सह्याद्रीचे वारे
अरविंद भानुशाली
शिवसेना आणि बंड हे समीकरण त्यांच्या जन्मापासून सुरू आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना २१ जून २०२२ या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील सर्वात मोठे बंड केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदार बाहेर पडतात. हे बंड होते का? की हा पक्ष नेतृत्वाच्या विरोधात उठाव होता?
सत्ता स्थापनेसाठी आजपर्यंत अनेकदा बंड झाले. त्यामधून वाईट व चांगलेही निघाले. शिवसेना आणि बंड हे समीकरण त्यांच्या जन्मापासून सुरू आहे. प्रारंभी शिंगरे बंधूंनी बंड केले, त्यानंतर अनेक बंड झाले. त्याआधी शिवसेनेत एकदा गेला की बाहेर पडायचे नाही, असे सम्यक होते. ठाणे मनपा महापौर निवडणुकीत बंड झाले. त्या बंडातून श्रीधर खोपकर या नगरसेवकाची हत्या झाली. शिवसेना नेते सतीश प्रधान पडद्याआड गेले. त्यानंतर छगन भुजबळ यांच्यासोबत पोलीस पहाऱ्यात १८ शिवसेना आमदारांनी बंड केले. ते मात्र पुन्हा निवडणुकीने परत आले नाहीत. मुंबईचे महापौरपद तीनवेळा भूषवलेले छगन भुजबळ यांच्या बंडानंतर निवडणुकीत त्यांचा एका शिवसैनिकाने (बाळा नांदगावकर यांनी) पराभव केला. पुढे भुजबळांना काँग्रेसने विधान परिषदेवर घेतले. त्यानंतर नारायण राणे यांनी बंड केले. त्यांच्याजवळ त्यावेळी १३ आमदार होते. त्यापैकी केवळ कालिदास कोळंबकर व सिन्नरचे आमदार राहिले. त्यापाठोपाठ राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. सुरुवातीच्या काळात ते प्रभावी ठरले. २००९मध्ये १३ आमदार निवडून आले. परंतु त्यानंतर राज ठाकरेंच्या पक्षाने धरसोडीची भूमिका घेतल्याने त्यांचे २०२४पर्यंत नामोनिशाण राहिले नाही. प्रारंभी त्यांनी गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. परंतु काही दिवसांनी बिनसले. मग त्यांनी २०१९मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांच्या प्रचारसभाही घेतल्या. पुढे २०२२-२३पासून मराठी माणसाबरोबरच हिंदुत्वाची भूमिका घेतली. २०२४च्या निवडणुकीत त्यांनी १२८ उमेदवार उभे केले. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, ठाणे येथे मोठ्या प्रचंड सभा घेतल्या. परंतु फारसा उपयोग झाला नाही. शिवसेनेतील तिन्ही बंड शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करूनच हे सर्व नेते बाहेर पडले; मात्र त्यांना जनतेने नाकारले.
ही सर्व पार्श्वभूमी पाहता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सत्ताकाळामध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले. ते नुसते बंड नव्हते, तर शिवसेनेमधील २/३ (दोन तृतीयांश) चाळीस आमदारांना घेऊन त्यांनी सुरतमार्गे गुवाहाटी गाठली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील ९ मंत्री सामील झाले होते.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकावर टिच्चून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदार बाहेर पडतात. हे बंड होते का? हा पक्षनेतृत्वाच्या विरोधात उठाव होता. पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होत असताना उद्धव ठाकरे यांना वर्षावरील चंबूगबाळ आवरून मातोश्रीवर परत यावे लागले. त्यावेळी त्यांच्यासोबत ५६ आमदारांपैकी १५ आमदार शिल्लक राहिले होते. पुढे-पुढे तर शिवसेनेच्या उबाठाबरोबरच राष्ट्रवादीमधील शरद पवारांच्या विरोधात काका-पुतण्यामध्ये बंड झाले आणि राष्ट्रवादीमधील ४२ आमदारांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध उठाव केला आणि ते भाजपबरोबर सत्तेत सामील झाले. एकूण शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षातील वाद हे पक्षनेतृत्वाच्या विरोधात होते. अशा परिस्थितीत मूळ राष्ट्रवादीकडे (शरद पवार गटाकडे) १४ आमदार शिल्लक राहिले. अखेर या दोन्ही पक्षांची मान्यता व निवडणूक चिन्हही गेले. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अजित पवार गटास राष्ट्रवादी पक्षास मान्यता दिली. एवढेच नाही, तर शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निर्वाळा दिला. एवढ्यावर थांबले नाही तर धनुष्यबाण चिन्हही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. नंतर त्याच पद्धतीने अजित पवारांकडे राष्ट्रवादीची मालकी गेली. भाजपने याचा फायदा सत्ता स्थापनेसाठी घेतला आणि मुख्यमंत्रीपदी असलेले उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. हा सर्व झाला पूर्व इतिहास.
महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये बंडखोरी करून बाहेर पडलेले पुन्हा निवडून येत नसत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संजय राऊत म्हणायचे या गेलेल्या ४० आमदारांपैकी एकही आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाही; मात्र चित्र उलटे झाले. शिवसेना शिंदे गटाचे गेलेल्या ४० पैकी एक-दोन आमदार वगळता ५७ आमदार निवडून आले, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अक्षरशः पानिपत झाले, त्यांचे केवळ १० आमदार निवडून आले, तर सत्तेत असलेल्या अजित पवार गटाचे ४२ आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. सहसा असे होत नाही, परंतु यावेळी झाले यात शंका नाही.
बंड मोडून काढले जाते. परंतु उठाव मात्र तोही पक्षनेतृत्वाच्या विरोधात होतो, तेव्हा याचा धडा संबंधितांनी, पक्षनेतृत्वाने घेणे आवश्यक होते. परंतु ते झाले नाही आणि आज ओरिजनल शिवसेना व राष्ट्रवादी मृत अवस्थेत पडल्याचे दिसून येते. शिवसेनेचा जन्मच मुली लाल बावटा खतम करण्यासाठी झाला होता. तर त्याचबरोबर मराठी हा टक्का घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरली होती. त्याकाळी काँग्रेसचे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यांनीच शिवसेना वाढवली. शिवसेनेने तब्बल २० वर्षे काँग्रेसबरोबरच काम केले होते. याचे एकच उदाहरण देतो. रामराव आदिक हे काँग्रेसचे उमेदवार उभे असताना शिवसेनेने जनसंघाचे वसंत कुमार पंडित यांना विरोध केला होता. एवढेच कशाला शिवसेना भाजपबरोबर केंद्रात सत्तेत सहभागी असताना तीन राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजप उमेदवाराच्या विरोधात मतदान केले होते. तेही दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत. हे सर्व झाले होते. एवढेच कशाला १९७८मध्ये जनता पक्षाचे खा. स्व. रामभाऊ म्हाळगी यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने काँग्रेसचे प्रभाकर हेगडे यांना पाठिंबा दिला होता. ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर त्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभाही झाली होती. असे असतानाही त्यावेळी हेगडे पराभूत झाले आणि जनता पक्षाचे जगन्नाथ पाटील हे विजयी झाले होते. हा जुना इतिहास आहे.
१९६६ साली स्थापन झालेली शिवसेना किमान २० वर्षे मुंबईच्या बाहेर पडू शकली नव्हती. सन १९८५ ते ८९ या काळात शिवसेनेने आपला पॅटर्न बदलला आणि हिंदुत्वाची भूमिका घेतली. पुढे भाजपबरोबर युती केली आणि १९९५ पसरून सत्तेमध्ये सहभागी झाले. ही वस्तुस्थिती यापूर्वीची होती. परंतु उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून केवळ सत्तेसाठी हिंदूविरोधी भूमिका घेतल्याने यावेळी विधानसभेत त्यांचे पानिपत झाले आणि उठाव केलेले एकनाथ शिंदे हे त्यांना भारी पडले. हे सर्व चित्र पाहिल्यानंतर नेतृत्वाच्या विरोधात हा उठाव झाल्याने या नेतृत्वाने कुठलाही धडा घेतला नाही. उलट सत्तेला चिकटून राहण्यासाठी सौदेबाजी मात्र केली आणि त्याचा परिणाम निवडणूक निकालाने दाखवून दिला आहे.
ज्या शरद पवारांनी सोनिया गांधी परदेशी म्हणून बंड केले आणि राष्ट्रवादीची स्थापना केली. ते शरद पवार सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होते. तीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांची, त्यांना परत मुख्यमंत्री व्हायचे होते, म्हणून दिल्लीत जाऊन सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासोबत कुर्नीसाद घातला हे अजबच. परंतु शेवटी उठाव यशस्वी झाले आणि बंड मात्र अपयशी ठरले.
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.