विशेष
प्रा.डॉ. प्रवीण घोडेस्वार
आदिवासी समाजातील काही विशिष्ट गुण सोडले तर स्त्रियांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन काही प्रमाणात वर्चस्ववादी समाजापेक्षा वेगळा नसल्याचे दिसून येते. आदिवासी पुरुष परिवर्तनाला नकार देताना एकाच वाक्याचा आधार घेत असतात- आपल्या पूर्वजांनी असेच नियम बनवले आहेत!
प्रत्येक समाज घटकाची आपली काही वैशिष्ट्ये (अंगभूत बलस्थाने, उणिवा/कमतरता) असतात. प्रसिद्ध कवयित्री आणि पत्रकार जसिंता केरकट्टा यांच्या मते आदिवासी समाजातही वरील दोन्ही घटक आढळून येतात. झारखंडमधील एका आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जसिंता यांची या संदर्भातील मांडणी महत्त्वपूर्ण आहे. आपल्या देशातील आदिवासी समाज शोषणाच्या वर्चस्ववादी व्यवस्थेच्या विरोधात प्रत्येक पिढीत लढत राहिला, या विरोधात आपला आवाज मुखर करत राहिलेला आहे. पण इतका संघर्ष करूनही या समूहावरचा वर्चस्ववादी व्यवस्थेचा पगडा नष्ट झालेला नाहीये. जसिंता म्हणतात की, आदिवासी समाजाच्या स्त्रियांच्या परिस्थितीबाबत चर्चा करीत असताना या समाजाकडून जे शब्द उच्चारले जातात त्यांच्या अर्थाकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. आदिवासी समाजातही पुरुष जेव्हा ‘समाज’ या शब्दाचा उपयोग करीत असतात तेव्हा याचा अर्थ ‘पुरुषांचा समाज’ असाच होतो. ते मनुष्यप्राण्याच्या अशा समाजाविषयी बोलत नाहीत ज्यात स्त्रियांचाही समावेश आहे. या ‘समाज’ शब्दामध्ये देखील आदिवासी स्त्रिया अनुल्लेखित असतात. जेव्हा एखादी आदिवासी व्यक्ती ‘पूर्वज’ शब्दाचा उल्लेख करत असते तेव्हा ती ‘पुरुष पूर्वजां’विषयीच बोलत असते, स्त्रियांविषयी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
आदिवासी समाजाच्या काही प्रथा-परंपरांमध्येही असे दिसून येते की पुरुष मंडळींच्या मृत्यूनंतर त्यांना पूर्वज समजण्यात येऊन त्यांच्या पार्थिवावर परंपरांगत आणि विधिवत संस्कार केले जातात. त्यांच्यासाठी घरातील एखादी स्वतंत्र खोलीही देण्यात येते. घरातील या खोलीत पूर्वजांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. मात्र झारखंडमधील मुंडा आदिवासी समाजात अशी प्रथा प्रचलित आहे की, ज्यात एखाद्या स्त्रीचे जर सासरी निधन झाले तर सासरी तिचे पार्थिव तिच्या गावातील घरातही ठेवायला सासरचे राजी नसतात. आपल्या मुलीचे पार्थिव घेऊन जायचा निरोप तिच्या माहेरच्या लोकांना सासरच्या लोकांकडून पाठवला जातो. माहेरची मंडळी सासरी येतात आणि पूजाअर्चा करून आपल्या मुलीचे पार्थिव परत घेऊन जातात. जर स्त्रीचे सासरी एखाद्या आजाराने निधन झाले असेल तर माहेरचे लोकसुद्धा तिच्या पार्थिवाला घरी घेऊन जात नाही. त्यांस आपल्या गावात आणून गावाच्या सीमेवर कुठेतरी टाकून देण्यात येते. स्त्रीच्या मृत्यूनंतरचे हे वर्तन किती अमानुष आहे!
बदलत्या काळात आदिवासी समाजातील काही शिक्षित लोक या प्रथेला आपल्या कुटुंबातील मृत स्त्रीचा अपमान समजतात. तसेच ती स्त्री जिवंत असताना तिने सासरी पार पाडलेली कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि कुटुंबासाठी उपसलेल्या कष्टाची अवहेलना मानतात. यामुळे वैयक्तिक निर्णय म्हणून काही लोक स्त्रीच्या पार्थिवाला माहेरी पाठवण्यास विरोधही करत असतात. काही गावांमध्ये अशा विरोधाची तुरळक उदाहरणे दिसून येतात. मात्र आदिवासी समाजात आढळून येणाऱ्या अशा प्रथा-परंपरा यातून आदिवासी समाजात स्त्रियांविषयी असलेला दृष्टिकोन स्पष्ट होतो. स्त्रिया जिवंत असतानाही त्यांचे कोणतेही घर नसते, ना माहेरी, ना सासरी, हे या अनुषंगाने लक्षात येते. कुठेही त्यांच्या नावे काही संपत्ती नसते आणि मरणानंतरही तिच्या पार्थिवासाठी एखादे घर, एखादी जागा नसते. म्हणून कधी कधी अतिशय असहाय्य होऊन, सर्व हिंसा आणि दु:ख सोसून स्त्रिया प्रश्न विचारतात की या धरतीवर स्त्रीचे घर असते तरी कुठे? जसिंता यांनी आदिवासी स्त्रीच्या वेदना, दु:ख, हाल-अपेष्टा, संघर्ष, व्यथा आपल्या कविता आणि कथांमधून अतिशय ताकदीने चितारल्या आहेत.
जसिंता यांच्या मते पितृसत्तेने सगळ्यात जास्त नुकसान कोणाचे केले असेल तर ते पुरुषांचे. प्रथमदर्शनी त्यांचे हे मत पटकन ध्यानात येत नाही. पण याचा खोलवर विचार केला तर याची सत्यता लक्षात येते. त्या म्हणतात, पितृसत्तात्मक संरचना सर्वात आधी पुरुषांमधील सुंदर मानवी गुणांना नष्ट करत असते. त्यांच्या आतल्या सौंदर्याची हळूहळू हत्या करून त्यांना निर्दयी, पाषाणहृदयी करते. पुरुषांनी निर्माण केलेल्या जगात त्यांच्या व्यवस्थेला स्त्रिया विनाकारण बळी पडतात. यापासून अलिप्त राहण्यासाठी, पळून जाण्यासाठी त्यांना कोणताच मार्ग दिसून येत नाही. म्हणून या व्यवस्थेच्या कंडिशनिंगपासून स्त्रियादेखील लांब राहू शकत नाहीत आणि सतत याच व्यवस्थेच्या हत्यारांचा उपयोग स्वत:ला भक्कम करण्यासाठी, स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी, स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्यासाठी स्त्रिया करत असतात. कधी कधी त्या त्यांच्यापेक्षा कमकुवत स्त्रियांचे शोषणही करतात. आदिवासी समाजातही हे सर्व आढळून येते, ही जसिंता यांनी नोंदवलेली निरीक्षणे अस्वस्थ करणारी आहेत.
आदिवासी समाजाला आदिवासी स्त्रियांनी खूप भक्कम पाठबळ दिले आहे, यात दुमत नाही. त्या नेहमी शेत-शिवारांत काम करत असतात. शेतीचे काम संपल्यावर त्या जंगलात जाऊन पाने तोडणे, कोरडा लाकूड-फाटा आणणे अशी कामे करतात. घरात पैशांची तंगी असेल तर त्या शहरांत जाऊन मजुरी करतात. आकडेवारी सांगते की, देशातील इतर कोणत्याही समाजाच्या स्त्रियांपेक्षा आदिवासी स्त्रिया मोठ्या संख्येने मजूर म्हणून काम करतात. यासोबतच जमीन वाचवण्याच्या प्रत्येक आंदोलनात आदिवासी स्त्रियाच सगळ्यात जास्त ताकदीने लढताना दिसतात. स्त्रियांच्या सहभागामुळेच आदिवासी समाजाने अनेक चळवळी/ आंदोलनांमध्ये यश मिळवले आहे. आदिवासी समाजातील ही पुरुषप्रधान व्यवस्था स्त्रियांना कमी लेखते. आदिवासी समाजातील काही विशिष्ट गुण सोडले तर स्त्रियांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन काही प्रमाणात वर्चस्ववादी समाजापेक्षा वेगळा नसल्याचे दिसून येते. आदिवासी पुरुष परिवर्तनाला नकार देताना एकाच वाक्याचा आधार घेत असतात- आपल्या पूर्वजांनी असेच नियम बनवले आहेत! या वाक्याला नेहमीच एखाद्या हत्यारासारखे वापरले जाते. यातून त्यांच्या यथास्थितीवादी मानसिकतेचे दर्शन घडते.
वंचित-उपेक्षित-परिघावरील समाजातील पुरुष जेव्हा त्यांच्यापेक्षा वर असलेल्या समाजावर आपले हक्क/अधिकार गाजवायला असमर्थ ठरतात तेव्हा ते आपल्याच समाजातील स्त्रियांवर हक्क गाजवतात, त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवतात, त्यांना आपली ताकद आणि सामर्थ्य दाखवतात. आदिवासी समाजातील पुरुषांमध्ये देखील ही लक्षणे आढळत असल्याचे जसिंता यांनी नमूद केले आहे. दुसरीकडे आदिवासी स्त्रियादेखील अनेक गोष्टींपासून वंचित आहेत. उदा.- शिक्षण, जाणीव जागृती, रोजगार, सुदृढ आरोग्य, त्यांचे हक्क/अधिकार, आत्मविश्वास इत्यादी. मूलत: झुंजार, लढवय्यी, कष्टाळू, आत्मनिर्भर असलेली आदिवासी स्त्री आपली सारी क्षमता समाजाचे संरक्षण करण्याच्या नावाखाली पुरुषप्रधान व्यवस्थेची वाहक, संरक्षक आणि संवर्धक बनली आहे, हे दुर्दैव! ती देखील पुरुषांचीच भाषा बोलू लागली आहे- आपल्या पूर्वजांनी असेच सांगितले आहे!
अशी सगळी परिस्थिती असली तरी भविष्यात आदिवासी स्त्रियाच नव्हे तर पुरुषदेखील या पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारतील अशी आशा करायला हरकत नाही. असे घडेल तेव्हा नवा सूर्योदय होईल आणि नवीन पिढी समता, न्याय, स्वातंत्र्य, समानता, सामंजस्य, मानवी सन्मान नि प्रतिष्ठा, सौंदर्य या शाश्वत मूल्यांचा स्वीकार करून एक नवे विश्व उभे करेल. जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने सर्व आदिवासी भगिनी आणि बांधवांना शुभेच्छा!
(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)