संपादकीय

रे क्षणांच्या संगतीने मी असा भारावलो...

सुमन कल्याणपूर यांची एका मुलाखतीच्या निमित्ताने भेट झाली. खार येथील त्यांच्या घरी जेव्हा ही भेट झाली तेव्हा त्यांच्या राजघराण्यात शोभावे अशा रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने मी प्रभावित झालो. त्यानंतर सुरू झाली शब्द, संगीत आणि सूर यांची मैफिल.

नवशक्ती Web Desk

विशेष

डॉ. विजय चोरमारे

सुमन कल्याणपूर यांची एका मुलाखतीच्या निमित्ताने भेट झाली. खार येथील त्यांच्या घरी जेव्हा ही भेट झाली तेव्हा त्यांच्या राजघराण्यात शोभावे अशा रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने मी प्रभावित झालो. त्यानंतर सुरू झाली शब्द, संगीत आणि सूर यांची मैफिल.

अरे संसार संसार, उतरली सांज ही धरेवरी, हले हा नंदाघरी पाळणा, मृदुल करांनी छेडित तारा, जिथे सागरा धरणी मिळते, केशवा माधवा, केतकीच्या बनी तिथे, घाल घाल पिंगा वाऱ्या... यांसारखी गाणी नुसती आठवली तरी सहज ओठावर येतात. आपण गुणगुणायला लागतो. एकेका गाण्यासोबत एक वेगळीच स्मरणयात्रा सुरू होते. पन्नाशीच्या पुढं, साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेकांना कळत्या वयात आपलं भावविश्व समृद्ध करणारी ही गाणी भूतकाळात घेऊन जातात. बहुतांश रेडिओवर ऐकलेली ही गाणी लोकगीतांप्रमाणं लोकप्रिय झाली. ही गाणी गायलीत सुमन कल्याणपूर यांनी. रेडिओ होता तेव्हा श्रेयनामावलीतून त्यांचं नाव कानावर यायचं. रेडिओचं प्रस्थ कमी झालं आणि श्रेयनामावली जाऊन नुसती गाणीच उरली. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर यांच्या चलतीच्या काळात सुमनताईंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

साधारणपणे १९५४ ते १९८४ असा तीन दशकांचा काळ गाजवणाऱ्या सुमनताईंनी वयाच्या ८९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सुमनताईंनी गाणं थांबवून चाळीस वर्षे झाली होती. मात्र त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत आणि त्या गाण्यांसोबत त्यांच्या आठवणीही रसिकांसोबत होत्या. चाळीस वर्षांपूर्वी त्यांचं गाणं थांबलं होतं. आता त्यांचा जीवनप्रवास थांबला. त्यांची गाणी मात्र पुढच्या अनेक पिढ्यांचं भावविश्व समृद्ध करीत राहतील.

अशा या महान गायिकेला भेटण्याचा योग एका मुलाखतीच्या निमित्तानं आला. संगीतकार दशरथ पुजारी यांचं निधन १३ एप्रिल २००८ रोजी झालं. दशरथ पुजारी यांची अनेक गाणी सुमनताईंनी गायली आहेत. ती लोकप्रियही आहेत. सुमनताईंकडून दशरथ पुजारी यांच्यासंदर्भातील आठवणीवजा लेख हवा होता. त्यानिमित्त त्यांना भेटण्याचा योग आला. अठरा वर्षे उलटून गेली या घटनेला. त्यावेळी ना स्मार्टफोन होते, ना रेकॉर्डिंगची सवय. मुलाखतीची साधनं असली तरी पत्रकार कागदावरच मुद्दे उतरून घ्यायचे. माझंही काही वेगळं नव्हतं.

फोनवरून संपर्क साधल्यावर हो-नाही करत त्यांनी दुसऱ्या दिवशीची वेळ दिली. खारचा पत्ता दिला. दिलेल्या वेळी पत्त्यावर पोहोचलो. फ्लॅटची बेल वाजवली. कुणीतरी दरवाजा उघडला. मी एका लॅव्हिश अपार्टमेंटमध्ये पोहोचलो होतो. जाऊन बसलो. पाणी आलं. काही मिनिटांतच सुमनताई आल्या. एखाद्या राजघराण्यात शोभावं असं रुबाबदार व्यक्तिमत्त्व. सत्तरीतलं खानदानी सौंदर्य. वात्सल्यमूर्ती. मंद हसल्या. मी उठून नमस्कार केला. एका खुर्चीवर मी बसलोय. समोर टीपॉय आहे आणि समोरच्या खुर्चीवर सुमनताई. त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्यातून काळ उलगडत होता. तो काळ होता एचएमव्हीचा. १९५५-५६ चा सुमार असावा. मराठी भावसंगीताला बहराचा काळ होता. एचएमव्हीकडंच सगळी कामं व्हायची. एका रेकॉर्डवर दोनच गाणी असायची. एका आर्टिस्टला एका वर्षात दोनच गाणी करता यायची. एचएमव्हीच्या जी. एन. जोशी यांनी दशरथ पुजारींची सुमनताईंशी ओळख करून दिली आणि सांगितलं, यांची गाणी ऐका. आवडतात का बघा. पहिलं गाणं होतं, ‘सावळ्या विठ्ठला’ आणि दुसरं ‘नंदाघरी नंदनवन फुलले’.

धार्मिक वृत्तीच्या सुमनताईंनी विठ्ठलाचं गाणं म्हणून ‘सावळ्या विठ्ठला’ पहिल्यांदा निवडलं. दोन्ही गाणी रेकॉर्डिंग झाली. या गाण्यांचं यश हे दशरथ पुजारी यांच्या संगीताचं असल्याचं त्यांनी त्यावेळी कृतज्ञतापूर्वक सांगितलं होतं. पहिली दोन्ही गाणी लोकप्रिय झाल्यामुळं पुढच्या वर्षी सुमनताईंनी पुजारींचीच गाणी निवडली. यावेळी त्यांना चार गाणी ऐकवली. त्यातली दोन गाणी निवडली आणि उरलेली दोन गाणी पुढच्या वर्षीसाठी ठेवली. दशरथ पुजारी यांच्या आठवणी सांगताना सुमनताई हळूहळू त्या जुन्या काळात हरवत गेल्या. आठवणींना उजाळा देता देताच दशरथ पुजारींच्या गाण्यांची एक मैफल आकाराला आली.

महान गायिका सुमनताई कल्याणकर बोलताहेत. गाणे आठवले की ते गाताहेत आणि समोर मी एकटा श्रोता. झिमझिम झरती श्रावणधारा (रिमझिम नव्हे) या गाण्याची आठवण त्या सांगू लागल्या. त्या काळात रेकॉर्डिंगच्या वेळी स्टुडिओच्या सगळ्या खिडक्या-दारे बंद करायचेत. त्यावर्षी मुंबईत जून संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. प्रचंड उकाडा जाणवत होता. झिमझिम झरती श्रावणधारा या गाण्याचं रेकॉर्डिंग संपलं. स्टुडिओच्या खिडक्या उघडल्या. दशरथ पुजारी वारा घ्यायला खिडकीजवळ गेले तर काय आश्चर्य, बाहेर पाऊस सुरू झाला होता. उपस्थित सगळे सरसरून शहारले. तिथं असलेल्या साथीदारांपैकी एक होते हरिप्रसाद चौरासिया. ते म्हणाले, बघा तुमच्या गाण्यात किती ताकद आहे. गाणं पुरं झालं आणि पाऊस सुरू झाला. ते गाणं आजही मराठी रसिकांना चिंब अनुभव देतं.

सुमनताई गाऊ लागतात, झिमझिम झरती श्रावणधारा. बाहेर रणरणतं ऊन आणि मी सुमनताईंच्या स्वरांमध्ये चिंब. आठवणींना उजाळा देता देताच काही छान जमलेल्या गाण्यांविषयी त्या सांगत. तुम्हाला ते गाणं आठवतंय का - मृदुल करांनी छेडित तारा... असं म्हणून त्या लगेच ते गाणं गायला लागत. कवीचे शब्द वाचून संगीतकाराला चाल सुचली पाहिजे. शब्द साधे आणि चाल चांगली असेल तर त्याचं स्वरूपच बदलून जातं. हे सांगताना त्या गायला लागतात- 'नकळत सारे घडले मी वळता पाऊल पडले...'

आणखी एका गाण्याचं वैशिष्ट्य त्यांना विशेष भावलेलं- 'प्रीतसागरी तुझ्या स्मृतीचे गर्जत आले वारे वादळ वारे' शब्द साधेच आहेत. प्रीतीचा सागर आहे. आठवणींचे वादळ वारे आहेत आणि ते गर्जत आले आहेत आणि हे गाणं एक गायिका गाणार आहे. तिचा नाजूक आवाज या सगळ्याचं भान आवश्यक होतं. इथं एखाद्या संगीतकाराला खूप काही कारागिरी करता आली असती. पण दशरथ पुजारी कसल्याही कारागिरीच्या मोहात पडले नाहीत. त्यांनी शब्दांना अशी काही चाल लावली की बस्स... सुमनताई दशरथ पुजारी यांचं वैशिष्ट्य सांगता सांगताच ते गाणं गाऊ लागतात. त्या एकेका गाण्यात शिरू लागल्या. चालींसह. दशरथ पुजारींनी बांधलेल्या सुरावटींसह ती गाणी त्यांच्या ओठांवर यायला लागली.

‘देव माझा विठू सावळा’, ‘हे नयन बोलले काहीतरी’, ‘आकाश पांघरूनि जग शांत झोपलेले’, ‘या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, आईस देव माना, वंदा गुरुजनांना, जगी भावनेहूनी त्या कर्तव्य थोर जाणा.’ या गाण्यांच्या चालींची वैशिष्ट्ये त्यांनी उलगडून दाखवली. या सगळ्या गाण्यांचे मुखडे, काहींची कडवी गाऊन दाखवली. सुमारे दीडेक तासांची ही मैफल होती. त्या गात होत्या तेव्हा राहून राहून वाटत होतं, यांनी गाणं का थांबवलं असेल? रे क्षणांच्या संगतीने मी अशी भारावले, हे सुमनताईंनी गायिलेलं गीत अजरामर आहे. माझी अवस्था अगदी तशीच झाली होती. एका महान गायिकेच्या मैफिलीचा मानकरी फक्त आणि फक्त मी एकटाच होतो.

सुमनताई गेल्याच्या बातमीनं अठरा वर्षांपूर्वीच्या या मैफलीची झिमझिम मनात अखंडपणे सुरू झाली.

(लेखक ज्येेष्ठ पत्रकार आहेत.)

जून महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, २ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Environment Day 2026 : फक्त पर्यावरणच नाही! झाडं लावल्याने आरोग्यालाही होतो फायदा

हिमोग्लोबिन कमी आहे? रोज या ८ पदार्थांचा आहारात करा समावेश; रक्त वाढण्यास होईल मदत

मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट; ट्राय करा मिक्स फ्रूट लस्सी