चर्चेत आले असले, तरी या एकत्र येण्यामागील राजकीय स्वार्थ, मराठी मुद्द्याचा पुनर्वापर आणि त्याचा खरा लाभ कोणाला होणार, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

केशव उपाध्ये

मुंबई महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव व राज ठाकरे यांचे मनोमिलन चर्चेत आले असले, तरी या एकत्र येण्यामागील राजकीय स्वार्थ, मराठी मुद्द्याचा पुनर्वापर आणि त्याचा खरा लाभ कोणाला होणार, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुंबई महापालिका आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू नुकतेच एकत्र आले आहेत. त्यांच्या एकत्र येण्याचा आनंद या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना झाला होता. या दोघांनी गेल्या १९ वर्षांतील मतभेदांचा इतिहास बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या मनोमिलनाला भारतीय जनता पक्षाच्या शुभेच्छाच आहेत. राजकारणाच्या कारणावरून एखादे कुटुंब विभक्त होऊ नये, अशीच आमची भूमिका आहे. या दोघांच्या वाटा परस्परांपासून वेगळ्या होण्याचा आणि आता दोघांच्या एकत्रिकरणाचा पट पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मराठी भाषेची अस्मिता, मराठी माणसाचे कल्याण आणि त्यासंदर्भात ठाकरे घराण्याची भूमिका, योगदान अशा अनेक बाजू ध्यानात घ्याव्या लागतात.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली ती भाषावार प्रांतरचनेच्या पार्श्‍वभूमीवर. भाषावार प्रांतरचनेच्या आधारावरच मुंबई महाराष्ट्रात राहिली. त्याआधी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे, सेनापती बापट यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन अनेक अर्थाने ऐतिहासिक होते. गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजे मुंबईत मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हाती घेतला आणि शिवसेनेची स्थापना केली. सरकारी व खासगी नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाला स्थान मिळालेच पाहिजे, असा आग्रह धरत शिवसेनेने १९६० आणि १९७०च्या दशकात मुंबईत अनेक आंदोलने केली. स्थानिक लोकाधिकार समितीसारख्या संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेने मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आग्रही भूमिका घेतली. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच त्या काळात मराठी माणसाला केंद्र, राज्य सरकारी, शासकीय महामंडळे आणि खासगी कंपन्यांमध्ये स्थान मिळाले. १९८५ पर्यंत शिवसेनेचे स्वरूप मुंबईतल्या सर्वसामान्य मराठी माणसाच्या दैनंदिन प्रश्‍नांसाठी व्यवस्थेशी लढणारी आक्रमक संघटना असेच होते. वंदनीय बाळासाहेबांचे लढाऊ आणि आक्रमक नेतृत्व हाच या संघटनेचा चेहरा होता. १९८५ पर्यंत शिवसेनेला मोठ्या राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हत्या. १९८५ नंतर मात्र वंदनीय बाळासाहेबांनी मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाची जोड देत शिवसेनेचे स्वरूप राज्यव्यापी केले. १९८५ नंतरचा शिवसेनेचा भाजपबरोबरच्या युतीनंतरच्या वाटचालीचा इतिहास सर्वांना ठाऊक असल्याने तो नव्याने सांगण्याची गरज नाही. १९८५ मध्ये मुंबई महापालिकेवर कब्जा केल्यानंतर अवघ्या १० वर्षांत म्हणजे १९९५ मध्ये राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला.

१९८५ ते १९९५ या शिवसेनेच्या संक्रमण काळात बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राज ठाकरेही ठाकरे कुटुंबातील एकमेव व्यक्ती सर्वार्थाने सक्रिय होती. विद्यार्थी सेनेद्वारे शिवसेनेची युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये संघटना बांधणी करण्याचे श्रेय राज ठाकरेंना जाते. १९९५ पर्यंत शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे हे शिवसेना आणि राजकारणापासून अलिप्तच होते. त्या काळात बाळासाहेबांचे नैसर्गिक वारसदार म्हणून राज ठाकरेंकडे पाहिले जात होते. मात्र अचानक तोपर्यंत पडद्यामागे असलेल्या उद्धव ठाकरेंनी दरबारी राजकारणाची खेळी करत शिवसेनेची सूत्रे आपल्याकडे अक्षरश: ओढून घेतली. संघटनेची सूत्रे हातात आल्यानंतर राज ठाकरेंची चहूबाजूनी कोंडी केली गेली. एकाचवेळी चुलत आणि मावस भाऊ असणाऱ्या राज ठाकरेंना आपल्या पक्षातून बाहेर पडण्याखेरीज दुसरा पर्याय राहू नये, अशाच चाली उद्धव ठाकरेंनी खेळल्या. राज ठाकरेंनी २००६ मध्ये पुन्हा मराठीचाच मुद्दा हाती घेत आपला सवतासुभा ‘मनसे’च्या रूपाने उभा केल्यानंतरचा २०२५ पर्यंतचा त्यांचा वळणावळणाचा प्रवास उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. राज ठाकरेंनी नव्या पक्षाची स्थापना करताना महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करत आपले वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर राज ठाकरेंचे घोडे विकासाच्या मुद्द्यावरून पुन्हा मागे फिरले.

उद्धव ठाकरेंनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून आजवर एकदाही महाराष्ट्राचा, मुंबईचा विकास करण्यासंदर्भातील आपल्या दृष्टिकोनाचा एकदाही परिचय करून दिलेला नाही. २०१९ नंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू भारतीय जनता पक्षाच्या विरोधात स्थिर करताना काँग्रेस, शरद पवार, कम्युनिस्ट, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल अशा राष्ट्रीय राजकारणातील म्होरक्यांबरोबर पाट लावला. उद्धव ठाकरेंना सक्रिय राजकारणात येऊन २५ वर्षे होऊन गेली आहेत. या काळात मुंबई महापालिका ताब्यात ठेवताना आणि अडीच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहताना उद्धव ठाकरेंना मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या कल्याणाचे काहीच देणे-घेणे नाही, हे अनेकदा दिसले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यानंतर उद्धव ठाकरेंना आपणच घरातून बाहेर काढलेल्या चुलत-मावस भावाची आठवण झाली. ज्या मनसेची ‘संपलेला पक्ष’ म्हणून उद्धवरावांनी हेटाळणी केली होती, त्या राज ठाकरेंच्या दारात जाण्याची वेळ नियतीने उद्धवरावांवर आणली. आता मनोमिलनानंतरही ठाकरे बंधू मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, यासारख्या घासून घासून गुळगुळीत झालेल्या मुद्द्यावरच बोलू लागले आहेत. मुंबापुरीचा विस्तार होत असताना मुंबईकरांपुढे दररोजच्या जगण्यातील हजारो प्रश्‍न तयार झाले आहेत. हे प्रश्‍न सोडवण्यासाठी काय करता येईल, या विषयी गांभीर्याने बोलण्याऐवजी ठाकरे बंधू पुन्हा मुंबई, मराठी या भावनात्मक विषयांमध्ये मराठी मतदाराला गुंतवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

ठाकरे कुटुंब मोठे होत असताना संघटनेसाठी लाठ्याकाठ्या खाणारा सामान्य शिवसैनिक अजूनही तिथेच आहे. मनोमिलनाची घोषणा होत असताना संपूर्ण ठाकरे कुटुंब व्यासपीठावर होते. मात्र अशावेळी वर्षानुवर्षे संघटनेचे काम केलेल्या एखाद्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला व्यासपीठावर बोलावण्याची बुद्धी ठाकरे बंधूंना झाली नाही. मराठी माणसाच्या नावाचा वापर करत इमले उभे करणाऱ्या उद्धव ठाकरेंना नगरपालिका निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी मुंबईबाहेर पडण्याची इच्छाशक्ती दाखवता आली नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबापलीकडे जग नसणाऱ्या ठाकरे बंधूंना मराठी मतदार भावनेच्या आहारी जाऊन थारा देणार नाहीत.

मुख्य प्रवक्ते, प्रदेश भाजप

BMC Election : भाजप १३७, शिवसेना ९०; मित्रपक्षांनाही सोडणार जागा; महायुतीचा 'फॉर्म्युला' अखेर ठरला

Mumbai : भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट'ने १३ जणांना उडवले; चौघांचा मृत्यू, ९ जखमी; CCTV मध्ये कैद झाली भीषण दुर्घटना

Thane Election : मनसेने २४ जणांना दिला एबी फॉर्म; नवीन चेहऱ्यांना संधी

मुंबईकरांचे 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशन धमाकेदार! मेट्रो 'ॲक्वा'च्या पहाटेपर्यंत विशेष फेऱ्या; 'बेस्ट'च्याही जादा बसेस

पुणे, पिंपरी चिंचवडसाठीच दोन राष्ट्रवादीची युती; आमदार रोहित पवार यांची घोषणा