संग्रहित छायाचित्र 
राजकीय

सदा सरवणकरांना महायुतीची विधान परिषदेची ऑफर?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत पाठवण्यासाठी मनसेपाठोपाठ महायुतीनेही प्रयत्न सुरू केले आहेत.

Swapnil S

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत पाठवण्यासाठी मनसेपाठोपाठ महायुतीनेही प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिल्याची परतफेड म्हणून महायुतीने आता विद्यमान आमदार सदा सरवणकर यांची मनधरणी सुरू केली आहे. मात्र, हॅटट्रिक लगावण्यासाठी सज्ज असलेले सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळेच सरवणकर यांनी माघार घेण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन महायुतीने दिल्याचे समजते.

४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत महायुती सरवणकर यांचे मन वळवण्यात यशस्वी होते का? आणि सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतील का? हे येत्या चार दिवसांतच स्पष्ट होईल.

माहीम मतदारसंघात सध्या महायुतीकडून शिंदे गटाचे सलग दोन वेळा निवडून आलेले सदा सरवणकर तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि मनसेकडून अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवला - एकनाथ शिंदे

सदा सरवणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मी बोलावले होते. परंतु, कार्यकर्त्यांचा सदा सरवणकरांकडे निवडणूक लढवण्यासाठी खूप आग्रह आणि उत्साह होता. कार्यकर्तेही जपले पाहिजेत. ती निवडणूक आम्ही कार्यकर्त्यांच्या मनावर सोडली आहे. ते जे काही निर्णय घेतील, तो निर्णय घ्यायला त्यांना मोकळीक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मार्ग निघेल ही आशा - फडणवीस

अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत आम्ही भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. आमची बोलणी सुरू आहेत. मुख्यमंत्री, राज ठाकरे, मी, आशिष शेलार आमची चर्चा सुरू आहे. यातून मार्ग निघावा, असा आमचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून आम्ही सर्वजण एकत्र राहायला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी