संपादकीय

पितृपक्ष: एक अंधश्रद्धा

पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. असे विधी करून जर खरंच आपल्या पितरांना मुक्ती मिळत असेल आणि त्यांचे आत्मे शांत होत असतील, तर मग दरवर्षी हीच कर्मकांडे पुन्हा-पुन्हा करण्याची गरज काय?

नवशक्ती Web Desk

भ्रम -विभ्रम

जगदीश काबरे

पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. असे विधी करून जर खरंच आपल्या पितरांना मुक्ती मिळत असेल आणि त्यांचे आत्मे शांत होत असतील, तर मग दरवर्षी हीच कर्मकांडे पुन्हा-पुन्हा करण्याची गरज काय?

हिंदू शास्त्राप्रमाणे जोपर्यंत श्राद्ध/पिंड दान होत नाही तोपर्यंत आत्म्याला स्वर्ग प्राप्त होत नाही वा मुक्ती मिळत नाही, असे समजले जाते. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. (१५ दिवसांचा काळ) या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. असे विधी करून जर खरंच आपल्या पितरांना मुक्ती मिळत असेल आणि त्यांचे आत्मे शांत होत असतील, तर मग दरवर्षी हीच कर्मकांडे पुन्हा पुन्हा करण्याची गरज काय? दरवर्षी ते पुन्हा पुन्हा अशांत का होतात? हा प्रश्न आपल्याला का पडत नाही? २१व्या शतकात अशी कर्मकांडे करून हिंदू समाज अंधश्रद्धेच्या भयाण अंधारात अजूनही जगत आहे, ही वैषम्याची बाब आहे. खरे तर हा लोकांच्या मनात भीती पसरवून स्वत:चे पोट भरण्याचा हा पारंपरिक ब्राम्होद्योग आहे. म्हणून ब्राम्हण अणि कावळा जोपर्यंत अन्न खात नाही तोपर्यंत घरातील कुणीही व्यक्ती जेवत नाही. बरे, श्राद्ध/पिंड दान करण्यासाठी पुरुषच लागतो, स्त्रियाना तो अधिकार नाही. काय कारण? कारण काय तर म्हणे, पुराणात असे सांगितले आहे की, पुरुषानेच हे विधी केले पाहिजेत, तरच घरात सुखसमृद्धी नांदते.

गरुड पुराण : पुत्राशिवाय मनुष्याला मुक्तता नाही. पितृपक्षात मुलाकडून पिंड दान केले नाही तर आत्मा स्वर्गात जात नाही. मार्कंडेय पुराण : घरातील मुख्य पुरुषाने आपले मृत पितर यांच्या सोबत भूत, देव अणि ब्रह्मण यांनाही अन्न दिले पाहिजे अणि असे केले. तरच त्याला समृद्धी, निरोगी शरीर अणि शेवटी मोक्ष मिळतो.

या तर पुरुषसत्ताक व्यवस्थेला बळकट करणाऱ्या गोष्टी आहेत. पुरुषी मानसिकतेत स्त्रियांना दुय्यम स्थान असते, म्हणूनच स्त्रियांना यातील कुठलाही विधी करता येत नाही. तसेच खरे पहाता, कावळा तुमचा निरोप घेऊन तुमच्या मृत पितारांकडे जात नाही की पितारांचा आत्मा कावळ्यात येत नाही. हे सगळे कर्मकांड तुमच्या मनातील भीतीचा फायदा घेऊन रचण्यात आले आहे. माणसे जिवंत असताना त्यांना छळतील आणि मेल्यावर त्यांच्या नावाने गळे काढत श्राद्ध करून गोडघोडही खातील. असा दांभिकपणा इतर कुठल्याही धर्मात नाही, आहे तो फक्त हिंदू धर्मातच. म्हणून धर्माच्या धंद्याचे सर्वात हास्यास्पद आणि विकृत रूप असेल तर तो आहे पितृपक्ष, श्राद्ध आणि त्यातील विधी.

पुनर्जन्म आहे, असे मानले तर घरातील वडीलधारी मंडळी मृत्यूनंतर पुढच्या जन्मात कुठेतरी जन्माला आली असतीलच ना? कारण त्यांना ८४ लक्ष फेऱ्यातून जावे लागल्यानंतरच माणूस जन्म मिळतो म्हणे! मग त्यांचे आत्मे अवकाशात लटकून खीर-पुरीसाठी कसे आणि कुठे तळमळत असतात? जर पुढचा जन्म हा ८४ लक्ष फेऱ्यातून होणारा असेल तर सगळ्यांचे पितर नेमके कावळेच कसे काय होतात? इतर प्राण्यांमध्ये पितरे का दिसत नाहीत? हा साधा प्रश्न कुठल्याही शाळेत शिकत असणाऱ्या मुलालाही पडतो, तर मग शिक्षित आणि उच्चशिक्षित लोकांना तो का पडू नये? धर्ममार्तंडांच्या हातातले ते एवढे मठ्ठ बाहुले कसे काय होतात? आता आपण आपले संत पिंडदानाविषयी काय म्हणतात ते पाहूया...

तुकाराम महाराज म्हणतात,

जित्या नाही अन्न| मेल्यावरी पिंडदान|

हे तो चाळवाचाळवी ||

संत कबीर सांगतात,

जिंदा बापाको रोटी न खिलावे, मरे बाप पाछतायो, मुठभर चावल दाबे धरके, कौवा बाप बुलय्यो।

गाडगेबाबा म्हणतात,

"पिंड दान करू नका. ही भटा-बमाणांची पोटभरी परंपरा बंद करा. गरिबांना अन्न द्या, त्यांच्या मुलांना शिकवा. मृत झालेल्या वाडवडिलांची स्मृती जतन करा, त्यानी केलेल्या चांगल्या कामाचे अनुकरण करा. त्यांचे चांगले विचार आत्मसात करा. हाच त्यांचा योग्य स्मृती दिन होऊ शकतो."

पण आपल्या पुरोहित पंडितांना दोन्ही हातात लाडू हवे असतात. त्यामुळे मरण्याआधी पुढच्या जन्म सुखाचा जाण्यासाठी ते विधी करायला लावतात आणि मृत्यूनंतरही पितरांचा धाक दाखवून त्यांच्या मुलांच्या सुखासाठी कर्मकांड करायला लावून त्यांच्याकडूनही आपल्या पोटोबासाठी खीर-पुरीची व्यवस्था करतात. असे केल्याने सुख-समृद्धी येईल असा दावा केला जातो. परंतु इतिहास साक्षी आहे की, हजारो वर्षे हे सर्व करूनही ही धार्मिक माणसे गरीबच राहिली आहेत. जे मुळातच श्रीमंत आहेत ते पितरांच्या नावाखाली फक्त आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी श्राद्ध पक्ष करत असतात. म्हणूनच श्राद्धाचे सोंग घराघरात अत्यंत उसन्या गांभीर्याने केले जाते... तेही सु(?)शिक्षित कुटुंबात! खरंच किती लाजीरवाणा प्रकार आहे हा!

सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे कावळ्यात आपल्या पितरांचा आत्मा येतो म्हणे! कावळा हा पक्षी वर्षभर मेलेले मासे, उंदीर, बेडूक, सडलेले मांस इत्यादी टाकाऊ घाण खाऊन परिसर स्वच्छ करत असतो. त्यात पूर्वजांचे आत्मे आल्याची अफवा पक्की करून पितृपक्षाचा खेळ मांडला जातो. जो कावळा १२ महिने घाण खातो तोच कावळा एका दिवसापुरता शुभ आणि शुद्ध कसा होतो? ह़ा विरोधाभास आपल्या लक्षात का येत नाही?

तुम्ही जर पिंडदान विधीचे नीट निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की... भटजी कार्यक्रम सकाळी लवकर घ्यायला सांगतात. कारण कावळे भुकेपोटी सकाळी पटकन येतात. एकदा पोट भरल्यानंतर भुक लागल्याशिवाय कोणताही प्राणी/पक्षी लगेच परत परत खात नाही. भटजींचा दुसरा सल्ला हा असतो की, कार्यक्रम तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी घ्या. याचे कारण तेथे दररोजच असे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे तेथील कावळ्यांच्या हे अंगवळणी पडलेले असते. कार्यक्रमाला उशीर झाल्यास कावळ्यांनी काही तरी खाल्लेले असतेच, त्यामुळे त्यांचे पोट भरलेले असल्यानेही ते सहजासहजी पिंडाजवळ येत नाहीत.

बरे, कावळ्यात आत्मा असतो असे मानल्यास मुस्लीम, ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या आत्म्यांचे काय? ते कावळे वेगळे असतात काय? आणि तसे असलेच, तर भटजींना कसे कळते हा हिंदू कावळा आहे? आणि त्याच यजमानाच्या पितराचा आहे? कावळ्यांनी काय फक्त हिंदुंच्याच आत्म्यांचाच ठेका घेतलाय का? तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना बघा. एकच कावळा अनेक पिंडावरचा भात खातो. म्हणजे एकाच कावळ्यात अनेक आत्मे आहेत असे समजायचे काय? दुसऱ्या दिवशी परत कावळा आत्म्यांची आदलाबदल करतो का? भात खाणाऱ्या कावळ्याचा आत्मा स्त्रीचा की पुरूषाचा कसे ओळखायचे? या अशा निरीक्षणावरून आपल्या हे सहज लक्षात येते की, ही १०० टक्के अंधश्रध्दा आहे. भट-पुरोहितांनी धर्माच्या नावाखाली अज्ञाताच्या भीतीपोटी लोकांना या कर्मकांडात गुंतवून स्वत:ची पोटे भरण्यासाठी काढलेली लुटीची दुकानं आहेत. तेव्हा मंडळी जागे व्हा आणि २१व्या शतकातला वैज्ञानिक विचार जगायला शिका.

"शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार" या 'सुधारका'तील लेखात आगरकर म्हणतात, "हिंदूंनो, तुम्ही इतके गतानुगतिक कशासाठी होऊन बसला आहांत? मनुष्याच्या जन्माला येऊन असे मेषासारखे वर्तन का करता? डोक्यात जो मेंदू आहे त्याची माती का होऊ देता? जिवंत माणसाच्या आहारास लागणारे पदार्थ तुम्ही मेलेल्या माणसास अर्पण करता याचा अर्थ काय? मृत शरीराची राख झाल्यावर त्याच्या नावाने तुम्ही जें अन्न-पाणी देतां त्याचा उपभोग कोण घेतो? आत्म्याला नाक, तोंड, पोट असे अवयव असतात का? असतील तर जिवंतपणा आणि मृतावस्था यांत भेद काय? खुळ्यांनो! असे पोराहून पोर कसे झालांत?" विचार तर कराल...!

jetjagdish@gmail.com

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून