संपादकीय

ग्राहकत्वाशी जोडलेले विज्ञान

ग्राहक म्हणून आपण जी खरेदी करतो ती करताना आपण वैज्ञानिक द्दष्टिकोन बाळगतो का? काय चांगले, काय वाईट हे ठरवताना आपले निकष काय असतात? आणि ते काय असायला हवेत? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपणच ग्राहक म्हणून शोधयला हवीत. २८ फेब्रुवारीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ग्राहकत्वाशी जोडलेले विज्ञान समजून घ्यायला हवे.

नवशक्ती Web Desk

ग्राहक मंच

मंगला गाडगीळ

ग्राहक म्हणून आपण जी खरेदी करतो ती करताना आपण वैज्ञानिक द्दष्टिकोन बाळगतो का? काय चांगले, काय वाईट हे ठरवताना आपले निकष काय असतात? आणि ते काय असायला हवेत? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपणच ग्राहक म्हणून शोधयला हवीत. २८ फेब्रुवारीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ग्राहकत्वाशी जोडलेले विज्ञान समजून घ्यायला हवे.

ग्राहक रोजच बाजारात जाऊन काहीतरी खरेदी करत असतो. एक खेळ म्हणून एक किलो टोमॅटो विकत घेताना टोपलीत टोमॅटो काढतो. प्रत्यक्ष वजन केल्यावर किती अधिक लागले, किती कमी करावे लागले, याकडे कधी लक्ष दिले आहे का? यात नेमके काय विज्ञान आहे? भाजी वजन करून घेतो म्हणजे नेमके काय करतो? ते तोलणे म्हणजेच तुलना करणे असते. एका तागडीत आपली वस्तू आणि दुसरीत ठराविक मापाचे वजन. हे ठराविक वजन कायदेशीर मापनशास्त्रानुसार ठरवले जाते. हे काम सरकारी पातळीवर वैध वजन मापन विभाग सांभाळत असतो. अशा पद्धतीने याच्यामागे भौतिकशास्त्र असते. गंमत म्हणून एक साधा प्रश्न. समजा एक तेल १४० रु. प्रति लिटर आहे आणि दुसरे १४० रु. प्रति किलो आहे, तर कोणते तेल घेण्यात ग्राहकांचा फायदा आहे? वाचकहो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच शोधायचे आहे.

आपल्या घरात आपण विविध वस्तू वापरत असतो. उदा. स्टिलची भांडी, प्रेशर कुकर, मिक्सर, गॅसची शेगडी बरोबर सिलेंडर किंवा अन्य इलेक्ट्रिकल वस्तू. या सर्वांवर आपण ISI मार्क बघून घेतो. यामुळे आपल्याला दर्जा आणि सुरक्षितता यांची हमी मिळत असते. हा मार्क सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी वस्तूला विविध परीक्षांना सामोरे जावे लागते. या परीक्षा आणि त्यात उतरण्यासाठी आवश्यक असलेले गुण भौतिकशास्त्रावर आधारित असतात. साईचे ताक घुसळल्यानंतर लोणी वर तरंगते आणि ताक खाली बसते. लोणी हलके असल्याने म्हणजेच त्याची घनता कमी असल्याने सायीतून वेगळे झाल्यावर ते तरंगते. दुधामध्ये पाणी मिसळलेले असल्यास 'लॅक्टोमीटर' या साध्या उपकरणाने ते सापडू शकते. हे उपकरण दुधाची घनताच मोजते.

डॉक्टर आपल्याला नेहमी सूचना देत असतात की हिरव्या पालेभाज्या, फळे खा. त्यामागे आपल्या जीवशास्त्रामधील शरीरशास्त्राची शाखा आहे. किंबहुना संपूर्ण वैद्यकीय उपचार यामध्येच मोडतात. गेली अनेक शतके आयुर्वेदिक औषधे निरनिराळ्या वनस्पतींपासून बनवली जातात. अर्थात यामागे वनस्पतीशास्त्र असते. सर्दी झाली तर गवती चहा, पोट दुखत असेल तर ओवा, दात दुखत असेल तर लवंग, असे कित्येक स्वयंपाकघरातील पदार्थ आपण औषध म्हणून वापरतो. या शिवाय कित्येक अर्कशाळा निरनिराळ्या जडी-बुटी एकत्र करून काढे किंवा चूर्ण औषध म्हणून तयार करतच असतात. तरी येथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो की या औषधांचे काटेकोरपणे प्रमाणीकरण व्हायला हवे.

आपण पाणी म्हणजे जीवन असे म्हणतो. कारण पाण्याशिवाय कोणताही प्राणी जगू शकत नाही. हे पिण्याचे पाणी शुद्ध असायला हवे. त्यासाठी आपण पाणी शुद्धीकरण यंत्र वापरतो. त्यात गाळणे या साध्या प्रक्रियेबरोबर अल्ट्रा व्हायोलेट किरणे वापरून त्यातील जंतू मारणे, 'रिव्हर्स ऑस्मॉसिस' वापरून त्यात विघळलेले हानिकारक क्षार काढून टाकणे वगैरे प्रक्रिया केल्या जातात. मुंबईतील जनता मात्र या बाबतीत सुदैवी आहे. कारण त्यांना शुद्ध पाणी मिळते. पिण्याचे आणि वापरण्याचे पाणी एकच असल्याने ग्राहकांनी पाणी अत्यंत काळजीपूर्वक वापरले पाहिजे. पॅकबंद पिण्याचे पाणी याच पद्धतीने शुद्ध केले जाते. त्यासाठी आपण किती पैसे मोजतो, त्यावरून आपण जे पाणी वापरतो किंवा वाया घालवतो त्याच्या मूल्याच्या तुलनेत आपण किती पैसे देतो ही विचार करायला लावणारी बाब आहे. तरी एकूणच भारत देश पाण्याच्या बाबतीत सुदैवी आहे. चार महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी आपण वर्षभर वापरतो. त्याच्या जोडीला नद्या, तलाव, विहिरी आहेतच. सिंगापूर सारख्या देशात सांडपाणी शुद्ध करून वापरावे लागते. त्यांना त्याची प्रचंड किंमत मोजावी लागते.

विज्ञानाच्या प्रमुख तीन शाखा. भौतिक, जीव आणि रसायन शास्त्र. आपण वापरतो ती सर्व औषधे ही रसायनशास्त्राची देणगी आहे. इतकी की माणसाचे आयुष्यमान वाढवण्यात याच औषधांचा सिंहाचा वाटा आहे. बेकरीतून आणलेला केक किंवा पाव चार दिवसांत खाण्यालायक राहत नाही. तर पॅकबंद केक तीन महिने टिकतो. यात प्रिझर्वेटिव्ह रसायने घातलेली असतात. ती त्यात जीव जंतू वाढूच देत नाहीत. परिणामी तो टिकतो. जीवजंतूना मारक ठरलेला पदार्थ माणसाने किती प्रमाणात खावा? बाजारातून आणलेले आंबे कधी एकाच रंगाचे किंवा चवीचे नसतात. तरी पॅकबंद फळांचे रस सारख्या रंगाचे आणि चवीचे कसे असतात? त्यांचे प्रमाणीकरण केले जाते, त्यावेळेस त्यात पाणी, साखर, रंग घातले जातात. या बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत. या सर्वांमागे रसायनशास्त्र असते.

महिला वर्ग साडीवरील ब्लाऊझसाठी बहुतेक वेळी 'टू बाय टू' कॉटनचे कापड घेतात. याचा नेमका अर्थ काय? तर दोन धागे एकत्र करून एक धागा बनवला जातो. असा दुहेरी धाग्यांचा वापर ते कापड विणण्यासाठी केला जातो. ‘रेडी टू इट वेफर्स’ ची पिशवी फुगवलेली का असते? कोणी म्हणेल त्यात हवा भरलेली असते. ही हवा आपण नाकाद्वारे आत घेतो ती असते का? तर नाही. तो नायट्रोजन गॅस असतो. नायट्रोजनच का? ऑक्सिजन का नाही? कारण नायट्रोजन 'इनर्ट' वायू आहे. त्याच्यावर सर्वसाधारणपणे कसलाही परिणाम होत नाही. किंबहुना आतील खाद्य पदार्थाला ऑक्सिजनपासून लांब ठेण्यासाठीच या वायूचा उपयोग केला जातो. ऑक्सिजनशी संबंध न आल्यानेच पदार्थ जास्त काळ चांगला राहतो. शिवाय वाहतूक करताना पदार्थाचा भुगा होत नाही हा आणखी एक फायदा.

प्रश्न साधे वाटणारे, वरवरचे वाटतात. पण आता म्हटल्याप्रमाणे का, कसे, कुठे, कधी, किती अशी ‘क’ ची बाराखडी आपल्या मनात उमटली पाहिजे. ‘बाबा वाक्यमं प्रमाणमं’ न मानता, जे आपल्याला सांगितले जाते किंवा आपल्या समोर ठेवले जाते ते डोळे झाकून स्वीकारले जाता कामा नये. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे केवळ विज्ञानातील पदवी किंवा विज्ञानाची माहिती असणे नव्हे. वैज्ञानिक द्दष्टिकोन असणे म्हणजे ग्राहक म्हणून प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिक द्दष्टिने विचार करणे. हे ग्राहकांच्या स्वतःच्याच फायद्याचे असल्याने त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.

मुंबई ग्राहक पंचायत

mgpshikshan@gmail.com

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत