संपादकीय

मोनोरेलचा श्वास कोंडणारा प्रवास

मोनोरेल प्रकल्प प्रवाशांसाठी सुरक्षिततेपेक्षा संकट ठरत आहे. २,४६० कोटी खर्चुन उभारलेली मोनोरेल सुरुवातीपासूनच प्रवाशांना न भावल्याने 'पांढरा हत्ती' ठरली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होऊन प्रवासी अडकण्याच्या घटना घडतात.

नवशक्ती Web Desk

आपले महानगर

तेजस वाघमारे

मोनोरेल प्रकल्प प्रवाशांसाठी सुरक्षिततेपेक्षा संकट ठरत आहे. २,४६० कोटी खर्चुन उभारलेली मोनोरेल सुरुवातीपासूनच प्रवाशांना न भावल्याने 'पांढरा हत्ती' ठरली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होऊन प्रवासी अडकण्याच्या घटना घडतात.

आर्थिक राजधानी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याच्या वल्गना वारंवार होतात. पण ते निवडणुकांमधील गाजरच ठरते. मुंबईत हक्काचे घर घेणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याने तो कधीच मुंबईबाहेर फेकला गेलाय. ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि नवी मुंबई या महापालिकांची आणि अंबरनाथ, कुळगाव बदलापूर, पनवेल व उरण या नगरपरिषदांचीही झपाट्याने वाढ होत आहे. परवडणारी घरे आणि मुंबईशी रेल्वे संपर्क या दोन घटकांमुळे लोक या विभागात स्थलांतरित होत आहेत. यामुळे राज्याच्या एकूण नागरी लोकसंख्येपैकी जवळपास ४५ टक्के लोकसंख्या मुंबई महानगर प्रदेशाची झाली आहे. या नागरिकांना नोकरीसाठी मुंबईत ये-जा करताना लोकलचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपवण्यात आली आहे. एमएमआरडीने प्रदेशात विविध रस्ते, उड्डाणपूल, स्कायवॉक, पाणी योजना आदी प्रकल्प राबवले आहेत. उपनगरीय वाहतुकीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी मेट्रो, मोनो प्रकल्प हाती घेतले आहेत. यापैकी वर्सोवा-अंधेरी-घाटकोर मेट्रो १, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व (मेट्रो ७), डी. एन. नगर ते दहिसर पूर्व (मेट्रो २अ), मोनोरेल आणि मेट्रो ३ प्रवासी सेवेत आहेत, तर काही मार्गाचे टप्पे या वर्षात प्रवासी सेवेत येणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमची फीडर सेवा म्हणून मोनोरेल सुरू करण्याचा निर्णय सप्टेंबर २००८ मध्ये घेतला होता. चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक हा २० किमी लांबीचा कॉरिडॉर भारतातील पहिला मोनोरेल प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी २ हजार ४६० कोटी रुपये खर्च आला होता. वडाळा ते चेंबूर मार्गावर मोनोरेल २०१४ मध्ये प्रथम धावली. त्यानंतर मार्च २०१९ मध्ये संत गाडगे महाराज चौक ते वडाळा दरम्यान मोनोरेलचा दुसरा टप्पा कार्यान्वित झाला. सुरुवातीपासून या प्रकल्पाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा प्रकल्प एमएमआरडीएसाठी पांढरा हाती ठरला आहे. मोनोरेलची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीए सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यानुसार नवीन गाड्या ताफ्यात सामील करून घेण्यासह विविध प्रयोग करण्यात येत आहेत. एमएमआरडीएने हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पांपैकी वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो ४ आणि डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो २ ब मार्ग मोनो स्थानकांना जोडले जाणार असल्याने मोनोची प्रवासी संख्या वाढण्याचा अंदाज आहे. मोनोरेलचे व्ही. एन. पुरव स्थानक मेट्रो लाईन २ ब च्या व्ही. एन. पुरव स्थानकाशी जोडले जाईल. त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग ४ भक्ती पार्क येथील मोनोरेल स्थानकाशी जोडले जाईल. त्यामुळे हे दोन्ही मार्ग सुरू होताच मोनोच्या प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. मात्र मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड होऊन गाडीत प्रवासी अडकल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्न करत असली तरी ते प्रयत्न अपयशी ठरत आहेत.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईची उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत झाली. यामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांनी मोनोरेलचा आधार घेण्याचा पर्याय निवडला. मात्र क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांनी मोनोत प्रवेश केल्याने मोनोरेल मैसूर कॉलनी स्टेशन दरम्यान मंगळवारी बंद पडली. मोनोरेलची क्षमता १०४ टनांपर्यंत आहे. त्यामुळे मोनो ठप्प होऊन अनेक प्रवासी अडकले. या प्रवाशांच्या सुटकेसाठी नेहमीप्रमाणे अग्निशमन दलाला प्रयत्न करावे लागले. तोवर अनेकांचा श्वास कोंडला गेला. या बिघाडानंतर प्रवाशांनी यापुढे मोनोमधून प्रवास करणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मोनोरेलची प्रवासी क्षमता १०२ ते १०४ इतकीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डब्यात यापेक्षा अधिक प्रवासी वाढणार नाहीत, यासाठी स्टेशनवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. गाडीत प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवून नंतरच गाडी पुढे सोडण्याचे निर्देश दिले आहेत. याचीही प्रचिती नुकतीच आली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी गाडीत घुसल्याने त्यांना उतरवण्याची वेळ प्रशासनावर आली.

दोन ट्रॅकवर धावणाऱ्या आणि जास्त प्रवासी क्षमता असलेल्या मेट्रो ट्रेनच्या तुलनेत मोनोरेल एकाच ट्रॅकवर चालतात. मोनोरेलची क्षमता अधिक नसल्याने मोनोरेल हे जगभरात सार्वजनिक वाहतुकीचे लोकप्रिय साधन म्हणून ओळखले जात नाही. सिडनी, जपान आणि जगभरातील काही मोजक्या शहरांमध्ये वाहतुकीसाठी मोनोरेलचा वापर केला जातो. तसेच मनोरंजन पार्कमध्ये जॉयराइड बांधण्यासाठी मोनोरेल तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात केला गेला आहे. त्यामुळे मुंबईतील मोनोरेल खेळण्यासारखे असल्याची टीका वाहतूक तज्ज्ञांनी केली आहे.

१९ ऑगस्ट रोजी घडलेली मोनो बिघाडाची घटना मुंबईकरांसाठी नवीन नाही. यापूर्वीही अनेकदा मोनो बंद झाल्याची किंवा आग लागल्याची घटना घडली आहे. १० एप्रिल २०१९ रोजी मैसूर कॉलनी येथे वडाळा पुलावर ४४ मिनिटे मोनो अडकली होती, तर वीजपुरवठा खंडित होऊन मार्च २०१५ आणि ऑगस्ट २०१६ मध्ये भक्ती पार्कजवळ, जुलै २०१७ मध्ये चेंबूर येथे आणि सप्टेंबर २०१९ मध्ये म्हैसूर कॉलनीजवळ मोनो ठप्प झाली होती. यामुळे मोनोरेल सिस्टमच्या तांत्रिक समस्या समोर आल्या, तर मार्च २०१५ मध्ये मोनोच्या एका डब्याच्या चाकाला आग लागली होती, तर नोव्हेंबर २०१७ मध्ये एका रिकाम्या ट्रेनला आग लागली होती. अशा विविध घटनांमुळे मोनोच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काही धनदांडग्यांच्या भल्यासाठी उभारलेली मोनो गोरगरीब मुंबईकरांच्या जीवावर उठू नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यायला हवी. अन्यथा दुर्घटना घडल्यावर त्यावर मलमपट्टी करून उपयोग होणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

tejaswaghmare25@gmail.com

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी