राजकीय

रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि कौटुंबिक संबंध असलेले रवींद्र वायकर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विभागाचे आमदार आहेत. वायकर जर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेले, तर तो उद्धव ठाकरेंसाठी आणखीन एक मोठा धक्का असणार आहे. वायकर यांच्यावर कथित घोटाळ्याचे आरोप असून त्यांची ईडी चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी हा एक प्रकारे दहशतवाद आहे. रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील व जिंकतील. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत, असे एक्सवरून स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे वायकर यांच्या भोवती गेल्या काही दिवसांपासून ईडीने चौकशीचा फास आवळला आहे. कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी वायकर यांच्या निवासस्थानी तसेच मातोश्री क्लबवर धाडी टाकल्या होत्या. आर्थिक गुन्हे शाखेकडूनही वायकर यांची चौकशी सुरू असून गुन्हे शाखेने वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि व्यावसायिक भागीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षप्रवेशापूर्वी वायकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतली होती. या भेटीत चर्चा होऊन वायकर यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार रवींद्र वायकर हे शुक्रवारी प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. वायकर हे मातोश्रीचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. मुंबई महापालिकेत नगरसेवक असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. वायकर हे पहिल्यांदा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी गृहनिर्माण या खात्याचे राज्यमंत्रीपद भूषविले होते.

हा दहशतवाद -संजय राऊत

रवींद्र वायकर यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेतील आमचे सहकारी नेते रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. येत्या काही दिवसांत त्यांना शिवसेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा, असे धमकावले जात आहे. हा एकप्रकारे दहशतवाद आहे. असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते. वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील आणि जिंकतील, आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत, असे राऊत यांनी एक्स या समाजमाध्यमात दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल