तृणमूलमधील बंड आणि भाजपचे वेगळेपण (संग्रहित छायाचित्र)
संपादकीय

तृणमूलमधील बंड आणि भाजपचे वेगळेपण

तृणमूल हा ममताबाईंच्या कुटुंबाचा खासगी मालकीचा पक्ष बनल्याने त्या आपल्या भाच्याशिवाय अन्य कोणाही नेत्याच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यास तयार नाहीत, हे दिसल्याने तृणमूल आमदारांना बंडाचा झेंडा फडकावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

केशव उपाध्ये

तृणमूल हा ममताबाईंच्या कुटुंबाचा खासगी मालकीचा पक्ष बनल्याने त्या आपल्या भाच्याशिवाय अन्य कोणाही नेत्याच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यास तयार नाहीत, हे दिसल्याने तृणमूल आमदारांना बंडाचा झेंडा फडकावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीच्या दणदणीत विजयामुळे राष्ट्रीय राजकारणाला बसलेल्या हादऱ्याचे धक्के अजूनही जाणवताहेत. सलग १५ वर्षे पश्चिम बंगालची सत्ता निरंकुश पद्धतीने भोगलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे ४ मे रोजी निकाल लागले आणि अवघ्या महिन्याभरात तृणमूल काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडी पाहिल्यावर हा पक्ष किती भुसभुशीत पायावर उभा होता हे दिसून आले आहे. तृणमूल काँग्रेसचे ८० आमदार या वेळच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यातील ६० आमदारांनी एकत्र येऊन आमचाच पक्ष खरा तृणमूल असल्याचा दावा करीत ममता बॅनर्जींनी निवडलेल्या गटनेत्याची नियुक्ती अमान्य केली. याचा सरळसरळ अर्थ असा आहे की निवडून आलेल्या आमदारांनी आता ममताबाईंचे नेतृत्व झुगारून दिले आहे. ममताबाईंच्या नेतृत्वाखाली आणि ममतांचा भाचा अभिषेक बॅनर्जी याच्या छत्रछायेखाली काम केल्यास आपल्याला भवितव्य नाही असे लक्षात आल्यामुळेच या आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकावला आहे. या घडामोडीमुळे ममता बॅनर्जी यांच्या राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे. सलग १५ वर्षे सत्ता भोगलेल्या पक्षाचे दोन तृतीयांश संख्येपेक्षा अधिक आमदार एका झटक्यात पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा निर्णय झुगारून देतात त्यावेळी या पक्षाचा संघटनात्मक आधार किती पोकळ होता हेच दिसते. भारतीय जनता पार्टीच्या विजयानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या राजवटीविरोधात असलेला असंतोष प्रचंड प्रमाणात उफाळून येत आहे. अभिषेक बॅनर्जी यांना झालेली मारहाण राष्ट्रीय पातळीवरील बातम्यांचा विषय ठरली. पण त्याखेरीज तेथे घडलेल्या अनेक घटना तृणमूलच्या दडपशाही राजवटीविरोधात सामान्य माणसाच्या मनात किती संताप खदखदतो आहे, याचे प्रतीक आहेत. तृणमूलच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात घुसून जनतेकडून त्यांनी वसूल केलेली खंडणी, हप्त्याची रक्कम वसूल केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये सरकारच्या नावावर गुंडपुंडांचे, जिहाद्यांचेच राज्य चालत होते हेच दर्शविणाऱ्या या घटना आहेत. याविरोधातील उद्रेक हळूहळू राज्यभरात होतो आहे. या उद्रेकाचा फटका आपल्याला बसू नये म्हणूनच तृणमूलच्या अनेक आमदारांनी स्वतःला ममता, अभिषेकपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विधानसभा निवडणुकीत एवढा मोठा फटका बसूनही ममताबाई आपला भाचा अभिषेक याच्याकडेच पक्षाची सूत्रे पुन्हा देताहेत हे अनेक आमदारांना पसंत पडलेले नाही. तृणमूल हा ममताबाईंच्या कुटुंबाच्या खासगी मालकीचा पक्ष बनल्याने त्या आपल्या भाच्याशिवाय अन्य कोणाही नेत्याच्या हातात पक्षाची सूत्रे देण्यास तयार नाहीत, हे दिसल्याने या आमदारांना बंडाचा झेंडा फडकावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा आजवरचा प्रवास आठवतो. १९७९ मध्ये जनता पक्षातील जनसंघाच्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवू नयेत, अशी मागणी जनता पक्षातील समाजवादी विचाराच्या मंडळींनी केली. ही मागणी अमान्य करत अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या मंडळींनी जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमची मातृसंस्था असून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारधारेवर आम्ही ठाम आहोत, अशी भूमिका घेत अटलजी आणि अडवाणी यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्याचा निर्णय जाहीर केला.

१९८० ते २०२५ या ४५ वर्षांच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीने अनेक खाचखळगे अनुभवले, टिंगलटवाळी सहन केली. मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्ष वाढवताना पक्षाच्या विचारधारेशी कधीच तडजोड केली नाही. भारतीय जनता पार्टीची स्थापना होत असताना भारतीय लोकदल, पूर्वाश्रमीच्या समाजवादी विचारधारेच्या मंडळींचा जनता पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष हे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला आव्हान देत होते. यातील जनता पार्टी आणि लोकदलाने जनता दलाच्या रूपाने १९८० च्या उत्तरार्धात आणि १९९० च्या पूर्वार्धात राष्ट्रीय राजकारणात लक्षणीय स्थान मिळवले होते. जनता दलाने काही काळ आघाडीच्या रूपाने केंद्रातील सत्ताही काही काळ उपभोगली. मात्र हे सर्व पक्ष आता राष्ट्रीय राजकारणात नगण्य ठरले आहेत. समाजवादी विचारधारेचे समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल हे दोन पक्ष उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आपले अस्तित्व राखून आहेत. मात्र हे दोन्ही पक्ष एकेका कुटुंबापुरते मर्यादित झाले आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे केरळबाहेर अस्तित्वही दिसत नाही. भारतीय जनता पार्टी मात्र या ४६ वर्षांत सातत्याने वाढत जाणारा पक्ष ठरला आहे. याचे कारण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने प्रखर राष्ट्रवादाची विचारसरणी सत्तेसाठी कधीच सोडली नाही. त्या आधी जनसंघाने १९५१ पासून राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पक्ष संघटनेची बांधणी केली. सत्ता मिळण्याची दूरदूर शक्यता दिसत नसतानाही जनसंघाने आपली निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज देशभर निर्माण केली. १९८४ मध्ये अटलबिहारी वाजपेयींसह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले तरी पक्षाचा एकही कार्यकर्ता सत्तेच्या वळचणीला गेला नाही. २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे ७७ आमदार निवडून आले होते. यापैकी काही आमदार वगळता अन्य सर्व आमदारांनी पक्षात राहून तृणमूलविरोधात लढा दिला. २०२१ पासून ३०० पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या तरी ममतांच्या दहशतीविरोधातील भाजपाचा आवाज बुलंदच राहिला. त्यामुळेच यावेळच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाला तृणमूलचा सशक्त पर्याय म्हणून निवडले. प्रखर राष्ट्रवादाची विचारसरणी हाच भाजपाचा भक्कम वैचारिक पाया आहे. असा पाया अन्य पक्षांकडे नसल्याने राष्ट्रीय राजकारणात असे पक्ष कसेबसे टिकून आहेत. भाजपच्या या यशोगाथेतून बोध घेणे दूरच राहिले, पण विरोधी पक्ष केवळ भाजपला दूषणे देण्यात धन्यता मानतात हे दुर्दैवी आहे.

प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

आजचे राशिभविष्य, ९ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मशरूमपासून बनवा भन्नाट स्टार्टर; प्रत्येक घासात मिळेल चीजी स्वाद

'तात्काळ देश सोडा'; इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट, भारत सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

पृथ्वीकडे येतंय शक्तिशाली सौर वादळ; मुंबईकरांना दिसणार का दुर्मिळ 'ऑरोरा'?

पावसाळ्यात डेंग्यू-मलेरियापासून बचावासाठी घरात काय काळजी घ्याल?