'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
संपादकीय

प्रादेशिक पक्ष अडचणीत

देशातील प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व सध्या पणाला लागले आहे. त्यामुळे विविध प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे पर्याय सुचवले जात आहेत. पण, भाजपच्या झंझावातासमोर हे पक्ष टिकतील का? हा मोठा प्रश्न आहे.

अरविंद भानुशाली

सह्याद्रीचे वारे

अरविंद भानुशाली

देशातील प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व सध्या पणाला लागले आहे. त्यामुळे विविध प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे पर्याय सुचवले जात आहेत. पण, भाजपच्या झंझावातासमोर हे पक्ष टिकतील का? हा मोठा प्रश्न आहे.

देशात सध्या राजकीय वातावरण बदलत आहे. बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. प. बंगालच्या निवडणूक निकालानंतर ममता दीदी या अल्पमतात आल्या असून त्यांनी आपला तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित करावा, अशी ऑफर सोनिया गांधींनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा यासाठी शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत धावून आले असून शरद पवार यांनी आपला राहिलेला राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत प्रस्ताव संजय राऊत यांनी ठेवला आहे. यामागे निव्वळ नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा द्वेष आहे. परंतु संजय राऊत हेही एका विघटन झालेल्या शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांनीही उरलेला शिवसेना पक्ष हा काँग्रेसमध्ये विसर्जित करावा अशी सूचना केली नसली तरी भाताची परीक्षा एका शितावरून करता येते. काँग्रेस प्रबळ व्हावी हे शिवसेना उबाठा प्रवक्त्यांना वाटत असेल तर प्रथम ही सूचना त्यांनी उद्धव ठाकरे यांना करावी.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे होते की, शिवसेना जेव्हा काँग्रेससोबत जाईल तेव्हा मी माझी शिवसेना बरखास्त करीन. इथे तर त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते काँग्रेसशी भलामण करीत आहेत.

देशात सध्या प्रादेशिक पक्ष संपुष्टात येत आहेत. अशावेळी संजय राऊत यांनी उबाठाची काळजी करायची की काँग्रेसची, हा प्रश्न पडला आहे. प. बंगालमध्ये आज काय स्थिती आहे. तृणमूलचे आमदार, २०-२२ खासदार एनडीएत चालले आहेत, भाजपकडे चालले आहेत, तर उबाठाचे ९ पैकी ७ खासदार सध्या शिंदे यांच्या संपर्कात आहेत, तर दक्षिणेत तमिळनाडूत डीएमकेने काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यांचा गटही भाजप-एनडीएकडे चालला आहे. उलट अशावेळी उबाठाने आपले संख्याबळ वाढविण्याचा नव्हे तर आहे त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. येथे मात्र संजय राऊत यावर भाष्य करीत नाहीत, तर काँग्रेस पक्षाची वकिली करीत आहेत हे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? एक मात्र निश्चित की, आदित्य ठाकरे संजय राऊतांपासून दूर आहेत. परंतु संजय राऊत यांना सकाळी ९ वाजता मीडियासमोर यायचे असते मग राज्यातील, देशातील नव्हे तर जगाचे विषय असतील त्यावर भाष्य हे संजय राऊतांचे असेल यात वाद नाही.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. शिवसेना उबाठाचे उमेदवार मैदान सोडून पळत आहेत, तर अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मैदान सोडले आहे. १७ जागांपैकी १७ जागा महायुती जिंकेल असे म्हणत असताना महाविकास आघाडीची दाणादाण झाली आहे. म्हणे उमेदवार १५० कोटींना विकत घेतले. शिंदे यांच्यावेळी ५ कोटी-खोक्याचा आरोप होता. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद ४० वरून ५३ वर पोहचली.

सध्या भाजप-काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांचे ध्रुवीकरण सुरू आहे. प्रादेशिक पक्षांची अवस्था कठीण झाली आहे. अशावेळी काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हावे असे प्रस्ताव येत आहेत. शरद पवारांचे काही खरे नाही. परवा झालेल्या राष्ट्रवादी मेळाव्यात त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची स्तुती केली, तर दुसऱ्या बाजूला मोदींच्या परदेशी निर्णयावर त्यांचे स्वागत केले. पवार काल काय बोलतील, आज काय आणि उद्या काय बोलतील याचा नेम राहिला नाही. २०२९ मध्ये ते भाजपबरोबरही जाऊ शकतात.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खर्गे असले तरी ते एक निमित्त मात्र आहेत. काँग्रेस पक्षावर वर्चस्व हे कायम गांधी घराण्याचेच आहे हे नाकारता येणार नाही. ममता बॅनर्जी यांना 'काँग्रेसमध्ये या' अशी ऑफर देताना त्यांना काँग्रेसमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देऊ असे म्हटले आहे. मात्र शरद पवारांना तसे म्हटले नाही. सध्या शरद पवार राष्ट्रवादीची अवस्था ममता दीदींच्या तृणमूलसारखी झाली आहे. मध्यंतरी अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. परंतु प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या राष्ट्रवादीमधील नेत्यांनी हा डाव उधळून लावला. देशात सध्या केंद्र व बहुतेक राज्यात भाजपची सरकारे आहेत. अशावेळी काँग्रेसच्या बुडत्या जहाजात बसण्यासाठी प्रादेशिक पक्ष तयार होतील असे चित्र दिसत नाही. बंगालच्या दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेस ही सैरभैर झाली आहे. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ ही मंडळी तर शरद पवारांचे खंदे समर्थक होते. परंतु ते सर्वजण अजित दादांबरोबर गेले. राष्ट्रवादी हा काँग्रेस विचारात वाढलेला पक्ष असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे असा युक्तिवाद शरद पवारांचे मित्र उबाठाचे प्रवक्ते खा. संजय राऊत हे करत आहेत. जे खासदार, आमदार पवारांबरोबर आहेत ते सरळपणे सत्तेत असलेल्या सुनेत्रा पवारांकडे जाऊ शकतात. सत्ता ही महत्त्वाची असून काँग्रेसकडे जाऊन पुन्हा हात चोळतच बसावे लागणार त्यापेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे नेत्यांचा वेग वाढणार आहे हे निश्चित! सध्याचे वारे हे सत्ताधाऱ्यांकडे असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मध्यंतरी शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. यापूर्वी पालकमंत्री संजय शिरसाट यांना धारेवर धरले. त्यानंतर संजय गायकवाड यांनी सत्तार यांना समर्थन दिले. त्यावर संजय राऊत म्हणाले, ज्यांना शिंदेंबरोबर व भाजपबरोबर जाण्याचा पश्चात्ताप होत असेल तर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धवजींना भेटावे. हेच बोलत असताना यापूर्वीचे वक्तव्य संजय राऊत विसरले. "या गद्दारांना शिवसेनेत यापुढे प्रवेश नाही" पाच कोटी, खोके घेणाऱ्यांना मातोश्रीवर थारा नाही असे म्हणणारी हीच उबाठा आता या बंडखोरांच्या स्वागतासाठी तयार आहे. हे अजब नव्हे का? याचाच अर्थ आता उबाठाची स्थिती गंभीर झाली आहे.

शिवसेना ही कोकणात एक नंबरची होती, परंतु विभाजनानंतर सगळे गड नेस्तनाबूत झाले. विधान परिषदेसाठी उबाठाने बाळ माने यांना उमेदवारी दिली. ते भाजपचे आमदार होते. परंतु शिवसेना भाजपच्या युतीनंतर रत्नागिरीची जागा अखंड शिवसेनेकडे गेल्याने बाळ माने यांचा पत्ता कट झाला होता. नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी जठार यांना विधान परिषदेवर घेतले. ते निष्ठावंत असे कार्यकर्ते शेवटपर्यंत राहिले. मात्र होतकरू असणारे बाळ माने नाइलाजाने उबाठाकडे गेले. ते तेथे गेले होते तरी ते मनाने खूप अस्वस्थ होते हे संजय राऊत यांना माहित नसावे.

सध्या राष्ट्रवादीची(शप) स्थिती सत्तेपासून वंचित आहे. बरेच आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे झुकू लागले आहेत. खासदारांचा एक गटही शिवसेना शिंदे गटाकडे जाऊ इच्छितो. त्याचे मुख्य कारण सत्ता हे आहे. आज उबाठा व राष्ट्रवादी या आमदार-खासदारांची स्थिती सत्ता नसल्याने दारुण आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शप व शिवसेना उबाठा या महाआघाडीतील उमेदवारांनी निवडणुकीतून पळ काढला आहे. अमरावतीसारख्या ठिकाणी तर उमेदवार हा हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहे. तेव्हा संजय राऊत यांनी प्रथम आपल्या पक्षाकडे पाहावे व नंतर इतरांच्या कागाळ्या कराव्यात. एकूण जे सर्वकाही चालले आहे ते पाहता राहिलेली उबाठा शिल्लक राहते की नाही, हा प्रश्न निर्माण होत आहे.

उमेदवारी मिळविण्यासाठी भाजप, शिंदे गटाकडे लाइन लागली होती, तर इकडे महाविकास आघाडीकडे १७ ठिकाणी उमेदवार देण्याच्या घोषणा केल्या. परंतु पहिल्या फेरीतच शिवसेना-भाजप- राष्ट्रवादीचे ६ आमदार बिनविरोध निवडून आले. आता ११ ठिकाणी लढती असल्या तरी तेथेही उमेदवार माघारी गेले आहेत. अमरावतीत काँग्रेसपुढे पर्यायच राहिला नाही. वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी चर्चा सुरू आहे. दरम्यान शिवसेनेने एकत्र यावे यासाठी चर्चा करण्यात आली होती. परंतु शिंदे गटाने ती फेटाळून लावली. पुढे काय झाले, सत्ता नसल्याने शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी (शप) या दोन्ही पक्षांची अस्तित्वाचीच लढाई सुरू झाली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर काय होते हे लवकरच कळेल.

आजपासून शाळांची घंटा वाजणार!

ICC Women's T20 World Cup : भारताचे पाकिस्तानवरील वर्चस्व अबाधित

FIFA World Cup 2026 : ब्राझीलचा सलामीलाच संघर्ष; मोरोक्कोविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान; नेयमारची उणीव जाणवली

Father's Day 2026 : यंदाचा 'फादर्स डे' कसा साजरा कराल? बाबांसाठी 'या' गोष्टी ठरतील खास

आजचे राशिभविष्य, १५ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत