संपादकीय

पाकिस्तानला हलक्यात घेणे कितपत फायद्याचे?

आपला शेजारी कंगाल आहे, महागाईचा आगडोंब तेथे उसळला आहे, आपल्यापेक्षा त्यांची अर्थव्यवस्था अतिशय किरकोळ आहे, असे म्हणून पाकिस्तानला आपण खूपच हलक्यात घेत आहोत. मात्र, हे योग्य आहे का?

नवशक्ती Web Desk

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

आपला शेजारी कंगाल आहे, महागाईचा आगडोंब तेथे उसळला आहे, आपल्यापेक्षा त्यांची अर्थव्यवस्था अतिशय किरकोळ आहे, असे म्हणून पाकिस्तानला आपण खूपच हलक्यात घेत आहोत. मात्र, हे योग्य आहे का?

भारतात साखरेचा दर एका किलोला ४० ते ५० रुपये आहे, तर पाकिस्तानात १७५ ते १८० रुपये आहे, तर भारतात ५५ ते ८५ रुपये प्रति लिटर भावाने विक्री होणारे दूध पाकिस्तानात २२० ते २५० रुपयांना आहे. तसेच, भारताची अर्थव्यवस्था ही जगात चौथ्या क्रमांकाची असून भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ३.६४ लाख डॉलर एवढे आहे, तर पाकिस्तान जगात ३८व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून त्यांचा जीडीपी ३७ हजार डॉलर एवढा आहे. म्हणजे आर्थिक पातळीवर भारत आणि पाकिस्तान यांची तुलना होऊ शकत नाही. तसे पाहता दोन्ही देश एकाचवेळी स्वतंत्र झाले, पण गेल्या साडेसात दशकांत दोन्ही देशांच्या वाटचालीत कमालीचा फरक आहे. ही वस्तुस्थिती मान्य करायलाच हवी.

पाकिस्तानला भीकेचे डोहाळे लागले आहेत, दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणाने पाकिस्तान पूर्णपणे सडला आहे, अमेरिका व चीनसारख्या देशांच्या आश्रयाखाली तो आहे, तेथे पारदर्शक लोकशाही नाही, लष्कराचा तेथे वरचष्मा आहे, तेथील राजकीय नेते सर्वसामान्यांना काहीच विचार करीत नाहीत, दहशतवाद्यांना तो पूर्णपणे बळ पुरवत आहे, नजीकच्या काळात पाकिस्तानचे तुकडे होतील, कदाचित पाकिस्तान नामशेषही होईल या आणि अशा कितीतरी वदंता आणि संदेशांची सोशल मीडियात चलती आहे. यात तथ्य नक्कीच आहे. मात्र, भारताने नेहमीच पाकिस्तानला अत्यंत कमी लेखणे योग्य नाही. भारताच्या परराष्ट्र धोरणात पाकिस्तान हा महत्त्वाचा भाग राहिला आहे, यापुढेही राहील. मात्र, तुलना करून आपण पाकिस्तानकडे कानाडोळा करीत आहोत, असे व्हायला नको.

जगात एकूण ५७ मुस्लिम राष्ट्रे आहेत. सद्यस्थितीत या देशांमधील लोकसंख्या २ अब्ज एवढी आहे. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत ही टक्केवारी २५ एवढी आहे. अरब राष्ट्रांना लागून असलेला पाकिस्तान हा मुस्लिम देशांपैकी एक आहे. भूराजकीयदृष्ट्या पाकिस्तानचे जगातील स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दक्षिण आशियातील देश आणि युरोपला जोडणाऱ्या देशांशी असलेली सीमा हे भौगोलिक स्थान पाकिस्तानच्या पदरात अनेक बाबी टाकणारे आहे. (म्हणूनच अमेरिकेला पाकिस्तान हवा असतो.) पृथ्वीच्या पाठीवरील पाकिस्तानच्या या महात्म्याकडे आपण डोळेझाक करू शकत नाही. त्यामध्ये अनेक दोष असतील, पण भारताने सतत त्याची हेटाळणी करणे योग्य नाही. कारण, गेल्या काही महिन्यांमधील घडामोडी पाहता पाकिस्तानबाबत आपण अधिक सजग रहायला हवे तसेच त्याच्याकडून योग्य तो धडाही घ्यायला हवा.

भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्यांमागे पाकिस्तान भक्कम उभा राहतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुंबई हल्ला असो की संसद किंवा पुलवामा की पहलगाम. साऱ्यांमागे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादच राहिला आहे. भारताने वेळोवेळी सडेतोड उत्तर दिले असले तरी त्यामुळे पाकिस्तानचे फार काही बिघडले आहे असे चित्र नाही. उलट भारताविरोधात कागाळ्या करण्यात तो माहीर आहे. शिवाय भारतावरील हल्ले कुठे कमी झालेले नाहीत. संधी शोधून आणि ठराविक अंतराने ते घडवून आणले जातात. असा उपद्व्यापी पाक हा ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे फार अडचणीत येईल असे अनेकांना वाटले. भलेही पाक लष्कराच्या विनंतीवरून भारताने हे ऑपरेशन स्थगित केले असेल, पण पाकिस्तानने गेल्या काही महिन्यांत ज्या बाबी केल्या आहेत त्या दुर्लक्षित करता येणाऱ्या नक्कीच नाहीत.

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जगभरात खासदारांची शिष्टमंडळे पाठवली. देशोदेशी पाकचे दुष्कृत्य उजागर केले. त्याने भारताला विशेष फायदा झाला असे जराही म्हणता येणार नाही. तसेच पाकचे काहीही वाकडे सुद्धा झालेले नाही. याउलट पाकचे पारडे अधिक झुकते आहे का, अशी शंका निर्माण होते. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आणि त्यानंतर काय काय घडले याची उजळणी केली तर काही बाबी ठळकपणे समोर येतात त्या अशा-

१. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जवळपास अडीच अब्ज डॉलरचे कर्ज पाकला मंजूर झाले. २. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पहलगाम हल्ल्याचा मुद्दा गेला नाही. ३. पाकने तुर्की व चीनकडून भक्कम पाठिंबा मिळवला. त्यांनी दिलेली शस्त्रास्त्रे भारताविरोधात वापरली. ४. मुनीर हे चाणाक्ष निघाले. त्यांनी चीन व तुर्कीच्या शस्त्रास्त्रांची जणू चाचणी भारताविरोधात करून घेतली. ५. पाकने पारंपरिक ऐवजी आधुनिक स्वरूपाचे हल्ले केले. ६. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केले. ७. वेगवेगळे नरेटिव्ह पसरवून पाकने जगभरात प्रसिद्धी मिळवली. ८. मुनीर हे फील्ड मार्शल बनले. ९. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकला अधिक जवळ केले. त्यांना गोंजारले. मुनीर यांच्यासोबत डिनर केला. १०. एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही की त्याला दोष दिला नाही किंवा पाकवर निर्बंध लादले नाहीत. केवळ पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. ११. संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद पाकला मिळाले. १२. चीनने भव्य सोहळ्यासाठी पाकला आमंत्रित केले. १३. राष्ट्रपती झरदारी हे तब्बल दहा दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले. त्यांना अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि चीनची संरक्षण सज्जता तसेच ताकद दाखविण्यात आली. १४. पाकने सौदी अरेबियासोबत सामरिक करार केला. दोघांपैकी एका देशावर हल्ला झाला तर तो दोघांवर हल्ला समजून प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यात नमूद करण्यात आले. १५. पंतप्रधान शरीफ आणि लष्कर प्रमुख मुनीर यांचे व्हाईट हाऊसमध्ये आगतस्वागत करण्यात आले.

वरील सर्व बाबी लक्षात घेता पाकिस्तानची बाजू जागतिक पातळीवर कुठेच कमी पडताना दिसत नाही. उलट ते स्वतःची बाजू भक्कम करीत आहेत. भारताला मात्र अनेकानेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्काचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होतो आहे. एच१बी व्हिसावरही भरभक्कम शुल्क लावून ट्रम्प यांनी भारताला लक्ष्य केले आहे. पाकिस्तानला आपण कितीही हलक्यात घेत असलो तरी ना त्यांचे कंबरडे मोडते आहे की त्यांना काही झळ पोहचते आहे. पाककडून मात्र भारताविरोधात जोरदार आघाडी उघडण्यात आली आहे. भारताला अडचणीत आणण्यासाठी ते रणनीती आखत आहेत. बांगलादेशशी असलेले शत्रुत्व संपून आता पाकसोबत मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे. ही सुद्धा त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. म्हणजेच, पाक एक एक पायऱ्या पुढे तर जात नाही ना याची खातरजमा करण्याची वेळ भारतावर आली आहे.

सार्कसारखी संघटना जवळपास बंद पडल्यासारखी आहे. भारताचा दक्षिण आशियातील दबदबा वाढतो आहे की कमी होतो आहे, याचाही विचार करायला हवा. केवळ आर्थिक बाबतीत पाकशी तुलना करून आपण मोठे आहोत असे म्हणून आपली पाठ थोपटून घेणे संयुक्तिक नाही. अमेरिका आणि चीनचे मोठे आव्हान भारतासमोर आहे. त्यातच आता पाकिस्तानसुद्धा भारतासमोर अडथळे निर्माण करतो आहे. पाकिस्तान न बोलता अनेक कृती करून भारतापेक्षा वरचढ तर बनत नाही ना, जगभरात आपली प्रतिमा उज्ज्वल तर करीत नाही ना, या साऱ्यावर अतिशय बारकाईने लक्ष ठेवणे अगत्याचे आहे. खरे तर भारतीय परराष्ट्र धोरणासमोरच पाकने आव्हान उभे केल्याचे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे शत्रू राष्ट्र पाकला कमी लेखून किंवा त्याला हलक्यात घेऊन भारत फार काही साध्य करणार नाही. पाकच्या कुटील कारवाया आणि कुरापतींना शह देण्यासाठी भारताने सर्वंकष असे धोरणच आखण्याची नितांत गरज आहे.

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.

SRA चा कॉर्पस फंड १ लाख! झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव; इमारतींच्या उंचीप्रमाणे रकमेत होणार वाढ

डायग्नोस्टिक लॅब्ससाठी नवीन कायदा; चाचण्यांची अचूकता व विश्वासार्हता राखण्यासाठी सरकारचे पाऊल

...तर ओला, उबरवर कारवाई

‘सावरकर सदन’ला वारसा स्थळाचा दर्जा; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

एलॉन मस्क यांची संपत्ती ५०० अब्ज डॉलरवर; जगातील पहिलेच उद्योगपती ठरले