ANI
राजकीय

एकनाथ शिंदेंचे मिशन मुंबई; उद्धव ठाकरेंकडून मुंबई हिसकवणार?

नवशक्ती Web Desk

शिवसेनेत न भूतो न भविष्यती असे बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे भगदाड पाडले. तसेच पुढे चालून शिवसेनेवर ताबा मिळवला. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातातून सत्ता तसेच पक्ष हिसकावून घेतल्यानंतर आता मुंबईवर पुढील लक्ष केंद्रीत केले आहे. शिंदे यांच्याकडे राज्यातील सत्ता तर आहे. पण आता आगामी महापालिकांचे त्यात सर्वात महत्वाची असलेली मुंबईल मनपाचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर असणार आहे. गेली 25 वर्षे उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असलेली मुंबई महानगर पालिका काढून घेण्यासाठी शिंदे यांनी भाजपच्या मदतीने तयारी सुरु केली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आपल्या ताब्यात राहावी, असे प्रत्येकच पक्षाला वाटते. सर्व पक्ष त्या दिशेने प्रयत्न करताना दिसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमने त्या दिशेन पावले उचलायला सुरुवात केली आहे. पक्षात आलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच आगामी काळात आणखी नगरसेवक तसेच पदाधिकारी शिवसेनेत (शिंदे गटात) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे योग्य रणनिती आखून भाजपच्या मदतीने जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे.

मुंबई जिंकण्यासाठी शिंदेंचे नियोजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या हातातून मुंबई मनपा हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी शिंदे यांच्यासह त्यांची टीम मुंबईच्या प्रत्येक वार्डात शासनाच्या योजना पोहचवण्याचे काम करणार आहे. शासनाची प्रत्येक योजना मुंबईतील सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम शिवसेनेकडून केले जाणार आहे. याअंतर्गत मुंबईत सुरु असलेल्या राज्यसरकारच्या प्रकल्पांची माहिती घराघरात पोहचवली जाणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांच्या संख्येत वाढ केली जाणार असून सणासुदीनुसार विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

आगामी मुंबई मनपा निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र लढणार आहे. भाजपची मुंबईत ताकद असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही मोठी परिक्षा असणार आहे. त्यामुळे शिंदे यांनी मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबईत 95 नगरसेवक आहेत. त्यापैकी आधीचे 11 माजी आणि 2017 च्या निवडणुकीतले 10 माजी नगरसेवक शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झाले आहेत. प्रत्यक्षात निडणूक लागल्यावर टिकीट कापले गेलेले, नाराज असलेले तसेच दुखावले गेलेले अनेक आजी-माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी हे शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या टीमकड़ून अशांचा शोध घ्यायला सुरुवात झाली आहे. मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी शिंदे यांचा अधिक कस लागणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त