महाराष्ट्राच्या महायुती सरकारची वर्षपूर्ती झाल्याने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा रिपोर्ट कार्ड वाचून दाखवला. महायुती सरकारने मागील एका वर्षात घेतलेले धोरणात्मक निर्णय हे “महाराष्ट्राच्या दीर्घकालीन विकासासाठी आणि टिकावासाठी निर्णायक” असल्याचे बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि. ५) पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दूरदृष्टीशी सुसंगतपणे पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
बावनकुळे म्हणाले, "अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ₹३२,००० कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. दुष्काळ निवारण उपाययोजना सुरू केल्या आहेत. पीक कर्जाची वसुली स्थगित केली आहे. जलसंचय क्षमता वाढवून नदीजोड प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. लिफ्ट इरिगेशन योजनांसाठी निधी प्राधान्याने देण्यात येत आहे. याशिवाय, जलयुक्त शिवार २.० अंतर्गत एका वर्षात ३७,१६६ कामे पूर्ण झाली आहेत."
राज्यातील मोठ्या प्रकल्पांबाबत सांगताना ते म्हणाले, "समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू केला आहे. शक्तिपीठ महामार्गाची तयारी सुरू आहे. मुंबईसाठी मेट्रो लाईन ११ ला मंजुरी देण्यात आली आहे. उपनगरीय सेवांसाठी २३८ लोकल गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे."
"महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी १० जिल्ह्यांत उमेद मॉल्स सुरु करण्यात आले आहेत. पुढील पाच वर्षांत वीजदर कमी करण्यासाठी सुधारणा करण्यात आली. सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाशी संबंधित प्रकल्पांसाठी निधी देण्यात आली. पीएम आवास योजनेत सुमारे ५ लाख घरे पूर्ण झाली आहेत. गेल्या एका वर्षात पारदर्शकतेसह विकासाचे नवे मानक निश्चित झाले आहेत. डिजिटल सिस्टीममुळे कार्यपद्धती अधिक परिणामकारक झाली आहे,” असे बावनकुळे म्हणाले.