दृष्टिक्षेप
उत्तम जोगदंड
समाजाला ‘स्टॉकहोम सिंड्रोम’मधून बाहेर काढले पाहिजे, अन्यथा यातून देशाचे, जनतेचे जे नुकसान होणार आहे त्याबद्दल आपल्या पुढील पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत.
‘स्टॉकहोम सिंड्रोम’ ही एक अशी मानसिक स्थिती आहे, जेव्हा ओलीस ठेवली गेलेली, छळलेली व्यक्ती तिच्या अपहरणकर्त्या व्यक्तीबद्दल विश्वास, निष्ठा किंवा आपुलकी विकसित करते. १९७३ साली स्टॉकहोम शहरातील एका बँकेवर पडलेल्या दरोड्याच्या वेळी दरोडेखोरांनी ज्या चार बँक कर्मचाऱ्यांना सहा दिवस ओलीस ठेवले होते त्यांच्या बदललेल्या मानसिक स्थितीचा अभ्यास करून ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ ही संकल्पना स्वीडिश मानसोपचार तज्ज्ञ आणि गुन्हेशास्त्रज्ञ निल्स बेजेरोट (Nils Bejerot) यांनी मांडली. या बदलाच्या परिणामी, दरोडा-नाट्य संपल्यावर ओलीस ठेवलेल्या बँक कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांविरुद्ध साक्ष देण्यास चक्क नकार दिला. एवढेच नाही, तर एका कर्मचाऱ्याने दरोडेखोरांची बाजू न्यायालयात मांडता यावी यासाठी निधी देखील उभारला होता. अपहरण प्रकरणातील काही अपहृत व्यक्ती ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ग्रस्त होऊ शकतात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील विशाल जनसमुदाय ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ग्रस्त झालाय की काय अशी शंका येते. यावर एक दृष्टिक्षेप टाकणे उद्बोधक ठरेल.
‘स्टॉकहोम सिंड्रोम’ अजून ठळकपणे समजून घेण्यासाठी जगभर गाजलेल्या ‘मनी हाइस्ट’ या बँक दरोड्याचे कथानक असलेल्या मालिकेतील मोनिका या ओलीस ठेवलेल्या बँक कर्मचारी पात्राचे उदाहरण योग्य ठरेल. तिच्याबाबत सहानुभूती दर्शविणाऱ्या डेन्व्हर नावाच्या एका दरोडेखोराच्या प्रेमात ती एवढी पडते की पुढे त्या टोळीत सामील होऊन ‘स्टॉकहोम’ हे नाव धारण करते. कोणत्याही अपहरणकांडात ओलीस ठेवलेल्या लोकांवर अपहरणकर्त्यांची प्रचंड दहशत असते. त्यांनी ओलिसांना खायला-प्यायला दिले, थोडीशी सहानुभूती दाखवली तरी ओलिसांना ती कृती दयाळूपणाची वाटते. ओलिसांना वाटू लागते की आता हेच आपले तारणहार आहेत. मग, अपहरणकर्त्यांची बाजू अयोग्य, बेकायदेशीर असली तरी ओलीस ठेवलेल्यांना ती न्याय्य वाटू लागते. त्यांच्या तावडीतून सुटून पळून जायची संधी मिळाली तरी ते पळून जात नाहीत. तसेच त्यांच्या तावडीतून सोडवणाऱ्या सुरक्षा यंत्रणा त्यांना शत्रू वाटू लागतात. त्यांना असे वाटणे हे त्यांच्या ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ग्रस्त होण्याचे लक्षण असते. मग अपहरणकर्त्यांनी केलेली गुन्हेगारी कृत्ये सुद्धा त्यांना न्याय्य वाटू लागतात.
भारतीय समाजातील काही कुटुंबांमध्ये या ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ची अनेक उदाहरणे आढळून येतात. आपल्या पतीने केलेला भयानक कौटुंबिक हिंसाचार सहन करून पत्नी ‘भला है, बुरा है, जैसा भी है...’ या भावनेने त्या पतीची सेवा करत आपले आयुष्य रेटत राहते. कारण संस्कार, परंपरा, सामाजिक दडपण, परावलंबित्व यामुळे तिची मानसिक अवस्था ओलीस ठेवलेल्या व्यक्तीसारखी झालेली असते. यातून आता सुटका नाही अशी तिची खात्री झालेली असते. ती नवऱ्याशी जुळवून घेते. नवऱ्यावर कसलेही संकट आल्यास त्याला वाचवण्यासाठी ती प्राणपणाने प्रयत्न करते. तिला यातून बाहेर पडण्याची संधी आली तरी त्या संधीचा ती लाभ घेत नाही. शिक्षणामुळे, स्वतःच्या हक्कांची जाणीव झाल्यामुळे हे प्रकार कमी झाले असले तरी अशिक्षित, गरीब कुटुंबांमध्ये अशा अनेक ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ग्रस्त महिला आजही आढळून येतात.
आपल्या देशातल्या राजकारणात गेल्या एक-दीड दशकात धार्मिक कट्टरतेने प्रवेश केल्यापासून धर्मांध पक्ष-संस्था-संघटनांनी विविध माध्यमांमधून गोबेल्स तंत्राने दुष्प्रचार करून बहुसंख्यांक धर्मीयांवर आपला धर्म नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अशी जबरदस्त भीती घातली आहे. आपला धर्म नष्ट करण्यासाठी अन्य अल्पसंख्यांक धर्म जोरदार प्रयत्न करीत असल्याचा दावा करून त्यांच्याविरुद्ध एवढ्या प्रभावीपणे दुष्प्रचार करण्यात येत आहे की बहुसंख्यांक समाजात अल्पसंख्यांक धर्मांच्या लोकांविषयी प्रचंड भीती, घृणा आणि क्रोध निर्माण झाला आहे. आम्हीच तुमचे तारणहार आहोत असा दावाही हे धर्मांध करतात. हा दावा पटवून देण्यात ते एवढे यशस्वी झाले आहेत की बहुसंख्यांक समाजाला त्यांच्या कारवाया अयोग्य असल्या, बेकायदेशीर असल्या तरी न्याय्य वाटू लागल्या आहेत. हे लक्षण तर हा समाज ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ग्रस्त झाल्याचे दर्शक आहे.
‘स्टॉकहोम सिंड्रोम’ग्रस्त झालेल्या या समाजाला मग अल्पसंख्यांकांचे मॉब लिंचिंग योग्य वाटते, ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्यांच्या मुलांचा जिवंत जाळून केलेला खून न्याय्य वाटतो. अन्य धर्मीय महिलांवरील बलात्कारासारखे अत्याचारांचे गुन्हे आवश्यक वाटतात. अल्पसंख्यांक समुदायांवर टाकलेले सार्वत्रिक बहिष्कार योग्य वाटतात. त्यांच्या प्रार्थनास्थळासमोर धुडगूस घालणे धार्मिक परम कर्तव्य वाटते. त्यांच्या घरांवर, प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवणे धर्मरक्षणाचे कार्य वाटते. ही सारी कृत्ये संवैधानिक मूल्यांना पायदळी तुडवणारी, देशाच्या ऐक्याला आणि एकात्मतेला छेद देणारी आणि अमानवी असली तरीही ती योग्यच आणि आवश्यक वाटतात आणि हे सारे करणारी शासन यंत्रणा आणि ती चालवणारे लोक आपले तारणहार वाटतात. देशाच्या कायद्यापेक्षा, देशापेक्षा मोठे वाटतात.
या ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ने एवढी भयानक पातळी गाठलेली आहे की या समाजाला स्वतःचे हित-अहितही कळत नाही. देशासमोर उभे ठाकलेले आणि त्यांना प्रभावित करणारे महागाई, बेरोजगारी, आरोग्य सेवा, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते इत्यादी जीवनावश्यक प्रश्नही दुय्यम किंवा अनावश्यक वाटत आहेत. देशाच्या सुरक्षेतली गफलत असो की देशाची ढासळती अर्थव्यवस्था, याबद्दल या लोकांना काहीही देणेघेणे नसते. एवढेच नाही, तर आपले मूलभूत अधिकार चिरडले जाताहेत याची जाणीवही त्यांना राहिलेली नाही. ‘ते काहीही असो, अन्य अल्पसंख्यांक लोकांचे नाक ठेचले जात आहे ना’, याचाच काल्पनिक आनंद त्यांना मोठा वाटतो. या प्रश्नांवर कोणी लक्ष वेधल्यास आणि आंदोलन केल्यास त्याला शत्रू, देशद्रोही मानण्यापर्यंत या ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ग्रस्त लोकांची मजल जाते. कारण मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधणे हा प्रकार त्यांना आपल्या ‘तारणहारा’विरोधातील अपराध वाटतो.
अशा परिस्थितीत अल्पसंख्यांक तरी मागे का राहतील. त्यांची लोकसंख्या अत्यल्प म्हणून त्यांच्या अस्तित्वाला मोठा धोका. मग त्यांचा धर्म देखील खतरे में है असा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. बहुसंख्यांकांची सर्व कृत्ये त्यांच्या दाव्यास पुष्टीच देतात. मग त्यांच्यातही त्यांच्या धर्मांचे तारणहार निर्माण होत आहेत. त्यांचेही लक्ष मूलभूत प्रश्नांवरून वळवले जात आहे. कारण धर्मरक्षणापुढे ते प्रश्न फिके पडत आहेत.
देशात लोकसंख्येने ८० टक्के असलेले, स्वातंत्र्यापासून सत्तेत असलेले, सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात असलेले हे बहुसंख्यांक लोक केवळ १५ टक्के अल्पसंख्यांक धर्मीयांविषयी एवढी भीती बाळगतात असे उदाहरण जगात कोठेही आढळणार नाही. अगदी इथले बहुसंख्यांक लोक जेव्हा अन्य देशांचे अल्पसंख्यांक रहिवासी बनतात तेव्हा त्या सर्व देशांमध्ये त्यांचा धर्म सुरक्षित असतो. सर्व अधिकार ते उपभोगतात. अगदी त्या देशातले बहुसंख्यांक लोक भारतातील अल्पसंख्यांकांच्या धर्माचे असले तरीही. आखातातील इस्लामी देश असोत किंवा पश्चिमेकडील ख्रिश्चनबहुल देश असोत, तिथे या लोकांच्या धर्माला कसलाही धोका नसतो.
हा प्रकार जातींमध्ये देखील झिरपलेला दिसत आहे. आपल्या जातीचे लोक धोक्यात आहेत. अन्य जातींकडून आपल्या जातीला धोका आहे, म्हणून कोणीतरी जातीचा कैवार घेतो. उदा. राजस्थानातली करणी सेना, बिहारमधील रणवीर सेना, इत्यादी. या सेना आपल्या जातीच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात हिंसाचार करायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या जातीतले नेमस्त लोक त्यांना विरोध करायला धजावत नसल्याने त्यांच्या मागे फरफटत जातात. कारण ते ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ग्रस्त असतात.
आपल्या देशातल्या या ‘स्टॉकहोम सिंड्रोम’चे देशाला भोगावे लागत असलेले परिणाम भयावह आहेत. सर्वात मोठा परिणाम म्हणजे भारतीय जनमानस, धर्म आणि जातींच्या आधारावर विभागले आहे. एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. आपल्या तारणहाराने केलेली हिंसक कृत्ये, विशेषतः महिलांवरील अत्याचार ही सामान्य बाब मानली गेल्याने आणि हिंसाचारास हिंसाचाराने उत्तर मिळण्याची शक्यता असल्याने देशासमोर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे.
देशाला यापासून वाचवायचे असेल तर धर्मांध प्रवृत्तींनी आपल्या राजकीय उद्दिष्टांपेक्षा देशाचे हित महत्त्वाचे मानून दुभंगलेली मने साधण्यासाठी व्यापक प्रयत्न केले पाहिजेत. समाजाला ‘स्टॉकहोम सिंड्रोम’मधून बाहेर काढले पाहिजे. अन्यथा यातून देशाचे, जनतेचे जे नुकसान होणार आहे त्याबद्दल आपल्या पुढील पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत.
uttamjogdand@gmail.com