संपादकीय

ऑपरेशन सिंदूर यशस्वी; पुढे काय?

'लष्कर ए तोयबा', 'जैश ए मोहम्मद' आणि 'हिज्बुल मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनांच्या पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तळांना अचूकपणे उद्ध्वस्त करून भारतीय सैन्य दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी केले आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यातील आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. आता प्रश्न आहे तो, इथून पुढे काय?

नवशक्ती Web Desk

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

'लष्कर ए तोयबा', 'जैश ए मोहम्मद' आणि 'हिज्बुल मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनांच्या पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तळांना अचूकपणे उद्ध्वस्त करून भारतीय सैन्य दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी केले आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यातील आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. आता प्रश्न आहे तो, इथून पुढे काय?

काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांची निर्घृण हत्या करून दहशतवाद्यांनी भारताला जणू खुले आव्हान दिले. पुरुष पर्यटकांना त्यांच्या पत्नीच्या देखत आणि ते सुद्धा अत्यंत जवळून गोळी घालत दहशतवाद्यांनी क्रूरतेचे दर्शन घडविले. जगभर या हल्ल्याचा तीव्र निषेध झाला. याचनिमित्ताने पाकिस्तानसारख्या अत्यंत असंवेदनशील आणि दहशतवाद्यांना पाठिशी घालणाऱ्या देशाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. अमेरिकेसारख्या महासत्ता असणाऱ्या देशावर ९/११चा हल्ला झाला. ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याच्या नेतृत्वाखाली झालेला हा हल्ला अमेरिकेला चांगलाच जिव्हारी लागला. हाच ओसामा चक्क पाकिस्तानमध्ये होता. अमेरिकेने गेली अनेक दशके पाकला गोंजारले. आणि याच पाकमध्ये ओसामाला आश्रय देण्यात आला होता. अखेर अमेरिकेने ओसामाला ठार केले. त्यावेळीही आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकचे वाभाडे निघाले. अमेरिकेचे पैसे, साधने आणि सहाय्य घेणारा पाकिस्तान हा देशच अमेरिकेच्याच विरोधात क्रूर कृत्ये करणाऱ्यांना बळ देतो. आताही पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी करून पाकला चांगलाच झटका दिला आहे.

'ऑपरेशन सिंदूर'चे यश हे अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. भारतीय सैन्य हे ठरवले तर काय करू शकते हे यातून दिसले. त्याशिवाय भारतीय गुप्तहेर खाते आणि विविध विभाग हे समन्वयाने किती प्रभावी मोहिम राबवू शकतात, भारतीय सैन्याला मोकळीक आणि संधी दिली, तर त्याचे ते सोने करतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व नियम, जबाबदारी आणि नैतिकता पाळून अतिशय व्यावसायिकरित्या भारतीय सैन्याने केवळ दहशतवाद्यांचे स्थळच नेस्तनाबूत केले, नागरी वस्ती किंवा पाक लष्करी वा अन्य ठिकाणांचे नुकसान केलेले नाही, अशा अनेकविध बाबी सिद्ध होत आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची प्रशिक्षण आणि अन्य स्थळे यापूर्वी भारताने सर्जिकल स्ट्राईकद्वारे नष्ट केली आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मात्र पाकिस्तानातील दहशतवादी स्थळेही शोधण्यात आली आणि ती लक्ष्य करून उद्ध्वस्त केली आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावरील आणि पंजाब प्रांतातील बहावलपूर, ३० किमीवरील मुरीदके आणि आठ किमीवरील सरजल या स्थळांवरील अचूक हल्ले हे अनेक अर्थाने महत्त्वाचे आहेत. कारण, पाकचे पंतप्रधान, लष्कर प्रमुख आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्ती या पंजाब प्रांतातील आहेत. आणि त्यांच्याच प्रांतात दहशतवाद्यांची स्थळे असल्याचे सिद्ध झाले. आता पाकला तोंड दाखवायला जागा नाही. तरीही ते अनेक बनाव करू शकतात किंवा करतील. कारण कांगावा करण्यापलिकडे त्यांच्या हाती फार काही नाही. देशोधडीला लागलेले असतानाही केवळ द्वेष आणि दहशतवादाचा पुरस्कार करून पाक आणखीनच खोलात जातो आहे.

भारतीय सैन्य हे केवळ पाकव्याप्त काश्मीरच नाही, तर थेट पाकिस्तानातही अचूक हवाई कारवाई करू शकते, हे सिद्ध झाले आहे. आपल्याकडील युद्धसामग्री, लढाऊ विमाने, सैनिक, अधिकारी या साऱ्यांचा सराव आणि गुणवत्ता ही सर्वोत्तम असल्याचेही स्पष्ट झाले. एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर पाकिस्तान असे म्हणू शकत नाही की, भारताने सामान्य नागरिक किंवा लष्करी ठाण्यांवर हल्ला केला आहे. तसेच, या हल्ल्यात जे मृत झाले आहेत त्यांना आपले म्हणायचे की नाही? अशाही पेचात पाक सरकार पडले आहे. कारण, दहशतवाद्यांना आपले म्हटले, तर जगभरात हा संदेश जाईल की, पाक त्यांना पोसतो आहे. शिवाय प्रतिमाही डागाळेल आणि दहशतवादी आपले नाही म्हटले, तर या बंडखोर संघटनांनाही कळून चुकेल की, पाक कसा दुटप्पी आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आठवडाभर वाट पाहिली. पाकला वारंवार सांगितले की, तुमच्या अखत्यारीतील दहशतवादी स्थळांवर कारवाई करा; मात्र, पाकने त्याकडे कानाडोळा केला. अखेर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाक आणि दहशतवाद्यांना धडा शिकवला. आता प्रश्न उपस्थित होतो तो पुढे काय?

मोहिम यशस्वी झाली, तरी काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. ते जाणून घ्यायला हवेत. या मोहिमेत भारताने किती आणि कुठली लढाऊ विमाने वापरली? ही मोहिम यशस्वीतेसाठी काय करण्यात आले? शिवाय या मोहिमेत भारताचे काही नुकसान झाले आहे का? भारताची राफेल ही लढाऊ विमाने आम्ही पाडल्याचा कांगावा पाकने केला तो खरा आहे का? की खोटा आहे? भारतीय सैनिक यात शहीद झाले का? याची उत्तरे लवकरच मिळतील, असे दिसते. कारण पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक फत्ते झाल्यानंतर भारतीय सैन्याने सर्व खुलासे केले होते. आता तसे झालेले नाहीत. भारतीय सैन्याने पाकिस्तान हद्दीत जाऊन कारवाई केली की, आंतरराष्ट्रीय सीमेवरूनच क्षेपणास्त्रे डागली? हे सुद्धा स्पष्ट झालेले नाही. भारतीय सैन्याने हवाई हद्द ओलांडली असेल तर पाकच्या सुरक्षा यंत्रणा गाफील राहिल्या? की त्यांच्या यंत्रणा बनावट आहेत? चीनने दिलेली यंत्रणा कार्यान्वित नाही का? पाक स्वतःची हवाई सुरक्षा करू शकत नाही का? की भारतीय सैन्य हे सीमेवरूनही थेट १०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदू शकते? या प्रश्नांची उत्तरे खुप महत्त्वाची आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे मोजमाप करताना किती दहशतवादी ठार झाले? दहशतवाद्यांचे कंबरडे खरोखरच मोडले का? विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या आठवडाभरानंतर कारवाई झाल्याने दहशतवाद्यांनी संबंधित स्थळांवरून सुरक्षित पलायन आणि मौल्यवान साहित्य वा सामग्री अन्यत्र स्थलांतरीत केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण स्थळे निवडून ती नष्ट केली तरी त्याचा परिणाम किती झाला? कुख्यात मसूद अजहरचे १४ कुटुंबीय ठार झाल्याचे तेवढे समोर आले आहे. या तिन्ही दहशतवादी संघटनांचे नेटवर्क उद्धवस्त झाले असल्यास ते मोठे यश म्हणता येईल.

पाकिस्तान आणि तेथील दहशतवादी संघटना या शांत नक्कीच बसणार नाहीत. भारतीय कारवाईचा बदला घेण्यासाठी ते पुन्हा आक्रमक आणि सक्रीय होतील. भारतीय सैन्य हे संभाव्य हल्ले किंवा कारवाया कसे नष्ट करते? सीमेवरील तणाव आणि चकमकी यांना किती व कसे उत्तर दिले जाते? हे सुद्धा महत्वाचे आहे. भारताला आणखीनच डोळ्यात तेल घालून सज्ज रहावे लागेल. आता गाफील राहण्याची वेळ नाही. पाक युद्ध छेडणार नाही, पण तो नक्की काय करेल? हे सुद्धा सांगता येत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ने दहशतवादाचा पूर्णपणे खात्मा झालेला नाही, तर त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे इथून पुढे आणखी सजग राहून कुटील कारस्थाने हाणून पाडायला हवीत.

भारतीय सैन्य जर इतकी अचूक कारवाई करू शकतात, मग त्यासाठी दहशतवादी हल्ला होण्याची वाट का पाहिली जाते? त्यांच्यावर वारंवार विश्वास का दाखवला जात नाही? मोकळीक का दिली जात नाही? वर्षातून एकदा किंवा वेळोवेळी अशा प्रकारचे ऑपरेशन्स राबवून दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा पर्याय आपण का स्वीकारत नाही? पाकिस्तानला सर्व आघाड्यांवर उघडे आणि एकटे पाडूनच भारत यशस्वी होऊ शकतो. त्यासाठीची सर्वंकष रणनिती आपण आखायला हवी. तसेच, दहशतवाद्यांसह त्यांना विविध सहाय्य करणाऱ्यांनाही नष्ट केले, तरच दहशतवादाची लढाई निर्णायक ठरेल. त्याचबरोबर ज्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये धुमाकूळ घातला ते कोण होते? कुठून व कसे आले? किती दिवस भारतात राहिले? हल्ल्यानंतर कुठे व कसे गेले? त्यांना भारतात कुणी व कसे सहाय्य केले? हे सारे शोधणे, घरभेद्यांना हुडकून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हा सुद्धा दहशतवादविरोधी लढ्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे सुरुवात झाली असली, तरी आणखी अनेक टप्पे आपल्याला यशस्वी करायचे आहेत, हे सतत ध्यानी ठेवावे लागणार आहे. हाच ‘ऑपरेशन सिंदूर’चा सांगावा आणि अन्वयार्थ आहे.

संरक्षण, सामरिक विषयांचे अभ्यासक

bhavbrahma@gmail.com

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video