RSS/Twitter
संपादकीय

संघा तुझा भाजपवर भरवसा नाय का ?

भाजपच्या लोकसभेतील पराजयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध मुखपत्रांनी टीका केली आहे.

नवशक्ती Web Desk

- ॲड. हर्षल प्रधान

मत आमचेही

भाजपच्या लोकसभेतील पराजयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध मुखपत्रांनी टीका केली आहे. गेले दोन महिने ऑर्गनायजर, स्वस्तिक आणि विवेक या साप्ताहिक मासिकातून भाजपच्या संघटना कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, तर भाजपच्या नेत्यांमधील अहंकारावर देखील टीका केली होती. मात्र महाराष्ट्र असो पश्चिम बंगाल असो किंवा दिल्ली असो, भाजपच्या नेत्यांनी संघाच्या मुखपत्रांकडून कोणताही बोध तर घेतला नाहीच उलट त्यांच्याकडे दुर्लक्ष संघाला अनुल्लेखित करण्याचेही धाडस दाखवले आहे. भाजपच्या डोक्यातील सत्तेची हवा अजूनही तशीच आहे जशी गेली दहा वर्षे होती असेच म्हणावे लागेल. त्यामुळे संघांचे कार्यकर्ते जणू संघा तुझा भाजपवर भरवसा नाय का, असे म्हणू लागले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायजरमधून भाजपच्या कामगिरीवर ताशेरे ओढत टीकास्त्र सोडण्यात आले. महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण टाळता येण्याचे तसेच हेराफेरीचे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रात जे घडले ते टाळता आले असते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. भाजप आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळाले असते. शरद पवार यांच्या चुलत भावांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद संपली असती. ज्या काँग्रेसी विचारसरणीविरोधात वर्षानुवर्षे लढलो त्यांच्या आणि संघावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याला पायघड्या घालण्यात आल्याने भाजप समर्थक दुखावले गेले. एका फटक्यात भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली. महाराष्ट्रात नंबर वन होण्यासाठी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, कोणताही संघर्ष न करता तो आणखी एक राजकीय पक्ष बनला असे भाष्य करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीचे निकाल अतिआत्मविश्वास बाळगलेल्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना आरसा दाखवणारे आहेत. सगळे आपल्या भ्रमात होते. कोणीही जनतेचा आवाज ऐकला नाही, असं आरएसएसचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायजरमध्ये म्हटलंय. भाजपनं आरएसएसचं काम केलं नाही, असं बोलण्यात आलं. पण, भाजप मोठा पक्ष आहे आणि त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते आहेत. ते पक्षाची कार्यपद्धती, विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. संघ निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृतीचं काम करते. पण, भाजपचे कार्यकर्ते संघापर्यंत पोहोचले नाही. त्यांनी निवडणुकीत सहकार्य करण्याबद्दल स्वयंसेवकांना साधं विचारलं सुद्धा नाही. त्यांनी असं का केलं याचं उत्तर द्यावं? असा सवाल या नियतकालिकातून विचारण्यात आला. भाजप कार्यकर्ते ‘आयेगा तो मोदी ही, अबकी बार ४०० पार’च्या अतिआत्मविश्वासात मश्गूल होते, अशी टीका करत महाराष्ट्रातल्या फोडाफोडीच्या राजकारणावरूनही या लेखातून भाजपला सुनावलं. महाराष्ट्रातलं हेराफेरीचं राजकारण टाळता आलं असतं. भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळत असताना देखील अजित पवारांना का सोबत घेतलं? ज्यांच्याविरोधात वर्षानुवर्ष लढा दिला त्यांनाच सोबत घेतल्यानं भाजप समर्थक दुखावले. भाजपनं एका झटक्यात आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली, अशी कठोर टीका भाजपवर करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन एका झटक्यात भाजपनं आपली ‘ब्रँड व्हॅल्यू’ कमी करून घेतली, असा हल्लाबोल ऑर्गनायजरमधून करण्यात आला. जमिनीवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत विचारात न घेता भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका बसल्याचं यातून दिसून आलं, असंही यावेळी नमूद करण्यात आलं. यावरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माहितीमध्ये कोणता संदेश मिळतो आहे हे स्पष्ट होतंय.

ऑर्गनायजर पाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विवेक या साप्ताहिकातून पुन्हा एकदा भाजपचे कान टोचण्यात आले. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपचे नुकसान झाल्याचं म्हटलंय. भाजपच्या महाराष्ट्रातील नुकसानीचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीवर फोडलं आहे. पक्ष, कार्यकर्ते आणि राज्यातल्या महायुती सरकारमध्ये सुसंवाद नसल्यानंच हा निकाल बघायला मिळाला, अशी टीका या साप्ताहिकात करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आणि मित्रपक्षाच्या अपयशाला राष्ट्रवादीला सोबत घेणे हे एक कारण असल्याचा संघ विचारांच्या विवेक साप्ताहिकात उल्लेख करण्यात आला. हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आज खचलेला नाही तर संभ्रमात हरवलेला आहे. २०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन विवेकने महायुतीच्या अपयशाचे विश्लेषण केले आहे. शिवसेनेसोबत भाजप यांना ही नैसर्गिक युती म्हणून मतदार आणि भाजप कार्यकर्त्यांनी हिंदुत्व हा सामायिक दुवा म्हणून स्वीकारलं, मात्र राष्ट्रवादीसोबत आल्यानंतर महायुती दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि नाराजी उत्पन्न झाली.

देश केवळ दोनच नेते चालवतात. मोदी आणि शहा यांनी महाराष्ट्रात आणि देशात एकाच पद्धतीने काम करण्यास सुरुवात केलीय आणि ती पद्धत म्हणजे हम करे सो कायदा. महाराष्ट्रातील नेत्यांना केंद्रात भाजपमध्ये फारसे महत्त्व राहिले नाही. भाजप महाराष्ट्रात एकही कणखर नेता आता राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात तळागाळात विविध संघटनांकडून विरोध होताना दिसतो आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या भाजप नेत्यांना संघाच्या मुखपत्रांकडे कानाडोळा करण्याशिवाय पर्याय नाही. संघाचे कार्यकर्ते संघा तुझा भाजपवर भरवसा नाय का, असा प्रश्न विचारत फिरतायत. त्यामुळे आधीच संभ्रमात असलेले संघांचे कार्यकर्ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला काहीही मदत करणार नाहीत. त्यामुळे भाजपचा उरलासुरला उत्साह देखील मावळल्याशिवाय राहणार नाही. भाजप महाराष्ट्रात आत्मविश्वास गमावलेला पक्ष म्हणूनच ओळखला जाईल. मग महाराष्ट्रातील मतदारही म्हणतील भाजप तुमचा स्वतःवर भरवसा नाय काय!

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जनसंपर्कप्रमुख आहेत.)

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी