संपादकीय

पोर्तुगालमध्ये का वाजतेय धोक्याची घंटा?

पोर्तुगीज जनतेने त्यांचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला आहे. तेथील राजकारण आणि आताचे निकाल नक्की काय सांगतात? कुठल्या ऐतिहासिक घडामोडी तेथे घडल्या? याचा विचार करता उजव्या विचारसरणीचा वाढता प्रभाव भविष्यात धोकादायक ठरू शकतो.

नवशक्ती Web Desk

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

पोर्तुगीज जनतेने त्यांचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला आहे. तेथील राजकारण आणि आताचे निकाल नक्की काय सांगतात? कुठल्या ऐतिहासिक घडामोडी तेथे घडल्या? याचा विचार करता उजव्या विचारसरणीचा वाढता प्रभाव भविष्यात धोकादायक ठरू शकतो.

युरोपच्या नकाशावर शांत आणि लोकशाही मूल्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पोर्तुगालने नुकताच आपला नवा राष्ट्राध्यक्ष निवडला आहे. मध्यममार्गी समाजवादी नेते अँटोनियो जोसे सेगुरो यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, या निकालाने एका वेगळ्या चर्चेला जन्म दिला आहे. हा विजय केवळ एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा नसून, पोर्तुगालच्या राजकारणात वेगाने शिरकाव करणाऱ्या ‘कट्टर उजव्या’ लाटेविरुद्धच्या संघर्षाचा एक टप्पा ठरला आहे. ही निवडणूक फक्त अध्यक्षाची निवड नव्हती, तर देशाच्या भावी राजकीय दिशेची, लोकशाही मूल्यांची आणि यूरोपमधील उदयोन्मुख राष्ट्रीयवादी धारांचा मुकाबला करण्याची परीक्षा होती.

मार्सेलो रेबेलो डी सूसा हे दोनदा राष्ट्राध्यक्ष झाले. तेथील राज्यघटनेनुसार तिसऱ्यांदा निवडणूक लढविता येत नाही. त्यामुळे सूसा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. एकूण ११ उमेदवार रिंगणात होते. त्यात सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार अँटोनियो जोसे सेगुरो हे होते. ते प्रामुख्याने मध्यमवर्गीय, मध्यम-वामपंथी विचारधारेचे समजले जातात, तर त्यांच्यासमोर चेगा पक्षाचे नेते अँद्रे वेंचुरा यांचे आव्हान होते. वेंचुरा हे राष्ट्रीयवादी आणि कट्टर उजव्या बाजूच्या गतिशीलतेचे प्रतिनिधित्व करतात. अटीतटीच्या लढतीत सेगुरो यांनी ६६.८ टक्के मते मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांचे प्रतिस्पर्धी, कट्टर उजव्या विचारसरणीच्या चेगा पक्षाचे नेते आंद्रे वेंचुरा यांना ३३.२ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. वरवर पाहता हा पराभव मोठा वाटत असला तरी, वेंचुरा यांना मिळालेली ही मते पोर्तुगालच्या इतिहासातील उजव्या विचारसरणीला मिळालेली आतापर्यंतची सर्वाधिक मते आहेत.

यंदाच्या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ४० वर्षांनी दुसऱ्या फेरीपर्यंत निवडणूक पोहचली. यापूर्वी १९८६ मध्ये तशी वेळ आली होती. यंदा पहिल्या फेरीत मतांचे विभाजन झाले. सेगुरो यांनी सुमारे ३१ टक्के एवढ्या उच्च मतांचा हिस्सा मिळविला. त्यानंतर वेंचुरा जवळपास २३.५ टक्के मते मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यामुळे दोन्ही नेते दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले. सेगुरो हे आर्थिक स्थिरता, लोकशाही मूल्यांचा बचाव व सर्वसमावेशक संदेश देत होते, तर वेंचुरा हे चेगा पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेचा उपयोग करणे आणि कठोर शरणागती विरोधी, स्थलांतरविरोधी धोरणांचा प्रचार करीत होते. मुख्य मध्यमवर्गीय पक्ष सोशल डेमोक्रेटिक पार्टी ही तटस्थ राहिली. त्यांनी कोणत्याही उमेदवाराला समर्थन न देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या फेरीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी होती, जी यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा जास्त होती. दुसऱ्या फेरीत अँटोनिओ जोसे सेगुरो यांनी ऐतिहासिक विजय मिळविला.

पोर्तुगालमध्ये राष्ट्राध्यक्षपद हे तसे औपचारिक मानले जाते. मात्र, संसदेला विसर्जित करण्याचा आणि राजकीय कोंडीच्या प्रसंगी हस्तक्षेप करण्याचा महत्त्वाचा अधिकार या पदाकडे असतो. त्यामुळेच ही निवडणूक आगामी काळातील देशाच्या धोरणात्मक दिशेसाठी निर्णायक मानली गेली. सेगुरो हे पोर्तुगालचे गेल्या दोन दशकातील पहिले समाजवादी राष्ट्राध्यक्ष आहेत. या निवडणुकीत केवळ परंपरागत नव्हे तर अन्य मतदार आणि उदारमतवादीही त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचे स्पष्ट झाले.

यंदाची निवडणूक केवळ राजकीय कारणांमुळेच नव्हे, तर नैसर्गिक आपत्तीमुळेही चर्चेत राहिली. ‘लिओनार्डो’ या भीषण वादळाने पोर्तुगालला झोडपून काढले. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्यासह जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी आंद्रे वेंचुरा यांनी केली होती, परंतु निवडणूक आयोगाने ती फेटाळून लावली. प्रतिकूल परिस्थितीतही पोर्तुगीज जनतेने मतदानासाठी दाखवलेला उत्साह हा त्यांच्या लोकशाहीवरील अढळ विश्वासाचेच प्रतीक मानला जात आहे. उजव्या विचारसरणीच्या अनेक मध्यममार्गी नेत्यांनीही वेंचुरा यांच्या विजयाची धास्ती इतकी होती की, त्यांनी आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेवून समाजवादी सेगुरो यांना पाठिंबा दिला. लोकशाहीची मूल्ये टिकवण्यासाठी कट्टरतावाद्यांना रोखणे गरजेचे आहे, अशी भावना यामागे होती.

आंद्रे वेंचुरा, जे एकेकाळी फुटबॉल समालोचक आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते, त्यांनी अवघ्या काही वर्षांत पोर्तुगालच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू ‘स्थलांतरित’ आणि ‘प्रस्थापित राजकारण’ हा राहिला. “पोर्तुगाल म्हणजे बांगलादेश नाही” किंवा “स्थलांतरितांना सरकारी लाभांपासून दूर ठेवावे” अशा टोकाच्या घोषणा त्यांनी दिल्या होत्या. त्यांच्या मतांची टक्केवारी गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील २२.८ टक्क्यांवरून आता ३३.२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी झालेल्या संसदीय निवडणुकीत चेगा पक्ष मुख्य विरोधक पक्ष म्हणून उभा राहिला होता. तब्बल ६० जागा मिळवून तो दुसरा सर्वात मोठा पक्ष बनला. उजव्यांचा हा वाढता प्रभाव केवळ पोर्तुगालसाठीच नव्हे, तर संपूर्ण युरोपियन युनियनसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

युरोपीय नेत्यांनी या निकालाचे स्वागत केले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांनी सेगुरो यांचे अभिनंदन करताना पोर्तुगालच्या ‘लोकशाही धैर्याचा’ उल्लेख केला. हा विजय युरोपमधील वाढत्या उजव्या लाटेला तात्पुरता ब्रेक असल्याचे मानले जात आहे.

पोर्तुगालच्या शेजारील देश स्पेनमध्येही अशाच प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे. स्पेनच्या ‘अरागॉन’ प्रांतीय निवडणुकीत कट्टर उजव्या ‘वॉक्स’ पक्षाने आपल्या जागा दुप्पट करून प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना पेचात पाडले आहे. पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या समाजवादी पक्षाला तिथे मोठा फटका बसला आहे. आयबेरियन द्वीपकल्पात उजव्या शक्तींचे हे वाढते प्रस्थ आगामी काळात युरोपच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरेल, असे बोलले जात आहे.

पोर्तुगालच्या निवडणुकीने काही महत्त्वपूर्ण संदेश दिले आहेत. सेगुरो यांच्या विजयाने स्पष्ट केले की, लोकशाही, सार्वभौम मूल्ये व एकमतावर आधारित राजकीय संवाद यांचे समर्थन आजही पोर्तुगालमध्ये आहे. या निकालाने पोर्तुगालचे राजकीय नेतृत्व पुन्हा अर्थपूर्ण आणि सर्वसमावेशक विचारधारेकडे वळले आहे. तसेच, उजव्या विचारसरणीचे मतदार वाढत आहेत. यापुढील काळाही हा प्रभाव असाच राहण्याची किंवा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेंचुरा आणि चेगा पक्ष पुढील संसदीय निवडणुकांमध्ये अधिक भूमिका बजावू शकतात. पारंपरिक पक्षांनी त्यांचे धोरण अधिक गतीने बदलण्याची गरज यानिमित्ताने स्पष्ट झाली.

राष्ट्राध्यक्षपदाची ही निवडणूक एका संवेदनशील, विभाजित पण लोकशाही प्रक्रियेच्या उत्कर्षाचे प्रतीक राहिली. एकीकडे प्रामाणिक, सर्वसमावेशक आणि लोकतांत्रिक दृष्टिकोन असलेला उमेदवार राष्ट्रपतीपदावर पोहोचला; तर दुसरीकडे, राष्ट्रवादी व अधिक कट्टर विचारधारा ठेवणाऱ्या पक्षानेही महत्त्वपूर्ण पाठबळ मिळवले. हे वर्तुळ आजच्या युरोपीय राजकारणातील विशेष वैशिष्ट्य आहे.

अँटोनियो जोसे सेगुरो यांचा विजय हा पोर्तुगालच्या मध्यममार्गी राजकारणासाठी एक दिलासा आहे. मात्र, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून आंद्रे वेंचुरा यांनी दिलेली धोक्याची घंटा दुर्लक्षित करून चालणार नाही. लोकशाहीमध्ये लोकांच्या असंतोषाला जेव्हा कट्टरतावादाची जोड मिळते, तेव्हा प्रस्थापित पक्षांना आत्मपरीक्षण करणे गरजेचे असते. सेगुरो यांच्यापुढील मुख्य आव्हान आता हेच असेल की, देशातील वाढत्या बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नांना सोडवून सर्वसमावेशक विकासाचा मार्ग कसा शोधायचा. तसेच, पोर्तुगालने सध्यातरी ‘समाजवादा’चा झेंडा फडकत ठेवला आहे, पण भविष्यातील राजकीय वादळांचा मुकाबला करण्यासाठी त्यांना अधिक सजग राहावे लागणार आहे.

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक व मुक्त पत्रकार.

आजचे राशिभविष्य, २७ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा अडकले विवाहबंधनात; 'VIROSH' च्या लग्नाची चाहत्यांत चर्चा

जेवणात तोंडी लावायला झणझणीत भरलेली हिरवी मिरची; वरण-भाताची चव होईल दुप्पट

Holi 2026 : केमिकलयुक्त रंगांना बाय बाय! नैसर्गिक रंगांनी करा सण साजरा; जाणून घ्या घरगुती रंगांचे पर्याय

आठवीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी! सुप्रीम कोर्टाने NCERT ला घेतले फैलावर; म्हणाले - 'हा सुनियोजित कट, दोषींना सोडणार नाही'