संपादकीय

मैं नरेंद्र दामोदरदास मोदी...

२६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर भारताच्या राजकारणाचा पट आमूलाग्र बदलला. गेल्या अकरा वर्षांत भारत आर्थिक, लष्करी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून उभा राहिला. या नेतृत्वाच्या धाडसी निर्णयांनी देशाचा आत्मविश्वास वाढवला.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

केशव उपाध्ये

२६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर भारताच्या राजकारणाचा पट आमूलाग्र बदलला. गेल्या अकरा वर्षांत भारत आर्थिक, लष्करी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून उभा राहिला. या नेतृत्वाच्या धाडसी निर्णयांनी देशाचा आत्मविश्वास वाढवला.

२६ मे २०१४... मैं नरेंद्र दामोदरदास मोदी... ईश्वर की शपथ लेता हूँ... अत्यंत धीरगंभीर आवाजात हे शब्द उच्चारले गेले तेव्हा या शपथविधीनंतर भारताच्या राजकारणाचे परिमाण बदलून जाणार आहे, याची कल्पना फार थोड्यांना होती. गेल्या अकरा वर्षांत काय घडले हे साऱ्या देशाने नव्हे जगाने पाहिले आहे. जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला भारत आता चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेला हल्लाही निमूटपणे सहन करणाऱ्या भारताने गेल्या अकरा वर्षांत पाकिस्तानच्या पाठिंब्यावर पोसल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर पाकिस्तानच्या भूमीत घुसून तीन वेळा हल्ले करत नव्या सामर्थ्यशाली भारताचे दर्शन जगाला घडले आहे. गेल्या अकरा वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रांत घडलेल्या बदलांचे आयाम अनुभवताना सामान्य माणूस विस्मयचकित होऊन जातो. या बदललेल्या भारताची आंतरराष्ट्रीय समुदायाला दखल घेण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. राष्ट्रीय राजकारणाचा बाज गेल्या अकरा वर्षांत झपाट्याने बदलला आहे. भले-भले प्रस्थापित विस्थापित झाले आहेत. निव्वळ घराणेशाहीच्या बळावर अस्तित्व टिकवणे अशक्य होऊ लागल्याची जाणीव वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाने करून दिली आहे. जातींच्या, भाषेच्या, विविध समाज घटकांच्या टेकूने उपद्रव मूल्य निर्माण केलेले पक्षही कालबाह्य ठरू लागले आहेत. या बदललेल्या पटावर सामान्य मतदार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेचे छत्रचामरे मिरवणाऱ्यांकडे त्यांचे प्रगती पुस्तक मागू लागला आहे. राजकारणाच्या ‘रंगपटा’ची नेपथ्य रचना अनेक वर्षे ताब्यात ठेवणाऱ्या गांधी घराण्यासारख्या कारभारी वर्गाची, चौटाला, बादलसारख्या कुटुंबशाहीची संस्थाने खालसा होऊ लागली आहेत. बारामतीचा पवारशाहीचा मजबूत चिरेबंदी वाडाही डगमगू लागला आहे. या पटावर बारा वर्षांपूर्वी आगमन झालेल्या नरेंद्र मोदी यांनी राजकारणातल्या चालींची परिभाषाच आमूलाग्र बदलून टाकली. या नव्या परिभाषेच्या ‘अंक लिपी’चे आकलन होऊ न शकल्याने मोदींना कोंडीत पकडण्याचा व्यूह मोदी विरोधकांना तयार करता आलेला नाही. परिणामी त्यांना विरोध करतानाचा सूर व्यक्तिकेंद्रित झाला. आपण इतकी दूषणे देऊनही, त्यांच्या आकलनानुसार एवढा तर्कशुद्ध युक्तिवाद करूनही मोदींच्या मागे उभा असलेला मतदार मागे वळण्यास तयार नाही हे पाहून विरोधक आणि विचारवंत, पत्रकारांची चिडचिड होऊ लागली आहे. चिडचिड वाढल्याने वास्तवाचे भान सुटून युक्तिवाद कर्कश्शतेकडे झुकू लागला आहे. त्याची अपरिहार्य परिणती मतदारांना, संपूर्ण समाजालाच निर्बुद्ध ठरविण्यात झाली आहे.

मोदींनी गेल्या अकरा वर्षांत काय केले याचे उत्तर आपापल्या बौद्धिक मगदुरानुसार मिळेल. आजवर आपण ज्या समाजवादाच्या, गरीब कल्याणाच्या कार्यक्रमाचा हिरिरीने पुरस्कार केला तोच कार्यक्रम मोदी प्रत्यक्षात आणताहेत हे या विचारवंतांच्या चिडचिडीचे आणखी एक कारण आहे. एकीकडे भारत जागतिक व्यासपीठावर प्रमुख भूमिकेतून वावरू लागला आहे, तर दुसरीकडे देश विकास, प्रगतीचे नवनवे मापदंड निर्माण करू लागला आहे. राजकीय पटलावर गरीब कल्याण कार्यक्रम निर्धाराने अंमलात आणले जात आहेत. त्याचवेळी खेळाडूंशी मनमोकळा संवाद साधणारे, खेळाडूंसमोर माईक धरून त्यांना बोलते करणारे, त्यांचा खेळ पाहून त्यावर ट्वीट करणारे, त्यांना नावानिशी ओळखणारे, त्यांच्या क्रीडा साहित्याबद्दल कुतूहलाने जाणून घेणारे, त्यांचे अभिनंदन आणि सांत्वनही करणारे पंतप्रधान भारताने पॅरिस, टोकियो ऑलिम्पिकनंतर पाहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही अनेक रूपे क्रीडा क्षेत्रातील आश्वासक बदलांची अनुभूती देणारी आहेत. त्याच वेळेला हा नेता चांद्रयान मोहीम थोडक्यात अयशस्वी झाल्यानंतर त्वरेने इस्रो प्रमुखांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्यासाठीही पुढे येतो. मोदी यांच्या नेतृत्वात धाडस आहे, त्यांच्या प्रत्येक कृतीला आणि निर्णयाला केवळ राष्ट्रप्रेमाच्या भावनेची झालर आहे आणि स्वार्थाचा स्पर्श नाही, हे विरोधकांनाही नाकारता येत नाही. डिजिटल इंडियासारखी योजना देशात यशस्वी ठरणार नाही, असा अपशकुनी कांगावाही सुरू झाला होता. पण कोरोनाकाळात या योजनेने देशाच्या अर्थव्यवस्थेला हात दिलाच, पण टाळेबंदीसारख्या काळात घरबसल्या आर्थिक व्यवहार करण्यासाठी ही योजनाच साह्यकारी ठरली.

जुलै २०१७ मध्ये मोदीजींनी इस्रायलला भेट दिली. इस्रायलच्या भूमीवर पाऊल ठेवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान होते. ‘अरब राष्ट्रांना चालत नाही, त्यांचे मन दुखवायला नको, नाहीतर ते आपल्याला तेल देणार नाहीत’ अशी भीती बाळगून, त्याचबरोबर देशातील व देशाबाहेरील मुस्लिम समुदायाच्या भावना जपण्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३५/४० वर्षे आपण इस्रायलशी संबंध प्रस्थापित केले नव्हते. तरी गेली अनेक वर्षे आपण इस्रायलकडून शस्त्रास्त्रे, अन्य संरक्षण साहित्य खरेदी करत आहोत. त्याचवेळी अरब राष्ट्रांकडून नरेंद्र मोदींना त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले जाते. आंतरराष्ट्रीय राजकारणातील सत्तेचा समतोल साधण्यात यशस्वी ठरलेल्या या नेत्याने राजनैतिक मुत्सद्देगिरीचे नवे मापदंड गेल्या अकरा वर्षांत तयार केले आहेत. कोरोना संकट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान या २० वर्षांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठे आव्हान होते. या महामारीमुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेपुढे मोठे संकट निर्माण झाले. कोरोना महामारीविरोधात भारताने इतर विकसित देशांपेक्षाही उत्तमरीत्या हिमतीने लढा दिला. २०२०च्या सुरुवातीस चाचण्यांची अपुरी यंत्रणा, वैद्यकीय साहित्य- उपकरण पुरवठ्याच्या अपुऱ्या व्यवस्था याबरोबरच एन९५ मास्क्स, पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन पुरवठा, ऑक्सिजनयुक्त खाटा अशा सुविधा कमी प्रमाणात होत्या. कोविडविरोधात झुंज देण्यासाठी वैद्यकीय सेवा, वस्तूंची मागणी व पुरवठा यातील तफावत वेगाने दूर करणे गरजेचे होते. स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देत मोदी सरकारने अवघ्या काही महिन्यांतच ही परिस्थिती बदलून टाकली. भारताने कोरोनावरील प्रतिबंधक लस बनवत अनेक प्रागतिक देशांना आश्चर्याचा धक्का दिला. नरेंद्र मोदी यांनी जगभरातील सर्वात मोठी आणि प्रभावी लसीकरण मोहीम देशात राबवली. कोविड संकट काळात तसेच युद्धकाळात विदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यात मोदींची मुत्सद्देगिरी कामी आली. अमेरिकेसारख्या महाशक्तीने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढविल्यानंतर या दबंग राजकारणाला कमालीच्या शांतपणे चाली खेळून दिलेले खमके उत्तर मोदीजींच्या प्रतिमेला आणखी उजळवणारे ठरले.

लेखन सीमेमुळे या नेत्याच्या कर्तृत्वाचा विस्ताराने आढावा घेता आला नाही. हे नेतृत्व १७ सप्टेंबर रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा....

मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश भाजप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी 'डेडलाईन', आयोगालाही फटकारले

खाडाखोड असेल तर मराठ्यांना प्रमाणपत्र देऊ नये; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र कॅबिनेट बैठकीत ८ मोठे निर्णय; ॲनिमेशन-गेमिंग धोरणासह विद्यार्थ्यांना दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा : बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त; मंत्री छगन भुजबळ यांना दिलासा

Mumbai : इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा आजपासून सुरू; एक किमीला १५ रुपये भाडे; राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी