गावर मंदीचे सावट आहे. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने नीचांकी स्तर गाठला आहे. देशाची अर्थव्यवस्था दोलायमान अवस्थेत आहे. कोरोना महामारी संपुष्टात आली असली तरी अजूनही देशातील व्यापार-उद्योग पूर्णपणे सावरलेला नाही. देशात बेरोजगारी वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीबरोबरच स्वयंपाकाच्या गॅसचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत व त्यात खाण्यापिण्याच्या वस्तूंवरील जीएसटीचा भारही असह्य होत चालला आहे. परिणामी, भाजीपाला, फळ, दुधाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. एकीकडे देशातील शेतकरी, कष्टकरी हैराण आहेत, दुसरीकडे सत्ताधारी भाजपने जात-धर्म भेदाभेदीचे, विरोधकांच्या फोडाफोडीचे राजकारण आरंभिले आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागासह केंद्रीय तपास यंत्रणांच्या केवळ विरोधकांविरुध्दच्या कारवाया वाढल्या आहेत. देशात केवळ एकाच राजकीय पक्षाची सत्ता असेल, अशा वल्गना भाजपची नेतेमंडळी करू लागली आहेत. लोकशाहीत विरोधकांनाही तितकेच महत्त्व आहे; परंतु त्याचा सत्ताधाऱ्यांना पार विसर पडला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या नेतेमंडळींनी विरोधकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दबावात ठेवण्याचे राजकीय डावपेच सुरू ठेवले आहेत. देशात बेरोजगारी, महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर साधी चर्चाही होत नाही. आमदार, खासदारांची पळवापळवीसोबतच आता व्यापार-उद्योगांच्या पळवापळवीने सामान्य नागरिक अस्वस्थ बनला आहे. अशाप्रकारचे राजकारण देशात कधीही नव्हते, अशीच सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे देशातील जनताच नव्हे, तर विरोधकही हतबल झाले आहेत. माजी उपपंतप्रधान व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री स्व. चौधरी देवीलाल यांच्या जयंतीनिमित्त रविवारी इंडियन नॅशनल लोकदलने फतेहाबादमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माकप नेते सीताराम येचुरी, शिवसेनेचे नेते अरविंद सावंत, अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल, जेडीयूचे महासचिव के. सी. त्यागी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यानिमित्ताने देशात विखुरलेले विरोधक थोड्याफार प्रमाणात का होईना प्रथमच एकत्र आल्याचे दिसून आले. या सभेकडे कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, आपचे नेते काही फिरकले नाहीत. या सभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ‘भाजपला अंगावर घ्यायचे असेल तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विरोधकांची संयुक्त आघाडी उभारणे ही काळाची गरज आहे, केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण केली जात आहे. तिसरी आघाडी न करता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. तसे झाल्यास आपण सहज विजयी होऊ शकतो.’ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ‘२०२४मध्ये केंद्रामध्ये सत्ताबदल घडावा यासाठी सर्वानी एकत्रित काम करण्याची वेळ आली आहे. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले; मात्र केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या तत्काळ मान्य केल्या नाहीत. आमचे शेतकरी आणि तरुण आत्महत्या करत आहेत; परंतु सरकारने यावर अजूनही कोणताही तोडगा काढलेला नाही. सरकार बदलणे, हाच त्या समस्येवर खरा तोडगा आहे. शेतकरी नेत्यांविरोधातील खटले मागे घेतले जातील, असे आश्वासन सरकारने दिले होते; मात्र ते आश्वासन अजूनही पाळले नाही, याकडे पवार यांनी विरोधकांचे लक्ष वेधले. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नितीशकुमार व शरद पवार यांची नावे जरी अग्रक्रमाने चर्चिली जात असली तरी त्याचा या दोघांनीही वेळोवेळी इन्कार केलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोणता, याचे उत्तर काही विरोधकांना सापडलेले नाही. या देशावर वर्षानुवर्षे ज्यांनी सत्ता गाजवली, त्या कॉंग्रेसची नेमकी भूमिका काय, ते विरोधकांच्या गोटात सामील होणार का याचे उत्तर अद्याप तरी मिळालेले नाही. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सर्वप्रथम भाजपविरुध्द जंग छेडून सर्वच विरोधकांना एकत्र येण्याची हाक दिली होती, त्याही आता बॅकफूटवर गेल्या आहेत. आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर भाजप व विरोधी पक्ष यांना समान अंतरावर ठेवण्यातच आजवर धन्यता मानली आहे. हरियाणातील सभेनंतर लगेचच नितीश कुमार, राजदचे ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली आहे. अशाप्रकारे भाजपविरोधात विरोधक जरी एकवटले पुढे काय, हा प्रश्नच आहे. भाजपविरोधात जोपर्यंत सक्षम पर्याय उभा केला जात नाही, तोवर विरोधकांच्या ऐक्याच्या चर्चा म्हणजे ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’ म्हटले तर ते वावगे ठरू नये.