(संग्रहित छायाचित्र)
राजकीय

दिल्लीत उद्धव ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट; काय झाली चर्चा?

दिल्लीतील आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

रविकिरण देशमुख

रविकिरण देशमुख/मुंबई

दिल्लीतील आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या दौऱ्यात त्यांनी लोकसभेतील विरोध पक्ष नेते राहुल गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापाठोपाठ सोनिया गांधी यांचीही भेट घेतल्याने आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचे सूत्र या बाबत चर्चा केल्याने महाविकास आघाडीतही सारेच काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात घडामोडी घडल्या त्याबद्दल उद्धव ठाकरे नाराज असल्याचे महाविकास आघाडीतील सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवारांसाठी काम केले नाही, काँग्रेसचे उमेदवार ज्या मतदारसंघात होते तेथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत राहुल गांधी आणि खर्गे यांच्या निदर्शनास आणून दिले, असे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे यांनी पत्रांद्वारे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना माहिती सादर केली, असे या घडामोडींच्या माहितगार सूत्रांनी सांगितले. आपल्या दिल्ली वास्तव्यात उद्धव यांनी आता हा प्रश्न गांधी आणि खर्गे यांच्याकडे उपस्थित केला. इतकेच नव्हे तर जागावाटपाचे सूत्र आणि निवडणूक रणनीती या बाबत राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी वक्तव्ये केली त्यावरूनही उद्धव ठाकरे नाराज असल्याचे कळते.

ठाकरे-काँग्रेसचे सूत जुळले

काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे ठाकरे यांच्याशी उत्तम संबंध ठेवण्याचे प्रयत्न आहेत आणि १७ पैकी १३ जागांवर विजय मिळविला आहे ते त्याचे सूचक आहे. महाविकास आघाडीची रणनीती आणि शिवसेनेशी असलेले संबंध या बाबात जाहीरपणे भाष्य करताना काळजी घ्यावी, असे काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना सांगितले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याबाबत आपले विचार मांडण्याची आणि संयुक्त रणनीती यंत्रणेबाबत मत व्यक्त करण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी साधली त्यामुळे त्यांचे पारडे जड राहणार आहे.

ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री

विधानसभेच्या निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरविला जाईल, असे उद्धव यांना सांगण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) कार्यकर्त्यांना मेहनत घेण्याचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे. एकदा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला. अन्य पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते १०० टक्के योगदान देणार नाहीत, जास्त आमदार ज्या पक्षाचे असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सुनिता केजरीवाल यांची घेतली भेट

दरम्यान, ठाकरे यांनी पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदे केजरीवाल यांची पत्नी सुनिता यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी राघव छड्डा, संजय सिंह आणि खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय - उद्धव ठाकरे