अभिनेत्री अश्विनी महांगडे आणि अभिनेता तसेच राज्यस्तरीय पदकविजेता कुस्तीपटू भूषण शिवतारे यांनी लग्नगाठ बांधली आहे. अश्विनीने २४ ऑक्टोबरला सोशल मीडियावर आपल्या लग्नसोहळ्यातील सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. पाचगणी येथील एका सुंदर रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. अश्विनीच्या मराठमोळ्या वधूच्या लूकसह तिच्या भरजरी मंगळसूत्रानेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अश्विनीचा नऊवारीतील मराठमोळा लूक
लग्नासाठी अश्विनीने सुंदर नऊवारी साडी नेसली होती. पारंपरिक दागिने, नाकातील नथ, हातातील हिरवा चुडा आणि कपाळावरील टिकली आणि मुंडावळ्या यांमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत होता. मराठमोळ्या साजात अश्विनी अतिशय सुंदर दिसत होती. दुसरीकडे, भूषणने ऑफ व्हाइट आणि गोल्डन रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. त्याचाही शाही अंदाज लक्षवेधी ठरला.
भरजरी मंगळसूत्राने वेधलं लक्ष
अश्विनीच्या लग्नातील दागिन्यांमध्ये तिच्या मंगळसूत्राची विशेष चर्चा होत आहे. सोन्याची सर, काळे मणी आणि पारंपरिक दोन वाट्या असलेलं हे मंगळसूत्र उठून दिसत आहे. पारंपरिक मराठी दागिन्यांची आवड असणाऱ्यांसाठी अश्विनीची ही निवड खास ठरू शकते.
तिच्या संपूर्ण वधूच्या लूकला या मंगळसूत्रामुळे पारंपरिक साज चढला आहे. तसेच, चंद्रकोरची डिझाइन असलेल्या मुंडावळ्याही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
सोशल मीडियावर शेअर केले लग्नाचे फोटो
अश्विनीने इन्स्टाग्रामवर लग्नसोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत भूषण अश्विनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसतो, तर अन्य फोटोंमध्ये दोघे विवाहविधी पार पाडताना आणि एकत्र सुंदर पोझ देताना दिसत आहेत. या फोटोंसोबत अश्विनीने नात्याचा अर्थ सांगणारे कॅप्शनही लिहिले आहे.
तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "लग्नाचे सर्वात प्रबळ प्रतीक म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे एकत्र उभे राहणे नव्हे, तर दोन स्वतंत्र अस्तित्वांचे एकरूप होणे हे होय. आमची टीम!" तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह मनोरंजनविश्वातील कलाकारही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
कोण आहे भूषण शिवतारे?
भूषण शिवतारे हा अभिनेता असण्यासोबतच राज्यस्तरीय पदकविजेता ग्रीको-रोमन कुस्तीपटू आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' या चित्रपटात त्याने येसाजी कंक यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
याशिवाय 'रांगडा' आणि 'बंधिनी' या चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे. आता अश्विनी महांगडे आणि भूषण शिवतारे यांच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर या नवदांपत्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.