मत आमचेही
ॲड. हर्षल प्रधान
घराणेशाहीमुक्त राजकारण करणार, असे सांगणारी भाजप राजकीय घराणेशाहीत गुरफटली आहे. महाराष्ट्रात निवडून आलेल्या भाजपच्या १३२ आमदारांपैकी ८७ आमदार घराणेशाहीशी संबंधित आहेत. लोकशाही वाचवायची तर घराणेशाही बंद केली पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका आहे, असे भाजपाई नेहमी सांगतात. ज्यांना कोणतीही राजकीय घराण्याची पार्श्वभूमी नाही, अशा तरुणांना मला राजकारणात आणायचे आहे, अशी गर्जना मोदी करतात. मात्र प्रत्यक्षात भाजप देखील घराणेशाहीने वेढला गेला आहे.
मनोहर नाईक यांचा इंद्रनील हा मुलगा, रामप्रसाद बोर्डीकर यांची कन्या मेघना, पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आकाश, रामदास कदम यांचा मुलगा योगेश, नारायण राणे यांचा मुलगा नितेश, अभयसिंहराजे यांचे पुत्र शिवेंद्रसिंह, शिवाजीराव देसाई यांचे पुत्र शंभूराजे, मोरेश्वर सावे यांचे पुत्र अतुल सावे, बाळासाहेबांचे पुत्र राधाकृष्ण विखे-पाटील, स्वतः देवेंद्र हे गंगाधरपंत फडणवीस यांचे चिरंजीव, शरद पवारांचे पुतणे अजित दादा असे अनेक घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे आणि महायुतीचे आमदार मंत्री झाले आहेत. प्रधानमंत्री मोदींनी घराणेशाही मोडून काढण्याचा निर्धार नव्हे, संकल्प केला होता. मात्र तो संकल्प मोडत भाजपने घराणेशाहीचा झेंडा फडकवत मंत्रिपदाच्या खिरापती वाटल्या आहेत. भाजपच कशाला, संपूर्ण भारत देशाचे राजकारण हे राजकीय घराण्यांनी व्यापले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी कितीही बोलले तरी देशातील ही घराणेशाही ‘भाजप के साथ भी, भाजप के बाद भी’ अशीच राहणार आहे.
राजकारणातील घराणेशाहीमुळे देशाचे नुकसान होते, असे म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत काही ठाम विधाने करून प्रादेशिक राजकीय पक्षांच्या घराणेशाहीवर प्रहार केला होता. भाजपमधील खासदारांना देखील त्यांनी पक्षात घराणेशाही चालणार नाही, असा कडक शब्दांत इशारा दिला होता. मात्र लोकसभेतील ‘४०० पार’चा आपटी बार फुसका ठरल्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजप आणि मोदी-शहा यांनी घराणेशाहीबाबत ब्र देखील काढला नाही. उलट अशोक चव्हाण यांच्यासारख्या नव्याने भाजपमध्ये आलेल्यापासून ते थेट रावसाहेब दानवे यांच्यासारख्या जुन्या भाजपाईपर्यंत सगळ्यांच्याच घराणेशाहीला मान्यता दिली आणि झुकते माप देत तिकीटही दिले.
उमेदवारी देताना घराणेशाहीचाच बोलबाला
यंदाची विधानसभा निवडणूक चुरशीची होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र ही विधानसभा निवडणूक आहे की आयपीएलची मॅच हेच कळेनासे झाले होते. कोण कुठल्या संघातून खेळतोय हेच उमजत नव्हते. कालपर्यंत एका पक्षाचा झेंडा घेऊन उभे राहिलेले आज चक्क विरोधी पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात होते. धर्म-जात-पंथ-भाषा इतकेच नव्हे, तर जात-पोटजात या सगळ्यात ही निवडणूक दुभंगली गेली. आपल्या देशातील खरी समस्या जातव्यवस्था ही आहे. आपली मुलगी आणि आपले मते हे केवळ आपल्याच जातीत जायला हवे, अशी ठाम भूमिका राज्यातील बहुसंख्य मतदारांची आहे. त्यामुळे इकडे-तिकडे पाहण्यापेक्षा आपल्याच घराण्यातला चेहरा दिलेला बरा म्हणत सगळ्यांनीच आपापल्या घरात निवडणुकीच्या तिकिटाची खिरापत वाटून घेतली. सख्खा भाऊ, चुलता, मावशी, मामा, काका, पुतण्या, भाचा अशांनाच तिकिटे मिळाली आणि विचारांशी, नेत्यांशी प्रामाणिक राहिलेल्यांच्या हातात धतुरा आला.
नातेवाईक निवडणुकीत, कार्यकर्ते कुठे गेले?
विधानसभेतील घराणेशाहीची सुरुवात भाजपपासूनच करूया. देवेंद्र फडणवीस - युती सरकारच्या काळातील मंत्री शोभाताई फडणवीस या देवेंद्र यांच्या काकू. देवेंद्र यांचे वडील गंगाधरराव विधान परिषदेचे आमदार होते. देवेंद्र नागपूरचे महापौर होते. नंतर आमदार. पुढे मुख्यमंत्री झाले. वडिलांचा व काकूंचा राजकीय वारसा त्यांनी पुढे चालवला. भाजप नेते स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या राजकारणात आहेत. महाजन यांची कन्या पूनम महाजन खासदार होत्या. मुंडे यांच्या एक कन्या डॉ. प्रीतम खासदार होत्या, तर दुसऱ्या पंकजा मुंडे-पालवे आमदार व मंत्री होत्या आणि लोकसभा हरल्यानंतर पुन्हा विधान परिषद आमदार आणि आता मंत्री झाल्या आहेत. भाजपचे माजी मंत्री विजयकुमार गावीत यांचे वडील जनता दलातून नंदुरबार येथून काँग्रेसला हरवून आमदार झाले होते. त्यांच्या पाठोपाठ मुलगा मंत्री झाला. गावीत यांची मुलगी हिना या भाजपच्या खासदार होत्या. दुसऱ्या कन्या सुप्रिया नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. पत्नी कुमुदिनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. दुसरे बंधू शरद गावित आमदार होते. गावित यांचे दुसरे बंधू राजेंद्र गावित पालघरचे खासदार होते. आता आमदार आहेत. एकाच घरात जिल्हा परिषद सदस्य ते आमदार, खासदार अशी सगळी पदे भाजपनेच दिली आहेत आणि तरी भाजप म्हणते, आमचा घराणेशाहीला विरोध आहे.
विधानसभेसाठी जेव्हा भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली तेव्हा त्यात अनेक आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली गेली. या यादीत पक्षातील अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळाली. पक्षातील नेत्यांची मुलं, मुली आणि पत्नीलाही पक्षाने तिकीट दिले. आमदार, खासदार आणि मंत्री असलेल्या नेत्यांच्या कुटुंबातच आणखी एक उमेदवारी दिल्याचे उघड झाले. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना विधानसभेची उमेदवारी दिली. अशोक चव्हाण हे भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत, तर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार आशिष शेलार यांचे बंधू, माजी नगरसेवक विनोद शेलार यांना तिकीट दिले गेले. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी आधी पत्नी प्रतिभा पाचपुते यांना, नंतर मुलाला उमेदवारी देऊ केली. तिकीट आमच्या कुटुंबातीलच एकाला मिळणार, अशी जाहीर कबुलीही त्यांनी देऊन टाकली होती. गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे आणि निलेश राणे, पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील-निलंगेकर आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांनाही उमेदवारी देण्यात आली. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांचे तिकीट कापून त्यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. राज्यपाल हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबात अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली. महाराष्ट्राच्या २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत लढणारे उमेदवार पाहिले की घराणेशाही हाच राजकारणातला प्रमुख धर्म झाल्याचे जाणवते.
घराणेशाहीचा भारतीय इतिहास
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात राजेशाही होती. त्यामुळे ‘राजा का बेटा राजा बनेगा’ हीच मानसिकता बळावली आणि वाढत गेली. जनमानसाने ते स्वीकारलेही. मात्र स्वातंत्र्यानंतर लोकशाही आली आणि पण मानसिकता बदलली नाही. अंधभक्त केवळ भाजपमध्येच नाहीत, तर ही सर्वपक्षीय स्थिती आहे. भारतात संसदीय लोकशाही आहे ती केवळ नावालाच. खरेतर देशाचे राजकारण घराणेशाहीने वेढलेले आहे, हेच सत्य आहे. घराणेशाही ही राष्ट्रीय, राज्य, प्रादेशिक पातळीवर तसेच जिल्हास्तरावरही आहे. नेहरू-गांधी यांच्यापासून सुरुवात करूया. नेहरू कुटुंबाने तीन भारतीय पंतप्रधान दिले आहेत आणि कुटुंबातील सदस्यांनी १९७८ पासून मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), शिरोमणी अकाली दल, शिवसेना, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, जनता दल सेक्युलर, झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस, जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स, इंडियन युनियन मुस्लिम लीग, एआयएमआयएम आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या सर्वांवर कुटुंबांचेच वर्चस्व आहे. आपल्याच कुटुंबातील व्यक्ती उमेदवार असावी, यासाठी सगळेच प्रयत्न करतात. त्यामुळे भाजप आणि त्यांचे नेते कितीही बोलले तरी घराणेशाहीपासून ना ते अलिप्त राहू शकत आहेत ना देश. ‘भाजप के साथ भी आणि भाजप के बाद भी’ हे असेच सुरू राहणार यात कोणतीही शंका नाही. ज्यांना राजकीय घराणी नाही, त्यांना आजच्या राजकारणात काहीच भवितव्य नाही, हेच सत्य आहे.
लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.