राजकीय

बुलेट ट्रेनचा कुणाला फायदा? राज ठाकरे यांचा पुन्हा केंद्रावर निशाणा: राज्याचा भूगोल धोक्यात

राज्याचा भूगोल धोक्यात आला, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली. यासोबतच बुलेट ट्रेनवरही १ लाख कोटी रुपये कर्च केले.पण, दोन तासांत मुंबई ते अहमदाबाद प्रवास करण्याने नेमका कुणाला फायदा होणार आहे.

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई

जगाचा इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे. आतापर्यंत अनेक आक्रमणे झाली. अनेकांनी जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. भूगोल काबिज करण्यासाठीच संघर्ष केला जात आहे. राज्यातही अतिशय हुशारीने जमिनीवर कब्जा मिळविला जात आहे. त्यामुळे राज्याचा भूगोल धोक्यात आला, अशी भीती मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. यासोबतच बुलेट ट्रेनवरही १ लाख कोटी रुपये कर्च केले जात आहेत. पण, दोन तासांत मुंबई ते अहमदाबाद प्रवास करण्याने नेमका कुणाला फायदा होणार आहे, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन योजनेवरही हल्लाबोल केला.

पुण्यात पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावर थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकार बुलेट ट्रेनसाठी कायम आग्रही असून, राज्य सरकारही केंद्राच्या सुरात सूर मिसळत आहे. मुळात बुलेट ट्रेनची गरज काय, हेच कळाले नाही. या ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबादला अवघ्या २ तासांत पोहोचता येणार आहे म्हणे. परंतु या ट्रेनमुळे नेमका कोणाचा फायदा होणार आहे, त्यासाठी तब्बल १ लाख कोटी रुपये कशासाठी खर्च करायला पाहिजे, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील जमिनी विकत घेऊन राज्याचे अस्तित्व संपविण्याचा घाट घातला जात आहे. याची सुरुवात रायगडपासून होणार असून, न्हावाशेवा शिवडी सीलिंकमुळे रायगडचे वाटोळे होणार आहे, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. खरे म्हणजे जगाचा इतिहास भूगोलावर अवलंबून असतो. परंतु अतिशय हुशारीने जमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल संकटात सापडला आहे. यातून भविष्यात महाराष्ट्राचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते, अशी भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

जातीपातीच्या वादामागे कुणी तरी वेगळाच

महाराष्ट्राने आजपर्यंत संपूर्ण देशाला दिशा दिली. देशातील सर्व विचारांना महाराष्ट्राने विचार दिला. मात्र, आता महाराष्ट्र एकसंध राहू नये, म्हणून सर्व जण प्रयत्न करीत आहेत. आज जे जातीपातीच्या नावावर सुरू आहे ना, त्याच्या मागे कुणी तरी वेगळेच आहेत. त्यामुळे येथील लोकांनी जातीपातीत बरबटून जाण्यापेक्षा सुज्ञ झाले पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त