आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी (Photo- X)
संपादकीय

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

राहुल गांधींनी आपण राजकीय अस्तित्वाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या असुरक्षित बनलो आहोत हे दाखवून दिले आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या असुरक्षित बनतो तेव्हा आपण इतरांच्या तुलनेत सक्षम, आक्रमक आहोत, असे दाखविण्याची धडपड करू लागतो.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

केशव उपाध्ये

राहुल गांधींनी आपण राजकीय अस्तित्वाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या असुरक्षित बनलो आहोत हे दाखवून दिले आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या असुरक्षित बनतो तेव्हा आपण इतरांच्या तुलनेत सक्षम, आक्रमक आहोत, असे दाखविण्याची धडपड करू लागतो.

लाेकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दिवसेंदिवस स्वतःच खोदलेल्या खड्ड्यात खोल खोल रुतत चालले आहेत. आपण खड्ड्यात एखाद्या दलदलीप्रमाणे रुतत चाललो आहोत, हेही त्यांना उमगेनासे झाले आहे. या खड्ड्यात रुतत असताना त्यांचे वर्तन अत्यंत बेताल, अनियंत्रित होत चालले आहे. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या अस्तित्वाच्या भीतीने राहुल गांधींची भाषा, एकूणच वर्तन हाराकिरीकडे वाटचाल करत आहे. दिल्लीत कथित विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर युवराजांच्या देहबोलीमध्ये आक्रस्ताळेपणा खेरीज दुसरे काहीच आढळून येईनासे झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात आपण एकटेच आक्रमकपणे उभे राहतो, असा दावा राहुल गांधी वारंवार करीत असतात. दिल्लीत समाजकंटकांच्या टोळक्यांनी घडवून आणलेल्या हिंसक घटनांनंतर राहुल गांधी आणखी पिसाळल्याचे दिसते आहे. विद्यार्थ्यांचे नेते म्हणवणाऱ्या काही मंडळींवर प्रसिद्धीचा झोत पडल्यानंतर आपल्या आक्रमक प्रतिमेचे काय होणार, अशा भीतीने राहुल गांधींना ग्रासले आहे. ही भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. दिल्लीतील आंदोलनाचा घटनाक्रम आणि त्यापाठोपाठ राहुल गांधींच्या हालचाली बारकाईने पाहिल्यावर त्यांना अस्तित्वाच्या शंकेने किती वेढले आहे याची कल्पना येते. आंदोलक म्हणविणाऱ्या हिंसक टोळक्यांनी संसदेवर मोर्चा काढला. यावेळी टोळक्यांनी पोलिसांवर हल्ले चढविले. हिंसाचार करण्याच्या उद्देशाने निघालेल्या या टोळक्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे शहरी नक्षलवादी समर्थकांनी समाजमाध्यमांतून प्रचंड भांडवल केले. निष्पाप, कोवळ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला असा समज निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवादी शक्तींच्या पाठीराख्यांनी आपल्या इको सिस्टीमद्वारे पद्धतशीरपणे केला. हे पाहून युवराज राहुल बाबा अस्वस्थ झाले. या भेदरलेल्या अवस्थेतच राहुल गांधींनी २० जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्धीचा सगळा झोत भलत्याच मंडळींवर पडतो आहे हे पाहून चिंताक्रांत झालेल्या राहुल गांधींनी मानसिक असुरक्षिततेच्या दबावात पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा घाट घाईघाईने घातला. त्या दिवसापासून राहुल गांधींचे वर्तन प्रचंड हेकेखोर पद्धतीचे झाल्याचे पहावयास मिळते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला, नीट परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका फुटीला वाव राहू नये यासाठी यासंदर्भातील कायद्यात अनेक बदल करण्यात आले. नीट परीक्षा काटेकोर व्हावी आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मोदी सरकारने या विषयावर संसदेत चर्चेची तयारी दर्शविली. अशा वेळी लोकसभेत या विषयावर साधकबाधक, समग्र चर्चा घडवून आणून नीट परीक्षा कायदा आणखी निर्दोष कसा होईल यासाठी शांततेत चर्चा घडवून आणणे हे प्रमुख विरोधी पक्षाचे कर्तव्य होते. या चर्चेत भाग घेऊन राहुल गांधींना आपली प्रतिमा आणखी उजळवता आली असती. मात्र आंदोलनामुळे भयग्रस्त बनलेल्या राहुल गांधींनी संसदेचे कामकाज चालू न देण्याचा हट्ट धरला. हिंसक टोळक्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत निवेदन करण्याची मागणी राहुल गांधींनी केली. लोकसभा अध्यक्षांकडे या विषयावर चर्चेची मागणी करा, केंद्र सरकार विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास तयार आहे, असे संसदीय कार्यमंत्री डॉ. किरेन रिजिजू यांनी वारंवार सांगूनही राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांकडे चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी केली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संसदेच्या दोन्ही सभागृहांत येऊन नीट प्रकरणावर निवेदन देण्यास तयार आहेत असे केंद्र सरकारकडून सांगितले गेल्यावर, ''आम्हाला अमित शहा यांचे लेक्चर ऐकायचे नाही,'' असे उत्तर देऊन राहुल गांधींनी आपण किती अगतिक झालो आहोत हे दाखवून दिले. केंद्रीय गृहमंत्र्यांना उद्देशून असभ्य भाषेचा वापर करून युवराजांना आपण किती आक्रमक आहोत हे ठसविण्याचा प्रयत्न करीत होते. जंतरमंतर आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या टोळक्यांना समाजमाध्यमांवर हेतुपूर्वक प्रसिद्धी मिळवून देण्यात आली. ही प्रसिद्धी पाहून आपणही तशाच भाषेचा उपयोग करण्याशिवाय गत्यंतर नाही, असा समज करून घेणाऱ्या राहुल गांधींनी त्यानंतर प्रत्येक पाऊल खड्ड्यात आणखी खोल रुतण्यासाठी टाकले असल्याचे दिसून येते.

केंद्रीय गृहमंत्री यांनी स्वतः संसद परिसरात उपस्थित असलेल्या पत्रकारांना आपण चर्चेस तयार आहोत, असे सांगूनही राहुल गांधींनी चर्चेसाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले नाही. अखेरीस गोंधळातच संसद अधिवेशन समाप्त झाले. या घटनाक्रमातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्येक संसद अधिवेशनात काँग्रेसचा गोंधळ हा नित्याचा भाग बनला आहे. आक्रमकतेच्या नादात जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आपल्याला काम करता येत नाही हे सिद्ध करून राहुल गांधींनी आपण राजकीय अस्तित्वाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या असुरक्षित बनलो आहोत हे दाखवून दिले आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या असुरक्षित बनतो तेव्हा आपण इतरांच्या तुलनेत सक्षम, आक्रमक आहोत, असे दाखविण्याची धडपड करू लागतो. राहुल गांधींचे सध्याचे वर्तन हे भयगंडातून जन्मलेले आहे. १३ ऑगस्टला पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना उद्देशून अभद्र टिप्पणी केली. त्यातून त्यांचा भयगंड आणखीनच ठळकपणे दिसला. राहुल यांनी या भयगंडाचे गेल्या काही दिवसांत वारंवार दर्शन घडवले आहे. अशा स्वस्त टिपण्या करून आपण स्वतःचेच हसे करून घेत आहेत, हे कळण्याएवढी आकलनशक्ती युवराजांकडे नाही. त्यांचा पाय आणखी किती खोलात जातो हे पहायचे.

भाजप प्रदेश उपाध्यक्ष

आजचे राशिभविष्य, १८ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मंचुरियन-चिली खाऊन कंटाळलात? यावेळी घरीच बनवा झणझणीत फ्लॉवर चिली; पाहा सोपी रेसिपी

बेसनाच्या मसालेदार सारणाची कुरकुरीत कचोरी; घरच्या घरी ट्राय करा सोपी रेसिपी

कुणी सिंहावर तर कुणी मोरावर... मुंबईच्या गणपती आगमन सोहळ्यातील खास झलक पाहा

मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचंय? फोनची ही १ सेटिंग बदला; स्क्रीन टाइम होईल कमी