संग्रहित छायाचित्र विजय गोहिल
संपादकीय

मैफिल-ए-इफ्तियार

देशभरामध्ये कबरीचे राजकारण करून राज्यांमध्ये दंगल घडवून आणता येते का? असा प्रयत्न केला गेला. इतके करूनही म्हणावे तसे हिंदू-मुस्लिम विभाजन होताना दिसत नाही. या विभाजनावर ज्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे, ते अस्वस्थ आहेत. अशा राजकीय खेळांपलीकडे जात, अनेक हिंदू-मुस्लिम महिला एकत्र येऊन ‘मैफिल-ए-इफ्तार’ साजरी करतात, उपवास करून सहभोजन करतात आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देतात.

नवशक्ती Web Desk

-भवताल

-ॲड. वर्षा देशपांडे

देशभरामध्ये कबरीचे राजकारण करून राज्यांमध्ये दंगल घडवून आणता येते का? असा प्रयत्न केला गेला. इतके करूनही म्हणावे तसे हिंदू-मुस्लिम विभाजन होताना दिसत नाही. या विभाजनावर ज्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे, ते अस्वस्थ आहेत. अशा राजकीय खेळांपलीकडे जात, अनेक हिंदू-मुस्लिम महिला एकत्र येऊन ‘मैफिल-ए-इफ्तार’ साजरी करतात, उपवास करून सहभोजन करतात आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देतात. महिलांचे हे ऐक्य आणि त्यांच्या संघर्षांच्या कथा समाजाला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे सामाजिक सलोखा राखण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे.

शभरामध्ये कबरीचे राजकारण करून राज्यांमध्ये मुस्लिमांच्या उपवासाच्या काळात दंगल घडवून आणता येते का? असा प्रयत्न केला गेला आणि तसे होत नाही, असे पाहून विदर्भातील नागपुरात जिथे ८० वर्षांत कधीही हिंदू-मुस्लिम दंगल झाली नाही, अशा शहरात दंगल घडवली गेली, असे म्हटले जाते. इतके करूनही म्हणावे तसे हिंदू-मुस्लिम विभाजन राज्यांमध्ये होताना दिसत नाही. या विभाजनावर ज्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे, ते अस्वस्थ आहेत. परंतु या सगळ्यापासून तुलनेने दूर असणाऱ्या छावा सिनेमात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी असणाऱ्या प्रेमापोटी थिएटरमध्ये जाऊन रडून डोळे सुजून परत आलेल्या माझ्या मैत्रिणी तेवढ्याच मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम दोन्हीही समूहातील दरवर्षीप्रमाणे ‘मैफिल-ए-इफ्तार’साठी एक दिवसाचा का होईना उपवास (रोजा) करून एकत्र जमल्या. संध्याकाळी मराठी, हिंदी सुरेल गाण्याच्या मैफिलीत सगळ्यांनी उपवास (रोजा) सोडून आनंदाने सहभोजन केले. एकमेकीला धर्म, जातीपलीकडच्या आपल्या मैत्रीची शपथ दिली आणि ही मैत्री अबाधित ठेवून देश एकसंध ठेवण्याचा निर्णय केला. कोण आहेत त्या मैत्रिणी? आमची एक मुस्लिम मैत्रीण आहे की, तिच्या मुलाने अकरावीत असल्यापासून शेवटच्या वर्षापर्यंत कॉलेजमध्येच जिच्या तो प्रेमात पडला. त्या हिंदू मुलीशी तिच्या इच्छेने इस्लामच्या पद्धतीने लग्न केले आणि लग्नाच्या तब्बल चार महिन्यांनंतर हिंदू आक्रोश मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या घरात घुसून त्याची बायको पळवून नेली. इतकेच नव्हे, तर त्या मोर्चातील कार्यकर्त्यांनी तिला परत हिंदू करून तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवली. या धाडसी मुलीने तिला मुंबईला नेऊन ठेवल्यानंतर पुन्हा ती पळून आली. कोर्टासमोर उभी राहिली आणि माझा हा मुस्लिम पती असून, मी स्वेच्छेने मुस्लिम झाले आहे. माझे त्याच्यावर प्रेम आहे आणि मला माझ्या सासरी आनंदाने नांदायचे आहे, असा जबाब दिला. आज ती गरोदर आहे आणि ही माझी मुस्लिम मैत्रीण आनंदाने तिच्या डोहाळ जेवणाची तयारी करते आहे.

दुसरी माझी मुस्लिम मैत्रीण जी तुळजापूरची आहे. तुळजाभवानीचे नऊ दिवस नवरात्र ठेवते. सवाष्ण म्हणून त्या अर्थाने हिंदू, मुस्लिम पलीकडच्या माझ्यासारख्या धर्मश्रद्धा नसणाऱ्या महिलेला जेवायला बोलवते. तिचा मुलगा गणपतीत आणि नवरात्रात अतिशय उत्तम ताशा वाजवतो. आठवी इयत्तेत शिकत होता. त्यावेळेला त्याचे इन्स्टा अकाऊंट हॅक करून हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. त्याच्या वडिलांनाही जेलमध्ये पाठवले आणि ते सगळे प्रकरण अकाऊंट कसे हॅक झाले आहे, हे पोलीस अधीक्षकांच्या लक्षात आणून देऊन त्या मुलाला पुन्हा जेलमधून बाहेर काढून शाळेत पाठवून समुपदेशन करून इतर मुलांप्रमाणेच त्याला त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल, असा प्रयत्न संघटनेने केला. तिसरी माझी मैत्रीण जी गेल्या १२ वर्षांपासून या कार्यक्रमात सहभागी होते. जिने स्वतः रामोशी समाजातील असूनही १२५ वेळा हातभट्ट्या तोडल्या आणि महाराष्ट्रातले पहिले देशी दारूचे दुकान महिला मतदानाने बंद करून आपल्या गावाला दारूमुक्त केले. ती माझी मैत्रीण उपवास ठेवून या मैत्रिणींसोबत इफ्तारमध्ये सहभागी असते. चौथी मुस्लिम मैत्रीण जी कारखान्यात कामाला जाते. जी स्वतः एचआयव्ही बाधित आहे. फसवून लग्न केल्यामुळे नवऱ्यामुळे एचआयव्ही बाधित झालेली, नवरा मरून गेला आणि आज ही माझी मैत्रीण विधवा आहे. परंतु आईचा संसार स्वतःचा असल्याप्रमाणे अतिशय कष्टाने घरातल्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे सगळ्यांचा सांभाळ करते. दोनशेहून अधिक धर्मजातीपलीकडच्या मैत्रिणी उपवास ठेवून एकत्र जमल्या. आम्ही महिला आमच्या उदरामध्ये रुजलेले बीज आमच्या अन्नाचं रक्त करून नाळेवाटे त्या लेकराला देतो. मरणाची कळ असते तशी जन्माची वेदना देतो आणि माणूस जन्माला घालतो. ही पुरुषसत्ताक, जातीवादी आणि धर्मांध व्यवस्था त्या लेकराला येऊन बापाचे नाव लावते. बापाची नको असलेली जात चिकटवते आणि अतिशय गंभीर असा धर्मही त्याला स्वीकारायला भाग पडते. हेही पुरुषसत्ताक व्यवस्थेचे आम्ही स्त्रियांनी सहन केले असते. परंतु त्याच जातीच्या, धर्माच्या नावाने येथे राजकारण केले जाते. आम्ही आमचा शारीरिक तोटा करून जन्माला घातलेली आमची लेकरे आणि आमच्या घरातले पुरुष यांना आपल्या राजकारणाचा बळी केले जाते आणि तीनशे वर्षांपूर्वी ज्या औरंगजेबाला दिल्लीला परत जाता आले नव्हते, ज्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडून घ्यावे लागले होते, मरण पत्करावे लागले होते, त्याची निशाणी असणारी कबर उखडण्याची भाषा केली जाते. त्यापैकी हिंदू- मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न होतो. ही गोष्ट आम्ही स्त्रिया सहन करणार नाही. पोटाला चिमटे काढून अतिशय कष्टातून लेकरे शिकवली आहेत. परंतु आज बेकारीचा खूप मोठा प्रश्न आहे. नोकरी कामधंद्याचा प्रश्न आमच्या पुढच्या पिढीसमोर उभा आहे. महागाईमुळे आम्ही बेजार आहोत. कष्ट करूनही मिळवलेले पैसे घरगृहस्थीला पुरेसे पडत नाहीत. अशा काळामध्ये धर्म, जातीवरून कोणी राजकारण करत असेल, तर ते आम्ही स्त्रियांनी खपवून घेता कामा नये. त्यासाठीच गेल्या १२ वर्षांपासून आम्ही सुरू केलेली ही नवीन परंपरा आणि हा उत्सव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हा फक्त धार्मिक उत्सव नाही, तर हा सर्वधर्मसमभाव आणि स्त्री-पुरुष समतेचा विचार मांडणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्र धर्माचा सांस्कृतिक ठेवा आहे, अशी आमची भावना आहे. पुरुषीप्रवृत्तीने जातीअंध, धर्मांध राजकारणात मोठ्या प्रमाणावर बळी पडताना त्यातही शिक्षण घेऊन बेकार झालेले, नोकरी मिळत नसलेले, नैराश्याने ग्रासलेले आमच्या घरातील तरुण. त्यांच्या झुंडी बनवल्या जात आहेत आणि त्यांचा वापर यांच्या राजकारणासाठी होतो. तो एक आई म्हणून, एक बहीण म्हणून आपल्याला वेळीच रोखला पाहिजे याचं भान बचत गट, महिला मंडळातील स्त्रियांना ठेवण्याची गरज आहे. फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी नव्हे तर गावागावात या पद्धतीची हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीची मैफिल जमली पाहिजे, अशी चर्चा यावेळी मैत्रिणींनी केली. वैयक्तिक आयुष्यामध्ये काहीही चूक नसताना देखील हिंदू-मुस्लिम दुभाजनाच्या राजकारणाचा फटका बसलेल्या अनेक माझ्या हिंदू-मुस्लिम मैत्रिणी या कार्यक्रमात सहभागी होऊन ऊर्जा देतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष इतरांबरोबर मोकळेपणाने बोलतात ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले त्याप्रमाणे अहिंसेची लढाई इतर कोणाहीपेक्षा कणखरपणे जिद्दीने स्त्रियाच अधिक सक्रिय होऊन पुढे नेऊ शकतात. म्हणूनच आत्ताच्या या हिंसक राजकारणाला आपल्या अहिंसेच्या, सत्याग्रही लढाई बाण्याने स्त्रियाच उत्तर देतील यात शंका नाही.

केवळ लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपयांची तथाकथित भाऊबीज देऊन महाराष्ट्र धर्माचे पालन करणाऱ्या सावित्रीच्या लेकींना बावळट समजण्याचा मूर्खपणा इथल्या राजकारण्यांनी करू नये. हाच संदेश आनंदाने ईद साजरी करणाऱ्या हिंदू-मुस्लिम मैत्रिणींनी दिला आहे. शिवाजी महाराजांचे स्वराज संपवण्याचा विचार करणाऱ्या, बुद्धिमान संभाजी राजांना कपट करून मारणाऱ्या, ज्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही, त्याला इथल्या मातीत गाडून घ्यावे लागले, त्या औरंगजेबाची कबर या सगळ्याची साक्ष आहे. त्या ठिकाणी जाऊन येणाऱ्या प्रत्येक तरुणाला आणि महाराष्ट्रीयन माणसाला आपल्या राजाबरोबर आणि राज्य संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना इथे गाडून घ्यावे लागते याची जाणीव आणि ऊर्जा तिथून मिळत असते, याचे भान सुटलेल्या राज्यकारण्यांना वेळीच शुद्धीवर आणण्याची गरज आहे. हेच यावेळी महिलांनी व्यक्त केले. हा सांस्कृतिक दहशतवाद संपवण्यासाठी पर्यायी सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमच आम्हाला करावे लागतील आणि ते स्त्रियाच अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. चित्रकार, कलाकार, नाटककार, विनोदाच्या माध्यमातून स्टँडअप कॉमेडी करणारे या सगळ्यावर उतारा ठरतील, यात शंका नाही.

- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानच्या संस्थापक

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास