संपादकीय

तैवान भेटीवरुन तणाव

तैवान भेटीवरून संतप्त झालेल्या चीनने तैवान सभोवतीच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी कवायती करण्याचा निर्णय घेतला

वृत्तसंस्था

अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तैवान हा आपलाच भाग असल्याचा चीनचा दावा आहे. त्यामुळे नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीस चीनने आक्षेप घेतला होता. पण चीनच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून पेलोसी या तैवानच्या दौऱ्यावर गेल्या. या भेटीचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा चीनने दिला आहे. पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून संतप्त झालेल्या चीनने तैवान सभोवतीच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी कवायती करण्याचा निर्णय घेतला. तैवानच्या सव्वा दोन कोटी नागरिकांसमवेत अमेरिकेची एकजूट असून लोकशाही आणि एकाधिकारशाही यातून एकाची निवड करण्याच्या काळात हे महत्वाचे आहे, असे नॅन्सी पेलोसी यांनी आपल्या तैवान दौऱ्याच्या निमित्ताने म्हटले आहे. तैवानला येणे लोकशाहीसाठीच्या आमच्या कटिबध्दतेचे निदर्शक आहे, असे ट्विटही नॅन्सी पेलोसी यांनी केले आहे. चीनमध्ये १९४९ मध्ये झालेल्या यादवीनंतर तैवान आणि चीन विभक्त झाले. चीनच्या मुख्य भूमीवर चिनी साम्यवादी पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले. तर तैवानमध्ये राष्ट्रवादी सरकार अस्तित्वात आले. दोन्ही सरकारांकडून चीनच्या सर्व भूप्रदेशांवर हक्क सांगितला जात होता. पुढे जागतिक राजकारणात साम्यवादी चीनचा वाढत असलेल्या प्रभाव लक्षात घेऊन अमेरिकेने १९७९मध्ये तैपेईच्या ऐवजी बीजिंगला राजनैतिक मान्यता दिली. पण त्याचवेळी तैवानशीही आपले औपचारिक संबंध कायम ठेवले. पण अमेरिकेकडून तैवानची केली जाणारी पाठराखण चीनला खुपत आली आहे. त्यातूनच नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीसंदर्भात चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘एक चीन’ला पाठिंबा देण्याच्या धोरणामध्ये अमेरिकेने काही बदल केला नसल्याचे जो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. पण त्याचवेळी ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न झाल्यास त्यास अमेरिकेचा तीव्र विरोध असेल, असेही बायडेन यांनी बजाविले होते. तैवानमध्ये लोकशाही असून त्या व्यवस्थेस अमेरिकेचा आशीर्वाद आहे, हे यापूर्वीच्या अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे. तैवानची अर्थव्यवस्था ही जगातील २५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. अमेरिका आणि तैवान यांची व्यापारात मोठ्या प्रमाणात भागीदारीही आहे. तैवानमधील लोकशाहीच्या मागे अमेरिका ठामपणे उभी असल्याचे आणि अमेरिकेने तैवानला वाऱ्यावर सोडले नसल्याचे नॅन्सी पेलोसी यांनी म्हटले आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये प्रथमच एक अमेरिकी उच्चपदस्थ व्यक्ती तैवानला भेट देत आहे. पेलोसी यांना तैवानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पेलोसी यांच्या या दौऱ्याच्यावेळी त्यांच्या समर्थकांनी स्वागत केले तर विरोधकांनी निदर्शने केली. पेलोसी यांना मलेशियामधून तैपेई येथे येण्यास सात तास लागले. त्यांच्या या विमान प्रवासाचा मागोवा मोठ्या प्रमाणात घेतला गेला. पेलोसी यांच्या तैवान भेटीचा उत्तर कोरिया, रशिया यांनी निषेध केला. नॅन्सी पेलोसी या सदैव मानवी हक्कांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या आहेत. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या बाजूने त्या उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल चीनला राग असणे स्वाभाविकच आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून चीनने तीव्र नाराजी व्यक्त करून याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला असतानाही पेलोसी यांनी हा दौरा केला आहे. त्यामुळे तीळपापड झालेल्या चीनने तैवानच्या समुद्रधुनीमध्ये आणि आजूबाजूच्या क्षेत्रात लष्करी कवायती करून आपले श्रेष्ठत्व दाखवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जग आधीच संकटात सापडले आहे. त्याच दरम्यान तैवानवरून अमेरिका आणि चीन यांच्या संघर्षाची ठिणगी पडणे जागतिक शांततेचा विचार करता अत्यंत धोक्याचे आहे. अमेरिकेचे तैवानप्रमाणे चीनसमवेतही मोठ्या प्रमाणात व्यापारी संबंध आहेत. ते पाहता चीनकडून कोणतेही टोकाचे पाऊल उचलले जाणार नाही. तैवान हा आपल्या देशाचाच सार्वभौम भाग आहे हे अमेरिकेसह जगाच्या लक्षात आणून देण्यासाठी चीन दबाबतंत्राचा वापर करीत आहे हे स्पष्ट आहे. चीनने आगीशी खेळू नका, असा इशारा दिला असला आणि चीन बघ्याची भूमिका घेणार नाही, असे म्हटले असले तरी पेलोसी यांच्या दौऱ्यानंतर हा तणाव काही प्रमाणात निवळेल, अशी अपेक्षा करावयास हरकत नाही!

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी