विशेष
द्रौपदी मुर्मू
आपल्या ध्येयासाठी वाहून घेतलेल्या आणि अतिशय प्रामाणिक असलेल्या शिक्षकांचा नेहमीच सर्वोच्च आदर करा. अशा प्रकारच्या ध्येयनिष्ठ शिक्षकांच्या योगदानामुळे भारत शिकत राहील आणि जगाचे नेतृत्व करत राहील.
शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य साकारत असतात. या शिक्षक दिनानिमित्त सर्व भारतीयांच्या वतीने, मी अशा सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते जे आपल्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचे जीवन ज्ञान, कौशल्ये, मूल्यांनी परिपूर्ण करतात आणि त्यांना प्रेरित करतात.
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची अशी इच्छा होती की त्यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जावा, हे सर्वश्रुत आहे. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान, प्रसिद्ध लेखक आणि आदरणीय मुत्सद्दी होते; मात्र तरीही त्यांनी शिक्षक म्हणून आपल्या भूमिकेला इतर सर्व भूमिकांपेक्षा सर्वात महत्त्वाचे मानले. भारताचे एक अत्यंत लाडके माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना एकदा विचारण्यात आले होते की, लोक त्यांना वैज्ञानिक म्हणून अधिक लक्षात ठेवतील की राष्ट्रपती म्हणून? त्यावर डॉ. कलाम यांनी उत्तर दिले होते की, त्यांना एक शिक्षक म्हणून आठवणीत राहायला आवडेल.
ज्यांचे कौशल्य आणि चारित्र्य त्यांना वंदनीय बनवते आणि त्यामुळे ज्याच्याप्रति समस्त विद्यार्थी समर्पित असतात असे शिक्षक नेहमीच आपले आदर्श राहिले आहेत. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांवर स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम केले पाहिजे, त्यांनी सर्वांना समान आणि न्याय्य वागणूक दिली पाहिजे, त्यांनी विद्यार्थ्यांवर रागवू नये, त्यांनी संयम बाळगावा, विद्यार्थ्यांचे कल्याण सर्वात वर ठेवावे आणि त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेनुसार त्यांना शिकवावे, अशी आपल्या प्राचीन ग्रंथांची शिकवण आहे. अशा शिक्षकांविषयी असलेल्या अतिशय सखोल आदराच्या भावनेतूनच, सुमारे तीन सहस्र वर्षांपूर्वी तैत्तिरीय उपनिषदातील 'शिक्षावल्ली'ने ‘आचार्यदेवो भव’ हा कालातीत संदेश दिला होता.
अनेक ज्ञानी आणि अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणे हे माझे परमभाग्य राहिले आहे. आमचे शिक्षक शाळेच्या वेळेनंतरही काही वेळा, त्यांच्या घरी आम्हाला शिकवायचे आणि आमची खूप काळजी घ्यायचे. सातवीची शाळा पूर्ण केल्यानंतर, पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर पडणारी मी पहिली मुलगी होते. नंतर, भुवनेश्वरमध्ये शिकत असतानाही, मला माझ्या शिक्षकांकडून उदंड प्रेम आणि प्रोत्साहन मिळण्याचे सौभाग्य लाभले. मी माझ्या शिक्षकांचा उल्लेख येथे अत्यंत नम्रतेने करत आहे, कारण त्यांची कथा एका सखोल सत्याचे दर्शन घडवते: एक प्रेमळ आणि समर्पित शिक्षक विद्यार्थ्यामध्ये असीम क्षमता आणि प्रेरणा जागृत करू शकतो. त्यांच्या या प्रोत्साहनाने बळकट होऊन, विद्यार्थी आयुष्यातील कठीण आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य आणि सर्वोच्च ध्येये गाठण्याचा आत्मविश्वास विकसित करतात. शिक्षक केवळ अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा खूपच जास्त काही करत असतात. आपल्या स्वतःच्या आचरणातून आणि उदाहरणातून, ते एक यशस्वी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली कला आणि कौशल्य यांनी विद्यार्थ्यांना संपन्न बनवतात. मार्गदर्शक असण्यासोबतच, शिक्षक हा विद्यार्थ्याच्या ज्ञानार्जनाच्या प्रवासातील एक शुभचिंतक, मित्र आणि सहप्रवासीसुद्धा असतो.
'एक चांगला शिक्षक कसा असावा' याविषयी प्राचीन काळापासून आपल्या संस्कृती आणि परंपरेतून मिळालेला हा दृष्टिकोन आजही तितकाच प्रासंगिक आहे. अनेक शतकांपूर्वी महाकवी कालिदासांनी त्यांच्या ‘मालविकाग्निमित्रम्’ या नाटकात लिहिले आहे की, चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्याकडे सखोल ज्ञान असते आणि ते ज्ञान प्रभावीपणे संक्रमित करण्याची क्षमताही असते.
संस्कृतमधील एक प्रसिद्ध सुभाषित आपल्याला सांगते : ‘सर्वत्र विजयम् इच्छेत्, शिष्यात् इच्छेत् पराजयम्’ -माणसाने सर्वत्र विजयाची इच्छा बाळगावी, परंतु स्वतःच्या शिष्याकडून मात्र पराभूत होण्याची इच्छा ठेवावी. विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचारांना प्रोत्साहन देणे, त्यांची उत्सुकता प्रज्वलित करणे, प्रश्न विचारण्याच्या वृत्तीला खतपाणी घालणे, त्यांची तर्क आणि निर्णयाची क्षमता तीक्ष्ण करणे आणि त्यांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण्यास मदत करणे - हे अध्यापनाचे सर्वात उपयुक्त आणि सन्माननीय पैलू आहेत. अशाच प्रेरणादायी शिक्षणाच्या माध्यमातून आपण यशस्वी उद्योजक, तल्लख शास्त्रज्ञ, सर्जनशील कलाकार आणि उदयोन्मुख आव्हानांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यास सक्षम असलेल्या नागरिकांच्या पिढ्या घडवू शकू.
अध्यापन हा केवळ एक व्यवसाय नाही; तर ते एक व्रत आहे. ही केवळ एक कारकीर्द किंवा नोकरी नाही; तर मानवतेला आकार देण्याचे एक पवित्र कार्य आहे. येणाऱ्या पिढ्यांचा मार्ग प्रकाशित करण्याची ही एक उदात्त जबाबदारी आहे.
अध्यापनाशी जोडलेल्या माझ्या आठवणी मला एका विशेष समाधानाची अनुभूती देतात. मी ओदिशातील रायरंगपूर येथील श्री ऑरोबिंदो इंटेग्रल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले आहे. विविध विषय शिकवण्याव्यतिरिक्त, मुलांचे संगीत कार्यक्रम, क्रीडा उपक्रम आणि नाटकांच्या तयारीसाठी मी पूर्णपणे मदत करत असे. आजही, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यांची आमची तयारी आणि कार्यक्रमांदरम्यान मुलांमधील आनंदी उत्साहाच्या आठवणी माझ्यासाठी अतिशय सुखावह असतात. विद्यार्थ्यांना सुंदर नैसर्गिक वातावरणात सहलीला नेण्यात आणि खेळ तसेच शोधाच्या माध्यमातून त्यांना प्राणी, पक्षी, झाडे आणि वनस्पतींच्या जगाची ओळख करून देण्यात मला खूप समाधान लाभले आणि जीवनाचा अर्थ सापडला.
शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनीही माझे विद्यार्थी मला त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमांना आदरपूर्वक आमंत्रित करतात. मला माझ्या अनेक विद्यार्थ्यांची नावेच नव्हे, तर आम्ही ज्या टोपणनावांनी त्यांना प्रेमाने हाक मारायचो ती टोपणनावेही स्पष्टपणे आठवतात. मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवले त्यांच्याकडून मीसुद्धा खूप काही शिकले आहे. माझा असा विश्वास आहे की, मुलांची उत्स्फूर्तता आणि चिकित्सक वृत्तीमधून शिक्षकही खूप काही शिकत असतात.
राष्ट्रपती म्हणून माझ्या कार्यकाळाचे दुसरे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, मी राष्ट्रपती भवनाच्या परिसरात असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला आणि त्यांना पर्यावरण संरक्षणाविषयी शिकवले. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे विचार व कल्पना समजून घेण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते. त्यांनी व्यक्त केलेले विचार कायम माझ्या मनात घर करून राहतात.
साधारण अकरा वर्षांपूर्वी, मी माझ्या गावच्या घरी एका निवासी शाळेची स्थापना केली. या शाळेत वंचित कुटुंबांतील विद्यार्थी आणि ज्यांनी आपले आई-वडिलांचे छत्र गमावले आहे अशी बालके शिक्षण घेतात. मी वेळोवेळी या बालकांना भेटण्यासाठी या शाळेला भेट देत असते. यावर्षी, २० जून रोजी माझ्या वाढदिवशी या बालकांना भेटून मला खूप आनंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माझ्यासोबत शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यांना भेटण्याचा हा असाधारण अनुभव या विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी प्रेरणास्रोत बनेल. त्या मुलांना प्रगती करताना पाहून माझ्या मनात एका विशेष अर्थपूर्णतेची भावना निर्माण होते.
शिक्षण देण्याचे कार्य ही केवळ शिक्षकांची एकट्याचीच जबाबदारी नाही. जे लोक आपल्या आचरणातून आणि कर्तृत्वातून मुलांसाठी आदर्श बनतात, तेसुद्धा शिक्षण आणि प्रेरणेचा एक मौल्यवान स्रोत असतात. पालक आणि पालकवर्ग जेव्हा आपल्या मुलांना शिकण्यासाठी पाठवतात, तेव्हा शिक्षकांवर त्यांचा सर्वाधिक विश्वास असतो. शिक्षक आपल्या मुलांना स्वतःचे मानतील आणि मुलांच्या सुरक्षेची व विकासाची पूर्ण काळजी घेतील, असा त्यांचा विश्वास असतो. पालकांनी ठेवलेल्या या पवित्र विश्वासाचे जतन करणे हे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य आहे. शिक्षकाची वृत्ती, आचरण आणि वर्तनामुळे मुलांमध्ये भीती आणि चिंता निर्माण होऊ नये, त्यांचे खच्चीकरण होऊ नये किंवा त्यांच्यात कोणतीही न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ नये. चांगले शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम व्यक्ती बनण्यास मदत करतात.
आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस बनवण्यासाठी मार्गदर्शन करणे हे शिक्षकांचे पवित्र कर्तव्य आहे. जे विद्यार्थी आपल्या विचारांत आणि कृतीत नैतिक राहून समृद्धी आणि यश संपादन करतात, ते शिक्षकांच्या यशाचे जिवंत प्रतीक असतात. आपला देश सामाजिक समावेशनाला केंद्रस्थानी ठेवून विकसित भारत बनण्याच्या ध्येयाकडे एका निश्चित गतीने वाटचाल करत आहे. या प्रवासात आपण पुढे जात असताना, आपल्या शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवाव्यात, ज्या आपल्या सांस्कृतिक वारशाच्या आणि परंपरेच्या समृद्धीला जपतील; वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करतील आणि मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करतील; 'अंत्योदय'च्या आदर्शाचे पालन करतील; पर्यावरण आणि सर्व सजीवांचे रक्षण करतील; वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतील आणि 'राष्ट्र प्रथम'च्या भावनेने पुढे जातील.
मी प्रत्येक नागरिकाला एक आवाहन करते : आपल्या ध्येयासाठी वाहून घेतलेल्या आणि अतिशय प्रामाणिक असलेल्या शिक्षकांचा नेहमीच सर्वोच्च आदर करा. अशा प्रकारच्या ध्येयनिष्ठ शिक्षकांच्या योगदानामुळे भारत शिकत राहील आणि जगाचे नेतृत्व करत राहील, अशी मी मनापासून कामना करते.
(लेखक भारताच्या राष्ट्रपती आहेत)